शिवकाव्य कौस्तुभ -भाग १९

Shivkavya Kaustubh Part 19
आधीच्या भागात..
'गनिमी कावा' हा मंत्र घेऊनच शिवबाने युक्तीने सर्व शाह्यांच्या फण्यावर नृत्य करत करत, सोडा आमच्या पिताश्रींना नाहीतर..? अशीच जणू आज्ञा केली.
आणि घडून आलेल्या सर्व घटनांचा परिणाम, म्हणून मग विजापूरच्या बादशहाने हे जाणले की 'दिल्लीचा लष्करी रोष पत्करण्यापेक्षा या शहाजीराजांना सोडलेले बरे' म्हणून मग त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले.
आणि शहाजीराजे ह्यांची अगदी सुखरूप सुटका झाली.

अन् योगायोग असा की नेमका वटपौर्णिमेचाच तो दिवस होता.
जिजाऊंना ही खबर राजगडावरकळाली.
त्यांना खुपच आनंद झाला. आपल्या या पुत्राचा त्यांना अभिमान वाटला.
'आज आमचे सौभाग्य जणू यमाच्याच तावडीतून तुम्ही सोडवलं आहे राजे.'असे उद्गार नकळत त्यांच्या तोंडून निघाले.

असेच या शिवविजयाच्या वार्ता पसरू लागल्या होत्या.अवघा महाराष्ट्र 'हिंदवी स्वराज्य'या कल्पनेने जागृत झाला होता.

असेच वरंधा घाटात,(आताचा बहुतेक सातारा जिल्हा) शिवथर या गुहेत अगदी निबीड वनात असलेली ही 'शिवथर घळ' म्हणजे गुहा ,येथे बसुन समर्थ रामदास स्वामी, श्रीरामाच्या प्रेरणेने एक चिरेबंदी,बुलंद असा काव्यग्रंथ रचित होते.'दासबोध'हा तो ग्रंथ.
याच आपल्या काव्यातून त्यांनी कर्मयोगाचे तत्वज्ञान जगाला सांगितले आहे.अखंड जन जागृतीचे कार्य त्यांनी केले.श्रीरामाची भक्ती आणि श्री.हनुमानाची उपासना त्यांना अतिशय प्रिय होती.
पुढे शिवाजी महाराज ही स्वामींच्या संपर्कात आले.त्यांनाही योग्य असा उपदेश त्यांनी केला.
शिवाजी महाराज यांच्या विषयी त्यांनी हे काव्य लिहिलेले आहे.
'निश्चयाचा महामेरू।बहुत जणांनी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ।।
पाहुया काय सांगत आहेत आणखी या काव्यात..

*शान सह्याद्रीची*
स्वतंत्र्याचे वाजले डंके, सह्याद्रीत हा भगवा फडफडे,
रामदास स्वामीं सांगे शिवबाला,
'झाला जन्म तुझा हिंदवी स्वराज्य स्थापण्याला।
नाही विराम आता या शुभ कार्याला।।धृ।।

शक्तीची करा उपासना,
गनिमी काव्याची योजना,
असे करूनी सुखवी प्रजाजना,
प्रयत्नांती परमेश्वर हे जाणा,
दुष्टांची नको गय आता,धरणीला भार त्यांचा झाला।
नाही विराम आता या शुभ कार्याला।।१।।

युक्तीने टाकावे डाव सारे,
शत्रुला दाखवावे अस्मानी तारे,
प्यावे साऱ्या मावळ्यांनी 'स्वा'* वारे,
आपापसातील कलह विसरा रे,
मित्रांची या गट्टी जमवुन, पळवावे परकीय सत्तेला।
नाही विराम आता या शुभ कार्याला।।२।।

जुगारूनी परक्यांची चाकरी,
धरावी तलवार हाती खरी,
समयी धरावा धीर अंतरी,
निराश न व्हावे कधीही परी,
ओळखावे 'किंमत असते शेळीपेक्षा वाघाच्या जगण्याला'
नाही विराम आता या शुभ कार्याला।।३।।

शुभांगी सुहास जुजगर.
*स्वा* -स्वातंत्र्याचे.

🎭 Series Post

View all