शिवकाव्य कौस्तुभ भाग ४

Shivkavya Kaustubh Part 4
काळ हा, एक एका पावलाने पुढे पुढे सरकत होता.
तशी जिजाऊ, संसारा मध्ये एकरुप होऊन गेली होती.तेथील माणसांची ती आवडीने काळ्जी घेत होती.
शहाजीराजांच्या पराक्रमाची यशस्वी घोडदौड पासुन त्यांचा ऊर, अभिमानाने भरून येत होता.
पण… त्यांचे माहेर तुटले होते.याची खंतही त्यांच्या मनाला टोचत होती. स्त्रियांना, सासरी कितीही सुख असले तरी माहेर हे जीव की प्राण असते. माहेरपणाचे सुख त्यांना नव्हते. या दोन घरात वैरभाव निर्माण झाला तो झालाच होता.
'काही दिवस मराठवाड्यातच राहायचे' हे शहाजीराजांनी ठरवले होते. आणि अशातच त्यांच्या पराक्रमाचे तेज वाढतच होते. लढाईमध्ये विजयश्री त्यांनाच मिळत होती. 'असाच जय मिळत राहिला तर आपण स्वतंत्र राजा होऊ शकतो' हा विचार त्यांच्या मनात सारखाच डोकावत होता. पण..
तो प्रत्यक्षात आणणे खूपच अवघड होते. कारण भोवतालची परिस्थिती अजिबातच अनुकूल नव्हती. या मुलखात सतत लढाया चालू होत्या. एक सुलतान दुसऱ्याशी लढत होता. जनतेचा छळ सुरूच होता.

याच मुलखात राहून, मुघलांशी दोन हात करता करताच, शहाजी राजांनी खूप विश्वासातली माणसे जमवायला सुरुवात केली. निष्ठावंत आणि प्रेमळ, जी आपल्या धन्यासाठी प्रसंगी जीव द्यायला ही मागे पुढे पाहणार नाहीत अशी.

'जिजाबाई कडे गोड बातमी आहे' हे कळल्यावर तर शहाजी राजां सहित, सर्वांना खुपच आनंद झाला होता.त्या नेहमी आनंदी कश्या राहतील याची काळजी घ्यावी.अश्या सुचना सर्वांना दिल्या गेल्या.त्यांच्या अवतीभवती मायेने ममतेने काळजी घेणारे मंडळी आणि महिला वर्ग कसा राहील याकडे राजांनी जातीने लक्ष दिले.


दिवस राहिल्याने जिजाऊ या धार्मिक कार्यात जास्त रस घेऊ लागल्या दानधर्मातच त्यांना धन्यता वाटु लागली होती.

जिजाऊला आता डोहाळे लागले होते.खाण्या पिण्याचे डोहाळे, पुरवायला माहेर जवळचे राहिले नव्हते.
म्हणुन त्यांनी हट्ट करायचा कोणाकडे?
'आवडीचे खावे वाटते आहे.'
असे कोणाला सांगायचे?
तर ते फक्त माता भवानीला सांगायचे.काय वाटेल ते देवासमोर बसुन, सुख दुःख व्यक्त करीत करायचे.
जिजा ला डोहाळे मुळी खाण्या पिण्याचे लागले नव्हतेच.की चांदण्यात फिरण्याचे.
सरोवरात विहार करण्याचे.नाही नाही..
हे डोहाळे होते..
माझ्या या रचनेत -

२) असे डोहाळे..

चिंचा नको, आवळे नको
मला चालवू द्या तलवार.
सांगतो गर्भातील हुंकार।।धृ।।

असे रामाचे डोहाळे,
लागले कौशल्या राणीला.
घेऊन बाण धनुष्य
जावे वनात शिकारीला.
तारण्या मानवधर्माला,
जाहला विष्णूचा अवतार.
सांगतो गर्भातील हुंकार।।
मला चालवू द्या तलवार,
सांगतो गर्भातील हुंकार।।१।।

एक न्यारीच तळमळ,
आहे साऱ्या देहात.
वाटे घेऊन तलवार,
़लढावे रणांगणात.
सपासप कापून काढावे,
पातशाही सरदार.
सांगतो गर्भातील हुंकार।।
मला चालवू द्या तलवार,
सांगतो गर्भातील हुंकार।।२।।

हत्तीवर स्वार होऊन,
फीरावे या मुलखात.
सारा सह्यागिरी तुडवावा,
एकाच या दमात.
गोरगरिबांना अभय देऊन, रक्षावे संसार.
सांगतो गर्भातील हुंकार।।
मला चालवू द्या तलवार,
सांगतो गर्भातील हुंकार।।३।।


🎭 Series Post

View all