Login

II ~ शिवरायांचे शिलेदार ~ II

शिवरायांचे शिलेदार या ऐतिहासिक माहितीपर लेखन संग्रहातील सरदार कोयाजी बांदल यांची माहिती.

II ~ शिवरायांचे शिलेदार ~ II
ll ~ सरदार कोयाजी बांदल ~ ll

        सन १६५७ च्या आसपास छ. शिवरायांनी रोहिडा घेतला. तेव्हा, हिरडस मावळातले देशमुख कृष्णाजी बांदल हातघाईच्या लढाईत मारले गेले. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू हे त्यांच्याकडे देशपांडे या पदावर चाकरीस होते. छ. शिवरायांनी स्वराज्याचे महत्व पटवून त्यांना व समस्त बांदलांना स्वराज्यात सामील करून घेतले. रायाजी आणि कोयाजी बांदल हे याच बांदल घराण्यातले. बाजी आणि फुलाजीप्रभू देशपांडे हे जणू त्यांना वडिलांप्रमाणेच होते.

        रायाजी आणि कोयाजी दोघेही शूरवीर...! धाडसी आणि निडर...! अफजलखान वध प्रसंगी बांदलांनी अपूर्व शौर्य दाखवले. रायाजी आणि कोयाजी बांदल यांच्या तुकडीनेही अफजलखानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. संधीचा फायदा उठवत शिवरायांनी आदिलशाहीचा बहुतांशी प्रदेश तसेच पन्हाळा, विशाळगड असे बलाढ्य आणि इतर किल्ले स्वराज्यात आणले. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर तीस हजारांची फौज घेऊन शिवरायांच्या मागावर निघाला आहे, हि खबर मिळताच राजांनी माघार घेतली आणि पन्हाळ्यासारख्या बलाढ्य, दुर्गम आणि विस्ताराने मोठा असलेल्या किल्ल्यावर आश्रयासाठी थांबले. स्वराज्याला आदिलशाही आक्रमणाची तोशीस पडू नये, म्हणून राजांनी लढाईसाठी पन्हाळा किल्ला निवडला. यावेळी राजांसोबत बाजी - फुलाजी समवेत सात आठशे लढाऊ आणि कसलेली अनुभवी बांदल सेना होती. त्यांना त्या परिसराची खडानखडा माहिती होती. तान्हाजी, येसाजी, जिवाजी आणि इतर सरदार मिळालेली संपत्ती, तोफा, हत्ती, घोडे घेऊन राजगडावर पोहोचले होते. तर नेतोजी पालकर पाच हजारांची सेना घेऊन आदिलशाही मुलखात लुटालूट करत होते. शिवाय, जौहरच्या सैन्यावरही छुपे हल्ले करीत होते. चार महिने उलटून गेले. जौहरचा वेढा उठण्याची चिन्हे दिसेनात. तेव्हा बहिर्जी नाईकांच्या गुप्त आणि खात्रीशीर बातम्या तसेच बाजी - फुलाजी यांच्या जबरदस्त योजने अंर्तगत एक धाडसी निर्णय घेण्यात आला. पन्ह्याळ्यावरून विशाळगडाकडे पलायन! २२ जुलै १६६० रोजी योजना अमलात आणली गेली.

        बाजी व फुलाजीप्रभू यांनी जवळपास ३०० कडव्या बांदल सेनेचे नेतृत्व करत गजापूरची खिंड अडवून धरली. तर रायाजी - कोयाजी उरलेल्या तीन चारशे बांदल सेनेसह राजांना घेऊन विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले. बाजी, फुलाजीप्रभू या बंधूंनी बांदल सेनेसमवेत सिद्दी मसूदच्या सेनेला कडवी झुंज दिली. प्राणाचं बलिदान देऊन खिंड दोन ते तीन प्रहार लढवली. शिवरायांना तेवढा वेळ विशाळगडावर पोहोचायला मिळाला. पण गडाला सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी या आदीलशाही मराठा सरदारांचा वेढा पडला होता. गुप्तहेरांकडून बातमी मिळताच गडावरील चार पाचशे शिबंदी आणि सोबतची ३०० बांदल सेना. दोहोंच्या रेट्यापुढे शत्रूचा प्रतिकार मोडून काढत, राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले. या लढाईत रायाजी आणि कोयाजी बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याच रात्री  बाजी, फुलाजी आणि बांदल सेनेच्या अपूर्व पराक्रमाची आणि बलिदानाची खबर गडावर आली. राजांना अपार दुःख झाले. रायाजी, कोयाजी यांचा संताप उफाळून आला. राजांनी त्यांचे सांत्वन केले. रायाजी, कोयाजी यांच्या विनंतीला मान देऊन राजांनी त्यांना गडाच्या खाली वेढा देऊन बसलेल्या शत्रूवर हल्ला करण्याची अनुमती दिली. सिद्दी जौहरचा जावई सिद्दी मसूद आणि आदिलशाही सरदार  सुर्वे विशाळगडाला तीन चार हजार सैन्याचा वेढा देऊन बसले होते. गडाच्या  आकाराच्या मानाने सैन्य खूपच कमी होते. रायाजी कोयाजी यांनी एका रात्री  अचानक हल्ला केला. दोन चारशे शत्रू कापून काढले. काही तोफा निकामी केल्या. तंबूंना आगी लावल्या तर बरेचसे सामान लुटून नेले. शत्रू सैन्य सावध होऊन संख्याबळ वाढताच, त्यांनी माघार घेतली. पण बाजी. फुलाजी यांच्या बलिदानाचा  सूडाग्नी हृदयात अजूनही धगधगत होता. राजांनी सिद्दी मसूदचा वेढा  विशाळगडावरून तोफा बंदूक चालवून उधळवून लावला. शिवाय, नेताजी पालकर ही पाच हजारांची सेना घेऊन येत आहे, हि खबर मिळताच सिद्दी मसूद वेढा उठवून पन्हाळ्याच्या दिशेने धावत सुटला.

