शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ८

शिवा एक शौर्यगाथा..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा
कथेचे नाव :- शिवा - एक शौर्यगाथा..
© अनुप्रिया..


शिवा - एक शौर्यगाथा.. भाग


“हुजूर, ये सिवा नही है! असली सिवा भाग गया!”

घाबरत शिपायाने सांगितलं. सिद्दी चिडून ओरडला,

“क्या? ये सिवा नही है?”

सिद्दी जौहरने मसुदकडे रागाने पाहत विचारलं,

“मसुद ये तुम किसे पकडकर लाये हो?”

“हुजूर, हुजूर.. किलेसे नीचे आनेवाली पालखीके साथ हमने इसेही पकडा था! ये ही असली सिवा है!”

मसुद घाबरत म्हणाला.

“बेवकूफ कही के! किसे उठाकर लेके आये हो?”

सिद्दी मसुद खाली मान घालून निमूटपणे उभा राहिला. सिद्दीने सेवकाला आदेश दिला आणि फाजलखानला तातडीने बोलवून आणायला सांगितलं. फाजलखान शामियान्यात आला.

“फाजल, देख लो ये सिवा है की नही?”

असं म्हणून सिद्दीने फाजलखानला पहायला सांगितलं. फाजलखान जवळ आला आणि त्याने शिवा काशीदच्या डोक्यावरचा जिरेटोप वर केला. तो चवताळून म्हणाला,

“जोहर, यह सिवा नही है। सिवाने हमारे अब्बाजान का कतल किया उस समय कृष्णाजीपंत भास्करकी तलवारसे सिवाके सर पर घाव हुआ था। उसकी निशानी इसके सर पर नही है। इसका मतलब ये असली सिवा नही है! दगा है ये!”

हे ऐकून सिद्दी जौहर प्रचंड चिडला. त्याने मसूदकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला,

“बेवकूफ, इसका मतलब असली सिवा भाग गया! जाओ, पिछा करो उसका! जादा दूर नही गया होगा! जाओ, खाली हात मत आना हरामजादो, उसे पकडो!”

“जी हुजूर.”

मसूद तातडीने शामियान्याच्या बाहेर पडला आणि विशाल सैन्यबळ घेऊन तो शिवाजी महाराजांच्या मागावर गेला.

इकडे दुसरी पालखी विशाळगडाच्या दिशेने कूच करत होती. इतक्यात घोड्यांच्या टापांचा आणि सैनिकांचा पावलांचा आवाज नजदिक येऊ लागला. बाजीप्रभू क्षणभर विचार करून थांबले आणि शिवरायांकडे पाहून म्हणाले,

“राजे, गनिम कधीही आपल्याला गाठू शकतो. तेंव्हा आम्हाला असे वाटते की तुम्ही काही मावळ्यांना घेऊन पुढे व्हावं तोपातूर आम्ही सिद्दीच्या सैन्याला इथे खिंडीत थोपवून धरतो. तुम्ही या राजं.”

वाऱ्याच्या वेगाने पुढे जाणाऱ्या शिवाजीमहाराजांना शत्रूच्या शक्तीचा अंदाज आला होता. शिवराय चिंतीत होऊन म्हणाले,

“बाजी, गनिम जोरावर आहे. सिद्दीची चाळीस हजाराची फौज..”

“तेच म्हणतोय आम्ही राजं, कितीही मोठा लोंढा येऊ द्या. आम्ही त्यांना खिंड पार करू देत नाही. आम्ही इथेच शत्रूला थोपवून धरतो. महाराज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. या राजे तुम्ही. जल्दी करा.”

बाजी प्रभू देशपांडे डोळ्यात पाणी आणून म्हणाले.

“नाही बाजी, आम्ही तुम्हाला असं मृत्यूच्या तोंडी सोडून जाणार नाही. आपण सगळे मिळून गनिमाशी दोन हात करू. जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. आपण सगळे मिळून पुढे जाऊ.”

शिवबाराजे गहिवरले.

“नाही राजे, तुम्ही राहिलात तर मराठा देश राहील. शेतकरी जगतील, धारकरी लढतील, रयत जगेल. महाराज, तुम्ही जगलात तर हे हिंदवी स्वराज जगेल. हा भगवा जिवंत राहील. राजे, मोठ्या पुण्याईने हे दिव्य कोणाच्या नशिबी येतं. ते भाग्य आमच्याकडून हिरावून घेऊ नका. थोरपणाच्या अधिकाराने आम्ही तुम्हास दटावतोय राजे, तुम्ही पुढे व्हा. विशाळगडी पोहचताच तोफांचे पाच बार सोडा. तोवर आम्ही गनिमास हाडामांसाची तटबंदी करून या खिंडीत रोखून धरतो. आता इथेच आमचं वैकुंठ आम्हांस साजरी करू द्या. महाराज, तुमच्या रूपाने मिळालेलं हे स्वराज आम्ही असं पाण्यात वाहू देणार नाही. राजे, तुम्ही जर गेला नाहीत तर इथेच स्वतःच्या देहाची शकले करून घेईन. तुम्हास आई भवानीची आन आहे. या राजे. या तुम्ही.”

