शिक्षण पंढरीचे आम्ही वारकरी

एका ध्येय वेडा शिक्षक अन त्याच्या स्वप्नांची गोष्ट

जिल्हा परिषदेचे सभागृह खचाखच भरले होते.बाहेर धोधो कोसळत असलेला पाऊस असूनही ह्या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला खचाखच गर्दी होती. पुरस्काराने सन्मानित होणारे आपापल्या कुटुंबासह हजर होते.ह्या सगळ्यात सचिन मात्र एकटाच खुर्चीवर बसला होता.त्याचे कुटुंब असलेली आजी कोरोनात गेली आणि सचिन पुन्हा अनाथ झाला.ह्या सगळ्या पुरस्कार घेणाऱ्या शिक्षकांच्या गर्दीत सर्वात तरुण आणि सर्वात दुर्गम तालुक्यातून एकमेव असणारा सचिन त्या गर्दीत एकटाच बसला होता.निवेदिका एकेक नाव पुकारत होती आणि आठवणींची पाने फडफडत सचिन सहा वर्ष मागे गेला.


आई वडील अपघातात गेल्यावर त्याला त्याच्या आजीने वाढवले होते.अतिशय हुशार असणाऱ्या सचिनने आजीचे कष्ट जाणून पुढे लवकर नोकरी मिळावी हा उद्देश मनात धरून शिक्षक व्हायचा मार्ग निवडला. डी.एड.साठी फॉर्म भरायला पैसे मिळावे म्हणून दोघे आजी अन् नातू दिवसभर शेतात राबले होते.


त्यानंतर दोन वर्ष आजी प्रचंड कष्ट करत त्याला शिकवत होती.संपूर्ण जिल्ह्यात पहिला येऊन सचिन पास झाला होता. दोनच महिन्यांनी नेमणूक मिळाली आणि सचिन आजीला घेऊन त्या गावी हजर व्हायला निघाला.आषाढ नुकताच सुरू झालेला.पाऊस धोधो कोसळत होता.गाडी तालुक्याच्या ठिकाणाहून निघाली.वाटेत येणारे ओढे नाले पार करत एस टी जात होती.अचानक एस. टी.थांबली.


कंडक्टर म्हणाला,"पुढ पुलावर पाणी हाय,एस टी.पुड जाणार न्हाय."

आजीला आधीच पाऊस बघून भीती वाटत होती.ती सचिनला म्हणाली,"सचिन,ही नोकरी नग आपल्याला.म्या अजून एक साल कष्ट करीन, पर तू शेरात नोकरी बग लेकरा."

सचिन काही बोलत नव्हता कारण त्याची मनस्तिथी दोलायमान होती.तेवढ्यात मागच्या सिटवर बसलेली एक आजी त्यांचं बोलणं ऐकून पुढे आली,"बर्केगावला जायचंय नव्हं?तुमि गुर्जी हायसा काय?"

सचिन मानेने हो म्हणाला.म्हातारीने सचिनच्या गालावर बोट मोडली,"दोन साल झालं साळत कुणी गूर्जी आन बाई न्हाय.आमच्या गरिबाच्या लेकारानी जायचं कुठं?ह्यो माजा नातू यंदा पैलीला जाईल.त्याला मामाच्या गावाला ठेवते हाय शिकायला रहात नाय पर काय करू?"


म्हातारीचे बोलणे ऐकून छोटा अजित पुढे झाला,"आजे,बग आता गुर्जिबी आल्यात.आता नग पाठवू मला.तू इकटी कशी राहणार मंग?"


त्या दोघांचे बोलणे ऐकतच सचिनचा निर्धार पक्का होत गेला.त्याने सामान उचलले आणि म्हणाला,"आजी चला,आता तुमचा अजित तुमच्याजवळ राहील."


ओढ्याच्या पुलावरून चालत सचिन आणि त्याची आई निघाले.गाव जेमतेम शंभर उंबरा असलेले.अजितची आजी म्हणाली,"म्या रखमा म्हंजी तशी समदी मला जिजी म्हणत्यात.आज माझ्याच घरी रहावा."


रखमा आजीने सचिन आणि त्याच्या आईला खायला घातले.पाऊस सुरूच होता.सचिनने निर्धार केला इथेच काम करायचे.


दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सचिन शाळेत गेला.दोन कौलारू खोल्या.पावसाने गाळणाऱ्या,रंग उडालेल्या.सचिनला हजर करून तात्पुरता चार्ज असलेले शिक्षक निघून गेले.शाळेत एकही विद्यार्थी नव्हता. हजेरीवर तीस मुले होती.सचिनने आधी शाळा स्वच्छ करायचे ठरवले.


गावातले काही टारगट तिथेच होते.त्यातील एकजण म्हणाला,"काय गुरजी नवीन हाय का?"

दुसरा म्हणाला,"आर जाईल पळून चार दिसात."


सचिन फक्त हसला आणि झाडू ,खोरे घेऊन कामाला लागला.तेवढ्यात रखमा आजी आली तिच्याबरोबर अजित आणि आणखी एक दहा बारा वर्षांचा मुलगा होता.रखमा म्हणाली,"गुर्जी म्या हाय तुमच्या संग."

त्याबरोबर तो दहा वर्षांचा सागर म्हणाला,"आन म्या बी हाय."



त्यानंतर सचिनने मागे वळून पाहिले नव्हते.वेगवेगळे उपक्रम राबवून,नाचून गाऊन आणि गोष्टी सांगून त्याने मुलांना शाळेची गोडी लावली. मुले नियमित शाळेत येऊ लागली.रखमा आजी आणि गावातील काही ज्येष्ठ मंडळी मदतीला आली शाळा रुजू लागली,फुलू लागली.छोटा अजित आणि रखमा सचिनचे गुरूच झाले जणू.


