शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ४

शिवा - एक शौर्यगाथा,

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा 

कथेचे नाव :- शिवा - एक शौर्यगाथा..

© अनुप्रिया..

शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ४

एक दिवस शिवाजी महाराज आपल्या सरदारांसोबत, बाजी प्रभू देशपांडे, रायाजी, फ़ुलाजी, संभाजी जाधव यांच्यासोबत विचारविनिमय करत बसले होते. इतक्यात एक सोंगाड्या आपलं वाद्य वाजवत महाराजांसमोर आपली कला सादर करू लागला. त्याने त्याच्या रांगडया आवाजात महाराजांचं कवन सुरू केलं.

“श्रीरामाला पूजती कोणी, श्रीकृष्णाला भजती कोणी

जन्मभरी ओठावर माझ्या शिवबाची अमर कहाणी

रामायण अन् महाभारत हे, राहील अथवा जाईल

शिवरायांची कीर्तिगाथा विश्वची सारे गाईल.”

त्याच्या तोंडून आपल्या राजाची महती ऐकून सर्वांचा ऊर अभिमानाने फुलून गेला होता. रायाजी त्याला बक्षीस देण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी विचारलं,

“आरं ए सोंगाड्या, कंच्या गावाचा रं तू? लय झ्याक गायलास बग.”

तो सोंगाड्या आणि शिवबा राजे मात्र गालात गालात हसत होते. राजांनी त्या सोंगाड्याला बरोबर ओळखलं होतं. 

“काय झालं नाईक? आज एकदम सोंगाड्या?”

महाराजांनी असं विचारताच सर्वांनी चपापून त्याच्याकडे पाहिलं आणि सगळेच मोठ्याने हसले.

“आरं ह्ये तर आपलं नाईक हाईत. काय राव नाईक तुमीबी! बहुरूपीवानी सोंग रचताय. वळखू बी आलं नाय.”

फुलाजी हसून म्हणाले. बहिर्जीनी महाराजांना मुजरा केला. महाराजांनी त्यांना प्रश्न केला.

“काय खबर आहे नाईक?”

“राजं, खबर चांगली न्हाई. सिद्दी जौहरला तुमी पन्हाळगडावर असल्याची खबर लागली आन त्यामुळं त्यानं पन्हाळागडाला चारी बाजूनं येढा घातलाय. तिकडे मोगलांनी शायिस्तेखानाला पुण्यावर चाल करण्यापाई पाठवलंय. शायीस्तेखानानं पूण्यात खूप धुमाकूळ घातलाय.”

बहिर्जी नाईकांनी खबर दिली.

“किती सैन्यबळ?”

महाराजांनी प्रश्न केला.

“पस्तीस हजार पायदळ, वीस हजार घोडदळ अशी विशालसेना. त्याच्या जोडीला फाजलखान आपल्या चाळीस हजारांची फौज घिवून त्येला सामील झालाय. अशी खबर हाय की, फाजलखान आपल्या बांच्या मृत्यूचा सूड उगवायला येतुया. त्याने राजापूरच्या फिरंग्याना भरपूर संपत्ती देऊन त्यांच्याकडनं लांब पल्ल्याची दुरपर्यंत जाणारी तोफा घितल्यात. महाराज, ह्ये त्येच राजापूरचं फिरंगी हाईती ज्यास्नी तुमी अभयदान देऊन त्यांच्यासंग संधी केली हुती. त्यांच्या त्या चांगल्या प्रतीच्या आणि वजनाला हलक्या असणाऱ्या तोफांमुळं आपल्यापेक्षा सिद्दी जौहरचं पारडं जड झालंय. आता पन्हाळगडाच्या पायथ्याशी फाजलखान आणि सिद्दी या दोन्ही सरदारांनी तळ ठोकलाय. आपली कोंडी करण्याचा डाव हाय.”

महाराज चिंतीत झाले; पण लगेच स्वतःला सावरत म्हणाले,

“ठीक आहे, नाईक, तुम्ही सर्व गडांवर वर्दी द्या. गडांवर भरपूर अन्नधान्य,शस्त्र,तोफ दारुगोळा याचा साठा करायला सांगा. पुरेश्या पाण्याची व्यवस्था करायला सांगा. हा आमचा आदेश आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्दीच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवा आणि आम्हाला खबर देत ऱहा. समजलं?”

“व्हय जी.”

असं म्हणून महाराजांना त्रिवार मुजरा करून बहिर्जी नाईक तिथून निघून गेले. शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांवरून एकदा चौफेर नजर फिरवली. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी पसरलेली दिसत होती.

“काही हरकत नाही गड्यांनो, शत्रू सामर्थ्यवान आहे म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही. आपल्याही मनगटात काही कमी ताकद नाही आणि आपल्याकडे तोफा आहेत आपण शत्रूला थोपवून ठेवू शकतो. असे भले भले सिद्दी जौहर येतील आणि स्वराज्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतील पण आपण झुंजायचं. मनगटात जोर असेपर्यंत आपण लढायचं. इतकं लढायचं की दिल्लीच्या तख्तालाही या मराठ्यांची भीती वाटली पाहिजे. स्वराज्याकडे रोखून बघण्याची कोणाचीही हिंमत होता कामा नये.”

शिवरायांच्या बोलण्याने सर्वांना स्फूरण चढलं. इतक्यात रायाजींनी मोठ्याने गर्जना केली

“हर हर महादेव!”

