Feb 29, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ भाग २८

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ भाग २८
मासाहेबांचा राजगडावर, हृदयाच्या तामनात त्या विघ्नहर्ताला ठेवून अश्रूंचा अभिषेक सुरू होता. भवानीची आळवणी ही सुरू होती. शंभू महादेवाला ही साकडे घातलेले होते. आणि विशेष म्हणजे खंडेरायाचे नवरात्र ही चालू होती. घराघरात खंडेरायाची पूजा चालू, सुरू होती. आणि ती पूजा करत असताना प्रत्येक जण, शंभू आणि भवानी म्हणजेच या मायबापाला सांगत होते, साकडे घालत होते की, 'आमच्या राजाचे रक्षण कर, मराठी बाण्याचे रक्षण कर.'
प्रत्येक मनाची हीच घालमेल होती की, येणारी घडी काय घेऊन येणार आहे? जय, विजय, की मग हार, पराभव, की आणखी काही वेगळेच?? असे नुसते मनी जरी आले तरी, काळी काळजात चर्रर्र होत होते.

मासाहेबांचीही अवस्था तर यापेक्षाही बिकट होती. पण तरीही त्या मनानं खंबीर होत्या. त्यांना विश्वास होताच,'की या संकटावर शिवबा, भवानीच्या आशीर्वादाने नक्कीच मात करून, विजयी होऊनच परतेल.'

अगदी हाच विश्वास सत्यात उतरला होता. जिजाऊच्या या शुर पुत्राने,शिवबाने मोठ्या युक्तीने संकटाच्या पोटात शिरुन, त्यांचे आतडेच बाहेर काढले होते.अभय दे, विजय दे, याप्रमाणे शिवबाने अफजलखान रूपी दैत्याला जणू…

राजगडावरून मासाहेबांचे सर्व लक्ष प्रतापगडाकडे लागले होते. नव्हे त्यांचे चित्त तिथेच घारी सारखे घिरट्या घालत होते प्रतापगडावर. पण त्याला काहीच दिसत नव्हते, कळतही नव्हते. पण फक्त या क्षणी तिथे काय होत असेल?? असेच प्रश्न त्यांच्या भोवती पिंगा करत होते.

आणि प्रतापगडाकडून ही आनंदाची बातमी घेऊन, स्वार दौडतच राजगडाकडे आला. त्याच्याकडची बातमी ऐकून, संपूर्ण गड हा दिवाळी सारख्या आनंदाच्या आतिशबाजीत, जल्लोषात बुडाला.
गडावरच्या तोफा कडाडल्या. नगारे वाजू लागले. गडावरील ध्वजा ही विजयोत्सवाने आकाशात फडकू लागली. तोफांच्या कड कडण्याने तर आकाश दुमदुमून गेले. खूप खूप आनंद!! हा हा आनंद ओसंडूनच वाहू लागला.

गडावर? गडावरच नव्हे तर, अवघ्या स्वराज्यानेच सुटकेचा निःश्वास सोडला.या अजगरी विळख्यातून स्वराज्य बाहेर पडले होते.या ग्रहणाचा मोक्ष झाला होता.

मासाहेबांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. शिवबा विजयी झाला. महन्मंगला,आई भवानी पावलीस गं. आई भवानी पावलीस गं. लाज राखली या मायेची. ममतेची. असं म्हणून साष्टांग दंडवत त्यांनी घातला. त्या खूपच खुश झाल्या होत्या.
त्यानंतर अवघ्या गडाचे तोंड त्यांनी गोड केले. शंभू महादेवालाही हात जोडले. हृदयाच्या तामनातील गणपतीलाही मुक्त केले. सगळीकडे आनंदी आनंद भरला होता.

शिवाजी राजे कामगिरी फत्ते करून प्रतापगडावर परतले. तशी प्रत्येकास, प्रत्येकालाच आपापली कामगिरी त्यांनी दिलेली होती. सगळ्यांनी चोख कर्तव्य बजावत कार्य केले होते. प्रत्येक ठिकाणी विजय मिळवत होते. कुच करतच राहिले. खानाचे सैन्य, सैरावैर वाट मिळेल तिकडून निघून जात होते. काही पळतही होते, निघूनही जात होते. आणि आपला बचाव करत होते. काही जीवाच्या भितीने शरणही येत होते.

परंतु त्याच रात्री महाराजांनी पुढील कामगिरी चे हुकुम सोडले.विश्रांती न घेता,ना विजयोत्सव साजरा करता. सगळ्यांना विजयाचे स्फुरण चढलेले होते. आणि शत्रूकडे सगळे पराभवाच्या गर्द छायेत आहेत. त्यामुळे उसने अवसान आणून लढणे शक्य होणार नाही.अशा परिस्थितीत आपले कार्य अधिक तत्परतेने तडीस जाईल हेच त्यांनी हेरले. मनोमन जाणले होते. आणि म्हणूनच न थांबता पुढील कामगिरीवर जाण्याचे ठरले.

निघाले महाराज मध्यरात्रीच कुच केले. बादशही अंमलाखाली गेलेला प्रदेश स्वतंत्र करण्यासाठी, मराठी तलवारी उसळल्या,
'हर हर महादेव, हर हर महादेव.'ची गर्जना करत, करत. वाचा या पुढील काव्यात..

*विजय! विजय!!*

अफजलखानाचे वादळ शमवून
न दवडता एकही क्षण,
मारून टाच घोड्याला, शिवबा निघाला, आदिलशाही मुलुख जिंकण्याला।।धृ।।
खानवधाच्याच दिवशी
दोन हात या मुलखाशी
करावेत याच घडीशी
शिरवळ सासवड सुप्याला
करून हल्ला, फडकविले भगव्याला
मारून टाच घोड्याला, शिवबा निघाला, आदिलशाही मुलुख जिंकण्याला।।१।।

नेताजी ने वाईत दस्तक दिला
स्वतःला शिवबाने साताऱ्याला
नंतर आले कोल्हापूरला
स्वतंत्र केले श्री. महालक्ष्मीला
साडेतीनशे वर्षांनी पाहिले स्वातंत्र्याला
मारून टाच घोड्याला, शिवबा निघाला, आदिलशाही मुलुख जिंकण्याला।।२।।

शिरवळ सुपे वाई पासूनी
कोल्हापूरपर्यंतची सारी ठाणी
असा सारा मुलुख जिंकुनी
वळविला मोर्चा पन्हाळ्याला
सर्व गड बेसावधपणे होता निजलेला
मारून टाच घोड्याला, शिवबा निघाला, आदिलशाही मुलुख जिंकण्याला।।३।।

घेऊनी फायदा अंधाराचा
गडाला फौजा मावळ्यांच्या
दोन दिवस गड घेण्याला
अखेर लागले निशाण भगवे, पन्हाळ्याला मारून टाच घोड्याला, शिवबा निघाला आदिलशाही मुलुख जिंकण्याला।।४।।
सौ.शुभांगी जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//