Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ भाग 12

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ भाग 12
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवबाच्या आणि मावळ्यांच्या रक्तात सळसळत होते.
रायरेश्वराच्या मंदिरातली प्रतिज्ञा पावलोपावली 'बंड करा,बंड करा.'चला उठा कामाला लागा.'असा संदेश देत होती.
पण..मोका अन् संधी यांची शिवबा,अन् मावळे वाट बघत होते.नेमकी कुठुन आणि कशी सुरूवात करावी?या विषयावर खलबत खाण्यात मंथन सुरू होते.
एके दिवशी सहजच डोळ्या समोर आला अजिंक्य असा तोरणा गड.पुण्याच्या नैऋत्येला दहा कोसांवर असणारा हा तोरणा किल्ला.
पुणे जिल्ह्यात,वेले तालुक्यातील कानदनदीच्या खोऱ्यातील हा गड. अतिशय दुर्गम भागात वसलेला हा किल्ला.प्रचंड कडे आणि पाताळात गेलेल्या भयंकर खोल दर्या.हेच तोरणं गडाचे वैभव.बुधला माची आणि झुंजार माची.यावर पोहोचनेही अवघड.या माचीवर जायला केवळ थोड्याच रूंदीची, अरुंद अशी वाट.अन् बाजुला खोल दरी. या गडावर भवानी तोरणजाईमाता चे मंदिर आहे.

या किल्ल्याचा सर्व अभ्यास करून, कुठुन सोपे, कुठुन सहज हे ठरवुन, पहिली चढाई तोरण्यावर करण्याचे निश्चित झाले.
सगळेच मावळे खुप दिवसांपासुन या घटिकेची प्रतिक्षा करत होते.'कधी एकदा त्या सुलतानशाहीवर झडप घालुन मनातली तगमग शांत करतो.'
वाचुन या पुढील काव्यात..
।।तोरणा मोहिम.।।
एक दिवस झाला इशारा,
तोरण्यावर चढाई करण्याचा,
तोंडुन शृंखला गुलामीच्या,
श्रीगणेशा झाला मुक्त होण्याचा ।।ध्रु।।

भीमाशंकराच्या तांडव नृत्यातून,
भवानी रणचंडीच्या तलवारीतून,
साडे तीनशे वर्षाच्या निद्रावस्थेतून,
उद्रेक झाला सह्याद्रीच्या ज्वालामुखीतून.
म्यानामधील तलवारीलाही रक्ताचे लागले डोहाळे शत्रूच्या।
तोंडुन शृंखला गुलामीच्या,
श्रीगणेशा झाला मुक्त होण्याचा ।।१।।

मनी धरुन तोरणा सावज,
मावळ सेना झाली सज्ज,
निघाली ही वाऱ्याच्या वेगात,
दऱ्या कपारीचा घेऊन अंदाज,
नाद घुमला कानात खोऱ्यात,
' हर हर महादेव' गर्जनेचा।।
तोंडुन शृंखला गुलामीच्या,
श्रीगणेशा झाला मुक्त होण्याचा ।।२।।

हरणाच्या वेगाने गेले तोरणा चढून,
मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन,
तानाजी मालुसरे या वीरानं,
किल्ल्यावर स्वराज्याचे निशाण फडकवून. चोहिकडे एक मुखाने, जय जयकार झाला शिवाजीचा।।
तोंडुन शृंखला गुलामीच्या,
श्रीगणेशा झाला मुक्त होण्याचा ।।३।।

डळमळले आदिलशहाचे सिंहासन,
'कोण शिवाजी?''कसा शिवाजी?''आला कुठून?',
किल्लेदार बसला कपाळी हात मारून,
'अरे, अरे' म्हणता गड गेला हातातून,
एका क्षणात उडाला धुव्वा, शत्रुच्या भक्कम सेनेचा।।
तोंडुन शृंखला गुलामीच्या,
श्रीगणेशा झाला मुक्त होण्याचा ।।४।।

गडावर नौबती झडल्या,
नगाऱ्यांचा आवाज घुमला,
सह्याद्रीचा रोमरोम फुलला.
गडही आनंदाश्रूंनी भिजला,
अनुभव आला साऱ्यांना
निश्चयाचा एका साक्षात्काराचा।।
तोंडुन शृंखला गुलामीच्या,
श्रीगणेशा झाला मुक्त होण्याचा ।।५।।

शुभांगी सुहास जुजगर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//