शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ६

शिवा - एक शौर्यगाथा

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा 

कथेचे नाव :- शिवा - एक शौर्यगाथा..

© अनुप्रिया..

शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ६

सिद्दी जौहर महाराजांच्या भेटीस तयार झाला. इसवी सन तेरा जुलै सोळाशे साठ रोजी भेटीचा दिवस ठरला. योजनेप्रमाणे भेटीच्या एक दिवस आधीच्या रात्रीच शिवराय आपल्या काही मावळ्यांना घेऊन विशाळगडाकडे कूच करणार होते. त्यांच्यासोबत बाजी प्रभु देशपांडे सिधोजी नाईक निंबाळकर, रायाजी बांदल, फुलाजी, संभाजी जाधव हेही सरदार होते. घनदाट डोंगराच्या वाटेने शिवाजी महाराज गड उतरून जाणार होते आणि दुसऱ्या वाटेने काही मावळे शिवाला पालखीत बसून गडावरून खाली घेऊन येणार होते. बाजीप्रभू आणि नेबापूर पाटलांनी ही योजना आखली खरी पण त्यांचाही जीव घाबरून गेला होता. जीवाचं काय होईल काही सांगता येणार नव्हतं पण तरीही हिंदवी स्वराज्याचा सूर्य सदैव तळपत राहावा म्हणून एवढ्या मोठ्या जोखमीची योजना आखली होती. रयतेची मोगलांच्या जुलूमापासून सुटका करायची असेल तर हे कठीण आव्हान घ्यावंच लागणार होतं. सगळीकडे काळाकुट्ट काळोख पसरलेला, ढगांचा नाद, विजांचा कडकडाट ऐकू येत होता. ढगफुटी व्हावी तसा मुसळदार पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. निसर्गाने घातलेल्या तांडवातूनच मार्ग काढत यशाचं घ्येय गाठायचं होतं. 

इकडे शिवाला महाराजांचे कपडे चढवण्यात आले. महाराजांचा जिरेटोप डोक्यावर घालण्यात आला. शिवा अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसू लागला. शिवा तयार होऊन त्रंबकपंत, गंगाधरपंत आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासमोर आला. सर्वांना वाटलं शिवाजी महाराज आले म्हणून सर्वांनी त्यांना मुजरा केला. अभिवादन स्वीकारत त्याने बोलायला सुरुवात केली. 

“बाजी, आता आपल्याला या संकटातून बाहेर पडायचं असेल तर आम्हांस सिद्दीला भेटावंच लागेल. त्याच्याशी तहाची बोलणी करावीच लागतील.”

“काय महाराज? तहाची बोलणी? म्हणजे साफ शरणागती? नाही नाही. हे कदापिही शक्य नाही. अरे हा दख्खनचा राजा कोणापुढे झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. तहाची बोलणी म्हणजे सिद्दीला शरण जाण्यासारखं आहे. हा सह्याद्रीचा सिंह त्या कर्नूलच्या बोकडाला शरण जाणार? हे सह्याद्रीचं वादळ यवनांपुढे मान तुकवणार? नाही महाराज.”

त्रंबकपंत त्यांच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करत म्हणाले. 

“कोण म्हणालं आम्ही शरणागती पत्कारतोय? आम्ही तहाची बोलणी करण्यास जात आहोत.”

पलीकडून आवाज आला. सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. शिवाजी राजे समोरून येत होते.

“राजं तुमी? मुजरा राजं.”

महाराजांना समोर पाहताच सर्वांनी लगबगीने वाकून मुजरा केला.

“मग ह्यो? शिवा? माफी द्यावी राजं. आमी तुमाला ओळखलं न्हाई. खरं सांगतुय, खरं राजं कंचं आन शिवा काशीद कंचा काय बी कळंना.”

बाजी प्रभू शरमेने मान खाली घालत म्हणाले. 

“फसला का न्हाई सरदार? त्यो सिद्दी बी असाच फसल आन राजं सुखरूप विशाळगडावर पोहचत्याल.”

बाजींकडे पाहत शिवा मिश्किलपणे हसत म्हणाला तसें सगळेजण जोरात हसले. बाजींनीही होकारार्थी मान डोलावली.

“बाजी, अगदी खरं बोलताय. शिवाजी आणि शिवा काशीद यामधला खरा शिवाजी कोणता हे गनिमांना सुद्धा ओळखता येणं अशक्य आहे. खरंतर स्वराजातील हरेक मावळा शिवाजीच आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक दऱ्याखोऱ्यात त्या गनिमांना एक शिवाजी मिळेल. जो देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढेल. मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. तसाच हा प्रतिशिवाजी खरा शिवाजी भोसले म्हणून सिद्दीशी तहाची बोलणी करायला जाईल.”

बाजींकडे पाहत शिवाजी महाराज म्हणाले.

“हां, मंजी शिवा त्या सिद्याला बोलण्यात गुतवून ठिवल आन राजस्नी इथनं निसटायला येळ घावल. ह्यो झकास बेत हाय राजं. तेवढ्या येळत आपण शत्रूला हुलकवणी देऊ आणि पुढं निघून जाऊ.”

रायाजी आनंदाने म्हणाला.

“आपली सुटका होईल पण मग ह्या शिवाचं काय? हा खरा शिवाजी नाही हे जर सिद्दीच्या लक्षात आलं तर….”

