शिवकाव्य कौस्तुभ -भाग १३

Shivkavya Kaustubh Part 13

बाल वयातच असलेल्या शिवबाने आणि या मावळतील त्यांच्या सवंगड्यानी, रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा घेऊन, अमलात आणली ती तोरण गडावर स्वारी करून.

हिंदवी स्वराज्याचे तोरण,याच किल्ल्यावर स्वारी करून बाधले. मावळ्यांनी आणि शिवाजीने पहिल्याच हल्ल्यात हा गड काबीज केला.आणि साडेतीनशे वर्षांच्या काळारात्रीनंतर पहिला उष:काल तोरण्यावर झाला.हिंदवी स्वराज्याचा झेंडा येथे डौलाने फडकला.

'देव, देश, धर्माचे अन् स्त्रियांचे रक्षण करणारे राज्य, आता येथे निर्माण होणार.' असाच संदेश हा डौलाने फडकत असलेला,हिंदवी स्वराज्याचा झेंडा आसमंताला सांगत होता.

पहिला विजय खुप महत्वाचा आणि प्रेरणेचा असतो.या विजयावर पुढील कार्य अवलंबुन
असते.सगळ्यांना स्फुरण चढले.आनंदाचे, धैर्याचे, आणि आत्मविश्वासाचे.

ही बातमी वार्याने येऊन जिजाऊंच्या कानात सांगीतली."तुझा शिवबा,जिंकला आहे.विजयी झाला आहे.त्याची आणि बरोबरच्या सगळ्या विजयी वीरांच्या स्वागताची तयारी कर.ऊठ लाग तयारीला."
हे ऐकल्यावर तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.आनंदाश्रुनी डोळे भरले होते.या आनंदात तिने सर्वाना बोलावले.आणि सांगितले.
या पुढील काव्यात..

।।विजयानंद गीत।।

गड जिंकला गं सखे गड जिंकला ,
शिवबाने माझ्या, गड जिंकला।।धृ।।
वाजवा गडावर सनई, चौघडे,
यशाचे पहिलं पाऊल आज पडे.
डौलाने विजय पताका फडफडे.
लागा सयांनो, त्यांच्या स्वागताच्या तयारीला।।
शिवबाने माझ्या, गड जिंकला।।१।।

सडा टाकुनी रांगोळ्या काढा,
गुढ्या उभारूनी,तोरणं बांधा,
येईल माझा शिवबा राजा ,
करीन मी विजयी औक्षण तयाला।।
शिवबाने माझ्या, गड जिंकला।।२।।

आज यशाने माझे डोळे दिपले,
मन माझे आनंदाने फुलले,
स्वप्न जणु आज सत्यात उतरले,
धन्य धन्य झाले जन्म देऊनी तुला।।
शिवबाने माझ्या, गड जिंकला।।३।।

दे आशिष माते राज्याला,
योग्य न्यायाची दृष्टी राजाला,
रामराज्य वाटो जनतेला,
आई जगदंबे नेई कार्य हे कळसाला।।
शिवबाने माझ्या, गड जिंकला।।४।।

शुभांगी सुहास जुजगर.

🎭 Series Post

View all