शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ७

शिवा - एक शौर्यगाथा

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा 

कथेचे नाव :- शिवा - एक शौर्यगाथा..

© अनुप्रिया..

शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ७

बारा जुलै सोळाशे साठ सालची ती रात्र. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, मेघांचा गडगडाट निनादत होता. निसर्गाने चांगलाच कहर माजवला होता. निसर्गाच्या तांडवापुढे कोणाचंच काही चालत नाही याची प्रत्यय जणू तो निसर्गच सर्वांना देत होता. अशा भर पावसात शिवा काशीद पालखीत बसून काही मावळ्यांसहित दुसऱ्या वाटेने गड खाली उतरत होता आणि दुसरीकडे शिवाजीमहाराजांची पालखी सहाशे मावळ्यांची फौज घेऊन भरधाव वेगात पन्हाळगडावरून थेट विशाळगडाच्या दिशेने निघाली होती. मावळ्यांचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलात बुडत होते. धावून धावून छातीत आग होत होती. श्वास फुलत होता तरी मावळे जीवाच्या आकांताने विशाळगडाच्या दिशेने धावत होते. ‘करा किंवा मरा‘ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

मध्यरात्रीचा प्रहर होता. सिद्दी जौहरचे सैनिक गस्त घालत होते. इतक्यात सैनिकांना एक पालखी पन्हाळगडावरून निघाल्याची बातमी समजली. सिद्दी त्याच्या शामियान्यात आराम करत होता. सैनिकांपैकी एका सैनिकाने लगेच ही खबर सिद्दीला जाऊन सांगितली.

“हुजूर, किलेसे एक पालखी नीचे आ रही है! शायद सिवा भागने की कोशिश कर रहा है!”

“क्या बक रहे हो? ये ना मुमकिन है! सिद्दीके शिकंजेसे भागकर जाना आसान नही है!” 

त्याने सिद्दी मसुदीला बोलवून घेतलं आणि त्याला पालखीच्या मागे जायला सांगितलं.

“जाओ मसुदी, सिवा भागने की कोशिश कर रहा है! उसे पकडकर हमारे सामने हाजीर करो, जाओ. गाफर भाग ना पाये!”

“जी हुजूर.”

असं म्हणत त्याने कुर्निंसात केला आणि तो तडक शामियान्यातून बाहेर पडला. शिपायांची फौज सोबत घेऊन पालखीच्या मागे गेला. त्यांनी पालखीचा पाठलाग केला व त्यांनी त्या पालखीला पकडले. शिवा काशीद पकडला गेला होता. थोड्याच वेळात मसुदी धावतच सिद्दी जौहरच्या शामियान्यात आला.

“हुजूर, जशन मनाईये! खूशखबर है! सिवा पकडा गया! दख्खन का शेर हमारी गिरफ्तमें आ गया!”

मसुदी आनंदाने म्हणाला.

“क्या? सच? पक्की खबर है? क्या सचमें सिवा पकडा गया?”

साशंक मनाने सिद्दीने मसुदीला विचारलं कारण शिवाजी महाराज इतका सहजासहजी पकडले जातील यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. 

“जी हुजूर, हमने खुद उसको पकडा है! पालखीमें बैठकर हो किलेसे नीचे आ रहा था!”

“बहोत खूब! मसुदी, आज तुमने इतना बडा काम किया है की तबियत खुश हो गयी! तुम सचमे काबिले ए तारीफ हो! जाओ, उस गाफर को हमारे सामने पेश करो!”

सिद्दी जौहरने आदेश दिला. मसुदीने मान डोलावली आणि तो कुर्निंसात करत बाहेर गेला आणि शिवाला सोबत घेऊन आला. सिद्दीने या आधी कधीच शिवरायांना पाहिलं नव्हतं त्यामुळे तेच शिवाजी महाराज आहे असं त्याला वाटलं आणि तो अदबीने बोलू लागला. 

“सिवा पकडा गया”

हा एकच जल्लोष सिद्दीच्या तळात पसरला. साऱ्या तळात आनंदीआनंद झाला होता. शिवाजीराजा, सह्याद्रीचा सिंह, दख्खनचा राजा पकडला गेला असं वाटून सारे निश्चिंत झाले. आता सर्वांचं लक्ष पकडलेल्या शिवाजी राजांकडे होतं त्यामुळे गडाकडे त्यांचं कोणाचंच लक्ष नव्हतं. याच गोष्टीचा फायदा घेऊन महाराज विशाळगडाच्या दिशेने वेगाने निघाले होते. शिवा शामियान्यात आला. 

”आओ सिवा, बिना मिलेही यहाँसे जा रहे थे! करार की बात करे बिना ही किलेसे भागना चाहता था तू? लेकिन ये यह सिद्दी ज़ोहर है, मेरे हाथ से कोई नही बचता! ”

असं म्हणून तो मोठ्याने हसू लागला.

“सिद्दी, तोंड सांभाळून बोला. आम्ही शिवाजी राजे आहोत. अवघ्या दख्खनचे राजे! असं शत्रूला घाबरून पळून जाणाऱ्यातले आम्ही नव्हे. मनात आणलं तर दिल्लीची गादीसुद्धा घेऊ आम्ही.”

शिवरायांच्या वेषातला शिवा गरजला. त्याची ती गर्जना ऐकून तिथे उभे असलेल्या सरदारांमध्ये भीतीने थरकाप उडाला. सिद्दीही थोडा वरमला. तरीही उसणं अवसान आणत म्हणाला,

“तेवर तो देखो इसके, पकडा गया है फिर भी अकड नही गयी!”

“अजून तू आमचे तेवर पाहिलेस कुठे? ”

शिवा पुढे बोलू लागला. 

“कधी कधी उंच उडी मारण्याकरीता दोन पावलं मागे यावं लागतं. त्याला यशस्वी माघार म्हणतात. त्यामुळे तहाची बोलणी करायला आलो याचा अर्थ आम्ही हरलो, घाबरलो आणि पळून जातोय असं मुळीच नाही. अरे, पळून जायचंच असतं तर तुझ्या नाकावर टिचून सहज राजगड गाठला असता; पण आम्ही पळून जात नव्हतो तर गडउतार करून आपणास भेटण्यासाठी आणि सुलाहाची बोलणी करण्याकरिता येत होतो. आम्ही इथे आलोय म्हणून शिवाजी राजा आमच्यापुढे नमला असा भ्रम कोणीही मनात बाळगू नये. सिद्दी, आम्ही हिंदवी स्वराज्याचे राजे आहोत हे ध्यानात ठेवा.”

शिवा काशीद शिवाजी महाराज बनून सिद्दीशी बोलणी करायला बसला. त्याचं चालणं बोलणं अगदी हुबेहूब शिवरायांसारखं भासत होतं. कोणालाही कसलीच शंका येण्याचं कारण नव्हतं.

इतक्यात सिद्दीचा एक शिपाई धावतच शामियान्यात शिरला आणि धापा टाकत म्हणाला, 

“हुजूर, हुजूर सिवा भाग गया!”

“क्या बकते हो! सिवा भाग गया? तो हमारे सामने बैठा हुआ ये कौन है?”

सिद्दी त्या शिपायावर डाफरत म्हणाला. ‘आपण गनिमाच्या तावडीत सापडलो. आता आपली सुटका नाही.’ हे शिवानं ओळखलं आणि तो गालातल्या गालात हसला. 

पुढे काय होतं? शिवाचं काय होईल? शिवा आणि तुळसा यांची भविष्यात भेट होईल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©अनुप्रिया..

🎭 Series Post

View all