शोध नात्यांचा भाग १

Mission of searching relatives

      लॉकडाउन लागल्याने राघवला ऑफिसला सुट्टी भेटली होती. राघव हा मेकॅनिकल इंजिनिअर होता, तो एका नामांकित कंपनीत नोकरी करायचा. एरवी राघव व त्याच्या बाबांमध्ये खूप कमी बोलण व्हायच, राघवच्या बाबांचा स्वभाव कडक व फटकळ होता त्यामुळे राघवला आपल्या बाबांचा स्वभाव पटत नसायचा, राघव व बाबांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी व्हायच्या, एकदा तर त्यांच्यातील वाद खूपच विकोपाला गेला होता म्हणून राघवच्या आईने दोघांनाही सांगितले होते की एकमेकांशी बोलला नाहीत तरी चालेल पण मला या घरात वाद नको. तेव्हापासून राघव बाबांशी थोडंफार बोलायचा आणि जास्तच काही महत्त्वाचे बोलायचे असेल तर आईच्या मार्फत बोलायचे. राघवचे बाबा मेकॅनिक होते, त्यांनी खूप कष्टातून मोठे गॅरेज टाकले होते, बाबांची इच्छा होती की राघवने गॅरेजकडे लक्ष द्यावे पण राघवला हे मान्य नव्हते. 

         लॉकडाउन झाल्यामुळे राघवला व त्याच्या बाबांना घरातच थांबावे लागले. दिवसभरात दोघेही अनेकदा समोरासमोर यायचे, त्यांची दोघांचीही एकमेकांशी बोलायची इच्छा व्हायची पण बोललं तर वाद होतील म्हणून ते बोलणं टाळायचे, हे राघवच्या आईच्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही. लॉकडाउन मध्ये आपण बघितलं असेल की सगळ्यांनाच मोकळा वेळ मिळाल्यामुळे सर्वांनाच आपल्या नातेवाईक व जुन्या मित्र मैत्रिणींची आठवण झाली. राघवच्या बऱ्याच मित्र मैत्रिणींनी त्यांच्या नातेवाईकांसोबत केलेल्या ग्रुप व्हिडिओ कॉल्सचे स्क्रीनशॉट्स काढून स्टेटस ला टाकले. राघवला ते बघून आपल्याही नातेवाईकांना संपर्क करावा वाटला पण राघवला त्याचे कोणी नातेवाईक आहे की नाही हेच माहीत नव्हते, याबद्दल त्याने आईला विचारायचे ठरवले,

राघव--- आई आपल्याला कोणी नातेवाईक आहे की नाही?

आई--- मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी, माझ्या आई बाबांना तर तु ओळखतोस, माझे चुलत बहीण भाऊ म्हणशील तर माझ्या आई बाबांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे सर्वांनी त्यांच्याशी संपर्क तोडून टाकला होता त्यामुळे माझा आणि कोणाचाच संपर्क आला नाही, आई बाबा गेल्यावर माझं अस कुणीच उरलं नाही.

राघव--- आई बाबांच्या नातेवाईकांबद्दल काय? त्यांनाही भाऊ बहीण असतील ना.

आई--- हे तु त्यांनाच विचार ना, मला माहित आहे, तुला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होते पण मुद्दामून त्यांना टाळतो.

राघव--- आई कुठल्या मुलाला त्याच्या बाबांशी अबोला धरायला आवडेल? पण बोललं तर आमच्यात वाद निर्माण होईल म्हणून मी त्यांना टाळतो. ते जाऊदे तुला बाबांच्या नातेवाईकांबद्दल काही माहीत असेल तर सांग ना.

आई--- तुझे बाबा १६ वर्षांचे असताना त्यांनी घर सोडून इकडे मुंबईत आले आणि इकडेच राहिले, सुरवातीला ते एका गॅरेजमध्ये कामाला होते, काम करता करता त्यांनी graduation पूर्ण केलं. माझी आणि त्यांची भेट कॉलेज मधेच झाली. ते कितीही तापट असतील, फटकळ असतील पण ते मनाने खूप प्रेमळ आहेत. कॉलेज मध्ये असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, तुझे बाबा कर्तृत्ववान वाटल्यामुळे माझ्या बाबांनीही आमच्या लग्नाला विरोध केला नाही. लग्न झाल्यानंतर मी तुझ्या बाबांना त्यांच्या आई वडील व बहीण भावांबद्दल विचारलं होत, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नगर जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे, तिथे ते राहायचे, त्या गावात त्यांचा एक वाडाही आहे. तुझ्या बाबांच व त्यांच्या बाबांच एकमेकांशी पटायचे नाही, नेहमीच त्यांच्यात भांडणं व्हायची, एक दिवस खूप मोठं भांडण झालं आणि तुझ्या बाबांनी रागात घर सोडलं.

राघव--- बाबांना त्यांच्या घरच्यांची आठवण येत नसेल का?

आई--- माहीत नाही, माझ्याशी ते कधीच त्या विषयावर बोलले नाही, तूच विचारून बघ.

          राघव ठरवतो की दुसऱ्या दिवशी बाबांना त्यांच्या बहीण भावांबद्दल विचारायचं. सकाळी सकाळी बाबा चहा घेऊन पुस्तक वाचत बसलेले असतात, राघव त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्या जवळ जातो,

राघव--- बाबा तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? मला तुमच्याशी बोलायच आहे.

