"अय, राम्या, अरं सकाळ पारी कुठं, रं.. चाललास," शिरपा रामाला आरोळी देत म्हणाला.
"आरं, तुला ठाव नाय व्हय, रं." रामा प्रश्नांकित नजरेने बघत म्हणाला.
शिरपा त्याच्या जवळ येत म्हणाला,"नाय बा, मला काय बी ठाव नाय."
"आरं, खुळ्या हाईस की काय? समद्या गावाला ठाव हाय अन् तुला रं कसं ठाव नाय." रामा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
"आरं, लेका, ठाव असतं तर विचारलं असतं का तुला? किती फाटे फोडतोस? सांग की आता." शिरपा वैतागत म्हणाला.
"बरं, बरं, ऐक मंग, आरं आपलं राजं, त्यांचा राज्याभिषेक सोहळा हाय नव्हं का, त्यासाठी गडावर चाललो म्या. आपण काय रं गरीब माणसं. ही फुलांची टोपली घेऊन चाललो बघ गड सजवायला. आधी बी पाच सहा टोपली देऊन आलो. आता अजून दोन चार टोपली घेऊन जातो. आपल्यासाठी राजंनी, किती काय काय केलं. फुल नाय फुलाची पाकळी म्हणूनस्यान थोडसं आपल्याकडून बी काहीतरी द्यावं मनात आलं बघ. म्हणूनस्यान चाललो हुतो ही फुले द्यायला. त्या निमतानं राजेच दर्शन बी हुत बघ. लय म्हंजी लय खूश हायती समदी. म्या बी लय खूश हाय ती खुशी पाहून." रामा उत्साहाने म्हणाला.
"व्हयं रं, हे तर तू लय बेस काम करतुया. आरं म्या बी घेऊन येतो थांब झेंडूची फुलं. माझ्या घरामागच्या परसात लय हायती. दोघं मिळूनस्यानी जाऊ मंग. मला बी राजेनच दर्शन घडू दे की रं..किती दिसांनी हा सोनियाचा दिस आलाय. अस राजं भेटाया नसीब लागतं बघ." शिरपा भारावून म्हणाला.
"व्हय रं, आक्षी शंभर नंबरी खरं बोललास बघ तू. आपलं नसीब लय भारी हायं. असं राज आपल्याला भेटलं. जा पटाकदिशी ये फुले घेऊनस्यानी, मी थांबतो तोस्तवर. " रामाही त्याला दुजोरा देत म्हणाला.
"हा, असा गेलो अन् असा आलो बघ." शिरपा हसत म्हणाला.
तो लगबगीने एक टोपलीभरून झेंडूची फुले घेऊन आला. मग दोघे मिळून रायगडाकडे निघाली.
थोड्यावेळाने दोघेही फुले घेऊन रायगडवर गेले. तिथला सोहळा पाहून ते दोघेही अगदी भारावून गेले. आपल्याला स्वराज्य मिळवून देणारा निधड्या छातीच्या शिबवाराजेना समोर पाहून त्यांचा ऊर अभिमानाने व आनंदाने भरून आला.
©️ जयश्री शिंदे
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा