शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ९ (अंतिम)

शिवा एक शौर्यगाथा..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा
कथेचे नाव :- शिवा - एक शौर्यगाथा..
© अनुप्रिया..


शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ९ (अंतिम)


शिवाचा देह रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. शिवरायांच्या स्वामींनिष्ठ मावळ्याचा असा दुःखद अंत पाहून जणू काही तो निसर्गही ओशाळला होता. जणू आभाळालाही रडू फुटलं होतं. मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला होता. सिद्दी सुन्न झाला. डोक्यावरून हात फिरवत फाजलखानकडे हताशपणे पाहत म्हणाला,

“फाजल, ये सिवा का हमशकल सिवा कासीद ऐसा था तो असली सिवा कैसा होगा? मर गया लेकिन हमारे सामने झुका नही! ये है मर्दाना सिपाही! अपने सुलतानके लिए उसने हसते हसते मौतको गले लगा लिया! ऐसे होते है क्या मराठे? जाओ फाजल, असली सिवा को पकडकर ले आओ!”

सिद्दी गरजला आणि फाजलखान शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आपल्या सैन्याच्या तुकडीसह त्यांच्या मागावर गेला. सिद्दी मसूद आधीच आपल्या सैन्यासोबत शिवरायांचा पाठलाग करत होता. बाजी प्रभू देशपांडे आपल्या मावळ्यांना घेऊन घोडखिंडीत शत्रूला रोखण्यासाठी थांबले होते. दोन उंच डोंगराच्यामध्ये असलेल्या खिंडीत वाट खूप अरुंद होती. या खिंडीतून एकावेळी फक्त एक घोडेस्वार पार जाऊ शकत असे. हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य होत असे. यामुळे या खिंडीला घोडखिंड हे नाव पडले होते. बाजी घोडखिंडीत उभे होते. त्यांनी सभोवताली नजर फिरवून आपल्या मावळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाले,

माझ्या मावळ्यांनो, आज परीक्षेची वेळ आहे. आपला राजा सुखरूप विशाळगडी पोहचेपातूर या खिंडीत शत्रूला थोपवून ठेवायचं आहे. मी बांदल सेनेचा सरसेनापती बाजी प्रभू देशपांडे देहाचा बुरूज करून गनिमाची वाट रोखेन. बांदल मावळे आहोत आपण. एक असं वादळ की, ज्याच्या नुसत्या येण्याने शत्रूच्या गोटात उलथापालथ झाली पाहिजे. भावांनो, आपल्याला लढायचंय, झुंजायचंय. अगदी शस्त्र चालवण्याची हौस फिटेपर्यंत शस्त्र चालवायची आहेत. अगदी त्या शस्त्रांचा खणखणाट सिद्दीच्या कानापर्यंत जाऊन त्याचे कान फुटले पाहिजेत. आपला दरारा दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचला पाहिजे. लढा. जीवात जीव असेपर्यंत लढा. हर हर महादेव.”

“हर हर महादेव!”

मावळ्यांनी एक मुखाने जयघोष केला. बाजींच्या बोलण्याने मावळ्यांना स्फूरण चढलं. इतक्यात मसूदच्या सैनिकांचा लोंढा घोडखिंडीत येऊन धडकला. घणघोर संग्राम सुरू झाला. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मावळ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. मुखी हरहर महादेवाचा जयघोष करत शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, रायाजी बांदल यांनी जीवाची पर्वा न करता खिंड लढवली. बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितलं होतं. त्यामुळे देहात असणाऱ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, श्वासात श्वास असेपर्यंत मावळे प्राणपणाने लढत होते. अखेर महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूनी तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. एक तेजस्वी तळपता सूर्य अखेर मावळला. जवळजवळ तीनशे बांदल मावळ्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत झुंज दिली. मसूदचे जवळपास तीन हजार सैनिक या युद्धात मारले गेले. बाजीप्रभू आणि बांदल मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली.

आपल्या जीवाभावाच्या सवंगड्यांच्या जाण्याने महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळला. जिजाऊंच्या पायाशी नतमस्तक होत त्यांनी प्रश्न केला.

