शिवकाव्य कौस्तुभ -भाग २९

Shivkavya Kaustubh Part 29
हर हर महादेव,
स्वराज्य तोरण चढे,गर्जती तोफांचे चौघडे ।।
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते।।

या शांताबाईंच्या गीता प्रमाणेच,
'हर हर महादेव,'हर हर महादेव." ची गर्जना करीत शिवाजी महाराज आणि मावळे मुलुख जिंकीत जिंकीत कुच करत होते.
अफजल खान वधानंतर थोडाही वेळ वाया न घालवता, ही सर्व लढत होती. स्वराज्यासाठी, शिवाजीसाठी, मासाहेबांच्या रयतेवरील प्रेमासाठी.
महाराजांच्या या सरदारांच्या घोड्याच्या टापा पुढे पुढे धावत होत्या.त्या प्रत्येक पावलागणिक, टापा गणिक महाराष्ट्राची भूमी स्वतंत्र होत होती. गेलेली ठाणे परत मिळवत होती. सातारा, कोल्हापूर, पन्हाळा. पन्हाळ्याच्या पायथ्याशी राजे आणि मावळे, मावळसेना दाखल झाले. राजांनी भरभर सर्वांना काम नेमून दिले. सगळेजण आपापल्या कामाला लागली. अचानक आलेल्या या हल्ल्यामुळे पन्हाळ्याचा किल्लेदार गडबडला. घाबरला, गडावर तशी काहीच तयारी नव्हती. पण तरीही भरभर तयारी करून प्रतिकारसाठी ती सर्व उभी राहिली. तरीही दोन दिवस ही लढाई चालली. त्यानंतर स्वराज्याचे निशाण पन्हाळ्यावर दिमाखाने फडकू लागले.आणि पन्हाळा ही स्वराज्यात दाखल झाला.
यशाची घोडदौड अशीच सुरू होती. इतर ठिकाणी पाठवलेले सरदारही आपली यशश्री मिळवत होते. प्रसंगी युक्ती वापरूनही कार्य सफल करीत होते.
आणि एक दिवस मग सिद्धी जोहरचा वेढा पन्हाळ्याला पडला. महाराज याच गडावर होते.
झालं, हळूहळू वार, हल्ले चालूच होते. पण बघता बघता महिना, दोन महिने, झाले अद्याप जे आहे ते सुरू होते. महाराज पन्हाळ्यात अडकून पडले होते. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला चांगलाच वेढा घातलेला होता. वरचेवर तो वेढा फुगत चालला होता. हा वेढा दिवसेंदिवस अधिकच बळकट होत चाललेला, पाहून महाराजांना चिंता वाटू लागली.

आईसाहेब चिंतेत होत्या. त्यांचा शिवबा सिध्दिच्या मगर मिठीत सापडलेला होता. आणि इकडे, म्हणजे पुण्याला शाहिस्तेखान तळ ठोकून बसला होता. मोगलांचे क्रूर अत्याचार ऐकून त्यांच्या मनाला वेदना होत होत्या.तरीही या संकटाशीही त्या सामना करीतच होत्या. महाराज आणि मासाहेबांची 11 महिन्यापासून भेट नव्हती. खानावधाच्या व त्याच्या आधी त्यांनी राजगड सोडला होता. व त्यानंतर महाराज स्वारीवरच होते.

आणि ते पन्हाळ्यावर असताना, सिद्धी जोहरचा हा वेढा पडला होता. एकच असलेल्या मुलावर, एका नंतर एक, संकट येतच होती. तरीही ही माऊली खंबीर होती. पण भेटीची ओढ मनात दाटून येत होती. एरवी जर असेल तर काही नाही. पण परिस्थिती अशी होती की जीवघेणी संकट महाराजां भोवती दबा धरून बसलेली होती. अशा परिस्थितीत या माय लेकरांना भेटायची, चार शब्द बोलायचे.मायेची, वासल्याचे बोलावे, ऐकावे वाटत होते. दोघांनीही स्वराज्याचे व्रत घेतले होते. 'कठोर व्रत'. या कठोर व्रतात म्हणजे आयुष्यात येणारे ताण सहन करावेच लागणार होते.वेळप्रसंगी खंबीर साथ ही महत्त्वाची आहे.धीर धरणेही हितकर आहे.अनेक इच्छा आकांक्षाना मुरडही घालावी लागते.

पण यावेळी मात्र त्यांची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. शिवबाच्या सुटकेसाठी त्या तळमळू लागल्या.'बाहेरून मदत गेल्याशिवाय तरी तो कसा या वेढ्यातुन सुटेल?' असे एक ना अनेक प्रश्न त्यांना पडले होते.
'बाहेरून वेढ्यावरच घाव घातले तर तो फुटेल.'
आणि हा घाव घालणारा वीर त्यांच्या जवळ नव्हता.तर असे वीर योद्धे जागोजागी तैनात होते.

म्हणुन मग, जिजाऊसाहेब याच उठल्या, कमरेला पदर खोचला.आणि मग त्या म्हणाल्या,"आम्हीच जातो आता पन्हाळ्यावर चालून. आणि आणतो शिवबाला सोडवुन."
हा निर्धार त्यांनी बोलुन दाखवला.
आणि काय!! लगेच त्यांना युद्धावेश संचारला.युध्दाची शस्त्रात्रे अंगावर चढवुन त्या तयारही झाल्या.
आता त्यांना विचारायचे, थांबवायचे,कसे?हे बघणाऱ्यांना प्रश्न पडले.आणि त्यांना अडवण्याची हिंमत तर कोणातच नव्हती.
आता काय करायचं??
काय होईल वाचु या पुढील काव्यात..

*मा साहेब*

चिंतेची काळेकुट्ट मेघ
राजगडावर आले दाटूनी,
शिवबांच्या काळजीने
अश्रू दाटले जिजाऊच्या नयनी।।धृ।।

शिवबा पन्हाळ्यावर अडकला
सिद्धी जोहरच्या वेढ्यात,
शाहिस्तेखाना ही बसला
तर ठोकून लाल महालात,
चोही कडून असे वनवे शत्रूचे उठले पेटूनी।।
शिवबाच्या काळजीने
अश्रू दाटले जिजाऊ नयनी।।१।।

उलघाल ही मनाची अशी
होत होती मातृ हृदयाची,
स्वराज्याच्या निर्मितीसाठी
ही ताटातूट माय लेकरांची,
घेतलाय हा वसा हाती
माता श्री भवानीच्या मर्जीनी।।
शिवबाच्या काळजीने
अश्रू दाटले जिजाऊ नयनी।।२।।

"घ्यावी म्यान बांधुनी कमरेस
मारावी ही टाच घोड्याला,
क्षणात जावे पन्हाळ्यावर
तोडूनी जौहरच्या वेढ्याला."
करीत असे असा विचार
मन जिजाऊचे फिरू फिरुनी।।
शिवबाच्या काळजीने
अश्रू दाटले जिजाऊच्या नयनी।।३।।

इतक्यात अंधारात जसा
दिसावा एक कवडसा,
तसा नेताजी पालकर
पोहोचला इथे खासा,
मुजरा करून मा साहेबांना,
म्हणे,' चिंता नका करू, आम्ही आणतो महाराजांना सोडवुनी।।'
शिवबाच्या काळजीने
अश्रू दाटले जिजाऊ नयनी।।४।।

सौ.शुभांगी जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)


🎭 Series Post

View all