Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ भाग ८

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ भाग ८
शहाजीराजे हे यवनांची चाकरी करीत, फिरत होते.
पण घारीची नजर जशी पिल्लापाशी असते, अगदी तशीच या राजांची जिजा आणि शिवबा यांच्यावर नजर होती. मोठा मुलगा संभाजी, मात्र त्यांच्यासोबत होता. जिजाऊ आणि शिवबा हे अगदी सुरक्षित कसे राहतील? याचा पुरेपूर बंदोबस्त त्यांनी केलेला होता. त्या दोघांसोबत राहणारी माणसेही विश्वासू होती. जीव लावणारी होती, आणि वाट दाखवणारी ही होती. हिंदवी राज्य निर्मितीसाठी जी पावलं उचलली जाणार होती त्यासाठीची मदत, सहकार्य करणारी होती.

शिवबा सात वर्षाचा असताना जिजाऊ त्यांना घेऊन पुण्याला आल्या.
हा भाग शहाजीराजांच्या अंमलाखाली असल्याने त्यांनी, इथे राहून काम करायचे ठरवले.
आदिलशाही फौजेने काही वर्षापूर्वी, जाळपोळ, कत्तली करून सगळे उध्वस्त झालेले, त्यामुळे पुण्याची राख रांगोळी झाली होती.

जेव्हा जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या, तेव्हा एक उजाड नगरी त्यांच्या दृष्टीस पडली. गाढवाचा नांगर फिरल्याने सगळी नगरीच भकास झाली होती. तिथे कोणी वस्तीला नव्हती. की शेती पिकत नव्हती. लोकांचा तुरळक राबता होता. सगळीकडे औदासीन्य होते.
हे असं सगळं पाहून त्यांना खूप वाईट वाटले. अन दुःखही झाले. पण तिने ठरवलेच की 'ही अवकाळा झटकून तिचे रूप पालटायचेच.'

फिरता फिरता त्यांना विनायक भट यांच्या वाड्यात एका कोनाड्यात दिसली.एक गणपती बाप्पा ची मुर्ती, उन्हातानात, पावसा पाण्याचे हालसोसत अंग चोरून बसलेली. याच गणेशाचे दर्शन त्यांनी आणि शिवबांनी घेतले, आणि आपल्या कार्यास त्यांनी प्रारंभ करण्याचे ठरवली. विनायक भटांना त्यांनी 'या गणपतीचे देऊळ बांधा.' असे सांगितले. लवकरच त्या मंदिराचे काम सुरू झाले. अवघ्या काही दिवसातच हे पूर्णही झाले. हे मग केवळ या मायलेकरांचे दैवत न राहता, संपूर्ण पुणे नगरीचेच दैवत बनले. आणि सकाळ, संध्याकाळ तेथील वातावरणात, परिसरात मंगल स्तोत्रे, आरत्याअन् मंगल वाद्ये ही वाजु लागली.
हेच दैवत म्हणजे पुण्यातील कसबा गणपती होय. या मंदिराच्या जीर्णोद्धारानेच जणु पुण्याचा कायापालट होण्यास प्रारंभ झाला.

यवनी सैन्याच्या अत्याचारामुळे इकडे तिकडे आश्रयाला गेलेले संसार, आपल्या लवाजम्यासह श्रींच्या चरणापाशी यायला लागली. हे पाहून जिजाऊना आनंदच व्हायला लागला.पण तरीही आणखी काहीतरी करण्याची गरज आहे असे त्यांनी हेरले.

आजूबाजूच्या परिसरात जंगलं खुपच वाढलेली होती.त्याच बरोबर त्या जंगलात हिंस्त्र प्राणी ही होते.
याच "प्राण्यांची शिकार करणार्यास योग्य बक्षीस दिले जाईल" असे जाहीर केले.
या कारणामुळे शुर, धाडसी, योग्य शिकारीचे कसब असणारे लोकं, समोर येऊ लागले.
मग त्यांना योग्य असे लढाईचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले होते.

पुण्याचा झालेला कायापालट म्हणा किंवा हिंदवी राज्याचा श्रीगणेशा म्हणा..
या माझ्या पुढील काव्यात गुंफलेला …

।। श्रीगणेशा..।।

सुखकर्ता तू, दुःखहर्ता तू,
श्रीगणेशा, श्रीविघ्नेशा.
कार्यारंभी करूनी पुजन
फलद्रुप होते मनिषा।।धृ।।


श्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार,
करण्याचे ठरवुन मनी,
स्वराज्याची घातली नांदी,
शिवबाच्य हस्ते जिजाऊनी.
ठेऊन श्रध्दा, श्रींच्या चरणी
घेतली भरारी,या आकाशा।
कार्यारंभी करूनी पुजन
फलद्रुप होते मनिषा।।१।।


पाहुनी सारी उजाड नगरी,
जिजाऊ मनी हिरमुसली.
धरून हाती नांगर
हतिने कंबर ही कसली.
घेऊन दिमतीला माणसे
फुलवली शिवारी नवी उषा।
कार्यारंभी करूनी पुजन
फलद्रुप होते मनिषा।।२।।

हळू हळू माणसे आली ,
जिजाऊ च्या छत्राखाली.
कणाकणाने बळ वाढले
फौज एक झाली बलशाली.
सुलतानाच्या प्रतिकाची.
ठेऊन मनात हीच आशा।
कार्यारंभी करूनी पुजन
फलद्रुप होते मनिषा।।३।।

बघता बघता रूप पुण्याचे,
पालटुन वाढले बाळसे.
खाऊ लागले ,घास सुखाचा
लेकी सुना आणि माणसे.
आयुष्यात निर्माण झाली
जगण्याची एक अभिलाषा।
कार्यारंभी करूनी पुजन
फलद्रुप होते मनिषा।।४।।

होऊ लागली दररोज
मंदिरात पुजा -अन् आरती.
तेऊ लागल्या सायंकाळी
स्मित मंद मंद ज्योती.
'संपु दे अन्याय येथला'
हीच प्रार्थना या श्रीगणेशा।
कार्यारंभी करूनी पुजन
फलद्रुप होते मनिषा।।५।।

-शुभांगी जुजगर


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//