शोध नात्यांचा भाग ६

Mission of searching relatives

     मागील भागाचा सारांश: राघवच्या बाबांनी व्हिडिओ कॉल द्वारे सुजाताशी संपर्क साधल्याने तिच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. राजेंद्र, संजय आणि सुशीला यांचा शोध घेण्याचे राघव पुढे मोठे आव्हान होते. राघव या संदर्भात अमोलशी बोलतो तर त्याच्याकडून ही माहिती मिळते की त्याचा एक चुलत भाऊ आहे, त्याचे मामाचे गाव नगर जिल्ह्यातील आहे तर तो एका वाड्याबद्दल अमोलला काहीतरी सांगत असतो. अमोल राघवला सांगतो की मी त्याच्याकडून वाड्याबद्दल संपूर्ण माहिती घेतो आणि तुला देतो, कदाचित तुला त्या माहितीचा फायदा होऊ शकेल.

        दुसऱ्या दिवशी अमोल त्याच्या चुलत भावाकडून वाड्याबद्दल सर्व माहिती गोळा करतो आणि राघवला फोन करतो,

राघव--- हॅलो अमोल, वाड्याबद्दल काही माहिती मिळाली का? तो माझ्या आजोबांचाच वाडा आहे का?

अमोल--- राघव किती प्रश्न विचारशील, थोडा श्वास तर घे. मला बोलायची संधी तर दे.

राघव--- अरे हो, मला सर्व ऐकायची इतकी घाई झाली आहे ना, लॉकडाउन नसत तर मी स्वतः गावी जाऊन आलो असतो.

अमोल--- मी माझ्या भावाला वाड्याबद्दल विचारलं तर त्यावेळी तिथे त्याची आई म्हणजे माझी काकू होती तर तिने बरीच माहिती दिली आहे. माझी काकू तुझ्या आजोबांना आणि त्यांच्या पूर्ण कुटूंबाला चांगल्या रीतीने ओळखते. माझी काकू तुझ्या सुशीला आत्त्याची वर्गमैत्रीण आहे.

राघव--- मी तुझ्या काकूशी बोलू शकतो का?

अमोल--- हो तुझ्या ज्या काही शंकाकुशंका असतील त्या त्यांनाच विचार. मी त्यांच्या घरी जाऊन तुला फोन लावून देतो.

      राघव मनोमन सुखावला होता, राघवला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अमोलच्या काकूकडे असतील अशी आशा राघवला होती. अमोलने राघवला फोन केला,

अमोल--- राघव माझ्या काकूशी बोल

अमोलची काकू--- हॅलो

राघव--- हॅलो काकू मी राघव बोलतोय, आनंद देशमुखांचा मुलगा

अमोलची काकू--- हो बोल ना, अमोलने मला सर्व कल्पना दिली आहे, तुला काय महिती हवी आहे.

राघव--- काकू तुम्हाला जी काही देशमुख परिवाराची माहिती असेल ती सांगा.

