Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ -भाग ७

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ -भाग ७
शहाजीराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, अगदी डोळ्यात तेल घालून जिजाऊ जपत होती. त्या दिशेकडे एक एक पाऊल जपून, पण.. धैर्याने टाकत होती.
वाट खूपच अवघड होती. तरीही जिजा त्या वाटेवर चालण्यास सज्ज झालेली होती.

हळूहळू शिवबा, पाळण्यातून खाली आला. रांगत रांगत चालूही लागला. जिजाऊ च्या हातचा, चिऊ, काऊ चा घास खाता खाता, नजर चुकवून.. हळूच मातीचा घासही स्वतःच्या हातानेच खाऊ लागला. आणि या मातीतच खेळून खेळून दमूही लागला. मातीत खेळायला खूपच आवडत होते. पळता पळता पडतही होते, उठत ही होते. मातीशी जुडलेली ही सलगी ही जन्मापासूनच जुळलेली होती.

आता त्यांना सवंगड्या सोबत, खेळायला मजा येऊ लागली. तसेच ते दिवसभर खेळणे, कसरत करणे, मातीचे ढीग करून 'किल्ला' म्हणून संबोधने. यात त्यांना जास्त रस वाटत होता.
राजांचे हे वय खेळण्याचे होते. पण जिजाऊच्या नजरेने," हे खेळणे ही व्यर्थ जाता कामा नये" हे हेरले, आणि मातीचे ढीग म्हणजे किल्ले समजून त्यांची नाकेबंदी, हल्ला, प्रतिहल्ला,असे खेळ त्या मुलांना खेळायला लावत असत.
जिजाऊ ने मनाशी एक पक्की गाठ बांधली, "माझी मुलं या शाह्यांची गुलाम झालेली मला कधीच आवडणार नाहीत." हेच ध्येय समोर ठेवून तिला शिवबाला, तयार करायचे, घडवायचे होते.

पराक्रमाचा वारसा घेऊनच जन्माला आलेल्या
शिवबांना,
योग्य मार्गावर चालायला, या आईने पदोपदी मार्गदर्शन केले.त्यानुसारच हे खेळणे कसे उपयोगाचे होऊन? भविष्यात कसे कामी येईल? पाहुया या पुढील काव्यात..

बाल संस्कार..

घेऊन हाती ढाल अन् तलवार,
जाहला शिवबा, चिमुकला सरदार।।धृ ।।
आजुबाजुचे जमवुन मित्र,
शुर सेनापतीचे रंगवून पात्र,
सुरू जाहले युध्दाचे सत्र.
बाळ फौज ही, लढण्यास असे तय्यार.
जाहला शिवबा, चिमुकला सरदार।।१।।

करून ढिगारे या मातीचे,
गडकोट नामकरण तयाचे,
हल्ले चढे , चिमुकल्या फौजांचे
मातीचे गड हे खोटे खोटे जिंकणार.
जाहला शिवबा, चिमुकला सरदार।।२।।

पाहुनी सारे हे खेळ युध्दांचे,
जिजाऊस अंकुर फुटे हर्षाचे,
आकार घेई स्वप्न उद्याचे,
"व्हावे तयार शिवबाचे मराठी सरकार."
जाहला शिवबा, चिमुकला सरदार।।३।।
-शुभांगी सुहास जुजगर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//