शिलूताई (भाग १)

शिलूताई आज हयात नाही.......

  शिलूताई आता हयात नाही. खरंतर आम्ही दोघे एकाच वयाचे. दिसायला ती काळी    सावळी. पण माणूस ओळखण्यात माणसं नेहमीच चुकतात की काय कोण जाणे. ती वर्गात असताना स्वतःचा अभ्यास तर करायचीच. अभ्यास म्हणजे गृहपाठ.पण ज्यांचाअभ्यास झालेला नाही.त्यांचाही अभ्यास ती करून द्यायची. तिचं लक्ष चौफेर असायचं.ती स्वस्थ बसलेली किंवा खेळताना दिसत नसे. सारखी बाहेर जायची. मी तिला एक दिवस त्याबद्दल विचारलं तर ती म्हणाली," अरे घराबाहेर गरजू माणसं खूप असतात.त्यांच्याकडे कोण पाहणार ?"  ती कधी अभ्यास करायची माहिती नाही.पण तिचा नंबर वर्गात पहिल्या दहात असायचा. तिच्या वडलांचं दुकान होतं. ते जेमतेमच चालायचं.तिचे कपडेही साधारण असायचे.ती एकुलती एक होती ,पण लाडावलेली नव्हती. तिची स्वतःची अशी शिस्त असावी.बोलणं एकदम मृदू आणि गोड.आम्ही दोघेही मॅट्रिक झालो. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती परिस्थिती चांगली नसल्याने घरातच राहिली. पण नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेली असायची.
         अचानक एक दिवस तिचे वडील पत्रिका द्यायला घरी आले. माझ्या बाबांनी सहजच. विचारलं," हे काय शिलूचं लग्न ?" त्यावर ते रागावून म्हणाले," का तिचं लग्न होऊ शकत नाही ?" त्यावर माझे बाबा म्हणाले," तसं नाही हो, ती अजून लहान आहे,पुढचं शिक्षण व्हायचंय ना , म्हणून म्हंटलं."
" अहो, मुलींना शिकून काय करायचंय ? संसारच तर करायचाय." त्यावर बाबा काहीच बोलले नाहीत.शिलूचा नवरा लहानग्या खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचा. लग्न होऊन जेमतेम एखादं महिना उलटला असेल नसेल.ती एक दिवस घरी दिसली. मी तिला माहेरपणाला आल्येस का असं विचारलं. त्यावर ती थोडी रुक्षतेने म्हणाली," नाही रे, मी आता सासरी जाणार नाही,मला सासरच्यांनी घराबाहेर काढलंय. कायमचं. पुन्हा इथे यायचं नाही असा सज्जड दम ही दिलाय." ....
मी उसळणाऱ्या रक्ताला आवर घालीत तिला विचारलं," अगं पण का ? काही कारण असेल ना ? ".... "त्यांना माझं लोकांमधे मिसळणं पसंत नव्हतं. आणि माझे कोणाशी तरी संबंध आहेत असं त्यांना वाटतंय. "  ... माझ्या मुठी आवळल्या जात होत्या . पण मी काही करु शकत नाही, हेही मला माहीत होतं. तरीही मी विचारलं, " आणि तू ऐकून घेतलंस ?"..... " तुला तर माहीतच आहे मी कठोर बोलू शकत नाही."...  असे कसे हिचे आई वडील ? जाऊन भांडले नाहीत. मी तर त्या नेभळट नवऱ्याची गचांडीच धरली असती. मला जास्त काही माहिती नसताना तिच्या नवऱ्याला नेभळट ठरवून मोकळा झालो. माझं कशातच लक्ष लागेना. आईच्या हे लक्षात आलं तिला सगळं सांगितल्यावर ती म्हणाली," नशीब तिचं.". मला तर आईचा ही राग आला. "नशीब काय नशीब ?." मी जवळजवळ ओरडूनच बोललो.
दिवस चालले होते. या घटनेला सहासात महिने झाले. अचानक एक दिवस पाच साडेपाचला,शिलूताईच्या घरातून आधी विव्हळण्याचा मग मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला.मी आई बाबांना घेऊन ताईच्या घराची कडी वाजवली. ताईनीच दरवाज्या उघडला. रडतरडत तिने जमिनीवर ठेवलेल्या आईच्या निष्प्राण देहाकडे हात केला.तिचे वडील तिथेच खाली मान घालून बसले होते.... दु:खाने कळवळून ती म्हणाली,"आई आत्ताच थोड्यावेळापूर्वी  गेली रे. ..... रात्रभर आम्ही जागेच आहोत."