“माँसाहेब, अजून माझ्या किती वीरांची आहुती हे स्वराज्य मागणार आहे? अजून किती आमच्या जिवाभावांच्या माणसांना आम्हांस गमवावं लागणार आहे?”

शिवरायांच्या डोळ्यातून आपोआप अश्रूधारा वाहू लागल्या. जिजाऊ मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या,

“शिवबा, असं हताश होऊन कसं बरं चालेल? रयतेच्या सुखासाठी तुम्हास लढावं लागेल. पातशाहींच्या तावडीतून रयतेला सोडवायचं असेल तर हे स्वातंत्र्य तर आहुती मागणारच. या अग्निकुंडात अनेक वीरांची आहुती द्यावी लागणार. स्वराज्य इतक्या सहजा सहजी कसं मिळेल? स्वराज्य म्हणजे काय तुम्हाला भाकरीचा तुकडा वाटला की मोडून तुम्हांस सहज देऊन टाकला? तुम्हीच जर असे हताश झालात तर या वीरांच्या कुटुंबियांचं कोण सांत्वन करणार? त्यांना कोण सावरणार? उठा राजे! डोळे पुसा आणि माझ्या शहीद झालेल्या माझ्या लेकरांच्या घरच्यांना भेटा. त्यांच्या दुःखावर आपणच फुंकर घाला. मायेने जवळ घ्या. त्यांचा सन्मान करा. उठा राजे! राजाने असं हताश होऊन चालणार नाही.”

शिवरायांना जिजाऊंचं म्हणणं पटलं. डोळ्यातलं पाणी पुसत ते म्हणाले,

“होय माँसाहेब, अगदी योग्य म्हणालात. आम्हांस असं निराश होऊन चालणार नाही. पुढच्या मोहिमेसाठी निघावं लागेल. आम्ही उद्याच शिवा काशीदच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांची भेट घेणार आहोत.”

असं म्हणून महाराजांनी जिजाऊंना चरणस्पर्श करून त्यांचा निरोप घेतला. शिवाजेराजे शिवा काशीदच्या गावी नेबापूरला पोहचले. राजांच्या येण्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. लोक जमू लागले. पालखीसोबत चालू लागले. महाराजांची पालखी शिवाच्या दारापाशी येऊन थांबली. शिवाची आई पंचारतीचं ताट घेऊन समोर आली आणि तिने ओवळायला सुरुवात केली तसं शिवरायांना गहिवरून आलं आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं. शिवाजी राजे आपलं रडू आवरत म्हणाले,

“अगं आई, कशापाई ओवाळतेस? तुझा मुलगा या मातीसाठी मेला. स्वराज्यासाठी कुर्बान झाला.”

शिवाची आई ओवाळता ओवाळता म्हणाली,

“आरं मला माहित्येय की. माजा शिवा मेला त्ये.”

“आई पण तुला कसं कळलं, तुझा शिवा या मातीसाठी मेला ते?”

तसं ती माऊली म्हणाली,

“आरं लेका, जवा तू त्या कमानीतनं येकलाच आत आलास नव्हं त्याच येळी मला समजलं, माजा शिवा न्हाई राहिला.”

आणि ती माऊली रडू लागली. शिवाजीराजे तिला म्हणाले,

“अगं आई, का रडतेस? एक शिवा गेला तरी हा तुझा दुसरा मुलगा शिवाजीराजा अजून जिवंत आहे.”

डोळ्यातलं पाणी टिपत शिवाची आई म्हणाली,

“आरं राजा, म्या माजा शिवा गेला म्हणून रडत नाय रं. त्या देवानं मला एकच शिवा का दिला? त्यानं जर मला दोन पोरं दिली असती तर त्ये बी सवराज्याच्या कामी नसती का लावली?”

आणि ती रडू लागली. तसं शिवाजीराजे म्हणाले,

“धन्य तो पुत्र आणि धन्य तू माऊली!”

तुळसाच्या डोईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ती स्तब्ध होऊन जागीच थबकली. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. किसन्या दारात उभं राहून टिपं गाळत होता. त्याला शिवाचे शब्द आठवत होते,

“एक दिस असा ईल, या शिवाचं नाव तुमा संमद्यांच्या तोंडामंदी आसल. तुमा समद्यास्नी माजं लय कवतीक वाटंल आन तुमीच छाती फुगवून म्हणाल, आक्शी नावाला शोभल असं काम केलं गड्या तू. नेबापुर गावाची आब राखलीस मर्दा.”

