शिलूताई (भाग २)

इन्स्पेक्टर आत आले आणि म्हणाले........

                                         इन्स्पेक्टर आत आले आणि म्हणाले," चला, पो. स्टेशनला, चौकशी करायच्ये ,शिलूताईंच्या खुनाची! ओळखताना त्यांना ?" मी स्वतःवर ताबा ठेवीत म्हंटलं ," पण त्यांच्याशी माझा काय संबंध ?."
    " तेच तर शोधायचंय ना. जे,जे शिलूताईंशी दूरान्वयेही संबंधित आहेत,त्या त्या सगळ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. चला,चला , कपडे घाला."
   माझी परिस्थिती समजल्याने बायकोनी मला थंड पाण्याने भरलेला पेला आणून दिला. ते पिऊन मी थोडा भानावर आलो. भीतीही थोडी दबली. मी आत जाऊन कपडे घालून आलो. इन्स्पेक्टर म्हणाले, " यांना बेड्या घालण्याची गरज नाही. काय कुलकर्णी,बरोबर ना ? " मी काहीच बोललो नाही. मग मी गेटजवळ उभ्या असलेल्या पोलीसगाडीत जाऊन बसलो. पंधरावीस मिनीटात आम्ही गावदेवी पोलिस स्टेशनला पोहोचलो. इन्स्पेक्टर मांडे (केबिनच्या पाटीवरील नाव दिसल्याने कळले होते) आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होत म्हणाले, " बरोब्बर सात महिन्यांपूर्वी तुम्ही शिलूताईंना भेटायला आला होतात, का ? आणि कशासाठी ? , पटापट बोलायचं कुलकर्णी." आतल्या एक दोन कोठड्यामधून मारण्याचे आणि ओरडल्याचे आवाज येत होते . ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी काहीच बोलत नाही असं पाहून इन्स्पेक्टर ओरडून म्हणाले," बोला लवकर. का चार्जरुममधे घेऊ ? " ते ऐकून तिथेच उभे असलेले कॉन्स्टेबल म्हणाले," नाही, साहेब ते सगळं सांगतील !" ते ऐकून इन्स्पे. खवळून म्हणाले," तुम्ही त्यांचे वकील आहात काय? आरोपीला प्रोटेक्शन देता ? सस्पेंड करीन,याद राखा."  मग मी सौम्य आवाजात म्हणालो, "सर मी शिलूताईला भेटायला गेलो होतो,हे खरं आहे, पण तिनेच तर मला भेटायला बोलावले होतं. "
    माझं उत्तर ऐकल्यावर ते कडाडले," त्यांनीच बोलावलं होतं म्हंटल्यावर प्रश्न मिटला, नाही का ? आता त्या जिवंत नाहीत, त्यामुळे त्यांना विचारता येत नाही. हे उत्तर सोपं ,नाही ?" मी काय बोलावं याचा विचार करीत होतो.
   मग मी काहीच बोलत नाही असं पाहून म्हणाले," तुम्हाला चार्जरुममधे जायची घाई झाल्ये , नाही? ".
मी त्या दिवशीच्या सभेपासून ते तिला भेटल्याच्या दिवसांपर्यंत सगळं सांगून टाकलं. अगदी तिचा नवरा तिला भेटून जाईपर्यंत. ते ऐकून ते म्हणाले," म्हणजे तुमचा तिच्या नवऱ्याशी संबंध होता तर ? काहो त्यानेच तर तिला मारण्याची सुपारी तुम्हाला दिली नव्हती ना ?" ......आता मात्र मी भडकून ओरडलो," नाही! नाही ! अजिबात नाही , माझा तिच्या नवऱ्याशी कधीच संबंध आला नाही. मला तो काळा की गोरा तेही माहिती नाही. "......मग मात्र ते हलक्या आवाजात म्हणाले, " लग्नाला गेला होतात, तुम्ही तिच्या . " मी म्हंटलं," त्यांनी काय सिद्ध होतंय ? मी मारलंय की त्याने मारायला सांगितलंय ? "
मग ते म्हणाले," आहे ,काय वकिली पॉईंट आहे. वकील तर नाही ना तुम्ही ? लवकर काय ते सांगा. " मग मी त्यांना हात जोडून म्हंटलं,"साहेब अहो मला खरंच काही माहिती नाही." मग काही वेळ स्तब्धतेतच गेला आणि अचानक ते म्हणाले, \" हुं ! निघा. सोडलं तुम्हाला,पण हे शहर सोडून चवकशी पूर्ण होईपर्यंत बाहेर जाता येणार नाही, लक्षात ठेवा." मी उठलो आणि दरवाज्या उघडण्यासाठी मी हात उचलला आणि त्यांनी विचारलं, " नवऱ्याचं नाव पत्ता काय आणि तुम्हाला किती पैसे दिले हो त्यांनी, आम्हाला गोंधळात पाडण्याचे? " मी थांबून म्हंटलं," अहो साहेब, माझा काहीच संबंध नाही हो. "
त्यावर ते नरमाईने म्हणाले," कुलकर्णी,तुम्ही आमचा माणूस म्हणून काम करा. तिच्या नवऱ्यावर नजर ठेवा,दर दोन दिवसांनी मला माहिती द्या. निघा आता. ".... मी बाहेर आलो.कपाळावरचा घाम रुमाल नसल्याने,हातानेच पुशीत मी घाईघाईत घरच्या रस्त्याला लागलो.


