शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ३

शिवा - एक शौर्यगाथा..

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा 

कथेचे नाव :- शिवा - एक शौर्यगाथा..

© अनुप्रिया..

शिवा - एक शौर्यगाथा.. भाग ३

गेल्या दीड दोन वर्षांपूर्वीचा काळ शिवाच्या डोळ्यासमोरून सरकत गेला. त्याने स्वतःकडे पाहिलं. स्वतःच्या कष्टाने कमावलेला रांगडा देह पाहून त्याचं त्यालाच स्वतःचं कौतुक वाटलं आणि नकळतपणे त्याने आपल्या मिशीवरून रुबाबात हात फिरवला. लहानपणापासूनच शिवाला रोज गड चढउतार करण्याची सवय होती. व्यायाम कुस्तीची आवड असल्याने शिवा अगदी रांगडा पैलवान झाला होता. दाणपट्टा चालवणं, तलवारबाजी करणं याचं जणू बाळकडूच पाजलं होतं. पिळदार शरीर, भारदस्त छाती आणि अंगात शंभर हत्तीचं बळ असलेला एकटा शिवा पाच पंचवीस शिपायांवर नक्कीच भारी पडला असता इतकी ताकद त्याच्यात होती. 

“माज्या राजानं माज्यासारख्या साधारण जीवाला त्येंच्या सैन्यात सामील केलं. न्हावीचं व्हतो म्या पर राजानं उचलून उराशी कवटाळलं. राजानं कंदीबी डावं उजवं केलं न्हाई. समद्यास्नी येकसारखं मानलं. त्येंच्या काळजात जागा दिली. समद्यास्नी सवराज्याच्या मोहिमेत सामील करून घितलं. आजपतूर त्येंच्यासंग मला जाता आलं. ह्ये काय कमी हाय?”

शिवाच्या डोळ्यात पाणी आलं. शिवाला स्वराज्य मोहिमेत सामील झाल्याचा दिवस आठवला. त्यावेळीस केस कापण्याव्यतिरिक्त शिवरायांच्या सैन्यात न्हावी देखील वैद्यकीय प्रक्रिया पार पाडत होते, जसे की गळू फोडणे आणि दात काढणे आणि शस्त्रे साफ करणे आणि दुरुस्त करणे ही त्यांची जबाबदारी होती. स्वराज्याच्या मोहिमेत शिवा सामील झाला. न्हावी कामासोबत तो मोहिमेच्या कामातही सक्रिय सहभागी होऊ लागला. शिवरायांसोबत तोरणा, राजगड आणि सिंहगड किल्ले ताब्यात घेतानाच्या पराक्रमी लष्करी मोहिमा त्याला आठवल्या. त्या सोनेरी क्षणाना उजाळा मिळाला. रणांगणावर आपले शौर्य आणि धैर्य दाखवून आपल्या सहकारी सैनिकांसोबत लढलेल्यामध्ये लढाया क्षणार्धात डोळ्यासमोर तरळून गेल्या. त्या साहसाची कहाणी आठवून जणू त्याच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं झालं. 

मजल दरमजल करत शिवा आणि किसन्या पन्हाळगडावर पोहचले. शिवाला पाहताच रायाजी सरदारानं त्याला आवाज दिला. 

“शिवा, आरं ए शिवा.. हिकडं ये. आरं मर्दा, कवापास्नं तुजी वाट बघतूय आमी.”

“व्हय जी सरदार.”

असं म्हणत शिवा लगबगीनं आत आला. सरदारांचे केस कापणे, दाढी करू लागला. रायाजीनी त्याच्याकडे पाहिलं. अचानक त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला आणि ते स्वतःशीच हसले. 

इकडे अफजलखानच्या वधानंतर आदिलशाही सैन्यात प्रचंड खळबळ माजली होती. सगळीकडे हाहाकार माजला होता. उंच आणि शक्तिशाली अशा अफजलखानाला शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीचातुर्याने ठार मारलं होतं. इतक्या मोठ्या बलाढ्य सैन्याला शिवरायांच्या मूठभर मावळ्यांनी जेरीस आणलं होतं. विजापुरात ही अफवा पसरली की, शिवाजी महाराज विजापूरावर हल्ला करणार आहेत आणि अली आदिलशहाला गादीवरून उतरवून दुसऱ्या कोणाला तरी सुलतान बनवण्याचा त्यांचा इरादा आहे. सर्वत्र भीतीचं सावट पसरलं. बादशाहने ताबडतोब दरबार बोलवला. आदिलशाही दरबारात स्मशान शांतता पसरली होती. बडीबेगम उद्विग्न झाली होती. 

