शिवकाव्य कौस्तुभ -भाग २५

Shivkavya Kaustubh Part 25
आधीच्या भागात आपण पाहिले की,
शिवाजी महाराज हे जड अंतकरणाने, अन् हृदयाला पिळवटून काढणारा तो क्षण.
म्हणजे सईबाई राणीसाहेबांचा निरोप. हा घेताना असंख्य वेदना त्यांना होत होत्या. तसेच आईचा म्हणजेच मासाहेबांचा निरोप घेताना ही.
आई आणि पत्नी ही दोन्हीही नाती, अतिशय नाजूक असतात. हे कोणत्या शब्दात बांधता येत नाही. की मांडताही येत नाहीत. ती फक्त अनुभवायची असतात. हृदयाच्या डोळ्यांनी पहायची असतात. आणि तिथेच ऐकायची असतात. तिथेच समजायची आणि उमजायची सुद्धा.. त्यातून येणारे अश्रू आणि फुटणारे हुंदके म्हणजेच आतली साद.

मासाहेबांचा थोरला पुत्र संभाजी हा काहीच दिवसापूर्वी मृत्यू पावला होता. त्याला हाच अफजलखान कारणीभूत झाला होता. आता शिवबा ही मृत्यूलाच सामोरे जायला निघाला होता.
"नको शिवबाऽ नको जाऊस त्याच्याकडे. तो तुला…"पुढे बोलवेना म्हणून त्या थांबल्या. "नको, नको मासाहेब पुढे बोलू नका. तुमच्या मनीची भीती आम्ही जाणतो. पण चिंता नसावी. भवानी मातेने आम्हास पहाटेस, स्वप्नात येऊन उजवा कौल दिला आहे."
आईचे सांत्वन करताना होणाऱ्या यातना, शिवबा महत प्रयासांनी लपवत होते.
'देव, प्रजा आणि धर्म'यांच्या रक्षणाचे व्रत शिवबाने घेतलेले होते. आणि तेच त्यांचे जगणेही होते.
शेवटी कठोर होऊन, मासाहेबांनी शिवबांना आशीर्वाद दिला." विजयी भव: विजयी होऊन परत या."

त्यानंतर दोन वर्षांच्या शंभू बाळाला घट्ट पोटाशी धरले. त्या मिठीत काय होते? हे त्या दोघा पिता पुत्रालाच माहित. त्यानंतर महाराजांनी दारुची महालाचा निरोप घेतला. आणि त्यांनी प्रतापगडाकडे कुच केले.

अफजल खानही सर्व लावाजम्यासहित वाईत येऊन दाखल झाला होता. पण पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे जरा शांत होते. तरीही काही ठिकाणी हल्ले करून तो प्रदेश ते जिंकेत होते. मग खानाने त्याचा वकील म्हणजे कृष्णाजी भास्कर यांना पाठवले बोलणी करण्यासाठी.
आशी की," शिवाजीला तुम्ही माझ्या भेटीस आणा काहीही करून."
वाचु या पुढील काव्यात..

*बोलणी*
बोलणे व्यवहाराची करण्याला
प्रतापगडी वकील खानाचा आला।।धृ।।

नाव कृष्णाजी भास्कर खास
मराठी मुलखाचा हा माणूस
आदिलशाहीच्या चाकरीस
स्वकीययांचा घात करण्याला
जसा गडावरी अक्रूर हा भासला।।
प्रतापगडी वकील खानाचा आला।।१।।

पत्र खानाचे वाचू लागला,
'पराक्रमाने प्रदेश जिंकीला
करा गुमान परत आम्हाला
नाही तर तयार व्हा
भयंकर परिणाम भोगण्याला।।
प्रतापगडी वकील खानाचा आला।।२।।

बोलले राजे ऐकून पत्राला
'वडिलांसारखे तुम्ही आम्हाला
नाश जर हा मान्य तुम्हाला
देव, देश आणि धर्माचा..
तुमच्या हातून तयार मी मरणाला'।।
प्रतापगडी वकील खानाचा आला।।३।।

ऐकताच वाणी शिवबाची
मती स्तंभित झाली भास्कराची
ओळख झाली तेजस्वी व्यक्तीची
अबला, बाल आणि वृद्धासाठी
खरेच रक्षिण्या हा देवदूत वाटला।।
प्रतापगडी वकील खानाचा आला।।४।।

ठरले बोलवावे खानासी
प्रतापगडाच्या पायथ्याशी
भेट होईल तिथे आमच्याशी
सांगा शिवबा आहे भ्याला
तुमच्या ह्या अचाट शौर्याला ।।
प्रतापगडी वकील खानाचा आला।।५।।

शुभांगी सुहास जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)

🎭 Series Post

View all