मग आईनी तिला जवळ घेतली. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत ती तिथेच बसली.बाबांनी तिच्या वडिलांना सांभाळून नातेवाईकांचे फोन नंबर घेतले आणि आम्ही दोघेही शेजारी सांगून पुढच्या तयारीसाठी बाहेर पडलो.......       
                     अशीच दोनतीन वर्ष गेली. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. लवकरच मी नोकरीला लागलो.शिलूताई अधूनमधून दिसायची.ती फारशी घरी येत नसे.नाहीतरी ती घरी नसायचीच.हल्ली तिचे वडील फारसे बोलत नसत. म्हणजे ओळखीचं हसूही हसत नसत. नाहीतरी दुकानदार असल्याने लवकर जात आणि उशीरा घरी येत.........
‌ तिचं समाजकार्य आता जोरात चालू असावं.आणि एक दिवस ती सकाळीच घरी आली. तो रविवार होता . आम्ही तिघे घरीच होतो. मग आम्हाला तिने जागा सोडणार असल्याचं सांगितलं. कुठे जाणार विचारल्यावर ती म्हणाली, " अरे. तुला मणिबेन मोकल माहिती आहेत का ? आपण चवथी पाचवीत होते तेव्हा त्या निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांनी माझं काम पाहिलं आणि जागा ऑफर केली. पाहू पुढे काय होतंय ते. " मग ती काही वेळ आईबाबांशी बोलत राहिली आणि निघाली.  दोन तीन दिवसात ती निघूनही  गेली. माझ्या मनात पोकळी निर्माण झाली. तसं मी आईशी बोललोही . त्याचा अर्थ मात्र आईनी वेगळाच काढला.हे मला तिच्या पुढच्या बोलण्यावरून वाटलं...... " तुला एक विचारू का ? " मी काही बोलत नाही असं पाहून ती म्हणाली, "चल जाऊ दे... तुला आवडणार नाही"  .... म्हणजे काहीतरी विचित्र असावं असं मला वाटलं. मग ती थोडे आढेवेढे घेत म्हणाली," मला वाटतं, तूच तिच्याशी लग्न केलं असतंस तर बरं झालं असतं,  तिची अशी परवड झाली नसती. "
"काऽऽय ?" मी जवळजवळ ओरडलोच. मी पुढे म्हणालो, " अगं माझं हे लग्नाचं वय होतं का ? आणि तिला ताई म्हणतो ना मी ?. दुसऱ्या कोणत्याच भावना तिच्याबद्दल माझ्या मनात नाहीत." तिचा चेहरा पडला . मग बाबाही म्हणाले," तू जराही विचार करून बोलतच  नाहीस का ? " अर्थातच तिनी  उत्तरादाखल  तिचं लक्ष दुसरीकडे वळवलं. मग ही चर्चा तेवढ्यावरच थांबली. माझ्या मनात मात्र बहिणीची भावना कायम होती. ......
  ......आणखी दोन अडीच वर्षांत माझं लग्न ठरलं.मला चांगली शिकलेली,नोकरी करणारी बायको मिळाली. यथावकाश आम्हीही चाळीच्या जागी झालेल्या फ्लॅटमधे शिफ्ट झालो.......
.मधे चारपाच वर्षांच्या काळ लोटला. शिलूताईची आठवण येणं थांबलं. पण मन विसरलं नव्हतं. मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी ती शेवाळासारखी चिकटून बसली होती. अगदी क्वचितच तिचं नाव आईच्या तोंडून निघायचं. पण तिची माहिती मात्र नव्हती. आणि तिच्याशी संपर्कही नव्हता. त्यामुळे तिच्याबद्दल बोलणं झालं तरी त्रोटकच होत असे. एवढ्या अवधीत मला मुलगा झाला. संसारात मी चांगलाच रुळलो होतो. ........असाच एकदा माझ्या मुलाला घेऊन मी रस्त्याने चाललो होतो. मागून दोन चार लोक " चला चला ,रस्ता सोडा, बाजूला व्हा. ताईंना जाऊ द्या ...." असं म्हणत गर्दी बाजूला सारीत होते. मी बाजूला होऊन मागे पाहिले. एका मोठ्या शृंगारलेल्या घोडागाडीत शिलूताई गळ्यात मोठाले हार घातलेल्या अवस्थेत बसली होती. मला तिला ओळखायला वेळ लागला. पण ती शिलूताईच होती. तिचे केस कानशिलांवर थोडे पांढरे झाले होते.बरीच माणसं तिच्या नावाचा जयघोष करीत जात होती. " हमारी नेता शिलूताई,." " दुसरी कोई नही बडी , शिलूताईही बडी " ... " आगे पीछे शिलूताई ऊपर नीचे  शिलूताई\"" वगैरे घोषणांनी वातावरण दुमदुमत होते. मग ती मिरवणूक " वामनराव पै "  उद्यानाकडे वळली. तिथे एक शृंगारलेलं स्टेज होतं. काही नेते आधीच व्यासपीठावर उपस्थित होते. समोर मोठ्या प्रमाणात श्रोतृगणही होता. घोषणांच्या गजरात शिलूताई व्यासपीठावरील खुर्चीवर विराजमान झाल्या.