      मला कळेना,मी तिच्या नवऱ्याला कुठे शोधणार आणि त्याच्यावर पाळत कशी ठेवणार ? तो कुठे राहतो,हे सुद्धा मला माहीत नव्हतं. आणि लग्न झाल्यावर पत्रिका कोण सांभाळून ठेवणार ? त्याचा पत्ता शोधण्यासाठी संपर्क करायला जिवंत होतंच कोण ,ती ना तिचे आईवडील.हे काहीतरी भलतंच मागे लावून दिलं. त्यांचं काम माझ्या का मागे लावलं. या विचाराने मी एवढा काळजीत पडलो की मला काहीही सुचेचना.जवळजवळ साडेदहा वाजले होते. म्हणजे मी पो.स्टेशनला दीडतास होतो तर. मला तर भितीच बसली. मग मी ठरवलं, हो म्हंटलं म्हणजे काही  केलंच पाहिजे असं थोडंच आहे. परत भेटल्यावर विसरलो असं म्हणता येईल. घराची बेल दाबली. बायकोने दार उघडलं. तिचा आणि मागे उभ्या असलेल्या आईवडिलांचा काळजीने काळवंडलेला चेहरा पाहून मी वैतागून म्हंटलं. " अरे विशेष काही नाही, नेहमीसारखी चौकशी केली आणि सोडून दिलं. " आईवडिलांनी सुस्कारा सोडल्याचे दिसले. माझ्या खोलीत गेल्यावर मात्र बायकोला सगळी माहिती दिली..  बायकोला जास्तीच काळजी वाटत असावी. मी अंथरुणावर पडल्यावर ती स्वतःच
जवळ येऊन म्हणाली," तुम्हाला पो.स्टेशनमधे काही केलं तर नाही ना? मला खरं खरं सांगा बरं का. " तसं काहीच न झाल्याने सांगण्यासारखं काहीच नव्हतं.आणि असतं तरी हिनी काय करुन घेतलं असतं ? अर्थातच मी तसं तिला बोललो नाही. मग कितीतरी वेळ आमचा वेळ प्रणयाच्या धुंदीत गेला. सकाळी उत्साहात उठलो. माझा मूड चांगला होता . कालच्या प्रणयामुळे खूपच धीर आला होता. मी कामावर गेलो. दिवस कामात कधी गेला कळलं नाही.
शिलूताईच्या नवऱ्याने परत माझी पकड घेतली. बायकोचं लक्ष माझ्यावर बारीक असावं. पण ती काही बोलली नाही. वडिलांना ताईच्या लग्नाच्या पत्रिकेबद्दल विचारणं म्हणजे ,का‌ कशाला अशा प्रश्नांची सरबत्ती झाली असती. पत्रिका शोधायचं काम मी स्वतःच करायचं ठरवलं. अचानक माझा मोबाईल फुरफुरला. मी घरी मोबाईल सायलेंट वर ठेवीत असे. उघडल्यावर लक्षात आलं.अन्नोन नंबर आहे . मी फोन कट केला. मग जवळजवळ तीनचार वेळा फोन वाजल्यावर मी तो घेतला. पलीकडचा माणूस गुजराती असावा. " काय भाव काय फोन उचलत नाय काय? तू शिलूताईच्या भाव बोलते ना ? ". मला नवल वाटलं आणि भीतीही. मी भीती भीती विचारलं
" तुम्ही कोण ?....." त्यावर तो म्हणाला, " मी मणिबेनच्या भाव हाय. मला जरा उदिया येऊन भेटा.

