शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ५

ही एका शौर्यकथा

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा 

कथेचे नाव :-  शिवा - एक शौर्यगाथा..

© अनुप्रिया..

शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ५

सिद्दी जौहरचा वेढा दिवसेंदिवस घट्ट होत चालला होता. पावसानेही चांगलाच जोर धरला होता. सह्याद्रीवरून येणारे पाण्याचे लोटही सिद्दीला अडवण्यात अयशस्वी झाले होते. सिद्दीच्या तोफांचा मारा वाढला आणि मराठ्यांच्या सैन्याचं नुकसान होऊ लागलं. महाराजांचं सैन्य कमी होत होतं. त्यात भरीस भर म्हणून सिद्दीने गडावर जाणारी रसद अडवल्याने अन्नधान्यही कमी उरलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांना या वेढ्यातून स्वतःची सुटका करून घेणं निकडीचं होतं. महाराजांनी काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन विशाळगडावर कूच करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सिद्दी जौहरसोबत एक खेळी खेळली. सर्वांत आधी महाराजांनी सिद्दीला तहाचा निरोप धाडला. सोबत सिद्दीला खूष करण्यासाठी सोन्याच्या मोहरा, हिरेमोती, उंची वस्त्रे पाठवली. सिद्दी आपल्या शामियान्यात बसून होता. महाराजांचा तहाचा करार करण्याचा खलिता वाचून तो मोठमोठ्याने हसू लागला. 

“अरे, ये सिवा तो डरपोक निकला! उसने तो करार संदेसा भेज दिया!

फाजलखानसहित सर्व शिपाई त्याच्या हास्याच्या गडगडाटात सामील झाले. आता शिवराय तहासाठी आपल्याकडे येणार आणि सिद्दी जौहर त्यांना पकडून विजापूरला आदिलशहासमोर घेऊन जाणार असं सर्वांना वाटू लागलं. आता आपण नक्की जिंकणार याची जणू सर्वांना खात्री वाटू लागली होती. आपल्या दाढीला कुरवाळत मोठ्या घमेंडीत सिद्दी म्हणाला, 

“आने दो उसके करार के संदेसे! इतनी जल्दी उसका प्रस्ताव हम नही मानेंगे! थोडा इंतजार सिवाको भी करने दो! सिवा हमसे डर गया! चूहाँ कही का! अब देखते है हमारी घेराबंदीसे वो कैसे निकल पाता है! फाजल, घेराबंदी कडी कर दो! किलेपर तोफे चलाओ! इन मावलोंका स्वाभिमान टूटकर चूर चूर होना चाहिये. समझे?”

“जी हुजूर.”

असं म्हणून फाजलखानने मान डोलावली. महाराजांनी तहाचा निरोप धाडला आणि सिद्दी गाफिल झाला. आता पन्हाळगड आपण सहज सर करणार आणि राजांना पकडणार असा त्याला आत्मविश्वास वाटू लागला. 

इकडे नेबापूर (चव्हाण) पाटील हे स्वराज्याचे सर्वात विश्वासू वैयक्तिक हेर होते. सिद्दी जौहरला दिशाभूल करण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे आणि नेबापूर पाटील यांनी एक गुप्त योजना आखली. बाजींनी शिवाला बोलावणं धाडलं. नेबापूर पाटील आणि बाजी प्रभू एकमेकांशी मसलत करत होते. हुजऱ्याने शिवाला बाजींचा निरोप दिला. तो तातडीने त्यांच्याकडे आला. त्यांना मुजरा करून म्हणाला,

“सरदार याद केलंसा मला?”

“व्हय, आमी तुज्यावर एक मोठी कामगिरी सोपवत आहोत. तयार हाईस नव्हं? बग सवराज्याचं काम हाय. लय जोखमीचं. जमल नव्हं?”

बाजींनी त्याला सवाल केला. 

“सरदार, तुमी फकस्त हुकूम सोडा; ह्यो शिवा सवताचं काळीज बी बाहीर काढून ठिवाय तयार हाय.”

शिवाच्या डोळ्यात महाराजांविषयी असलेली स्वामीभक्ती स्पष्ट दिसत होती.

“शिवा काम लय जोखमीचं हाय. दगाफटका होऊ शकतो. जीवबी गमवावा लागल.”

बाजी प्रभू त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले. शिवाच्या डोळ्यात पाणी होतं. तो गुडघ्यावर खाली बाजींच्या पायाशी बसला.

“धनी, जीवाचं काय घिवून बसलासा? ह्यो जीव म्या माज्या राजाच्या पायाशी ठिवलाय. माज्या राजासाठी म्या कायबी कराय तयार हाय. माजा ह्यो देह सवराज्याच्या कामी आला तर माज्या समद्या देहाचं सोनं हुईल. अजून काय पायजेल मला?”

त्याचे शब्द ऐकून बाजींना गहिवरून आलं. त्यांनी त्याच्या दोन्ही खांद्याला पकडून उभं केलं आणि सद्गदित होऊन म्हणाले. 

“हेच पायजेल मर्दा, मला इस्वास हाय, तू तुजी कामगिरी चोख पार पाडशील.”

“शिवा, तुला शिवाजी महाराज बनून सिद्दी जौहरला भेटाय जायचं हाय. तहाची बोलणी कराय. प्रति शिवाजी बनून त्या सिद्याला चकवा द्यायचा हाय. त्येला बोलण्यात गुतवून ठिवायचं. तोवर राजास्नी विशाळ गडावर जाण्यासाठी येळ घावल. राजं आपल्या काही मावळ्यांस्नी घिवून विशाळगडाच्या दिशेनं जातील. आपुन सिद्दीच्या बंदीवासातून त्येंची सुटका करणार हाय.”

आणि बाजींनी शिवाला सविस्तरपणे त्यांची योजना सांगितली. शिवा एक पायावर तयार झाला. बाजींनी आणि नेबापूर पाटलांनी महाराजांची देहबोली, उठण्या बसण्याची, शुद्ध बोलण्याची पद्धत त्याचबरोबर सिद्दीसमोर गेल्यावर काय आणि कसं बोलायचं, वागायचं या साऱ्या गोष्टींचं उत्तम प्रशिक्षण शिवाला दिलं. नेबापूर पाटील स्वतः जातीनं शिवाला या मोहिमेसाठी तयार करत होते. 

एकीकडे शिवाला प्रति शिवराय बनण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं तर दुसरीकडे शिवाजी महाराज सिद्दीला वारंवार तहाचा निरोप पाठवत होते. त्यासोबत उंची भेटवस्तूही जात होत्या. महाराजांनी पाठवलेल्या भेटवस्तू पाहून त्याचे डोळे दिपले होते आणि अखेर तो तह करण्याकरीता भेटीसाठी तयार झाला. शिवाजी महाराजांना सुटकेचा दिलासा देण्याच्या दिशेने एक पाऊल पडलं होतं. भेटीचा दिवस ठरला. शिवा आणि त्याचे सहकारी सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यास सज्ज झाले. 

योजना तर नामी आखली होती पण पुढे काय होईल? काम फत्ते होणार की नाही याची कोणालाच काहीच कल्पना नव्हती. स्वराज्यासाठी लढायचं, गनिमाविरुद्ध एकजुटीनं झुंजायचं इतकंच सर्वांना ठाऊक होतं. परिणामांची कोणालाच फिकीर नव्हती.

पुढे काय होतं? महाराजांची सुटका होते का? शिवाचं पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© अनुप्रिया..

🎭 Series Post

View all