शिवा - एक शौर्यगाथा.. भाग २

शिवा - एक शूरवीराची शौर्यकथा..

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा 

कथेचे नाव :- शिवा - एक शौर्यगाथा..

© अनुप्रिया..

शिवा - एक शौर्यगाथा.. भाग २

“शिवा, आरं शिवा..”

किसन्या शिवाच्या नावानं आरोळी देत त्याच्याजवळ आला.

“काय झालंय मर्दा, कशापाई कोकलतोयस?”

शिवाने शेजारी पडलेल्या कापडानं अंगावरचा घाम पुसत प्रश्न केला.

“आरं, तुज्या आयबानं तुजं नाव शिवा ठिवलंय मनून काय सोताला शिवबा राजं समजाय लागलास व्हय? चल गुमान बिगीनं. दिस निघालाय. सरदाराचा निरोप हाय. गडावर निघाय पाहिजेल.”

किसन्या शिवाला चिडवत म्हणाला. 

“व्हय, व्हय.. चल निघू. पर भावा, आज तू माज्यावर हसतुया नव्हं पर तुला सांगतो, एक दिस असा ईल, या शिवाचं नाव तुमा संमद्यांच्या तोंडामंदी आसल. तुमा समद्यास्नी माजं लय कवतीक वाटल आन तुमीच छाती फुगवून म्हणाल, आक्शी नावाला शोभल असं काम केलंस तू. नेबापुर गावाची आब राखलीस. आरं मर्दा, ज्याच्या नावामदीच राजाचं नाव हाय. त्येला कसलं आन कंचं भ्या?”

तो हसून म्हणाला.

“बरं माज्या राजा, तुमचं त्ये वस्तरा आन त्ये टकूरं भादरन्याचं सामान घेतांसा नव्हं? गडावरचे सरदार वाट बघत असत्याल. की तलवारीनं केस भादरता?”

किसन्या त्याला चिडवण्यासाठी मिश्किलपणे म्हणाला.

“आता गपतू का? चल गुमान.”

शिवानं डोळे वटारले तसा किसन्या गप बसला. दोघेही घरी आले. घरी आल्यावर अंगणातच पाण्याने भरलेली घागर त्याने अंगावर ओतून घेतली. तिथे ठेवलेल्या कापडानं अंग पुसून घेतलं. अंगात सदरा चढवला. तुळसाचा स्वयंपाक झाला होता. तिने किसन्या आणि शिवाला न्याहारी दिली. दोन घास पोटात ढकलून ते दोघे गडावर जाण्याच्या तयारीला लागले. किसन्या अंगणातल्या पारावर बसला आणि शिवा तयारी करू लागला. शिवाने अंगावर पांढरा सदरा, साधारण कमरेला आवळलेला, पिंढऱ्यावर दाटणारा चुणीदार मांडचोळणा, छातीवर बंद आवळलेली, हाताच्यावर भुजापर्यंत सरकवलेली बाराबंदी, डोक्याला कंगणी, डोक्यावर लालरंगाची पगडी, कमरेभोवती फिरलेला आणि बगलेला गाठ दिलेला पांढऱ्या रंगाचा शेला, डोक्याच्या पगडीवरून कानशीलं झाकीत हनुवटीखाली गाठ दिलेला पगडपोस, मनगटावर जाड चांदीचं कडं आणि काळ्या रंगाचा गोफ, पाठीवर बांधलेली भरघेराची काळीशार ढाल, हातात तळपती तलवार, त्याचं मोहनी घालणारं रुपडं आणि त्यात त्याचा राकट पेहराव पाहून तुळसा क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला असं पाहताना पाहून आपल्या मिशीवरून हात फिरवत तो हसून म्हणाला,

“काय कारभारने, काय बघतीस? कंदी पाहिलं नाय व्हय तुज्या धन्याला?”

“काय नाय जी. माजा कुकवाचा धनी किती रुबाबदार हाय ते बघत व्हती. त्येला कोनाची बी नजर नगं लागाया जी.”

असं म्हणत तिने तिच्या डोळ्यातल्या काजळाचा तीट त्याच्या कानामागे लावला तसा तो खळखळून हसला. त्याने तुळसाला जवळ ओढून कुशीत घेतलं. तुळसाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. शिवाने तिच्या कपाळावर अलगद आपले ओठ टेकवले आणि म्हणाला,

“कारभारने, तुज्यावानी रणचंडिका माज्यासंगं असताना कुनाची बिशाद हाय आमाला नजर लावायची?”