महाराज कळवळून म्हणाले.

“तर? तर काय राजं? त्यो माजा जीवच घेईल नव्हं? घिवू द्या. मरणाचं भ्या आमा मावळ्यास्नी कदीपास्नं वाटाय लागलं? आवं, मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर तांडव करणारे मावळे आमी, आमाला कसलं भ्या? राजं, या जीवाची कशापाई चिंता करता? माज्या मायबांची पुण्याई किती, माजं भाग्य किती थोर बगा की, ह्यो शिवा येक दिसाचा का असना पर शिवाजी राजाचं मरण मरणार हाय. राजं, असं किड्यामुंग्याचं जिणं जगण्यापरिस येक दिसाचा राजा बनून मरीन म्या. लोक सांगत्याल, ह्यो शिवा असा बिलंदर की त्यो शिवबा राजाचं मरान मेला. महाराज, म्या मरून बी हजारो वरीस जिता ऱ्हाईन. नगा काळजी करू. येतो राजं.”

त्याच्या बोलण्याने सगळ्यांचे डोळे पाणावले होते. थोड्याच वेळात महाराजांना गड उतरून खाली घेऊन जाण्यासाठी पालखी तयार करण्यात आली होती.

“चला राजं, निघाय पायजेल. शिपायांच्या गस्तीची पथकी आली की घोळ व्हायचा. जल्दी करा. येळ दवडून चालायचं नाय. शिवा चल बिगीनं, पालखीत बस.”

बाजी प्रभू घाईने म्हणाले.

“व्हय जी.”

असं म्हणत शिवा पटकन पालखीकडे वळणार इतक्यात महाराजांनी त्याचा हात पकडला.

“शिवा..”

महाराजांनी त्याला आर्त साद घातली. महाराजांनाही शिवाला असं शत्रूच्या तोंडी सोडून जाणं जीवावर आलं होतं. काहीतरी विचार करून ते एकदम म्हणाले,

“शिवा आमच्यासंगे चल. जे काही होईल ते पुढच्या पुढे पाहू. सर्वजण मिळून सामना करू. आमच्या जीवाच्या रक्षणासाठी आम्ही तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही. आम्ही इतके स्वार्थी बनू शकत नाही. आमच्या जिवाभावाच्या लोकांना असं वाऱ्यावर सोडू शकत नाही. शिवा चल. आमच्यासवे चल.”

“महाराज?”

सर्वांनी चमकून शिवरायांकडे पाहिलं. राजे शिवाला त्यांच्या सोबत येण्यासाठी सांगत होते. ते त्याचा हात पकडून त्यांच्या सोबत घेऊन जाणार इतक्यात महाराजांनी पकडलेला त्याचा हात शिवाने अलगद सोडवून घेतला आणि महाराजांना मुजरा करत म्हणाला,

“राजं, माफी द्यावी पर म्या तुमच्यासंग येणार नाय. म्या त्या सिद्याला माज्यासंगट बोलन्यामंदी गुतवून ठिवतो आन राजं तोवर तुमी सुखरूपपणे विशाळगडावर पोहचा. जल्दी करा. राजं, तुमच्या पायाशी ह्यो जीव ओवाळून टाकलाय. आता माघार न्हाई.”

“शिवा.. ऐक माझं.”

शिवाजीराजांना गहिवरून आलं होतं. त्यांनी आपल्या गळ्यातली कवड्यांची माळ शिवाच्या गळ्यात घातली. शिवाच्या डोळ्यात पाणी दाटू लागलं. आवंढा गिळत तो म्हणाला,

“राजं, म्या येक न्हावी पर तुमी तुमच्या काळजामंदी जागा दिलीसा आन माजं समदं आयुष्य पावन झालं. आवं राजं, जवा तुमची कापडं माज्या अंगाला लागली तवाच शिवाच्या अवघ्या देहाचं सोनं झालं. अजून काय पायजेल या जीवाला? आता त्या सिद्याम्होरं म्याच शिवाजी राजं बनून जाणार हाय.”

“भले शाब्बास!”

त्याच्या वाक्यासरशी बाजी उत्स्फूर्तपणे म्हणाले. शिवरायांच्या डोळ्यात पाणी आलं ते पाहून शिवा सद्गदित होऊन म्हणाला,

“आं, हे काय राजं? तुमच्या डोळ्यामंदी पाणी? त्येबी येका सामान्य मावळ्यासाठी, माज्यासाठी? सोनं झालं राजं. सोनं झालं. अवघ्या देहाचा गड पावन झाला. राजं, आता तुमच्या अश्रूच्या येकेका थेंबासाठी ह्यो शिवा एक काय हजार मरान हसत मरल. जा राजं, बिनघोर मनानं गड सोडा. तुमची सावली असलेला हा शिवा त्या सिद्याला तुमच्या सावली पातूरबी पोहचू देणार नाय. या राजं, जल्दी करा.”

शिवा पटकन महाराजांना मुजरा करून पालखीत जाऊन बसला. शिवरायांचा नाईलाज झाला. मोठ्या जड अंतःकरणाने त्र्यंबकपंत आणि गंगाधरपंत यांच्यावर गडाची जबाबदारी सोपवून त्यांनी विशाळगडाकडे कूच केली.

पुढे काय होतं? शिवाचं पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© अनुप्रिया..

🎭 Series Post

View all