शिवकाव्य कौस्तुभ भाग ३

Shivkavya Kaustubh Part 3
हळूहळू जिजा, भोसले यांच्या घरात रुळू लागली. संसारात रमू लागली.
तीचे शहाजीराजांच्या सहवासात, दिवस आनंदाने जात होते. काळ पुढे सरकत होता. तशी संसार वेल मांडवावर चढू लागली. शहाजीराजे ही निजामशाहीत चाकरी करू लागले.
जाधव आणि भोसले या दोन्ही पराक्रमी तलवारी, निजामशाहीत गर्जून तीस अधिक बळकट बनवत होत्या.
असेच एके दिवशी, देवगिरी किल्ल्यावरील निजामशहाचा दरबार संपला. सर्व सरदारां सहित मंडळी एक एक करून बाहेर पडू लागले. सरदारां मध्ये लखुजी जाधव,दत्ताजी जाधव, शहाजी भोसले, संभाजी भोसले, आणखीही बरेच मराठी सरदार होते. हे सर्व बाहेर पडत असताना, तेथील एक हत्ती पिसाळला आणि तो सैरावैरा पळू लागला.त्यामुळे एकच गदारोळ माजला. त्याला थांबवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करू लागले. या झटापटीत दत्ताजी जाधव (जिजाऊचे बंधु) हे नकळतपणे संभाजी भोसले यांच्याकडून मारले गेले याचा बदला म्हणून लखुजी जाधव(जिजाऊचे वडिल) यांनी संभाजी भोसल्यास (जिजाऊ चे दीर) ठार केले.

सासरी दीर मारला गेला.आणि माहेरी भाऊ मारला गेला. कोणासाठी दुःख करायचे?
एका अविचाराने आणि शुल्लक कारणावरून, दोन घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्याबरोबरच वादाची ठिणगी ही पडली होती.
एकमेकांच्या विरोधात तलवार चालवून वैरच वाढत होते, दुफळी निर्माण होत होती. आणि सगळीकडे असेच करून बादशहा आपले हित साधून घेत होता.
हेच आणि असेच चित्र, सर्व मराठी मुलखात दिसत होते. यवनांची चाकरी करीत करीत मराठी माणसे जगत होती. आणि मरतही होती. स्वाभिमान, स्वातंत्र्य, अस्मिता इत्यादी कशाचाही स्पर्श या स्वार्थी आणि अविचारी मनांना होत नव्हता. ही शूर मराठी माणसे अविचारात, अपमानात, गुलामगिरीत, सुलतानाच्या अत्याचारात किड्यासारखी मरेपर्यंत भरडली जात होती.
जिजाऊला या भयंकर परिस्थितीची चांगलीच
कल्पना होती.कळत्या वयापासूनच ती हे सारे पाहात आली होती.
याविषयी विचार करून तिचे मन अस्वस्थ होऊ लागले होते.
"हे बदलणारच नाही का?"असा प्रश्न स्वतःला ती विचारु लागली.
'आपल्याच तलवारीच्या बळावर हे सुलतान मराठी मुलखात जुलमी राज्य करीत आहे.
जर आपण एकत्र येऊन बंड केले तर, सुलतानांची अत्याचारी सिंहासने डळमळू लागतील.' असेच त्यांना राहुन राहुन वाटायला लागले.या नुसत्या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभी राहिली होती.
'या मराठ्यांची भाग्यभवानी आणि विचारशारदा, जागी होऊन देव्हाऱ्यातुन बाहेर पाऊल टाकील का?जेणेकरून हा मुलुख स्वतंत्रतेचा श्वास घेईल.'
असेच तिच्या मनात विचारांचे मंथन चालु होते.
अन् या विचारातच तीची पावले आपसुकच देवघराकडे वळली.देवघरातल्या समईतील वात तीने पुढे केली.त्यात तेल घातले.त्या तेलाने ज्योती मध्ये अधिक तेज आले.त्या तेजाने देव्हारा उजळुन गेला.
आणि जिजाऊने हात जोडुन देवाला नमस्कार केला.नंतर आंतरिक तळमळीने देवाला ती विनवु लागली.. ही विनवणी मी माझ्या पुढील काव्यात गुंफलेली आहे..

नं. १ विनवणी..

आई भवानी, तू देव्हाऱ्यातून बाहेर ये।।
लागले ग्रहण मराठी मुलखाला,
सर्व ताकद सुलतानी दावणीला,
‌‌ आई भवानीऽ हे कुलस्वामिनीऽ
तू देव्हाऱ्या तून बाहेर ये,
‌‌ ‌‌ रक्षिण्या कुलशील, तू अवतार घे।
आई भवानी, तू देव्हाऱ्यातून बाहेर ये।।धृ।।

‍ मराठ्यांची ताकद आहे मोठी,
तीस मिळू दे एका गाठी.
या माझ्या मराठी मातीवरचा,
जुलूम थांबव तु एकदाचा.
अष्टभुजात तुझ्या, धरून तलवार ये।
आई भवानी, तू देव्हाऱ्यातून बाहेर ये।।१।।

बेड्या गुलामगिरीच्या तोडूनी,
स्वातंत्र्याची व्हावी पायाभरणी.
तेज सूर्याचे येऊ दे मराठी शौर्यला,
यशाची कमान भडो शिखराला.
दे अंबिकेऽ तू मला स्वतंत्रतेचा आहेर दे।
आई भवानी, तू देव्हाऱ्यातून बाहेर ये।।२।।
‌‌
(संदर्भ -'राजा शिवछत्रपती ' बाबासाहेब पुरंदरे)

पुढे काय? जिजाऊ ची ही विनवणी माता भवानीने ऐकली का?
पाहु या पुढील भागात..

🎭 Series Post

View all