“खरं बोललास भावा, त्यो शिवा असा बिलंदर, शिवाजी राजाचं मराण मेला. दोस्ता, जिवलग असावा तर त्यो तुज्यासारखा.”

तो मनातल्या मनात पुटपुटला. इतक्यात पदराने डोळे पुसत डोईवरला पदर सावरत तुळसा माजघराच्या दारापाशी येऊन उभी राहिली आणि म्हणाली,

“राजं, माजं धनी सवराज्याच्या कामी आलं. आपल्या राजासाठी त्यानी जीव सोडला. पर काळजी करू नगा राजं, त्येंचा अंकुर माज्या पोटात वाढतूया. म्या त्याला माज्या राजाच्या रक्षणाच्या, सवराज्याच्या कामी लावीन तवाच माज्या धन्याला शांती लाभल. माज्या कुकवानं त्याचं कर्तव्य पार पाडलं. आता त्येंचा लेक बी कामी ईल आन राजाच्या पायी आपला जीव ववाळून टाकील.”

“ताई साहेब!”

शिवरायांच्या गळ्यात उमाळा दाटून आला.

“आपल्या पोटच्या लेकरांना हसतमुखाने स्वराज्याच्या हाती सुपूर्द करणाऱ्या माता आणि तुझ्यासारख्या भगिनी या हिंदवी स्वराज्यात असल्यावर लवकरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिवा काशीदच्या बलिदानाची गाथा पिढ्यानुपिढ्या लोक गात राहतील, ऐकवत राहतील. आई, जेंव्हा जेंव्हा शिवाजी राजांचा इतिहास सांगितला जाईल तेंव्हा तेंव्हा शिवा काशीदचं नाव, त्याच्या पराक्रमाची कहाणी सांगितली जाईल.”

शिवरायांचे शब्द आजही ह्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात ऐकू येताहेत. शिवा काशीदच्या बलिदानची कहाणी या डोळ्यांनी पाहत असताना हा विशाल सह्याद्री ओशाळला होता. धाय मोकलून रडला होता. निधड्या छातीच्या या निर्भिड मावळ्याने कसलीच पर्वा न करता, आलेल्या काळाला सुद्धा न घाबरता एका क्षणात आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला. घोडखिंडीतला तो थरार, तो पराक्रम पाहून हा सह्याद्री आभिमानाने फुलला होता. तिथला रक्तरंजित संग्राम पाहून, मावळ्यांच्या रक्ताने हा अवघा सह्याद्री पावन झाला. आपल्या रक्ताचं शिंपण करून माझ्या मावळ्यांनी हसतमुखाने मृत्यूला अलिंगन दिलं. सह्याद्रीच्या प्रत्येक दगडावर त्या माझ्या मावळ्यांचं नाव कोरलं गेलं. इतिहासाच्या पानावरून जरी यातली काही नावं पुसली गेली असली तरी प्रत्येक मराठी माणसांच्या मनावर ती स्वर्णअक्षरात कोरली गेलीत. ‘शिवा काशीद’ नावाच्या मर्द मावळ्याची समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी, विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी बांधलेली आहे. नेबापूरच्या (चव्हाण) पाटलांनी शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर (चव्हाण) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांशी थेट बैठक आयोजित केली. नेबापूर (चव्हाण) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणून शिवाजी महाराजांनी "मानाची पायरी" भेट दिली. ‘मानाची पायरी’ हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे. तो अजूनही नेबापुरात आहे. असा हा स्वामीनिष्ठ शिवा काशीद मरूनसुद्धा हजारो वर्ष आपल्या मनावर राज्य करत राहील. हिंदवी स्वराज्याची गौरवगाथा त्याच्याशिवाय पूर्णत्वास प्राप्त होऊ शकत नाही.

धन्य ते वीर मावळे आणि ते शिवाजी महाराज!

॥ जय भवानी॥ ॥ जय शिवराय ॥

समाप्त
©अनुप्रिया..

🎭 Series Post

View all