बाबा--- आज तर माझं भाग्यच उजळलं, आमच्या चिरंजीवांना आमच्याशी बोलवस वाटतंय.

राघव--- बाबा उगाच माझी खेचत बसू नका, मला खरच तुमच्याशी बोलायच आहे.

बाबा--- कोणा मुलीच्या प्रेमात पडला आहेस का? लग्नासाठी परमिशन पाहिजे का? 

राघव--- बाबा आता हे काय मधेच

बाबा--- अरे या वयात मुलं बापाशी याच विषयावर बोलायला येतात.

राघव--- बाबा मला वेगळ्याच विषयावर बोलायच आहे.

बाबा--- बोल काय बोलायच आहे?

तेवढ्यात आई तिथे येते.

आई--- तुम्हाला दोघांना जे बोलायच ते बोला, पण एकमेकांशी वाद घालू नका आणि माझ्या डोक्याचा ताण वाढवू नका, एकतर या कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही.

राघव--- आई तुझं राहुदेत, तु इथे बसून आमच्या बोलण्याकडे लक्ष ठेव,ज्यावेळी तुला अस वाटेल की आमचं बोलण वादाकडे सरकत आहे त्यावेळी तु आम्हाला थांबव म्हणजे आमच्यात वाद होणार नाही.

बाबा--- राघव तुझ्या आईकडे दुर्लक्ष कर, तुला माझ्याशी काय बोलायच आहे ते बोल.

राघव--- बाबा मला आपल्या नातेवाईकांबद्दल काहीच माहीत नाही, म्हणजे मी लहानपणापासून बघत आलोय, आपल्याकडे तुमचे काही मित्र सोडले तर कोणीच येत नाही किंवा आपणही कोणाकडे जात नाही, आपलं मूळ गाव कोणतं आहे? तुमचे आई बाबा कुठे राहत होते? तुम्हाला भाऊ बहीण किती? आणि ते कुठे असतात? माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना नातेवाईक आहेत, ते त्यांच्याकडे जातात, लग्न, कार्यक्रम एकत्र साजरे करतात, ते सोबत किती मजा करतात. मला तुम्ही दोघे सोडून कोणीच नाही.

बाबा--- राघव बेटा इतके दिवस तु मला काही विचारलं नाही आणि मलाही तुला काही सांगावस वाटलं नाही. पण आज तुला एवढे प्रश्न पडलेच आहे तर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. माझे आई बाबा नगर जिल्ह्यात एका गावी राहायचे, मला दोन बहिणी आणि दोन भाऊ असे आम्ही पाच भावंडे होतो, मी सगळ्यात मोठा, माझ्या पाठचे दोन भाऊ आणि त्यानंतर दोन बहिणी. माझ्या बाबांना आम्ही अण्णा म्हणायचो, आमचे अण्णा माझ्यासारखेच तापट स्वभावाचे होते, आमच्या दोघांचा स्वभाव सारखा असल्याने आमचे एकमेकांशी कधीच पटायचे नाही. मी घरात मोठा असल्याने त्यांचे सतत एकच म्हणणे असायचे की तु जबाबदारीने वागायचं, हट्ट करायचा नाही, आपल्या लहान बहीण भावांना सांभाळायच. अरे पण त्यांना हे का समजत नव्हतं की मीही लहानच होतो ना. मला खूप शिकायच होत पण अण्णांची इच्छा होती की मी शाळा सोडून अण्णांना शेती कामात मदत करावी, मला हे मान्य नव्हतं, आईला माझी शिक्षणाप्रती असलेली तळमळ समजायची पण तिचे अण्णांपुढे काहीच चालायच नाही. एके दिवशी अण्णांनी माझी पुस्तके जाळली आणि आमच्यात खूप भांडण झाले त्याच वेळी मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी इकडे मुंबईत आलो, गॅरेजमध्ये काम केले, काम करता करता शिक्षणही घेतले. त्या दिवसांनंतर मी गावाकडे कधीच गेलो नाही. माझ्या बहीण भावांच काय झालं? ते कुठे असतात? याची मला पुसटशीही कल्पना नाहीये. 

राघव--- बाबा तुमच्याकडे त्यांचा फोटो आहे का?

बाबा--- नाही, माझ्याकडे फक्त ती लाकडी गणपतीची मूर्ती आहे जी अण्णांनी मला लहानपणी दिली होती आणि सांगितलं होतं की जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी ही मूर्ती स्वतःकडे ठेव, ही गणपतीची मूर्ती म्हणजे तुझं अस्तित्व आहे, तुझा उगम आहे. 

राघव--- बाबा तुम्हाला तुमच्या बहीण भावांना भेटायला आवडेल का?

बाबा--- अरे नक्कीच आवडेल पण मला भेटायला त्यांना आवडले पाहिजे ना, पण त्यांना शोधायचं कस? कारण आता सध्या लॉक डाउन आहे तर आपल्याला गावी जाता येणार नाही.

राघव--- बाबा माझ्याकडे एक आयडिया आहे, मला तुमच्या बहीण भावांची नावे सांगा, मी त्यांना सोशल मीडियावर शोधतो.

बाबा--- अरे पण राघव ते सोशल मीडियावर असतील का?

राघव--- बाबा आपण शोधून तर बघूया.

 राघवला त्याच्या नातेवाईकांचा शोध लागेल का? बघूया पुढील भागात

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all