बाजींनी राजांना आई भवानीची शपथ घातली आणि स्वतःच्या देहाचे तुकडे करून टाकू अशी प्रेमळ अधिकाराने धमकीही दिली. अखेर महाराजांच्या नाईलाज झाला. शिवरायांनी बाजींना घट्ट अलिंगन दिलं आणि ‘आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत.’ असं म्हणून मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी विशाळगडाच्या दिशेने कूच केली. आता घोडखिंडीत बाजी प्रभूदेशपांडे, रायाजी बांदल, फुलाजी आपल्या तीनशे बांदल सैनिकांसोबत शत्रूशी दोन हात करण्यास उभे ठाकले. चाळीस हजाराची मुघलांची फौजेशी लढण्यास फक्त तीनशे मावळे उभे राहिले होते.

इकडे सिद्दीच्या सैनिकांनी शिवाला पकडलं. शिवा त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता पण सैनिकांनी त्याला घट्ट पकडलं होतं. सिद्दीने शिवाला पुन्हा प्रश्न केला.

“कौन हो तुम काफर? क्या नाम है?”

कमरेवर हात ठेवत शिवा मोठ्या तोऱ्यात म्हणाला,

“शिवाजी, शिवाजी नाव आहे माजं?”

“झूठ बोलते हो तुम!”

“आरं शिवाजीच हाय म्या. नाय, मंजी शिवाजीराजं भोसले नसलो तरी नेबापूरचा न्हावी शिवा काशीद म्हणत्यात मला.”

शिवाने निडरपणे उत्तर दिलं.

“हरामखोर! पीछले चार महिनोंसे हम इस तुफानी बारिशमें यहाँ बैठे है वो क्या तुझसे हजामत करने के लिए?”

सिद्दी उद्विग्न झाला. शिवा मोठ्याने हसत म्हणाला,

“काय मंग जोहर कशी वाटली माजी हजामत?”

“हरामजादे! हमे बेवकूफ बनाकर तुम्हे क्या लगता है की, तू बच जायेगा? मौतके सामने खडा है तू!”

सिद्दी शिवाकडे पाहून म्हणाला.

“आरं जा. मरणाचं भ्या कुनाला दावतोस? सवराज्यासाठी आन माज्या राजासाठी हजार डाव मरायला तयार हाय म्या.”

“खामोश! मौतके सामने बडे बडे सुरमाँ झुक जाते है तो तू क्या चीज है? चल हमारे सामने झुक जा! कुर्निंसात कर!”

फाजलखान त्याच्यावर डाफरत म्हणाला.

“आरं जा, सोंगातला शिवाजी झालो म्हणून काय झालं? तो काय कुनापुढं पालथा पडेल? आरं, ह्ये शिवाजी नावाचं वादळ कंदीबी कुनापुढं झुकलं न्हाई, झुकत न्हाई आन झुकणार बी न्हाई.”

शिवाच्या डोळ्यातून अंगार बरसत होता. सिद्दीही इरेला पेटला. त्याने सैनिकांना आदेश दिला.

“सिपहियों, झुकाओ इसे! देखते है कैसे झुकता नही? मार मारकर इसकी हड्डीपसली एक कर दो! इसका इमान टूटकर चूर होना चाहिये!“

“तू आमचं इमान तोडणार व्हय? त्वांड बघ. आरं, इनामासाठी आपलं इमान इकणारी जात तुमची. तुमी काय आमचं इमान तोडणार? आमचं इमान, आमची निष्ठा फकस्त आमच्या सवराज्याशी आन माज्या शिवाजीराजाशी. जोहर, पदाच्या तुकड्यासाठी बादशहाचे तळवे चाटणारी कुत्री तुमी, तुमाला काय ठावं इमान कशाला म्हणत्यात? आरं एक दिसासाठी का असंना पर या माज्या देहावर सह्याद्रीच्या सिंहाची कापडं चढली. डोस्क्यावर फकस्त आऊसाहेबांम्होरं झुकणारा जिरेटोप चढला आन मला एक दिसाचा शिवाजी राजा होण्याचं भाग्य मिळालं तेंव्हाच देहाचं सोनं झालं माज्या. आता ह्यो देह तुझ्यासारख्या कुत्र्याम्होरं झुकणार न्हाई. झुकेन तर फकस्त माज्या शिवबा राजाम्होरं. देव हाय त्यो समद्या दख्खनचा. आमच्या हिंदवी सवराज्याचा. काय समजलास?”

शिवाचे शब्द सिद्दीच्या रागात भर घालत होते. काळजाला तप्त सळईने जणू डाग देत होते. सिद्दी प्रचंड चिडला आणि संतापून म्हणाला.

“हमे बादशाह का कुत्ता कहते हो? ठिक है, सिपहियों, इसे भी कुत्तेकी मौत मार डालो.”

शिवाने पवित्रा घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत तो सिद्दीच्या शिपायांची लढत होता. इतक्यात एका शिपायाने त्याच्या पोटात तलवार खुपसली. शिवाच्या रक्ताची चिळकांडी उडाली. शिवा खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा देह तडफडला. त्याने आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणाला,

“राजं, म्या माजा शब्द पाळला. माज्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्या सावलीपातूर बी कुनाला पोहचू दिलं नाय. राजंss ! या शिवाचा शेवटचा मुजरा ! त्रिवार मुजरा राजंss! राजंss.”

असं म्हणत शिवाने जीव सोडला.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया..
 

🎭 Series Post

View all