शिवकाव्य कौस्तुभ भाग १

Shivkavya Kaustubh part 1
ही महाराष्ट्र भूमी, म्हणजे देव देवतांची आणि संतांची भूमी आहे.
समृद्ध असा इतिहास असलेल्या, आणि संस्कृतीचा महान वारसा असलेल्या, संपन्न अशा या भूमीत…
अनेक राजघराणी, शुरवीर, पंडित, संत महंत, निरनिराळे कलावंत, व्यापारी आणि शेतकरी असे सर्वच येथे, गुण्या गोविंदाने नांदत होते.

महाराष्ट्राच्या या राजसभांची, पंडित सभांची आणि बाजारपेठांची कीर्ती दाही दिशांना दरवळत होती. सर्व कला, विद्या या भरजरी पैठणी सारख्या झगमगत होत्या. पैठण, सिन्नर, करवीर, तेर, ठाणे, गोवे, पवणार इत्यादी नगरे वैभवाने सजलेली आणि नटलेली होती. आणि येथील संस्कृती आणि परंपरा दिमाखाने मिरवतही होती.

महाराष्ट्रातील बाजारपेठा आणि विद्वत्सभा याकडं जगातुन लोक धावत येत असत.

राजाचे आपल्या प्रजेवर अतिशय प्रेम होते. ही प्रजा सुरक्षित राहून, राज्याचे चोहीकडून संरक्षण होण्यासाठी, राज्याची चतुरंग सेना सदैव तत्पर असायची.

देवी देवतांची संपन्न अशी मंदिरेही होती. या मंदिरात सांज सकाळी स्तोत्रमंत्रांचे स्वर घुमत असत. फुलांचा सुगंध, धुपाचा गंध या मंदिराचे वातावरण प्रसन्न आणि मनाला प्रफुलित करणारे असे होते.

याच महाराष्ट्रातील देवगिरी हा किल्ला म्हणजे मराठ्यांची ही राजधानी.( यादवांची) मराठ्यांचा गरुड ध्वज याच देवगिरीवर दिमाखात फडकत होता. महाराष्ट्रातील अगणित किल्ल्यात देवगिरी किल्ला, हा म्हणजे तुर्या सारखा ऊठुन आणि शोभुन दिसत होता.
या सारखी जडणघडण कोणत्याही किल्ल्याची नाही. गडाच्या सभोवती वैभव संपन्न नगरी.! याच राजनगरीला भव्य दरवाजे! आत विशाल राजवाडे! सुंदर मंदिरे! राज रस्ते! पाठशाळा! बाजारपेठा, अश्वशाळा, गजशाळा, सुंदर जलाशय!! आणि
राजकारभारासाठी वेगवेगळे प्रसाद!!

अनेक महापुरुषांचे, पंडितांचे व कलावंतांचे सन्मान याच देवगिरीच्या राजसभेत झाले. जणू येथे देवेंद्र चे वैभव नांदत होते. त्याचा उपभोग यादवेंद्र घेत होते. हा एक देवगिरीच नव्हे तर सह्यागिरीतील सर्वच गडकोट हे अजिंक्य होते.

दारावर याचक, अतिथी, गरजवंत, आला तर घर मालकाला किंवा मालकिणीला आनंदच होत असे. भिक्षा मागणारे याचक हे भिकारी नसत. तर ते 'व्रतस्थ देवभक्त' असत.

अन्नकोट घालणारा असा हा महाराष्ट्र. तृप्त, समृद्ध, दानशील होता. खेडीपाडी, वाड्या, वस्ती आनंदात नांदत होती. शेतीत धान्य भरपूर पिकत होते. कोणीही अन्नासाठी वन वन भटकत नव्हते. किंवा भटकावे लागतही नव्हते.

पण कशी आणि कुठून वाईट दृष्ट या भूमीला लागली. आणि दुर्दैवाचा फेरा या समृद्ध भूमीकडे हळूहळू सरकू लागला.

देवगिरी या राज्याच्या उत्तर भागातील सीमेकडून, अल्लाउद्दीन खिलजी आपली पठाणी फौज घेऊन, किल्ल्यावर हल्ला करू लागला. भयंकर युद्ध झाले. ते बरेच दिवस चालले. राजाने सगळे बळ एकवटून प्रतिकार केला. पणअखेर.. मराठ्यांचा पराभव झाला.

भयंकर ‌लुटालुट करून अत्याचार ही केले. त्या अत्याचाराच्या किंकाळ्यांनी आसमंत जणू हादरला.रक्ताचे पाट वाहिले.महिला व बालकांचे हाल हाल झाले.
दुर्दैवाच्या फेऱ्याने येथे चांगलाच डाव साधला होता. या युद्धानंतर मराठ्यांचा राजा, 'राजारामदेवराय' पठाणांचा मांडलिक -गुलाम झाला.
यांची संपत्ती गेली. स्वतंत्रता गेली. अब्रू ही गेली.

हीच ही अन्यायाची शृंखला जवळजवळ पाचशे वर्ष चालू होती. अवघा मराठा मुलुख, परकीयांच्या बंदीवासात होता. येथील संस्कृती, धर्म या सर्वावर बेड्या पडल्या होत्या. अपमान, अत्याचाराचे निखारे झेलीत येथील संसार फुलत होते. चालत होते. अशातही मराठ्यांची तलवार ही सुलतानाच्या चाकरीत रमली होती .

पण.. अश्या या अंधाऱ्या युगात श्रीक्षेत्र पैठण येथील अनाथांचा नाथ 'एकनाथ' हे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील आणि अंतकरणातील विवेक शक्तीला ओरडून आर्जवित होते.
"दार उघड बया दार उघड! दार उघड बया दार उघड!!"
पाहुया पुढील भागात..

🎭 Series Post

View all