“हर हर महादेव!”

सर्वांनी एक मुखांनी गर्जना केली आणि गड राखण्याच्या दृष्टीने पाऊलं टाकायला सुरुवात केली. बहिर्जी नाईकांनी प्रत्येक गडावर शिवाजी महाराजांचा आदेश पोहचवला. बघता बघता चार महिने उलटून गेले पण सिद्दी जौहर वेढा हटवण्याचं नाव घेत नव्हता. पन्हाळगडावरच्या सैन्यामध्ये चिंतेचं सावट पसरलं होतं. आतापर्यंत पुरवठा करून ठेवलेलं अन्नधान्य संपत आलं होतं. शस्त्र दारूगोळा कमी होत चाललं होतं. शिवा आणि किसन्या गडावरच सैन्याचे स्वयंसेवक, मदतनीस म्हणून थांबले. शिपायांचे केस कापणे, दाढी करणे, शस्त्रांची दुरुस्ती त्याचबरोबर त्यांची वैद्यकीय सेवाही ते करत होते. त्या दोघांच्या सोबतीला नेबापूरचे चव्हाणही होते. एकदा शिवा सरदारांची शस्त्रे दुरुस्त करत होता. चव्हाण शिवाकडे निरखून पाहू लागले आणि हसून म्हणाले,

“शिवा, तूज्याकडं पाईलं की राजांची लई याद येती बग. तुजा चेहरा आक्शी आपल्या शिवबा राजावानी हाय. त्योच हुबेहूब चेहरा, नाक डोळे. समदं कसं त्येच. व्हय नव्हं सरदार?”

चव्हाणानी बाजींकडे पाहून प्रश्न केला. बाजींनी शिवाकडे निरखून पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात एक नामी युक्ती सुचली.

“कायतरीच पाटील, तुमचं कायबी असतंय. कुटं महाराज आन कुटं म्या? त्येंच्या पायातल्या खेटाराची बी मला सर नाय.”

शिवा हसून म्हणाला.

दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू, रायाजी बांदल, फुलाजी आणि काही निवडक सरदार एकत्र जमून  सल्लामसलत करत उभे होते. बाजी प्रभू देशपांडे शिवरायांकडे पाहून म्हणाले, 

“महाराज, आज चार महिने झालं पर सिद्दीने पन्हाळगडाला घातलेला वेढ्याचा पोळ कमी होईना. गडावरचं अन्नधान्य, दारूगोळा, शस्त्रसाठाही संपत आलाय. तिकडे तो कपटी शायिस्तेखान  पुण्यात धुमाकूळ घालतोय. रयतेस त्रास देतोय. राजं, त्याला वेळीस आवर घालणं गरजेचं. नाहीतर स्वराज्य हातातून निसटून जाईल आणि मोगलाई हुकूमत अजून प्रबळ होत जाईल. हे आपल्याला परवडणार नाही. आता काय करायचं राजं? आपल्याला काहीतरी युक्ती काढली पाहिजे. प्रसंग बाका आहे.”

बाजी प्रभूनीं त्यांची काळजी व्यक्त केली. महाराज विचारात गढून गेले.

“बरोबर आहे बाजी तुमचं. खरे म्हणजे आम्हांस वाटले होते की, एकदा का पाऊस सुरू झाला की सिद्दी आपला वेढा उठवेल. पन्हाळा गडावरला मुसळधार पाऊस पाहून तो मागे सरेल पण त्याने तर वेढा अजूनच आवळला आहे.”

“महाराज, आतातर गनिमांनी गडावर येणारी अन्नाची रसदबी अडवली हाय . मावळ्यांना एवढ्या अवाढव्य सेनेला तोंड देणं कठीण दिसतंय.”

रायाजी बांदल चिंतीत होत म्हणाले.

“काहीतरी करून गडउतार करणं फार गरजेचं आहे. पन्हाळगडाचा हा वेढा फोडून विशाळगडाकडे निघायला हवं. तिथे गेल्यावर पुढची योजना आखता येईल. विशाळगडावर जायचंय पण कसं?”

शिवाजीराजे बाजींकडे पाहून म्हणाले. शिवरायांनी सिद्दी जौहरचा वेढा फोडून विशाळगडाकडे कूच करण्याची नामी युक्ती शोधून काढली पण पन्हाळगडावरून बाहेर कसं पडायचं कोणालाच कळत नव्हतं. मग बाजीप्रभू देशपांडेंनी जोहरचा भ्रम घडवून आणण्याची योजना आखली आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“महाराज, हा वेढा फोडून काढण्यासाठी आमच्याकडे एक योजना आहे.”

बाजींच्या वाक्यासरशी सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.

“कोणती योजना बाजी?”

महाराजांनी त्यांना विचारलं.

“महाराज, तहाची बोलणी करण्याचा प्रस्ताव सिद्दी जौहरला पाठवायचा. आपण भ्यालो आणि त्याला शरण आलोय असा त्याचा भ्रम व्हायला हवा. त्यामुळं तो गाफिल राहील आणि वेढा उठवेल किंवा वेढाचा फास कमी आवळेल.”

“हं..”

महाराज विचार करू लागले.

पुढे काय होतं? महाराजांची सुटका होते का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© अनुप्रिया..

🎭 Series Post

View all