Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ भाग - २२

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ भाग - २२
आदिलशाही दरबारातील तबकातला विडा उचलणारा, धिप्पाड देहाचा, अचाट शौर्याचा तसेच शूर आणि पराक्रमी वीर म्हणजेच 'अफजल खान' होय होय.
अफजल खानच यानेच तबकातील विडा उचलला. 'सह्याद्रीच्या सिंहास कैद' करून आणण्यासाठी.
खान हा कडक शिस्तीचा उत्तम प्रशासक होता. तो त्याच्या अखत्यारीतल्या प्रदेशातील रयतेवर जुलूम करीत नव्हता.परंतु स्वभावाने फारच क्रूर होता. धर्मवेडा,महत्वकांक्षी होता. त्याच्या पराक्रमाची खूपच दहशत बसलेली होती. मात्र बादशहाचा तो एकनिष्ठ सरदार होता. आणि सर्व सरदारात याचा दरारा मोठाच होता. त्यामुळेच याला सगळे वचकून होते. पण तो भोसले कुटुंबाचा मात्र वैरी होता. हाती घेतलेल्या कामगिरीसाठी भल्याभुऱ्या मार्गाचा अवलंब करून, तो ते काम फत्ते करीत असे.
असाच एक अनुभव त्याच्या बाबतीतला.. शिरेपट्टण या कर्नाटकातील राज्याचा राजा (संस्थानिक) म्हणजेच कस्तुरी रंग.
तर बादशहाच्या आदेशानुसार अफजलखान या राज्यावर चालून गेला. कस्तुरी रंग राजाने राज्याचा उत्तम बंदोबस्त ठेवलेला होता. केलेला होता. झुंज चालू होती. पण विजय मिळत नव्हता. खानापुढे राजा काही नमत नव्हता.
मग खानाने युक्ती केली. त्या राजाला तहासाठी तयार केले. आणि वाटाघाटी साठी स्वतःच्या छावणीत विश्वासाचा शब्द देऊन बोलावले. राजाचा स्वभाव साधा आणि सरळ होता. तोच येथे नडला.तो सहज विश्वास ठेवून छावणी दाखल झाला.
पण अरेरेऽ, अरेरेऽ दगा झाला.. अफजलखानाने त्यास दगा करून ठार केले.
असा हा क्रूर, दगाबाज अफजलखान. शिवाजी महाराजांच्या मोहीमेवर स्वराज्याकडे कुच करता झाला.
स्वराज्या सहित शिवाजी महाराजांच्या वर हे संकट चालुन येत आहे. असे कळाल्यावर सगळेच काळजीत पडले होते.ही खबर महाराज आणि माससाहेबा साठी तर भयंकरच होती.'माझ्या पोरांनी रक्त शिंपडून उभे केलेले हे स्वराज्य, तो महिषासुर आता तुडवुन तुडवुन त्याची राख रांगोळी करणार!' याच काळजीने त्यांच्या मनाची तगमग होत होती.
येता येता आई तुळजाभवानीचे देऊळ खानाने फोडले. ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप संताप आला. त्यांचे मन त्यांना सांगू लागले, 'चल उठ.. तुझ्या भवानी तलवारीने त्याची…' पण दुसरे मन म्हणाले, 'नाही.. योग्य वेळेची वाट बघ.. थांब..' राजांना विवेकी सांगने पटले. 'धीर धरायचा' असेच त्यांनी ठरवले.
वाचु या पुढील काव्यात..

*चिंता राजगडी*
'करीन मी कैद एवढ्याशा
त्या बच्चाला सह्याद्रीच्या.'
विडा उचलला अफजलने
दरबारात आदिलशाहीच्या।।धृ।।

वार्ता आली राजगडावर,
भिती सर्वांच्या चेहऱ्यावर,
फौज संगती बेसुमार,
असा करावा प्रतिकार?
प्रश्नच समोर शिवबाच्या।।
विडा उचलला अफजलने
दरबारात आदिलशाहीच्या।।१।।

सल्लाविचारी मासाहेबांला,
'सोडु नकोस रे धीरा ला,
चिंता आहे त्या भवानीला,
लावील तीच रे मार्गाला.'
जणू वदली भवानी
तोंडून जिजाऊंच्या।।
विडा उचलला अफजलने
जी दरबारात आदिलशाहीच्या।।२।।

'आहे उसने एक फेडायचे,
संभाजीच्या निष्पाप रक्ताचे,
आमच्या धन्याच्या वरातीचे,
आता वस्त्रहरण स्वराज्याचे,
नाही! शिवबा नाही!!
कर कठोर निश्चय
अशा राक्षसाला संपवण्याचा.'
विडा उचलला अफजलने
दरबारात आदिलशाहीच्या।।३।।

मिळाला धीर शिवबाला,
मग भरवले दरबाराला,
बोलावले वीर सरदारांला,
चाचपले एकेकाच्या मनाला,
खेळुन डावपेच,
लाभ हा डोंगर दर्‍यांचा।।
विडा उचलला अफजलने
दरबारात आदिलशाहीच्या।।४।।
शुभांगी सुहास जुजगर.

(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)
टीप-काही शब्द हे कथानकाच्या दृष्टीने वापरलेले आहेत.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//