 त्याला अजून बिलगत तुळसाने विचारलं,

“धनी, माघारी कंदी याल? तुमच्याबिगर एकलीला जीव न्हाई लागत.”

आता मात्र तिचे डोळे पाण्याने डबडबले. विरहाचं पाणी डोळ्यात दाटू लागलं. तिला चांगलं ठाऊक होतं, एकदा का शिवा मोहिमेवर गेला की सहा सहा महिने परत यायचा नाही. ती मात्र त्याची वाट पाहत राहायची. तिचे पाण्याने भरलेले डोळे पाहून शिवाला गलबलून आलं. त्याने तलवार कमरेला म्यान करून ठेवली आणि त्याची केस कापण्याच्या वस्तूंची पेटी हातात घेतली. तिची हनुवटी वर उचलून धरत तिच्याकडे पाहत तो म्हणाला,

“तुळसा, असं डोळ्यामंदी पाणी आणून कसं हुईल? आगं, आपला राजा रयतेच्या सुखासाठी, सवराज्याचं सपान पूरं करण्यासाठी त्येच्या जीवाचं रान करतूय. दिसरात येक करून मोगलांसंग लढाया करतूय. मग आपण त्यास्नी साथ नगं द्यायला? तुळसा, आज आमचं रगात सांडलं तर उंद्या आपल्या पोराबाळास्नी सुख पाहाय मिळलं. आपणाला थोडी कळ तर काढाया पाईजेल गं.”

तुळसाची समजूत काढून शिवा गडावर जायला निघाला. तुळसाने भरल्या डोळ्याने त्याला निरोप दिला. शिवा आणि किसन्या घोड्याला टाच मारून गडाच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने धुळीचे लोट उडवत निघाले. शिवाचं मन मात्र भूतकाळाच्या दिशेने घोडदौड करू लागलं. त्याला त्याच्या बांचं बोलणं आठवलं.

“आरं पोरा, ह्ये कसलं खुळं टकुऱ्यात घिवून बसलाय? ह्ये आपलं काम नव्हं. थोरामोठ्यांची कामं हाईत ह्यी. उगी खुळ्यागत वागू नगं.”

शिवाच्या बांचं बोलणं सुरू असताना मधेच त्याची आई म्हणाली,

“आपलं काम काय हाय आन आपुन काय करतूय? आपली जात कंची आन तुला ह्यो कसला नाद लागला म्हणायचं? ही कसली आवदसा आठिवली रं? आरं बिरादरीतली लोकं चारचौघामंदी बसू द्यायची न्हाई. आन ह्ये किती जोखमीचं काम हाय. तुला जमल व्हय? नगं पोरा नगं, उगी जीवाशी खेळू नगं. तुज्याबिगर आम्हास्नी तरी कोन हाय रं? आपला पिढीजात धंदा हाय नव्हं मंग कशापाई तुला शिपाई बनून राजासंगट जायचंय? तुज्या माघारी आमचं कसं हुईल, तुळसा कशी जगल इचार केलाय कंदी?”

शिवाच्या आईने डोळ्याला पदर लावला. तुळसाही आतल्या खोलीत आसवं गाळत बसली होती. 

“नाय माय बां. म्या सरदारास्नी शबुद दिलाय. म्या जाणार मंजी जाणारच. माज्या राजानं कंदी नाय इचारलं तुजी जात कंची, कंचा धरम? मंग म्या तरी कशापायी इचार करू? सवराज्याच्या कामी आलो तर समद्या जिंदगीचं सोनं हुईल बा.. जातीनं न्हावी हाय म्या. वस्तरा कसा चालवायचा ते शिकवावं लागत नाय. समदं आयुष्य वस्तऱ्यानं लोकांची डोसकी भादरत बसण्यापरीस त्योच वस्तरा गनीमाच्या सैन्याच्या मानेवरनं अलगद फिरवीन की, कधी जीव गेला ह्ये बी त्येला कळायचं नाय. गनिमाचा खात्मा करून राजाचं सपान पूरं करायचंय मला. बां म्या जाणार हाय बां.. मला माज्या राजासाठी, राजाच्या सवराज्याच्या ध्येयापायी जायालाच पाहिजेल.”

पुढे काय होतं? शिवा शिवबा राजांच्या सैन्यात जाईल? पाहूया पुढील भागात…

क्रमशः©

अनुप्रिया..

🎭 Series Post

View all