Mar 02, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ भाग ५

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ भाग ५
जिजाचे असे हे जगा वेगळे डोहाळे, पुरवताना वेगळेच वाटत होते.
पण डोहाळेच ते..पुरवावेच लागत होते.

आजूबाजूच्या जुलमी वातावरणामुळे जिजाऊ ला या अवस्थेत कुठेतरी, सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. शिवाय त्यांच्याजवळ विश्वासातली माणसे असणही खूप गरजेचे होते. शहाजी राजांना स्वतःबरोबर घेऊन फिरणे धोक्याचेच वाटत होते.
म्हणूनच मग, त्यांना किल्ले शिवनेरीवर ठेवायचा निर्णय राजांनी घेतला. तेथील किल्लेदार हे राजांच्या अत्यंत विश्वासातले होते. नात्यातलेही होते. शिवनेरी किल्ला बळकट होता. भोवती अनेक दैवते पहारा देत होती. लेण्याद्री, ओझर येथील गणपती बाप्पा. भीमाशंकर, कुकडेश्वर, आंबा, अंबिका, कालभैरव आणि प्रत्यक्ष गडावर श्री शिवाई भवानी. यांच्या सानिध्यात, येथील वातावरणात त्यांना प्रसन्न वाटणार होते.
म्हणूनच राजांनी त्यांना शिवनेरीवर ठेवायचा निर्णय घेतला.
शहाजी राजांनी 'स्वतंत्र पुण्याची घोषणा करून, तेथील राज्यकारभार ते पाहू लागले. हा एक धाडसी निर्णय घेऊन, त्यांनी प्रयोग करून बघितला. पण काहीच दिवसात विजापूरच्या आदिलशहाचा एक सरदार, मोठी फौज घेऊन आला आणि त्याने पुणे पार उध्वस्त करून टाकले. तिथे गाढवाचा नांगर फिरवला आणि वेशीही पाडून टाकल्या.

हे असं ऐकून, पाहुन राजांच्या जीवाची नुसती घालमेल होऊ लागली, आणि अनावर असा राग त्यांना आला.पण.. नुसत्याच हाताच्या मुठी आवळून ते सदरेवर इकडुन तिकडे फिरू लागले होते.आपले स्वप्न असे उध्वस्त झालेले पाहुन 'नुसतेच शौर्य आणि पराक्रम काय कामाचा? जर आपण स्वकीयांचेच संरक्षण नाही करु शकत तर??'
अशी स्वतःशीच ते बडबडु लागले,भांडु लागले.

ही त्यांच्या मनातली चलबिचल, जवळच उभ्या असलेल्या जिजाऊंच्या ध्यानात आली.
ती म्हणाली,"राजे,असा त्रागा करून घेऊ नका.हेही दिवस जातील. आज निदान हा प्रयत्न तरी तुम्ही केला. उद्या नक्कीच हे साकार होईल. आज तुम्ही एकटे होतात. पण उद्या हेच स्वप्न अनेकांनी पाहिलेले असेल. त्यातूनच ते जन्माला येईल. हवं तर ही पहाट समजा."
जिजा चे हे समजावणीचे शब्द ऐकून, त्यांच्या मनाची तडफड थोडी शांत झाल्यासारखी त्यांना वाटली. तिची भविष्याचा वेध घेणारी नजर आणि शब्दातील विश्वास, पाहून त्यांना हायसे वाटले.
"होऽ हे असे होईल?" त्यांनी तिला प्रश्न केला. "हो नक्कीच होईल. पण तुमच्यातील पराक्रमाची धार मात्र बोथट होऊ देऊ नका."

हे तिचे शब्द ऐकून, तीचा चा हात हातात घेऊन राजे म्हणाले,
" तुमच्याशी या विषयावर बोलून, आज खरंच मला बरं वाटत आहे."
त्याच हातावर हात ठेवून जिजा म्हणाली, "निश्चिंत असावं राजे तुम्ही, ही जिजा आयुष्यभर सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. प्रसंगी वादळ वाऱ्याशी दोन हात करेल. पण, माघार घेणार नाही. तुमच्या स्वप्नाला एक एक वीट लावून, तिच्यावर कळसही चढवीन."

"तुमची भक्कम अशी साथ आम्हाला मिळाली. खरेच आम्ही भाग्यवान आहोत."

'एकमेकांना विश्वासाने समजुन घेणे' हेच यशस्वी संसाराचे गमक …

जिजाऊला शिवनेरीवर ठेवून, राजे आपल्या मोहिमेवर निघून गेले.

दिवस जात होते.
तसेच जिजाचे दिवस भरत आले होते. पावले जड होऊ लागली होती.
एके दिवशी रात्री अचानक तिचे दुखू लागले. बाळंतपणासाठीची सगळी सिद्धता, करून ठेवलेली होती.
रात्री उशीरा बाळाच्या रडण्याने, गड आनंदाने नाचु लागला. भोसले कुळाला पुत्र लाभ झाला होता. जिजाऊने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.
त्या नंतरचा आनंद या पुढील काव्यात..

५) शिवजन्म

अंधार सरला, उषःकाल झाला.
उधळीला गुलाल पूर्वेच्या गगनात.
जन्मला शिवबा शिवाईच्या गाभाऱ्यात।।धृ।।

दुमदुमले सनई चौघडे,
माचीवरही तोफ गडगडे.
गडावरती निशान ही, फडकले डौलात. जन्मला शिवबा, शिवाईच्या गाभाऱ्यात।।धृ।।

मना मनात आनंद भरला,
तोरणं लावले, दारा दाराला.
फुलून आला, गड हा सारा जल्लोषात. जन्मला शिवबा, शिवाईच्या गाभाऱ्यात।।धृ।।

पक्षांच्याही ओठी किलबिल,
वाराही गातो गाणी मंजुळ.
अंगणातील जाई जुई ही, नहाली सुगंधात. जन्मला शिवबा, शिवाईच्या गाभाऱ्यात ।।३।।

चिमुकल्या मुठीत भाग्य उद्याचे,
सान रूप हे, जिजाऊ च्या स्वप्नाचे.
बहरू दे हा वृक्ष भवानी, तुझ्या कृपा छत्र्यात. जन्मला शिवबा शिवाईच्या गाभाऱ्यात।।४।।
सौ. शुभांगी जुजगर .ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//