शिवकाव्य कौस्तुभ -भाग ३०

Shivkavya Kaustubh Part 30
मासाहेब सिद्धी जोहरचा, पडलेला वेढा फोडण्याच्या तयारीने गडावर तयार झाल्या होत्या.
एका आईची ममता त्यांना आता शांत बसू देत नव्हती. पण नेताजी पालकर हा नेमका याचवेळी गडावर दाखल झाला. मा साहेबांची ही तयारी पाहून मनातच खजिल झाला. संथ पावले टाकीत आईसाहेबांच्या महाली मुजरा करायला आला. मुजरा करतानाही मासाहेबांच्या नजरेतला 'तिखट भाव' नेताजींच्या जीवाला पोखरून गेला.
आणि तो म्हणाला,"तुम्ही काळजी करू नका आईसाहेब. मी जातो पन्हाळ्याच्या मोहिमेवर. महाराजांची चिंता तुम्ही मुळीच करू नका. आई भवानी आहे त्यांच्याबरोबर त्यांची पाठ राखीन म्हणुन. अशीच माझी फौज पन्हाळ्याकडे नेतो. तेव्हा मला आज्ञा द्यावी." आणि लगेच त्याने पन्हाळ्याकडे दौड केली. आणि सिद्धीच्या फौजेला भिडला पण निरूपाय झाला. या हल्ल्याचा किंचितही परिणाम वेढ्यावर, किंवा सिद्धी जोहर वर झाला नाही.

पाहता पाहता आषाढ महिना उजाडला. जवळजवळ चैत्र महिन्यापासून पडलेला हा सिद्धी जोहरचा वेढा.
मुसळधार पडणाऱ्या पावसात पन्हाळा न्हाऊन निघत होता. पाण्याची लोटच्या लोट डोंगरावरून उड्या मारत मारत जमिनीकडे वाहत होते. धों धों पावसातही सिद्धीची फौज डगमगत नव्हती.. की त्यांच्या तंबूत पाणी शिरत नव्हते.. वाऱ्याने तंबूची छते फुगत होती पण… एवढा पाऊस येत असूनही जोहरच्या वेढ्यातील हजारो सैनिक, रात्र असू दे, नाहीतर दिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. खरोखरच खूपच काटेकोरपणे परिश्रम घेऊन वेढा हा सावध होता. अगदी मुंगी सुद्धा बाहेरून मध्ये गडावर येऊ शकत नव्हती. की गडावरून बाहेर जाऊ शकत नव्हती. असा हावेढा होता.अजगरी वेढा.
वेढ्यातील लोकांचे कामं, आणि वेढ्यातील लोकांनी लावलेले बंदुकीचे मोर्चे, या पावसातही चालूच होते. या सर्व अडचणीवर त्याने मात केली होती.
चार महिने होत आले होते, तरी देखील त्यात फरक पडलेला नव्हता.

महाराजांच्या,पन्हाळा येथुन सुटकेचा मार्ग काही नजरेच्या टप्प्यात येत नव्हता. त्यामुळे सुटका होण्याच्या सर्व आशा मावळल्या. जणू संपल्यात जमा होत्या. कसं यातून बाहेर पडावं? कसं गडावरून पसार व्हावं?
याच विचारांचे मंथन गडावर सुरू होते.पण काहीही उपाय, कल्पना कोणालाही काहीही सुचत नव्हती.
गेल्या चार महिन्यापासून गडावर महाराजां सहित अनेक शूर मावळे बंदिस्त होते. जवळपास ६००० शिबंदी गडावर होती. रात्र,
रात्र हाच विचार चालू होता.पन्हाळ्याच्या बाहेर, बाहेरच्या स्वराज्याचे कसे असेल? शाहिस्तेखानाचा आघळपघळ पसारा पुणे प्रांतात विसावला होता. हा सर्व विचारांनी महाराजांना वादळात सापडल्या सम झाले होते. त्यांचे चित्त सैरभैर झाले होते. मन नाही नाही ते चिंतित होते.
महाराज, पन्हाळगडावरील आई जगदंबे समोर निशब्द होऊन उभे होते. मध्येच इकडून तिकडे तिकडून इकडे फेऱ्याही मारत होते.
त्यांच्या मनातली उलघाल फक्त आणि फक्त ती भवानीच जाणो..
आपण जाणुन घेऊया या पुढील काव्यात..

*चिंतित राजे*

आवळली मूठ हाताची,
शिव शिवली म्यानातील तलवार,
शिवराय येथे हतबल झाले फार ।।धृ।।

नागपाशात आवळीले
राम अन् लक्ष्मणाला,
तैसे सिद्धीने कोंडिले
स्वराज्याच्या या सिंहाला,
परी,मारणाऱ्या पेक्षा मोठा तो तारणहार।।
शिवराय येथे हतबल झाले फार ।।धृ।।

चिंता महाराजांना
रात्रंदिन होती लागली,
गडावरील शिदोरी ही
संपल्यात जमा झाली,
तगमग शिवबाची अशी होऊ लागली फार।।
शिवराय येथे हतबल झाले फार ।।धृ।।

आता कसे काय करावे?
प्रश्न उभाराही हा समोर,
वाटले, पावसाळ्यात
पाऊस सुरू झाल्यावर
सैल पडेल वेढा तेव्हा, हळूच व्हावे पसार।।
शिवराय येथे हतबल झाले फार ।।धृ।।


आखला मग एक बेत
करून नित्य हाच विचार,
निवडक मावळे थोडे
घेऊन आता बरोबर,
वीर बाजी सह व्हावे येथुन हळुच पसार।।
शिवराय येथे हतबल झाले फार ।।धृ।।

@सौ.शुभांगी जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)


🎭 Series Post

View all