Feb 29, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ -भाग ११

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ -भाग ११
जिजाऊ लाल महालातील प्रसादात बसल्या होत्या. गवाक्षातून, बाहेरचे निरीक्षण त्या करत होत्या. दूर आकाशात त्यांना दिसले, दोन पक्षी उडताना. उडत उडतच ते नागमोडी वळणे घेत घेत उडत होते. पण त्यांच्यातील अंतर कायम होते. हे बघत असताना सहज त्यांच्या लक्षात आले की, अरे शिवबांना ही, अशी सोबत करणारी कोणीतरी असायला पाहिजे. कितीही नागमोडी वळणे आली तरी तिची साथ कायम यांच्याबरोबर राहायला पाहिजे.
म्हणजे शिवबाचे आता लग्न करायला पाहिजे.

शिवबा दहा वर्षाचे झाले होते. हे वय आता लग्नाचे होते.
फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई हिच्याशी शिवबांचे लग्न ठरवले. अतिशय सोज्वळ, देखण्या रंग रूपाची, गुणी आणि गोड स्वभावाची ही मुलगी, शिवरायांसाठी निवडली.
लग्न योग्य थाटामाटात पार पडले. या लग्नाला शहाजीराजे येऊ न शकल्यामुळे त्यांच्या भेटीला जाण्याचे ठरवले. शिवबा, सई, जिजाऊ हे तिघेही निवडक व्यक्तींना बरोबर घेऊन बंगळुरू या नगरी गेले. तिथे गेल्यावर शहाजीराजांना खूप खूप आनंद झाला. त्यांचे खूप लाड आणि कौतुक राजांनी केले. सुनबाई असणाऱ्या सईबाईंची ही विशेष बर्दास्त ठेवली.
हे सर्व मग तिथे दोन वर्ष राहिले. या दरम्यान शिवबाला युद्धाचे विशेष प्रशिक्षण शहाजी राजांनी देण्याची व्यवस्था केली.
तिथे फिरत असताना तिथल्या परिस्थितीची जाणीव शिवबांना त्रास देऊन गेली. शाही अंमलाची ओळख झाली.हे असे चित्र पाहुन त्यांचे मन दु:खी झाले. एक प्रकारची चीड त्यांच्या ठायी निर्माण झाली..हे 'थांबलेच पाहिजे' असे हे शिसारी आणणारे चित्र पाहुन त्यांचे मन त्यांना 'हिंदवी स्वराज्य' निर्मितीची प्रेरणा देत होते.

आमचे राज्य,आमची सेना ,आमचा झेंडा या व्दारे धर्माचे राज्य,रामाचे राज्य आम्ही निर्माण करु.
या एकाच ध्येयाने ते प्रेरित झाले.

यामुळे ते मांसाहेबां सहित पुण्याला परत आले.
काहीच दिवसात मित्र जमवले.स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात फुलवले.त्यासाठी रानावनात, दर्या खोऱ्यात भटकू लागले. असे करता करताच एके दिवशी…

एक प्रतिज्ञा..

बस्स झाले जगणे आता,
गुलामगिरीच्या ओझ्याखाली.
मिळून सारे पेटवू आता
स्वातंत्र्याच्या जळत्या मशाली।।धृ।।

एक निश्चय करून ठाम मनात,
'हिंदवी स्वराज्य' निर्माण करू या मावळात. रायरेश्वराच्या मंदिरात, प्रतिज्ञा एक दुमदुमली।।
मिळून सारे पेटवू आता, स्वातंत्र्याच्या जळत्या मशाली ।।१।।


'दुर्जनांचा नाश' धरून मनी हा एकच ध्यास, बिंबवण्यास मनावर रात्रंदिन करूया प्रयास. तेव्हाच निर्माण होईल सुराज्य एक वैभवशाली।।
मिळून सारे पेटवू आता, स्वातंत्र्याच्या जळत्या मशाली।।२।।

प्रतिज्ञेस साक्ष आहे येथील हिरवी वनराई,
'स्वतंत्र व्हा' 'बंड करा' नाद गिरीशिखरातून येई.
'राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' आहे बलशाली।। मिळून सारे पेटवु आता, स्वातंत्र्याच्या जळत्या मशाली ।।३।।
शुभांगी सुहास जुजगर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//