        महिन्याभरात राजे राजगडावर पोहोचले. दरबारामध्ये शिवरायांनी रायाजीला तलवारीच्या पहिल्या पानाचा मान तर 'नाईक' हा किताब बहाल केला. कोयाजी बांदल याचाही अतुलनीय पराक्रमाबद्दल राजांनी वस्त्रे ,तलवार देऊन गौरव केला. त्याचबरोबर चाकणच्या संग्रामदुर्गावर झालेल्या लढाईमध्ये पंचावन्न ते साठ दिवस शत्रूला झुंजवणाऱ्या फिरंगोजी बाबा यांचाही मानाची वस्त्रे तलवार देऊन गौरव करण्यात आला. संग्रामदुर्ग, तेवढाच काय तो विजय शाहिस्तेखानास मिळाला. त्यानंतर  मात्र सगळीकडे, त्याने पाठवलेल्या सरदारांचा दारुण पराभव होत होता. उंबरखिंडीत कारतलब खानाचा धुव्वा उडवून राजांनी शाहिस्तेखानास मोठा धक्का दिला, तरीही स्वतः खान काही पुण्यातून बाहेर यायचं नाव घेईना. दरम्यानच्या काळात शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली. त्याने अनेक गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले. तब्बल तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देत होता. सर्व सामान्य जनता आणि डोंगर दऱ्याखोऱ्या हेच स्वराज्याचे बळ होते. डोंगरी किल्ले घेणे आपल्याला शक्य नाही. त्यापेक्षा प्रजेला त्रास देणं सोपं होतं. त्याशिवाय शिवाजी महाराज हाती लागणार नाहीत, हे खानाला उमगले होते. शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली. राजांनी धाडसी निर्णय घेतला. पुण्यातल्या लालमहालावर छापा!

        साल होतं एप्रिल १६६३. रमजानचा महिना. सुरु होऊन आठवडा झाला होता. पाचशेच्या आसपास निवडक मावळे घेऊन राजांनी लालमहालावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. सोबत येसाजी, तानाजी, कोयाजी, बाळाजी, चिमणाजी, रायाजी, बहिर्जी आणि इतर विश्वासू लढवय्ये होते. नेताजी पालकर आंबील ओढ्याजवळ दोनशे मावळे घेऊन सज्ज होते. राजांसोबत येसाजी आणि तान्हाजी शाहिस्तेखानच्या मागावर तर खाली रायाजी, कोयाजी आणि इतर. शाहिस्तेखानच्या दालनाकडे जाणारी वाट रायाजी, कोयाजी यांनी अडवून धरली. हातघाईची लढाई झाली. कोयाजी बांदल पाच पन्नास शत्रूंना कंठस्नान घालून जखमी झाले. मोहीम फत्ते झाली. पाच एक मावळे कामी आले तर दहा पंधरा जखमी! घाव खोलवर असल्याने कोयाजी बांदल जबर जखमी झाले होते. भोर जवळ त्यांच्या गावी उपचार चालू असतानाच कोयाजी बांदल यांना वीरमरण आले.

    मित्रांनो, स्वराज्यासाठी असे कित्येक शूरवीर आपले पंचप्राण उधळून गेले. आपली मराठी माती पावन करून गेले. भोरला जाताना नीरा नदीच्यानागमोडी वळणांनी प्रसिद्ध पावलेला नेकलेस पॉईंट पाहायला लोक आवर्जून जातात. पण रस्त्याच्या विरुद्ध बाजूला "कोयाजी बांदल समाधी स्थळ" म्हणून असलेला फलक दुर्लक्षितच राहतो. जवळच असलेल्या बसस्टँडच्या बाजूने, पायवाटेने अंदाजे शंभर एक मीटर चालून गेलं कि, श्री खंडोबाचे मंदिर लागते. मंदिराच्या उजव्या बाजूने अंदाजे शंभर मीटर अंतर चालून गेल्यावर झाडाझुडपांमध्ये, टेकडीच्या मध्यावर 'सरदार कोयाजी बांदल' यांची समाधी आहे. त्यांच्या शौर्याची, बलिदानाची साक्ष देत आजही उभी आहे.

मित्रांनो, भोर परिसरामध्ये सहलीसाठी जात असाल तर नीरा नदीवरील नेकलेस  पॉईंटचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जरूर थांबा. पण, थोडा वेळ काढून, स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सरदार कोयाजी बांदल यांच्या समाधीचेही दर्शन जरूर घ्या!

रायरेश्वर - केंजळगड ट्रेक जरूर करा! पण, आंबवडे गावातील नागेश्वराच्या मंदिरालाही जरूर भेट द्या! तिथेही सरदार कान्होजी जेधे, जिवाजी महाले यांची स्मृतीस्थळे आहेत.

तसेच बांदल देशमुख घराण्यातील शूरवीरांची स्मृतीस्थळे पिसावरे या गावात आहेत. इतिहासप्रेमी, गडकोट भटकंती करणारे ट्रेकर्स आणि सहलीसाठी येणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी.

अशी अनेक स्मृतिस्थळे, समाध्या आपल्या आजूबाजूला, या मराठी मातीतील शूरवीरांच्या पराक्रमाच्या, बलिदानाच्या आठवणींना उजाळा देत आजही उभ्या आहेत. तुमच्या आमच्यासारख्या मावळ्यांची वाट पाहत!

ll ~ जय शिवराय ~ l