“बीजापुर के सुल्तानने बड़ी हसरतसे अफजलखान को सिवा का सफाया करने भेजा था, लेकिन अफजलखान अपनी आधी से अधिक सेना के साथ खत्म हो गया! इतनी बडी फौज, इतना होशियार सिपेसालार अफजलखान! फिर भी उस सिवाको हरा नही पाये! बडी शेखी बखार रहा था, सिवा को मार डालेगा! उसे हमारे कदमोमे लाके डालेगा जिंदा या मुर्दा! क्या हुआ? उन गिनेचुने मावलोंकोभी हरा नही सके! अपना काला मुहं लेकर यहाँ आ गये! शरम आनी चाहिये तुम लोगोंको!”

ती जोरात ओरडली. तिच्या त्या आवाजाने साऱ्या दरबारात थरकाप उडाला. 

“इसका बदला हम लेंगे! जरूर लेंगे!”

हातांच्या मुठी आवळत आदिलशहा म्हणाला.

“जरूर बादशाह, हम इस अपमान का बदला जरूर लेंगे!”

सगळ्यांची नजर त्या आवाजाच्या दिशेने वळली. कर्नूरचा सरदार सिद्दी जौहर समोरून चालून येत होता.

“हम सिवा को हरायेंगे! सरदार अफजलखान का बलिदान व्यर्थ नही जायेगा! हम सिवाको सबक सिखायेंगे!”

“आमीन.. आमीन..”

सरदारांच्या घोळक्यातून आवाज येऊ लागले. बडीबेगम आणि आदिलशहाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आदिलशाही सैन्याच्या मनात एक नवा आशेचा किरण जागा झाला. सिद्दी जौहर म्हणजे एक झंजावात होता. प्रचंड पराक्रमी, युद्धकुशल आणि धूर्त, कपटी व्यक्ती होता. शिवाजी महाराजांचा पराभव करून पकडून विजापूरला आणेन अशी त्याने आदिलशहासमोर प्रतिज्ञा केली आणि ठरल्याप्रमाणे प्रचंड फ़ौजफ़ाट्यासह तो महाराजांचा मुक्काम असलेल्या पन्हाळगडाच्या दिशेने चाल करून येऊ लागला. त्याच्यासोबत मागच्या लढाईत शिवाजी महाराजांकडून पराभूत झालेला फाजलखान आणि सरदार रुस्तमजहाँ आणि बरेच पराक्रमी सरदार त्याला येऊन मिळाले. 

अफजलखानाचा वध झाला आणि मावळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. शिवाजी महाराज प्रतापगडावरून पन्हाळगडावर मुक्कामास आले. स्वराज्याला एवढा मोठा विजय मिळाला होता त्यामुळे मराठे सरदारांचं मनोबल वाढलं होतं. आता मागे वळून पाहायचं नव्हतं. स्वराज्याला अजून सामर्थ्यशाली, बलवान बनवायचं होतं. महाराजांनी योजना आखली आणि सरदारांना वेगवेगळ्या मोहिमेवर पाठवून दिलं. त्यामुळे बरेच सरदार, सेनापती इतर मोहिमेत व्यस्त झाले. स्वराज्यावर आता सिद्दी जौहर नावाचं नवीन संकट चालून आलं होतं. तो पस्तीस हजार पायदळ, वीस हजार घोडदळ अशी आपली विशाल सेना घेऊन चालून येत होता. वाटेत फाजलखान आपल्या चाळीस हजार सैनिकांच्या फौजेनिशी येऊन जौहरला सामील झाला. आणि सिद्दी जौहरने संपूर्ण पन्हाळगडाला वेढा घातला. फाजलखानकडे ब्रिटिश तोफा सुद्धा होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याने पन्हाळगडाला वेढा दिला व तिथेच दोन्ही सरदारांनी आपले तळ ठोकले आणि महाराज व त्यांचे मावळे गडावर अडकून पडले. महाराज पन्हाळगडावर बंदिस्त झाले. नेमकं त्याचवेळीस खबर मिळाली की, मुगलांचा सरदार शायिस्तेखान सुद्धा पंचाहत्तर हजार मुघल सैन्य घेऊन पुण्याच्या दिशेने चाल करून येत होता. 

पुढे काय होतं? शिवाजी महाराज यातून कसा मार्ग काढतील? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©अनुप्रिया..

🎭 Series Post

View all