शिवकाव्य कौस्तुभ भाग ९

Shivkavya Kaustubh Part 9
जणू गौरी गणपतीच्या रूपातच,
जिजाऊ आणि शिवबाचे पुण्यात आगमन झाले. आल्या आल्या त्यांनी, विनायक भट यांच्या वाड्यातल्या गणपतीचे दर्शन घेतले. आणि विनायक भट यांना या गणपतीचे, छान चिरेबंदी मंदिर बांधून घ्या. असे सांगितले.

त्याच मंदिरा शेजारी, म्हणजे मंदिराच्या नैऋत्य या दिशेला, या दोघांना राहण्यासाठी एक सुंदर वाडा बांधला गेला. यालाच 'लाल महाल' असे नाव देण्यात आले.
माय लेकरांच्या येण्याने पुण्याचे नशीब पालटले. त्याची दैना फिटून जणू भाग्योदयच झाला.
पहिल्यांदा शिवबाच्या हाताने नांगराला सोन्याचा फाळ लावून, काही जमीन, गाजावाजा करून नांगरली. या कृतीमुळे सगळ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले, प्रेरणा मिळाली. आता आपणही आपली शेती करावी. त्यामध्ये धान्य पिकवावे. असे त्यांना वाटू लागले. आणि एक प्रकारची उर्मी घेऊन ती प्रत्येक जण कामाला लागली.
बघता बघता पूर्वीची उजाड असलेली ही नगरी, हिरवीगार झाली. शेतात पिके आनंदाने डोलू लागली.
पशुपक्ष्यांच्या किलबिलाटाने रानं वनं गजबजु लागली.
नद्यावर बंधारे, धरणे बांधून, त्या पाण्याचा उपयोग सर्व शेतीसाठी होऊ लागला.
बाजारात गर्दी दिसु लागली, ती माणसांनी फुलून येऊ लागली. या खरेदी-विक्रीमुळे अनेकांच्या व्यवसायाला भरभराटी येऊ लागली.
यामुळे जिजाऊंच्या आणि शिवबाच्या उदात्त ध्येयाचा, भावी स्वराज्याचा, प्रत्येकाला प्रत्यय येऊ लागला.
याच कारणामुळे आजूबाजूची माणसे यांच्या छत्रछायेखाली येऊ लागली. हळूहळू हा परिवार वाढत गेला.

शिवबाचे आता शिक्षणाचे वय झाले. तरबेज अशा व्यक्तीकडून त्यांना युद्ध कलेचे प्रशिक्षण देणे फार गरजेचे होते.
तसेच सर्वगुणसंपन्न असेही शिवबाने बनले पाहिजे. याकरिता ह्या हिऱ्याला पैलु पाडण्यासाठी शहाजी राजांनी योग्य व्यक्तीना ही जबाबदारी सोपवली होती.
लाल महालात शिवबांना जिजाऊ रामायण, महाभारत यातील बोधकथा सांगतच होत्या.

हेच शिवबांचे शिक्षण माझ्या काव्यात गुंफलेले आहे.

अष्टपैलू शिक्षण…

अष्टपैलू हा युगपुरुष बनावा,
'इतिहास नवा' यांनी घडवावा,
ठेवूनी सुप्त इच्छा अंतकर्णी
झाला प्रारंभ शिवबाच्या शिक्षणी।।धृ।।

आई भवानीला करून वंदन,
युद्धकलेत होण्यास निपुण,
सुरू झाले शास्त्रांस्त्रांचे शिक्षण,
श्रेष्ठ ठरण्यास योद्धा हा रणांगणी।।
झाला प्रारंभ शिवबाच्या शिक्षणी।।१।।

लाल महाली रामायणाची,
महती सत्यवचनी रामाची,
वचनपूर्ती करण्या, पित्याची.
गेला वणी भ्रत्या सवे, पत्नी घेऊनी।।
झाला प्रारंभ शिवबाच्या शिक्षणी।।२।।

थोरवी महाभारतातल्या पांडवाची, श्रीकृष्णाच्या रणनीतीची ,
धूळधाण झाली कौरवांची,
जिंकले पांडव. शक्तीपेक्षा युक्तीनी।।
झाला प्रारंभ शिवबाच्या शिक्षणी।।३।।

शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेऊनी,
सत्य वचनाचा धडा घेऊनी,
राजनीती ही ठसवून मनी,
घेऊन यांची शिदोरी, उतरले मैदानी।।
झाला प्रारंभ शिवबाच्या शिक्षणी।।४।।

शुभांगी सुहास जुजगर.

🎭 Series Post

View all