Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ -भाग १४

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ -भाग १४
हिंदवी स्वराज्याचा, डौलाने फडकत असलेला झेंडा या मराठी मुलखाला सांगत होता 'देव अन् धर्माचे राज्य येथे निर्माण होणार आहे.'
एकनाथ महाराजांच्या आर्जवीला आणि जिजाऊ च्या आर्त हाकेला ऐकुन आदिशक्ती ने
कौल दिला होता. दान दिले होते.'दार उघड, बया दार उघड.'या प्रमाणे आज हे दार उघडले होते.

तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.गड जिंकल्याचा आनंद सर्वानीच साजरा केला.पण आता थांबुन चालणार नव्हते.म्हणुन लगेच तोरणा गडावर अधिक बंदोबस्त करून तो बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.कुठे कुठे डागडुजी करणेही आवश्यक होते.त्यासाठीची कामे सुरू झाली.शिवराय हे जातीने लक्ष घालून कामे करून घेऊ लागले होते.
तर ही डागडुजी करत असताना किल्ल्यावर धनाने भरलेले हंडे सापडले.हे पाहुन सर्वचजण खुपच हर्षित झाले.'भवनी पावली!भवानी पावली!!' आपल्याला भवानी मातेने स्वराज्यासाठी धन दिले आहे.
हे पाहुन प्रत्येकाच्या आकांक्षेने झेप घेतली.स्वराज्याच्या स्वप्नाचे घोडे वेगाने दौडु लागले. हाती घेतलेले कार्य न थांबता चालु ठेवावे.असाच संकेत समजुन या धनाचा उपयोग करून घ्यायचे ठरले.
वाचु या पुढील काव्यात..

*धनलाभ*

तुळजाभवानीने आशिर्वाद हा दिला,
तोरण्यावर हंडा धनाचा सापडला।।ध्।।

करीत असता डागडुजी किल्ल्याची,
दिसली घागर होनमोहरांची,
हर्षित झाली मने मावळ्यांची.
स्वराज्य उभारणीस मदतीचा हात दिला।
तोरण्यावर हंडा धनाचा सापडला।।१।।

खुष, शिवाजी राजे झाले,
मांसाहेबांचे नेत्र पाणावले,
सर्व महाल दिव्यांनी सजले.
वसंताचे आले रूप जणु मावळायला।
तोरण्यावर हंडा धनाचा सापडला।।२।।

जन्म एका नव्या कल्पनेचा,
आग्नेयेस पहाडी मुरूंबदेवीच्य,
एक बळकट गड बांधायचा.
योग्य जागा तीच राजधानीला।
तोरण्यावर हंडा धनाचा सापडला।।३।।

ठरला मुहूर्त,तयारी पुजेची,
साथ भक्कम जीवलग मावळ्यांची,
ओढ लागली नव चैतन्याची,
भराभर झाली सुरूवात नव निर्मितीला।
तोरण्यावर हंडा धनाचा सापडला।।४।।

कामगारांच्या हाती कौशल्य न्यारे,
रुपं ही विश्वामित्रांची आहेत खरे,
हळुहळू नवी वास्तु आकारे.
बघता बघता मुर्त रुप आले गडाला।
तोरण्यावर हंडा धनाचा सापडला।।५।।

'राजगड' हे नाव ठरले,
स्वराज्याने बाळरूप हे धरले,
हर हर बाहुत स्फुरण चढले.
राहिला ना पारावार सर्वाच्या आनंदाला।
तोरण्यावर हंडा धनाचा सापडला।।६।।

सौ. शुभांगी सुहास जुजगर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//