शिवा - एक शौर्यगाथा.. भाग १

शिवा - एक शौर्यगाथा..

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

सहावी फेरी :- ऐतिहासिक कथा 

कथेचे नाव :-  शिवा - एक शौर्यगाथा..

© अनुप्रिया..

(सदर कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक कथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत.  केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्यात आली आहे. इतिहासातील कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

|| जय शिवराय||

शिवा - एक शौर्यगाथा.. भाग १

होय मी सह्याद्री.. महाराष्ट्राच्या संताचा वारसा असलेल्या  पवित्र भूमीत, डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या त्या प्रत्येक शूरवीरांच्या पोलादी मनगटात एकवटलेल्या शक्तीत, माझ्या राजाच्याठायी असलेली स्वामीभक्ती, देशभक्ती निभावताना विजयश्री मिळवण्यासाठी,  आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या पराक्रमी सरदारांना डोक्यावर घेऊन नाचणारा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा गोदावरी या पंचगंगेच्या कुशीत दिमाखात उभा असलेला, भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजताना पाहिलेला, हजारो वर्षे गडगडणाऱ्या नभांची भीती न बाळगता, काळ्या छातीवर आभिमानाची लेणी कोरून, कडाडणाऱ्या विद्युलत्तेचे तांडवनृत्य धारण करत, निरंतर कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसधारा झेलत, बोचणारी थंडी, अंगाची लाही लाही करणाऱ्या कडकडीत उन्हाच्या ज्वाला हे सारे घाव हसतमुखाने सोसत निर्भीडपणे, कशाचीही पर्वा न करता  आजही दक्षिण भारताला सुरक्षित ठेवणारा, त्याच्या रक्षणार्थ लढणारा आणि झिजणारा होय, मी पश्चिम घाट..

हो, मीच तो सह्याद्री, ज्याच्या कणाकणात स्वराज्याचं स्वप्न झिरपत राहिलं. स्वराज्याचा मंत्रघोष रोमारोमात दुमदुमत राहिला. या माझ्या मातीला शौर्यरसाचा गंध लाभलेला, याच मातीतला रक्तरंजित इतिहास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. माझ्या शूरवीर पुत्रांची शौर्यगाथा मीच आभिमानाने गायलीय, जगाला ऐकवलीय आणि त्याच माझ्या कुशीत जन्म घेतलेल्या, माझ्याच अंगाखांद्यावर खेळलेल्या, बागडलेल्या, याच मातीत वाढलेल्या, घडलेल्या आणि अखेर याच मातीत स्वतःला गाडून घेऊन धन्यता पावलेल्या माझ्या शूरवीर पुत्रांचं बलिदान पाहून मी ढसढसा रडलोयही.

होय, मीच आहे साक्षीदार इतिहासातील त्या प्रत्येक घटनांचा. त्या गाजवलेल्या पराक्रमाचा. अस्मानाच्या सुलतानीला जवाब देणाऱ्या त्या जिभांचा. दरीदरीतून ‘हर हर महादेव’ चा गुंजणाऱ्या नादाचा. सह्याद्रीच्या सिंहाच्या, शंभूराजांच्या गर्जनेचा. होय, मीच आहे त्या निढळाच्या घामाने भिजलेल्या, देशगौरवासाठी झिजलेल्या अनेक शौर्यगाथांचा   प्रत्यक्ष जिवंत पुरावा. त्या शौर्यगाथा आठवताना अजूनही अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाही. आजही इतिहासाची बरीच रहस्यं, गुपितं माझ्या काळजात दडून बसलीत. माझ्या काळजातून बाहेर येण्यासाठी आसुसलेली आहेत. काही पराक्रमी मावळ्यांची नावं इतिहासाच्या पानावर स्वर्ण अक्षरात नोंदवली गेली तर काहींची साधी दखलही घेतली गेली नाही. असे कितीतरी मावळे स्वराज्यासाठी बलिदान देऊन गेले किंबहुना इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवले ज्यांची नावं इतिहासाला आजही माहित नाहीत. अशा कितीतरी शौर्यगाथा काळाने गिळंकृत केल्यात ज्याची फारशी कुठे नोंद नाही. इतिहासाच्या कुठल्यातरी पानावर अवघ्या दोन चार ओळीत रेखाटलेला त्यांचा पराक्रम कोणालाच माहित नाही. पण मला माहित्येय ना! मी सगळं सगळं पाहिलंय. तो थरार स्वतः अनुभवून खरंच मी धन्य झालोय. खरंतर त्या विशाल स्वराज्याचा, विश्वासाचा, निष्ठेचा, पराक्रमाचा, बलिदानाचा मी एकमेव साक्षीदार!

आज अशीच एक शौर्यगाथा मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा आहे माझ्या शूरवीर पुत्रांची. स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या माझ्या मावळ्यांची. हसतमुखाने मृत्यूला आलिंगन देणाऱ्या माझ्या  पुत्राची ही शौर्यगाथा.. ही कथा सुरू होते, ती स्वराज्याच्या महान स्वप्नापासून. उराशी बाळगलेल्या त्या ध्येयाने झपाटून खडतर वाटेवरचा प्रवास. एक असं स्वप्न ज्याची संकल्पना शहाजीराजांनी मांडली. ज्याला प्रेरणा जिजाऊसाहेबांची मिळाली. ज्याची स्थापना शिवरायांनी केली. होय, हे माझं, माझ्या शिवबाचं स्वराज्य. इथल्या मातीत उगवूनही कर्तृत्वानं क्षितिजापर्यंत पोहोचलेल्या, आपल्या रक्ताचं शिंपण घालून आपल्या मातीला वाचवणाऱ्या आणि हसत हसत बलिदान देणाऱ्या माझ्या मावळ्याचं स्वराज्य. अशाच एका शूरवीराच्या पराक्रमाची ही कथा.