   मी मुद्दामच सभेला उपस्थित राहण्याचं ठरवलं. मी मुलाला पुरेसा खाऊ घेऊन दिला.सभेला शंभर सव्वाशे माणसं होती. व्यासपिठावरील इतर वक्त्यांनी शिलूताईचा परिचय करुन दिला. त्यांच्या सामाजिक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.शेवटी शिलूताई भाषणाला उभी राहिली. अतिशय सुंदर शब्दांत तिने तिची भूमिका मांडली. राजकारणात जाण्याचा तिचा  हेतू स्वच्छ व पारदर्शक होता. तिच्या वागण्यातला बोलण्यातला व्यवस्थितपणा अगदी तोच होता ,जो शाळेत असतानाही दिसायचा. भाषण संपलं होतं. शिलूताई आता जाणार होती. मी तिला भेटायचं ठरवलं. गर्दी बाजूला सारीत मी पुढे होऊन तिला हाक मारली. तिने मागे वळून पाहिलं.आणि ती आनंदाने गळ्यात पडण्याची बाकी राहिली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. कशाचे ते नक्की माहीत नाही. " अरे माझ्या घरी ये रे. बरीच वर्ष झाली बघ  " आयोजक तिला घोडागाडी कडे चलण्याचा आग्रह करीत होते. त्यामुळे ती वळली आणि गर्दीत दिसेनाशी झाली.
     मी घरी परतलो. बायकोने इतका वेळ खोदून खोदून कुठे गेलो होतो विचारलं.तेव्हाच तिला सांगितलं. मी सहसा तिला जास्त काही सांगायला जात नसे , कारण चर्चा करून दुसऱ्याला कंटाळा आणण्यात एक्स्पर्ट होती. त्यात तिचा वाईट हेतू नसतो हे मला माहीत झालं होतं. तिला शिलूताईबद्दल सांगितल्यावर मात्र ती आदराने म्हणाली," त्या आहेतच तशा." असं म्हंटल्यावर मी विचारलं," तशा म्हणजे ? " मग मात्र ती चिडून म्हणाली, " म्हणजे आदर करण्यासारख्या.पण तुम्हाला काय माहिती असणार त्यांच्याबद्दल?" मग आईने शिलूताई लहानपणापासून आमच्या शेजारीच राहातं असे,असं सांगितल्यावर ती गप्प बसली. नाहीतर तिला आईची कोणतीच गोष्ट तिला पटत नसे. मग काही वेळ शिलूताईवर चर्चा झाली. काही दिवस असेच गेले. एका संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो. मला स्वागतिकेने बाहेरच्या बैठकीवर बसवलं आणि ती आत शिलूताईला वर्दी द्यायला गेली. थोड्याच वेळात ताई बैठकीवर आली. आणि मनापासून स्वागत करीत म्हणाली," चाळ सोडल्यापासून  चाळीतला येणारा फक्त तूच आहेस. बरं वाटलं तुला बघून. " मग तिने आतून संत्र्याचा रस मागवला. तो पीत पीत आम्ही बऱ्याच आठवणी काढल्या. तिचं राजकारणात जाण्यापर्यंतचे सगळ्याच प्रसंगांची उजळणी झाली.मग पुढे ती जे बोलली ते ऐकून मला चांगलाच धक्का बसला. ती म्हणाली," माझ्या लग्नाचं काय झालं तुला माहीतच आहे.  आधी आई गेली मग बाबा. जवळचं असं कोणीच राहिलं नाही. कोणा जवळ मन मोकळं करणार ? मध्यंतरी माझा तथाकथित नवरा आला होता . घरी चलण्याचा आग्रह धरायला. आपण परत संसार करु असंही म्हणाला. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम होते.नाहीतरी ज्या वयात माझं लग्न झालं त्यावेळी माझा लग्न करण्याचा विचारच नव्हता. मला शिकायचं होतं. आणि तुला खरं सांगू लग्नाबद्दल माझ्या मनात फक्त तू होतास. मी तुला मनाशी वरलं होतं रे. पण काय झालं ,तू पाहिलसंच  . ...." बोलता बोलता तिचा स्वर कातर झाला. मग ती हमसून हमसून रडायलाच लागली.  तरी मी तिला म्हटलं, अगं काहीतरीच काय? मी तुला ताई म्हणतो ना ?  मग ? ...."