त्यात एकदा शिक्षक प्रशिक्षण लागले.अनेकजण हिरीरीने आपले उपक्रम सांगत होते.सचिन सुद्धा स्वतःच्या शाळेतील उपक्रम सांगत होता.


तेवढ्यात अचानक एकजण म्हणाला,"अहो सर,फक्त नाचणे,गाणे म्हणजे शिक्षण नाही.गुणवत्ता आहे का?"


त्या सरांनी विचारलेला प्रश्न सचिनचे मन पोखरत होते.त्याने ठरवले असे काहीतरी करायचे की आपल्या छोट्याशा शाळेतील मुले सगळीकडे चमकतील.त्याने काही उपक्रमशील शिक्षकांना विचारून मार्ग शोधला.शिष्यवृत्ती परीक्षा.


आता सचिनने सगळे लक्ष पहिलीच्या वर्गावर केंद्रित केले.पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया भरायला सुरुवात केली.

अनेकदा सहकारी टिंगल करत,"काय सचिन?अरे घे बदली करून.ती खेड्यातील पोर अडाणी राहणार."


बरोबरचे सहकारी शहरात रहायला गेले.सचिन मात्र आपले काम शांतपणे करत होता. कोरोना काळात सुद्धा त्याने काम थांबवले नाही.अगदी आजी गेल्याचे दुःख बाजूला सारून काम सुरू ठेवले.अनेक अडथळे येऊन पार पाडून परीक्षा झाली.निकाल लागला.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बर्केगावचे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले होते.


अजित जिल्ह्यात पहिला आला होता.सगळ्या जिल्ह्यात डंका वाजत होता.सचिनच्या डोळ्यासमोरून झरझर हा सगळा काळ सरकत होता आणि निवेदिकेने पुढचे नाव घेतले.


पुढील पुरस्कार जातोय श्री.सचिन महादेव शिर्के यांना.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बर्केगाव.सचिन एकटाच उठून व्यासपीठाकडे चालत होता.


एवढ्यात,"गुर्जि, आमी आलोय."


असे ओरडत रखमा आजी पोरांना घेऊन आत आली.धोधो कोसळणाऱ्या पावसात ओढे नाले ओलांडत आख्ख बुर्केगाव गुरुजींचा सन्मान घ्यायला आले होते.ओलेचिंब गावकरी गर्दीतून पुढे आले.संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकाटाने दणाणला होता.



बाहेर कोसळणारा पाऊस गुरुजी आणि विद्यार्थी दोघांच्याही डोळ्यात बरसत होता. व्यासपीावरून निवेदिका पुढील घोषणा करणार एवढ्यात रखमाआजी हात जोडून म्हणाली,"मला बोलाया मिळलं का?"


प्रमुख पाहुण्यांनी स्वतः माईक आजीकडे दिला.आजी बोलायला उभी राह्यली,"म्या रखमा, बुर्केगावची जीजी.आन ह्यो अजित माजा नातू.आज सकाळी लई पाऊस व्हता.गुर्जिनी कालच निरोप धाडला व्हता. हिकड यायला निघालो.पावसानं रस्त तुंबल्याल.पर आमची लेकरं शिकावी म्हणून जीवाच रान करणाऱ्या गुर्जिंच कवतिक करायला यायचं व्हतच.समदी निघाली चालत म्हणून हित पोचाया येळ झाला."


एवढे बोलून रखमा थांबली.तिने चिंब भिजलेली शाल सचिनच्या खांद्यावरून पांघरली आणि कंबरेच्या पिशवीतून भिजलेली नोट काढून म्हणाली,"लेकरा,लई पाऊस व्हता. गॉड काय आणायला जमल न्हाय.याच पेढ खा."



तो अद्भुत सन्मान पाहून प्रत्येकजण स्तब्ध झाला होता.पाऊस बाहेर कोसळत होता आणि सभागृहात सुद्धा कोसळत होता प्रत्येकाच्या डोळ्यातून.सचिन गुरुजींनी व्यासपीठावर पोरांना बोलावले.ओलेत्या कपड्यांनी पोरांनी गुरुजींना मिठी मारली.आणि आख्ख बुर्केगाव गुरुजींना घेऊन चालू लागले.ओलेत्या अंगाने.बाहेर पाऊस वाढत होता.


सचिनला पावसात दिसत होती म्हातारी आजी आशीर्वाद देणारी.आज एका शिक्षकाला शिक्षकी पेशा काय असतो हे पुन्हा एकदा शिकवले होते.अडाणी रखमाआजी आणि बुर्केगावच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी.


गुरुपौर्णिमा आली की मला स्वतः ला माझा शिक्षक म्हणून प्रवास आठवतो अनेकदा शिक्षकांना प्रेरणा देणारे असे प्रसंग अवतीभवती घडत राहतात.प्रशासकीय सेवेत येणारी मरगळ आणि नैराश्य झटकले जाते.ठायीठायी भेटणारे असे लहानगे अजित आणि रखमा आजी कायम जिवंत ठेवतात माझ्यातील शिक्षकाला.


सचिन गुरुजींसारख्या महाराष्ट्रातील खेडोपाडी, वाड्या वस्तीवर काम करणाऱ्या.मुलांना जीव लावणाऱ्या ह्या शिक्षण पंढरीचे वारकरी असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला समर्पित असणारी ही गुरुपौर्णिमा.त्यानिमित्त प्रसंगी माझ्यातील शिक्षकाला वाट दाखवणाऱ्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना आठवत राहतो आणि पुन्हा पौर्णिमा उजळत राहते.नव्या प्रकाश वाटा दिसत राहतात.

©®प्रशांत कुंजीर.