अर्थातच मी काही त्याला भेटायला गेलो नाही. नेमका लगेचच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला. " काय कुलकर्णी,काय खबर आहे,शिलूताईंच्या नवऱ्याची? ". मग मी त्यांना त्याचा पत्तासुद्धा माहिती नसल्याचं सांगितलं आणि मणिबेनच्या भावाचाही  फोन आल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले," अहो चांगलं काम करताय  की तुम्ही. उद्या तुम्ही त्याच्याकडे जा. पण जायच्या आधी मला फोन करा,म्हणजे मी आमची माणसं घेऊन तुमच्या मागावर राहतो. आमचं संरक्षण आहेच तुम्हाला.पाहा तो का‌य म्हणतोय. " ....... मी घाबरुन म्हणालो," छे हो, मी हे काम नाही करु शकणार. " त्यावर ते भडकून ओरडले, " असं कसं नाही जमणार? लहान पोरासारखं करु नका. जाच तुम्ही. का घेऊ तुम्हाला ताब्यात? पुरावे बरोबर सापडतात. ".....मी कसंतरीच हो म्हणालो. आपण यात उगाचच अडकतोय .अशा शंकेने माझी झोप पळाली. मणिबेनच्या भावाचा काय संबंध असेल असा विचार करण्यात माझी रात्र सरली... नाही म्हणायला चाळवलेल्या झोपेत मला पोलिस बेड्या घालून नेतायत असं स्वप्न पडलं.मी सकाळी उठल्यावर बायकोला सांगितलं. त्यावर ती म्हणाली," मला बाई भीती वाटते " निदान हिच्याकडून तरी माझी धीराची अपेक्षा होती.  आता मात्र माझी गाळण उडाली. दुपारी ऑफिस मधल्या लंच टाईम मधे मणिबेनच्या भावाचा फोन आला. मग मात्र मी त्याला रात्री आठ वाजता भेटण्याचं कबूल केलं. नंतर इन्स्पेक्टर साहेबांना तसं कळवलं.
                     आता घरी काय सांगायचं हा प्रश्नच होता.
आई बाबांना काहीही सांगायचं म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणं भाग होतं. त्यांना दुसराच काही तरी कारण सांगून वेळ मारुन नेली. बायकोला मात्र खरं सांगणं भाग होतं. सगळं सांगितल्यावर ती म्हणाली," मला एक कळत नाही, पोलिसांना तुमच्यावर संशय का येतोय ? तुमचा काही संबंध तर नाही ?" मग मी रागात म्हणालो, " तू सुद्धा अविश्वास दाखवतेस माझ्यावर ? " मग ती म्हणाली," पोलिसांना तुमचा संशय येण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही तसे नाही आहात हे मला कळतंय हो."
" जाऊ दे. तू सुद्धा भरंवशाची राहिली नाहीस. " असं म्हणून मी पावणे आठला निघालो. इन्स्पेक्टरना फोन केल्याने ते माझ्या मागे होते.अखेरीस मी ताईच्या घरी पोहोचलो. दारावरची बेल वाजवण्यापूर्वी मी मागे वळून पाहिलं. थोड्याच अंतरावर इन्स्पेक्टर त्यांच्या माणसांसहीत उभे होते.त्यांनी माझ्या खिशात मायक्रोफोन बसवला होता. त्यांनी खूण केल्यावर मी बेल वाजवली. आतून एका नोकरासारख्या माणसाने दार उघडलं. मी आत यावं म्हणून तो थोडा बाजूला झाला.आतून थोडा कणखर पण रागिट आवाज आला," आओ, अंदर. बैठो. मी टेबलापलीकडे बसलेल्या उग्र चेहऱ्याकडे पाहिलं. तो एक मध्यम वयीन माणूस होता.अर्धवट पिकलेले केस, त्याखाली देवीचे व्रण असलेला काळसर चेहरा .थंड भीती दाखवणारे वेडसर डोळे,सतत दुसऱ्याकडे पाहात राहणारे. मी बसलो.माझं निरीक्षण पूर्ण झाल्यावर तो म्हणाला," मी किरिटभाई.मणिबेनच्या भाव.तुमी शिलुताईचे भाव काय? ". मी " मानलेला भाऊ" असं म्हणालो.मग तो थोडा थबकून म्हणाला," तुम्ही शिलूताईमधे एवढा इंटरेस्ट का घेते ? मी काय बोलते ते नीट सांबळ.तुमाला त्रास नको पायजे तर आमच्यासून दूर रवा.आनी हां, पुलिसला काय बोलायचा नाय.पुलिसला सांगेल तर मोठा धोका हाय.हे ध्यानमदी ठेवायचा." मला थोडा घाम फुटला. रागही आला.इन्स्पे.मांडे बाहेर काय करीत होते, माहित नाही.मग मी विचारलं" मी निघू का ? " त्याने उत्तर देण्याच्या आतच बेल वाजली..नोकर दार उघडायला गेला. किरीट भाईने ड्रॉवर मधून पिस्तूल काढलं.दरवाज्याकडे रोखीत तो उभा राहिला.अचानक इन्स्पेक्टर मांडे नोकराला ढकलून त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह आत शिरले. त्यांच्याही हातात पिस्तूल होतं. त्या सगळेच एकदम पुढे आले आणि किरीट भाईंचे पिस्तूल हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतला.मग मात्र मला शिव्या देत तो ओरडला," तुला तर मी बघून घेईल." .... " अरे, चल असं म्हणत मांडेे साहेबांनी त्यांचं बकोट धरलं. त्याला खेचत नोकरासहीत ते पोलीस कारमधे त्या दोघांना त्यांनी कोबले. मग माझ्याकडे वळून म्हणाले, " चला बसा तुम्ही पण. मग आम्ही आमची यात्रा पो.स्टेशन कडे निघाली.


(क्रमशः).

🎭 Series Post

View all