        "... असेल, पण माझ्यासाठी तू वेगळाच होतास. " मला कसंतरीच वाटू लागलं. एकदम सगळीच मूल्यं बदलल्या सारखं झालं. मला ती भावना सोसवेना. आता मला तिथून कधी घरी जातोय असं झालं. माझं मन चांगलंच ढवळून निघालं. ती डोळे पुसत  "मुलाला आणि बायकोला घेऊन ये एकदा " . असं म्हणाली. पण मला ते धड ऐकायला आलं नाही. किंवा मला ते ऐकायचं नव्हतं.  मी अचानक उठलो. त्यावर ती म्हणाली," अरे, थांब रे. मी बोललेले आवडलं नाही का तुला ? ". पण तिला उत्तर द्यायला मी थांबलोच नाही. तडक दरवाजा उघडून बाहेर पडलो. ती मला हाका मारीत राहिली . मी भराभर चालत राहिलो. त्या हाकांपासून दूर पळावंस वाटत होतं. अचानक मला वाटू लागलं हिच्यात आणि माझ्या आईमधे काहीच फरक नाही.
       हळूहळू घरात शिलूताईचा विषय मागे पडू लागला. त्याला कारण मीच होतो.तिचा विषय निघतच नव्हता असं नाही. ती निवडणुकीला उभी असल्याने बातम्या येतच असत.पण माझ्या मनात असलेल्या तिच्याबद्दलच्या दैवी भावनेला धक्का लागल्याने,मी विषय निघाला तरी त्याला प्रोत्साहन देत नव्हतो. मला वाटतं निवडणुका लवकरच झाल्या. मी मतदानाला गेलो नाही. कारण दिलं मत , तर ताईलाच नाहीतर कोणालाही नाही.ही माझी भावना होती. आणि माझं तिच्याबद्दलच्या चांगल्या भावना तीव्र न राहिल्याने,मी मतदान केलंच नाही.त्यावर बायको आणि आई दोघीही बरंच बोलल्या पण मी लक्ष दिलं नाही. ....असो, ताई निवडून आली. नगरसेविका म्हणून ती मिरवू लागली. तिचं कौतुक तिच्या आश्रमामुळे आणि समाजकार्यामुळे होतच होतं.हळूहळू ते अंगवळणी पडलं. साधारणपणे सहासात महिने झाले असतील. .....       
         अचानक एका रात्री एकदीडच्या सूमारास बेल वाजली. आम्ही सगळेच झोपेत होतो. मला बेल ऐकू आली. पण मला ते महत्वाचं वाटलं नाही. मी परत झोपलो. मग मात्र दोनतीन वेळा बेल वाजली. म्हणून मी उठलो.आणि घाबरत विचारलं," कोण. ....?"