अमोलची काकू--- मी आणि तुझी सुशीला आत्या शाळेपासून एकाच वर्गात होतो त्यामुळे मला थोडीफार माहिती आहे, ती मी तुला सांगते. तुझे बाबा आणि ते पाच भावंडे होती. तुझे आजोबा खूप कडक आणि शिस्तीचे होते, त्यांना बेशिस्तपणा अजिबात चालायचा नाही. गावातील सगळेजण त्यांना अण्णा आणि तुझ्या आजीला ताई म्हणायचे. अण्णांचा स्वभाव जरी कडक असला तरी त्यांच्यात माणुसकी खूप होती, ते नेहमीच सर्वांना मदत करायचे. ताईंचा स्वभाव तर खूप प्रेमळ होता. देशमुखांच्या वाड्यावर कोणी गेलं आणि चहा न पिता आलं अस होऊच शकत नाही. लहान मूल गेली तर ताई त्यांना रव्याचे लाडू खायला द्यायच्या. ताईंच्या हाताला खूप चव होती. नजर लागेल असा वाडा आणि त्यातील लोकं होते. सर्व काही सुरळीत चालू होते. तुझ्या बाबांच म्हणजेच आनंद दादाच कधीच सुत जुळले नाही, दादा जसा मोठा होऊ लागला तसे त्यांच्यातील वाद वाढायला लागले, एके दिवशी वाद विकोपाला गेल्यामुळे आनंद दादाने कोणालाही न सांगता घर सोडले ते कायमचेच. अण्णांनी घरातल्या सर्वांना सक्त ताकीद दिली की आनंद परत आला तरी त्याला घरात घ्यायचे नाही. आनंद दादा गेल्यानंतर ताईंची तब्येत खालावली, त्यांचा स्वभाव खूप हळवा होता. ताईंना खुप अशक्तपणा आला होता, आनंद दादा त्यांच्या खूप जवळचा होता. ताईंना सावरायला जवळजवळ तीन ते चार महिने लागले. अण्णांच्या भीतीमुळे ताईंना मनमोकळं रडताही येत नव्हतं. हळूहळू दिवस जात होते तश्या सगळ्याच गोष्टी बदलत होत्या. राजेंद्र दादा अभ्यासात हुशार होता, त्याला स्कॉलरशिप मिळाल्याने तो तालुक्याच्या शाळेत शिक्षण घेऊ लागला, तो शाळेच्या बोर्डिंगमध्ये राहत असे, त्याने पुढील शिक्षण शहरातच पूर्ण केले, कॉलेजमुळे तो गावाकडे कमी वेळा यायचा. संजय दादा अभ्यासात जेमतेम होता, त्याला अभ्यासात जास्त रस नव्हता, तो अण्णांना शेतीच्या कामात मदत करायचा. सुशीला व सुजाता दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या. सुजातालाही राजेंद्र दादा प्रमाणे स्कॉलरशीप मिळाली आणि ती पुढील शिक्षणासाठी शहरात गेली. राजेंद्र दादाला सरकारी नोकरी लागली होती. अण्णांना राजेंद्र दादाचा खूप अभिमान वाटायचा. राजेंद्र दादाचे लग्न अण्णांनी त्यांच्या नात्यातील मुलीशी लावून दिले, ती शिकलेली होती, तिला गावाकडे रहायला आवडायचे नाही म्हणून राजेंद्र दादाचे गावाकडे येणे जाणे कमीच झाले. सुजाताने प्रेमविवाह केल्याने तिचाही सगळ्यांशी संपर्क तुटला. संजय दादाच त्याच्या मामाच्या मुलीशीच लग्न झालं, संजय दादा जेमतेम बारावी पर्यंत शिकला आणि शेतीकामाला लागला. सुशीला दिसायला सुंदर होती, ती बारावीला असतानाच तिच्यासाठी एका डॉक्टर मुलाचे स्थळ चालून आले, लग्नानंतर सुशीलाला पुढे शिकवण्याची जबाबदारी मुलाने घेतली, त्याप्रमाणे सुशीला पुढे जाऊन स्त्रीरोग तज्ञ झाली. मी अस ऐकलंय की सुशिलाचे मुंबईत स्वतःचे हॉस्पिटल आहे. मला देशमुख परिवाराबद्दल एवढीच माहिती आहे.

राघव--- आता संजय काका गावालाच राहतात का? आजी आजोबांच पुढे काय झालं? तुमच्याकडे सुशीला आत्त्याचा फोन नंबर आहे का?

अमोलची काकू--- मी बारावीला असताना माझंही लग्न झालं, मला माहेरी जाण फारसं जमायचं नाही. कालांतराने तुझी आजी आधी देवघरी गेली आणि त्यानंतर काही महिन्यातच तुझे आजोबाही देवाघरी गेले. माझा आणि सुशिलाचा लग्न झाल्यापासून काहीच संपर्क नाहीये. राहिला प्रश्न तुझ्या संजय काकाचा तर मी काही दिवसांपूर्वी गावाला गेले होते त्यावेळी मला अस ऐकायला भेटलं की संजय दादाला दारूचे व्यसन लागले आहे, त्या व्यसनामुळे त्याने सावकाराकडे तुमचा वाडा गहाण ठेवला आहे. सावकाराला कोणीतरी सांगितले होते मी त्या वाड्यात खजिना दडलेला आहे म्हणून संजयने कर्ज फेडून सुद्धा सावकाराने वाडा परत करायला नकार दिलाय आणि असही ऐकण्यात आलंय की सावकार खजिना शोधण्यासाठी वाडा पाडणार होता. खरी परिस्थिती मला ठाऊक नाही.

राघव--- अरे बापरे हे तर आता काहीतरी विपरीत घडतंय, सावकार अस काहीच करू शकत नाही. मला संजय काकांचा फोन नंबर मिळू शकतो का?

अमोलची काकू--- माझ्याकडे तर नाहीये पण मी माझ्या भावाकडून फोन नंबर घेऊन तुला देते.

राघव--- काकू तुमचे जितके आभार मानू तितके कमीच आहे. माझे बाबा तुम्हाला ओळखत असतील ना.

अमोलची काकू--- हो त्याला सांग मंजुळेंच्या संगीताशी तुझं बोलण झालं, आनंद दादा मला नक्कीच ओळखेल. आणि राघव आभार मानण्याची गरज नाहीये. ताई व अण्णांचा विखुरलेला परिवार जर परत एकत्र आला तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल आणि जर हे करण्यात माझा खारीचा वाटा असेल तर मला आनंदच होईल आणि हो तुझा सुशीला आत्त्याशी जर काही संपर्क झाला तर तिला सांग संगीता मंजुळे तुझी आठवण काढत होती.

राघव--- हो नक्कीच काकू.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all