Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ -भाग २४

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ -भाग २४
ज्या अंगी मोठेपण,
तया यातना कठीण.
या प्रमाणेच शिवबां हे, 'राजे' म्हणून मोठे होत होते. मोठे व्हायचे तर घावावर घाव हे सोसावेच लागतात. त्याचप्रमाणे शिवबांनाही हे मोठे पण मिळवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातील पावला पावलावर जणू सुरुंग पेरलेले होते, पदोपदी संकटाशीच सामना करावा लागत होता.रात्र असो की दिवस, सदैव सावध राहावे लागत होते.

सईबाई या त्यांच्या पहिल्या पत्नी.
परम प्रतापी संभाजी महाराज यांच्या मातोश्री.
सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील लेक.हे घराणं तेथील तोलामोलाचे होते.
गुणी अन् गोड अशी ही मुलगी जिजाऊ ला अतिशय आवडली.
सात वर्ष वयाची ही मुलगी त्यांनी शिवाजी साठी पसंत केली.
आणि शिवबां सोबत सई चे लग्न झाले.
मासाहेबांनी सईवर योग्य संस्कारांची रुजवण केली.त्याच्या हाताखाली ही महाराणी तयार झाली.
दिसायला देखणी,गुणी आणि सोज्वळ स्वभावाची ही सुनबाई चांगलीच तयार झाली.
चांगुलपणा सोबतच, माणसांना धरुन ठेवणे, वेळप्रसंगी धीराने वागुन आलेल्या प्रसंगातुन मार्ग काढीत हित साधणे.हे त्यांना अवगत होते.

शिवबां सोबत, लहान वयात लग्न झाले.या दोघांमध्ये एक छान मैत्रीचे बंध तयार झाले. या मैत्रीमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला, आणि या विश्वासातून त्यांचे प्रेम फुलत गेले. यामुळे एक वेगळेच भावविश्व या दोघांचे तयार झाले. थोडासा लटका रुसवा थोडा राग ही यामध्ये होता. पण त्यामधूनही या दोघांचं प्रेम वृध्दिंगत झाले. शिवाजी राजांचे पहिले प्रेम होते.
सईचा स्वभाव गोड आणि समजूतदार होता. महाराजांच्या मनीचे भाव त्या अचूक टीपीत होत्या. आणि याच गुणामुळे या दोघांमध्ये एक अतूट बंध निर्माण झाले होते. प्रसंगी उपयुक्त सल्लाही त्या महाराजांना देत होत्या. ज्यामुळे महाराजांचे मनोबल वाढत असे.

तर अशा या प्रेमळ सईबाईं राणीसाहेब यांना,१४ मे १६५७ या दिवशी पुत्ररत्न झाले. मासाहेबा सहित शिवाजी महाराज यांना खूप खूप आनंद झाला. गडावर जल्लोष करण्यात आला. पण काही दिवसातच या आनंदावर विरजण पडल्यासारखे झाले. सईबाई ना बाळंत रोगाच्या व्याधीने त्रस्त केले.ज्यामुळे बाळाला त्यांचे दूधही मिळाले नाही. दिवसेंदिवस या रोगाने त्या अशक्त होऊ लागल्या. मग हळूहळू त्यांनी अंथरूण धरले.

पण शिवबांना त्यांच्यासाठी कुठे वेळ होता? त्यांच्या संसाराचा व्याप फारच मोठा होता. १२मावळांचा संसार त्यांनी हाती घेतला होता.
त्यांनाही सई बाईपासून आणि शंभू बाळापासून दूर जावेसेच वाटत नव्हते.
पण…
अफजलखान रुपी वादळ स्वराज्यावर चालून आलेले होते. आणि या वादळाशी दोन हात करण्यासाठी शिवबा अन् जीवा भावाची मावळसेना आपले कुटुंब कबीले सोडुन या आपल्या राजासाठी लढाईस सज्ज झाली होती.

पण हा क्षण.. शिवाजी महाराजांसाठी खुपच कठीण होता.कारण सईबाई, या घडीला खुपच आजारी होत्या. आणि तो आजार अधिकच बळावत चालला होता.
त्यामुळे अश्या अवस्थेत राणीसाहेबांना सोडुन जाणे खुपच कठीण होते.त्यांचा पाय निघत नव्हता.
पण..पाहुया या काव्यात.


*सई*१


हात हाती सईचा घेऊनी,
ओघळले अश्रू गालावरूनी,
आला हुंदका मनात दाटूनी ,
कंपित शिवाजी राजे बोलले गहिवरूनी।।धृ।।

विरहाचा शाप आम्हाला,
जगाचा संसार मांडला,
जगावे वाटते राणी फक्त पिता पुत्र म्हणूनी।। कंपित शिवाजी राजे बोलले गहिवरूनी।।१।।

संकट आले एक जबर,
येऊ करून त्याचा संहार,
करू आम्ही हाताने तुमचे औषध पाणी।।
कंपित शिवाजी राजे बोलले गहिवरूनी।।२।।

या अवस्थेत सोडून तुम्हाला,
नाही जावे वाटत आम्हाला,
झालो आहोत अगतीक आम्ही 'राणी'।।
कंपित शिवाजी राजे बोलले गहिवरूनी।।३।।

भक्कम साथ हवी तुमची,
शंभूला ही गरज आईची,
नका जाऊ अशा अर्ध्यावर डाव मोडुनी।।
कंपीत शिवाजी राजे बोलले गहिवरूनी।।४।।

*सई*२

आला हुंदका मनात दाटूनी
कंपित सईबाई बोलली गहिवरूनी।।

संकटी मात करावी हिमतीनं,
माता भवानीचे आहे वचन,
खात्री आम्हाला जिंकाल तुम्ही याही क्षणी।।
कंपित सईबाई बोलली गहिवरूनी।।

शंभू बाळाची व्हावे तुम्हीच आई,
आमचा आता भरोसा नाई,
जाताना स्वामी माझ्या भाळी कुंकू जा लावुनी।।
कंपित सईबाई बोलली गहिवरूनी।।
शुभांगी सुहास जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//