त्यावर दबक्या आणि थरथरत्या आवाजात उत्तर आलं," मी शिल् लूऽऽताई ". मी धडधडत्या छातीने दरवाज्या उघडला. शिलूताई दारात भीतीने थरथरत उभी होती. तिचे केस विस्कटलेले,चेहरा घामाने निथळत  होता , तोंडातून शब्द फुटत नव्हता. मी तिला घरात घेतलं .ती आत आली म्हणाली, " ते माझ्या मागे लागल्येत...." आणि माझ्या अंगावर कोसळली. मी दरवाजा लावून घेतला. तिला सावरुन समोरच्या आरामखुर्चीत बसवली.आता बायको ,आई. बाबा सगळेच बाहेर आले. सगळ्यांनाच धक्का बसला होता. मग बायकोनी पाणी आणलं. ते ताईच्या चेहऱ्यावर शिंपडले आणि तिला थोडं पाजलंही . तरी तिच्या डोळ्यातली भीती जाईना. तिचे डोळे भीतीने गरगरत राहिले. मग बायकोने तिच्यासाठी कॉफी करुन आणली. ती थोडी भानावर आल्यावर तिला आजची रात्र इथेच काढायला सांगितली. तिला काय करावं हे समजत नव्हतं ,मग आईनी स्वतःजवळच झोपायला सांगितलं. पण तिच्या घरी काय आणखी कसं कळणार याची मला काळजी वाटली.सकाळी ती उठल्यावर मी तिला नक्की काय झालं हे विचारुन घेतलं. तेव्हा असं कळलं की ती कुठल्याशा झोपडपट्टीत अनाथ मुलांना ताब्यात घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेली तेव्हा भांडणं झाली आणि बराच वेळही गेला. मुलं तर मिळालीच नाही. नंतर अचानक काल रात्री आलेले गुंडांनी मात्र तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने कशीबशी स्वतःची सुटका करून घेऊन ती पळत सुटली. आणि अचानक चाळीची आठवण होऊन ती माझ्या कडे आली. . घरच्या कोणीतरी पोलिस कंप्लेंट केली असली तर ? आणि आता घरी गेल्यावर ती रात्रभर कुठे होती विचारणार नाहीत ? त्यावर, मी तुझ्या कडेच भेटायला आले होते असं सांगीन म्हणाली . मला हे पटलं नसल्याचं मी तिला सांगितलं. ती गुन्हेगारांना का लपवत्ये असंही म्हणालो. ते पुन्हा प्रयत्न करतील तेव्हा काय करणार आहेस ? ती माझ्यापासुन काहीतरी लपवित होती असा मी संशयही तिला बोलून दाखवला.  त्यावर तिचं एकच म्हणणं होतं उगाचच राजकीय गुंतागुंत नको. मला हे अजिबात पटलं नाही.
मी तिला तसं बोललो नाही, पण आपण पोलिस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंदवावा आग्रह धरला. पण तिला ते नको होतं. मला ते अयोग्य वाटलं. मग ती साधारण नऊच्या सुमारास घरी गेली. अर्थातच मी तिला सोडायला गेलो. मधे बरेच महिने गेले.

  ........ अशाच एका रविवारी सकाळच्या आरामात गप्पा चालू असताना आणि आज काय स्पेशल करायचं याच्यावर चर्चा चालू असताना,बायको एकीकडे पेपर पाहात होती. अचानक ती ओरडली," अहो हे पाहा काय... विचित्र बातमी आहे. शिलूताईंची काही अज्ञात इसमांनी हत्या केली. बापरे,...." ती पुढे वाचणार तेवढ्यात मी तिच्या हातून पेपर ओढून घेतला . आणि तपशिलवार बातमी धडधडत्या छातीने वाचू लागलो.
."........ सीतामंदीर मार्गावरुन जात असता शिलूताईंची काही अज्ञात इसमांनी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान  निर्घृण हत्या केली. अजून पोलिसांना कोणताच माग लागला नाही,आणि कुणालाही अटक झाली नाही. पोलिस तपास अतिशय कडकपणे सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिलूताईंना भेटलेल्या सर्वांचीच चौकशी पोलिस करीत आहेत....
       अजूनही मला काहीच क्लिक झालं नाही. तेवढ्यात बायको दबक्या आवाजात म्हणाली," तुम्ही भेटला होतात ना ताईंना ? कदाचित पोलिस तुम्हालाही बोलावतील, नाही ?".  त्यावर मी तिला झापली," काही काय बोलत्येस ,मी भेटून महिना दीडमहिना होऊन गेलाय.तुझं आपलं काहीतरीच हं ! ". पण अचानक मला भीती वाटू लागली. खरंच मला बोलावलं तर ? तर ?.....मी गप्प झालो. घाबरून बायको जवळ आली आणि हातात हात घेत हळवेपणाने म्हणाली," असं काही होणार नाही बरं. माझं मेलीचं नेहमीच चुकतं. " तिचे डोळे डबडबले. मग मीच तिला धीर देत म्हंटलं, " काळजी करू नकोस.आपला काय संबंध पोलिसांनी बोलावण्याचा ? आपण काही तिच्याकडे नियमीत थोडेच जात होतो ? "
   ते बोलणं तेवढ्यावरच राहिलं. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आम्ही अंथरुणं घालून झोपण्याच्याच तयारीत होतो. तेवढ्यात दरवाज्यावर थाप पडली. बायकोने दार उघडलं. बाहेरील माणसाने करड्या व कोरड्या आवाजात विचारलं,
मि. सतीश कुलकर्णी आहेत का घरात ?". बाहेर पोलिस निरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल उभे होते.पडेल आणि थरथरत्या आवाजात बायको म्हणाली, " पोलीस.....!" अन् ती बाजूला झाली.
..
(क्रमशः)

🎭 Series Post

View all