कोल्हापूरच्या वायव्येस, पन्हाळगडाच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वसलेलं, हिरव्यागार वनराईने नटलेलं नेबापूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्यात पाच पन्नास घरं असलेली छोटी वाडी. गावात गुण्यागोविंदाने राहणारी अठरा पगड जातीजमाती, बारा बलुतेदार म्हणजे तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, गुरव, धनगर, गवळी, लाड वाणी, जैन, कोष्टी, साळी, तेली, माळी, रंगारी, जैन, चितारी आणि स्वादि अशी आपल्या व्यवसायाप्रमाणे समाजरचना असलेली वेगवेगळ्या समाजाची जनता आपापला कामधंदा, रोजगार सांभाळून राहत होती. इसवी सन सोळाशेची राजवट.  संपूर्ण हिंदुस्थानावर परकीय सत्ता राज्य करत होत्या. दक्षिणेत असणाऱ्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही तर उत्तरेस मोगलशाही यांनी संपूर्ण हिंदुस्थानात धुमाकूळ घातला होता. गरीब रयतेची पिळवणूक होत होती. आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. रयत प्रचंड त्रासली होती. नेबापूरची जनताही या जाचाला कंटाळून गेली होती. रयतेला वाली उरला नव्हता. तशाही बिकट परिस्थितीत नेबापूरची जनता एकजूटपणे त्या जुलूमांचा सामना करत होती. नेबापूर गावावर कितीही मोठी संकटं येवोत तरी एकमेकांना सहकार्य करत, जीवाला जीव लावत, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत, एकमेकांना जपत रयत आला दिवस पुढे ढकलत होती.

आणि मग अशा कठीण परिस्थितीत हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय झाला. शिवबाच्या रूपाने रयतेला आशेचा किरण लाभला. शिवाजीराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि साऱ्या महाराष्ट्रभर हिंदवी स्वराज्याचं वारं वाहू लागलं. स्वराज्याच्या स्थापनेचा पाया रचला गेला. रयतेचा राजा गोरगरीब जनतेसाठी झटू लागला. शिवरायांनी आदिलशाही मुलखातील, मावळ प्रदेशातील एकेक गड सर करत स्वराज्य स्थापनेस सुरवात केली. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, गावातल्या प्रत्येक घरातून, अठरापगड जातीजमातीतून स्वराज्याच्या रक्षणासाठी, राजाच्या मदतीसाठी हरेक मावळा परकीय सत्तांना टक्कर द्यायला सज्ज झाला. शिवरायांच्या या स्वराज्य मोहिमेत गावागावातून मावळे जमा होऊ लागले. स्वराज्यासाठी रक्त सांडू लागले.  त्या अठरापगड जातींचा, बारा बलुतेदारांचा एकच रंग होता. एकच धर्म होता, एकच ध्येय होतं ते म्हणजे हिंदवी स्वराज्य. एकचं चेहरा होता. एकच स्वामी होता. एकच राजा होता तो म्हणजे आपला जाणता राजा. माझा शिवबा राजा आणि आज त्याच्या पायाशी पंचप्राण अर्पण करण्यास नेबापुरातली तरणीबांड पोरं घोड्याला टाच मारून गडाच्या दिशेने निघाली होती.

“शिवा, ए शिवा.. कुठं हाईस रं? वहिनी, शिवा कुठं गेलाय?”

दारात उभं राहून किसन्यानं त्याला आवाज दिला.

“त्ये बघा, मागल्या रानात जोर बैठका मारत बसल्यात. या भावजी, तोवर भाकरीचा तुकडा मोडा. त्ये जेवतील मागून. या वाढते तुमास्नी.”

कपाळावरचा घाम पदरानं पुसत तुळसा म्हणाली. भाळी चंद्रकोर रेखलेली, गोऱ्या रंगाची, गळा भरून काळ्या पिवळ्या मण्यांचं डोरलं घातलेली, हिरव्या लुगड्यातली, घामानं निथळत तुळसा चुलीसमोर भाकरी थापत होती.

“नगं वहिनी, म्या त्येला घरला घिवून येतू. मग आमी दोघं संगटच दोन घास खाऊ. तू बिगीनं आवर. आमास्नी लगोलग गडावर निघायचंय नव्हं.”

इतकं बोलून किसन्या घाईघाईत घराच्या मागच्या बाजूला गेला.  मागच्या रानात एक उमदा तरुण जोर बैठका मारत होता. सावळा रंग, ओठांवर भरदार काळ्याभोर मिशीचे कंगोल, कानाच्या पाळ्यापर्यंत उतरलेले कानकल्ले, मजबूत भारदस्त बांधा, घामाने निथळणारी पिळदार शरीरयष्टी, काळेभोर डोळे, तो अगदी दणकट, राकट दिसत होता.

कोण होता तो युवक? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः

©अनुप्रिया..

🎭 Series Post

View all