Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ भाग -२६

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ भाग -२६
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी,
अर्ध्या वरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी।।

हे गीत ऐकताना मनाची खुपच घालमेल होते.
अगदी तसेच,
म्हणजे सईबाई राणीसाहेबांच्य बाबतीत झाले.
या राणी साहेब,संसाराच्या सारीपाटावरचा खेळ अर्धाच टाकून निघुन गेल्या.
शंभु बाळाचे मातृत्वाचे छत्र, ते दोन वर्षाचे असतानाच हरपले.
त्यांच्यावर बर्याच वैद्यांनी उपचार केले. पण व्यर्थ.. त्यांचे आजारपण बळावतच गेले. राजांना मात्र, सई जवळ इच्छा असूनही थांबता येत नव्हते.
अफजल खान हा जणू अख्खे स्वराज्यच बळकावण्यासाठी आलेला होता.

ही बातमी जेव्हा प्रतापगडावर आली, तेव्हा सगळेच दुःखी झाले.आणि सगळ्यांचे चेहरे उतरले. महाराजांचे दुःख तर, शब्दातच मांडता येत नाही. जीवनातली ही एक अमूल्य अशी ठेव होती. तीच आज त्यांच्यापासून नियतीने जणू हिसकावूनच घेतली होती.

महाराजांचा आणि सईबाईचा अवघा अठरा वर्षाचा संसार. महाराजांनी आणखीही विवाह केले होते, राजकारणातील भाग म्हणून त्यांनी, ही नाती जपली होती.रुजवली होती. आणि जोपासली ही होती. पण सई इतके मनाच्या जवळचे मात्र कोणीच नव्हते. कोणाशीच ते बंध जुळलेही नव्हते. नाते, मात्र एक जणीशी जुळले होते. अन् ती होती म्यनातील तलवार.
ही मात्र कधीच त्यांच्यापासून वेगळी होत नव्हती, अन झालीही नाही.

पण दुःख करत बसायला ही वेळ नव्हता. समोरच्या संकटाचे पाश अधिक आवळले जात होते. त्याचा विळखा घट्ट होत होत चालला होता. हा विळखा यापेक्षा जास्त घट्ट होण्याच्या आधीच तो थांबवायला लागणार होता. आणि त्याच दिशेने एक एक पाऊल महाराज सावधतेने टाकत होते. खानाला, 'प्रतापगडाच्या पायथ्याशीच भेट घ्यायची आहे.' याच्यासाठी तयार केले होते. आणि तो तयारही झाला होता. म्हणून मग भेटीचा दिवस निश्चित झाला.
त्या दृष्टिकोनातून मग महाराजांनी त्याच्यासाठी व्यवस्था करायला सांगितली. खानाला थांबण्यासाठी भव्य असा, उच्च सुखवस्तू असलेला शामियाना तयार करायला सांगितले.

बघता बघता भेटीचा दिवस उजाडला.
सगळ्यांच्या काळजात धस्स होत होते. हा दिवस म्हणजे…नको, कल्पनाही नकोच करायला. कारण मन चिंती, ते वैरीही न चिंती. असंच म्हणतात.

इकडे राजगडावर, मासाहेबांची अवस्था ही 'जणू कुणी काळीज काढून नेते की काय!' अशी झालेली होती. हृदयाच्या तामनात त्या विघ्नहर्ताला अश्रूंचा अभिषेक सुरू होता. माता भवानीचीही आळवणी सुरू होती. शिवशंभुला ही साकडे घातलेलेच होते. सगळा राणीवसाच भवानीची आराधना करत होता.

गडावर राजांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या.समजा, "काही बरे वाईट झाले. तर पुढे काय करावे." याचे सगळे कृतीयुक्त वर्णन त्यांनी सांगितले होते. हे सगळे सांगताना ते खूपच भावुक झाले होते. ऐकणारे ही अक्षरशा तुडुंब भरलेल्या डोळ्याने ऐकत होते.
म्हणत होते, "नका राजे, नका असं बोलू, आम्हाला ऐकवत नाहीये." पण तरीही सगळं व्यवस्थित सर्वांना समजावून, राजांनी निघण्याची तयारी केली.
खान तर वाटच पाहत होता, की कधी एकदा तो शिवा येतो, आणि मग मी त्याला…..
बघूया पुढील काव्यात शिवबांची तयारी*भेटीची तयारी*

दिवस भेटीचा उजाडला,
लागले शिवबा तयारीला।।ध्।
सुचिर्भुत सकाळी होऊन,
श्री.शंकराचे केले पूजन,
भवानीचे मनात चिंतन,
निघालो मी आज स्वारीवर, विजयी करा मला।।
दिवस भेटीचा उजाडला,
लागले शिवबा तयारीला।।१।

केले ब्राह्मणास नमन,
सवत्स गाईचे दिले दान,
तीर्थ रूपाची आठवण,
तुमच्या झालेल्या अपमानाचा, निघालो मी सूड घेण्याला।।
दिवस भेटीचा उजाडला,
लागले शिवबा तयारीला।।२।।

चढवले अंगात चिलखत,
त्यावर अंगरखा मस्त,
पोलादी जिरे टोप डोक्यात,
वाघ नखे, बिचवा, तलवार, सुरक्षित केले तनुला।।
दिवस भेटीचा उजाडला,
लागले शिवबा तयारीला।।३।।

मुद्रा शांत अन् राजस,
व्यक्तिमत्व दिसे लोभस,
कानी बाळी गंध कपाळास,
पाहुनी रूप हे शिवबाचे,अवतारी पुरुष भासला।।
दिवस भेटीचा उजाडला,
लागले शिवबा तयारीला।।४।।

कामगिरी फत्ते करण्याला,
उचित सूचना मावळ्याला,
गडावरील प्रजाजनाला,
डोळे अश्रूंनी भरले, हात उठले देण्या आशीर्वादाला।।
दिवस भेटीचा उजाडला,
लागले शिवबा तयारीला।।५।।

गडावरील माती हाती,
घेऊन लावली माथी,
जन्मापासून माझी साथी,
क्षणभर दृश्य पाहून हे, प्रतापगडही गहिवरला।।
दिवस भेटीचा उगवला, लागले शिवबा तयारीला।।६।।
@ सौ.शुभांगी सुहास जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//