Login

शिवराज्याभिषेक सोहळा वर्णन

A great worrier.

                      निश्चयाचा महामेरू

                   बहुत जनांसी आधारु |

                  अखंड स्थितीचा निर्धारु |

                        श्रीमंत योगी ||

वरील ओळीत समर्थ रामदासांनी महाराजांची महती अगदी सोप्या शब्दांत रेखाटली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वबळावर हे उभं स्वराज्य निर्माण केलं. जाणता राजा ज्याने आपल्या उभ्या आयुष्यात केवळ मुघलांशीच नव्हे तर अनेक अन्य घुसखोरांसोबत संघर्ष करून हे स्वराज्य निर्माण केलं वाचवलं आणि वाढवलं देखील. महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अन एक अनन्यसाधारण सोहळा जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिले छत्रपती म्हणून ओळखला जाऊ लागला तो म्हणजेच "शिवराज्याभिषेक सोहळा".

शिवराज्याभिषेक हा भव्य दिव्य सोहळा दुर्गराज रायगडावर योजिला होता. इतिहासाची पाने चाळली तर असं समजतं की साधारण ५०० वर्षांपूर्वी रायगडास गडाचे स्वरूप नव्हते. केवळ समुद्रतटावर वसलेला एक डोंगर होता . त्यास "रायरी" या नावाने संबोधले जायचे. युरोपचे लोक त्यास "पूर्वेकडील जिब्राल्टर" असे म्हणत. त्याचा आकार, ऊंची व सभोवतालच्या दऱ्या यामुळे त्यास "नंदादीप" असेही नाव होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग केवळ कैदी ठेवण्यापुरता होई. जावळीतील मोरे घराणं तेथील मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर आला तर प्रतापराव मोरे विजापुरास रवाना झाले. ६ एप्रिल १६५६ रोजी महाराजांनी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड मिळवला देखील. ह्या काळात त्यांनी मोऱ्यांच्या वारसाला या गादीवर बसवलं; पण पुढे त्यानेच विश्वासघात केला. रयतेवर जुलुम करू लागला. त्याचा हा उर्मटपणा महाराजांना समजला. त्यांनी त्याचा निःपात  करून जावळी स्वराज्यात आणली. यानंतर महाराजांनी रायरीचे नामकरण "रायगड" असे केले.

रायगड हा समुद्रतटावर वसलेला विशाल हृदयी, आकाशाशी सलगी करणारा एक भव्य दिव्य किल्ला होता. अतिशय अवघड अन एकुलती एक वाट. विस्तृत पठार आणि भक्कम तटबंदी आणि समुद्रतटालगतचं स्थान यामुळे समुद्री सत्तांना आळा घालण्यासाठी रायगड हा उत्तम पर्याय. १६७० मध्ये कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी वसविण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अन लक्षणीय घटना आहे. भव्य तटबंदी, अचूक उभारलेले बुरुज, चोरवाटा, महाद्वार रायगडाची राजधानी म्हणून भव्यता पदोपदी सिद्ध होते. राजधानी रायगडास आतुरता होती ती राज्यांच्या राज्याभिषेकाची. बत्तीस मणांचे सुवर्णसिंहासन जितकी अनमोल रत्ने कोशात लावलेली होती तितकीच अनमोल अन रूपक रत्ने या सिंहासनावर विराजली होती. सिंहासनास अन् राज्याभिषेकास योग्य स्थळ रायगड हे नमले गेले. अखेर तो दिवस उजाडला. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ आनंदनाम संवत्सर तारीख ६ जून १६७४ महाराजांनी या मंगल व पवित्र प्रभाती शुचिर्भूत होऊन श्री महादेव व कुलस्वामिनी आई भवानी यांचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभाकर उपाध्ये यांचे पुत्र कुलगुरु बालभट्ट व गोसावी भट यांची यथाविधी अलंकार व वस्त्रे देऊन पुजा करण्यात आली. सर्वांना मनःपूर्वक नमन करून पुढे राजांना अभिषेकासाठी सुवर्णचौकीवर बसविण्यात आले. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंडळी व उपस्थित ब्राम्हण यांच्या हस्ते महाराजांवर सुवर्णकलशातून अभिषेक करण्यात आला. सर्व पूज्य मंडळींना दिव्य वस्त्रे व दिव्य अलंकार प्रदान करून महाराज सिंहासनावर बसले. सिंहासनाजवळ आठ खांब उभे केले होते. प्रत्येक खांबाजवळ एक असे आठ प्रधानांना उभे करण्यात आले. पूर्वी कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात ज्याप्रमाणे राज्याभिषेक केला जाई अगदी तसाच शास्त्रोक्त पद्धतीने हा सोहळा साजरा झाला. त्यानंतर रत्नजडित झालरीचे भव्य छत्र महाराजांच्या डोक्यावर धरण्यात आले.  सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुशोभित केलेले भाले उभे केले होते. भाल्याच्या टोकावर मुसलमानी पद्धतीप्रमाणे सत्ता आणि अधिकार यांची निदर्शक चिन्हे होती. उजवीकडील भाल्यावर दोन मोठे मासे होते. त्यांची डोकी सोन्याची होती. त्यांचे दात मोठे होते. डावीकडील भाल्यावर घोड्याच्या पुष्कळ शेपट्या होत्या. एका रत्नजडीत भाल्याच्या टोकावर सोन्याचा एक तराजू होता. हा तराजू म्हणजे न्यायाचे द्योतक. वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूस दोन लहान हत्ती होते आणि सोनेरी लगाम व मौल्यवान खोगीर वगैरे घातलेले दोन उमदे घोडे होते.महाराजांना छत्रपती असे संबोधले गेले. क्षत्रीयकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती म्हणून सिंहासनावर विराजमान झाले.

यादिवशी हिंदवी साम्राज्याची कीर्ती सर्वदूर पसरली आणि याच दिवसापासून शिवराई वापरात आली. याच दिवशी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ स्थापित झालं. त्यात मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे, पंत अमात्य रामचंद्र बावडेकर, पंत सचिव अण्णाजी दत्तो आणि इतर मंत्री नेमले गेले. सार्वभौम स्वराज्याला त्याचा राजा मिळाला. राजनैतिक कार्य काम पार पाडण्याकरिता अष्टप्रधान मंडळाची स्थापना अत्यंत गरजेचं होतं.एका सार्वभौम राजसत्तेची समाजहितकारक मूल्ये जपण्यासाठी एक राजसिंहासन निर्माण होणं जरूर असतं. ते त्या सार्वभौम राजसत्तेचं प्रतीक असतं. या प्रतिकांतूनच सिंहासनारूढ होणारा राजा रयतेचं कल्याण साधु शकतो. असं एक तख्त गरजेचं असतं जिथे केवळ समजाकल्याणाचा विचार वास करतो आणि हेच तख्त महाराजांनी निर्माण केलं आणि एक सार्वभौम, ध्येयनिष्ठ राजा हिंदवी साम्राज्याला लाभला हे आपले भाग्य. अश्या या महान पराक्रमी जाणत्या राजास त्रिवार वंदन. महाराजांची गारद या मंगलप्रसंगी उपस्थित कराविशी वाटते.

आस्ते कदम

आस्ते कदम

आस्ते कदम

महाराज गडपति, गजपती, भूपति, प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्ठित, न्यायालंकारमण्डित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, राजनीतिधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, महाराजाधिराज, योगिराज,

श्रीमंत श्रीमंत श्रीमंत

श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

©श्वेता कुलकर्णी♥️