शिक्षा

this is about the girl who got punishment from her mom and teacher

शिक्षा

लहानपणीचा काळ सुखाचा असे आपण नेहमी म्हणतो. हे लहानपण आपल्याला खूप काही  शिकवतं . प्रत्येकाच्या लहानपणी त्याने काहीतरी स्पेशल अनुभवलेले असते .

माझ्या १ ली ते ४ थी  पर्यंत च्या शाळेचं नाव होतं "मुलींची कन्या शाळा". नगरपालिके ची शाळा होती .फार मोठी नाही ,फार छोटी नाही,एक छोटास मैदान होते जे कि सर्व जण वापरत असत .त्यालाच लागून दगडी स्टेज बनवला होता .तिथेच सर्व कार्यक्रम व्हायचे . शाळेची इमारत हि बैठया शाळेसारखीच होती . १ ते सातवी पर्यंत असल्याने ७ वर्ग होते आणि एक मुख्याध्यापकांची आणि बाईंची रूम होती .मस्त छान कौलारू अशी बैठी शाळा होती .

मुख्य म्हणजे त्या एरिया मधील गरीब श्रीमंत अश्या सर्व जणांच्या मुली शिकायला असायच्या .काही भेदभाव नाही . बंगल्यात राहणाऱ्यांच्या मुली पण असायच्या आणि कामवाल्या बाईंच्या मुली पण तिथेच असायच्या . शिक्षण घेणे हा एकमेव हेतू तिथे असायचा . माझी हि शाळा आमच्या घरापासून ३ मिनिटाच्या अंतरावर होती त्यामुळे आई वडील सोडायला येणे वगैरे हा भाग नसायचा . डबा खायला सूध्दा कधी कधी मी धावत घरी यायचे पटकन पोळी भाजी खायची आणि शाळेत पाळायचे ,कधी कधी तर दुपार नंतर शाळेला कल्टी मारायचे . हजेरी सकाळीच लागायची ना . कधी कधी शाळेत जाताना दप्तर शोधायची वेळ यायची मग शेजारी जाऊन विचारायचे काकू माझं दप्तर आहे का ?मग आई कडून एक रट्टा मिळायचा आणि कुठे ना कुठे तरी दप्तर मिळूनच जायच. मग स्वारी शाळेत जायची.

अजूनही खूप छान आठवणी आहेत माझ्या त्या शाळेच्या .अजूनही खूप मैत्रिणी आहेत कॉन्टॅक्ट मध्ये . त्यातलाच एक अनुभव आज सांगणार आहे .  एक माझी मैत्रीण होती . खूप छान सुंदर सुरेख  सुशील . तेव्हा तिचे लांब केस होते  गोरी गोरी पान ,आणि घारे  डोळे . जणू बाहुलिच .ती आणि मी शेजारी शेजारी बसायचो ,अभ्यास एकत्र करायचो ,कधी ती माझ्याकडे ,कधी  मी त्यांच्याकडे .गावच छोटस असल्याने सर्व जवळ जवळ असायचं . तिचा आणि माझा एका किस्सा आहे जो खूप काही शिकवून गेला .

मला माझे वडील शाळेत जाताना कधी १ रुपया  ,चार आणे ,कधी ५ पैसे ,कधी २० पैसे द्यायचे . पप्पांकडून मिळालेले हे पैसे खाऊसाठी असायचे मग लगेच धावत जाऊन  रस्त्यापलीकडच्या दुकानात जाऊन खाऊ घ्यायचा आणि शाळेला आनंदात खात पळायचे . हे पैसे रोजच मिळायचे असे नाही पण आठवड्यातून एक दोनदा तरी मिळायचे . तेव्हा ५ पैशात एक लिम्लेट ची गोळी मिळायची .किंवा एक बॉबी मिळायची . १ रुपया म्हणजे भरपूर झाला .  पान  पराग  च्या गोळ्या ,पार्ले जी च किस मी , चिंच ,खाऱ्या  पाण्यातले आवळे , गोडी आमसुले ,चिक्की ,बोरपुड ,मिलन सुपारी नाव सांगेन तेवढी कमी आहेत ,असा सर्व खाऊ चार आणे ,पन्नास पैसे मध्ये मिळायचा . एकदा असाच मला पप्पांनी पैसे दिले आणि मी ५ बॉब्या घेऊन माझ्या शाळेत गेले तिथे माझी हि  मैत्रीण भेटली .मी तिला एक बॉबी दिली . आम्ही दोघी मिळून बॉबी चा आस्वाद घेतला .तिने हि बॉबी पहिल्यांदाच खाल्ली होती तिला ती खूप आवडली . मी तिला अजून एक दिली . तिला ती बॉबी काय च्या काय आवडली . मला ती म्हणाली तू हि कुठून आणलीस ,केवढ्याला आणलीस , तुला पैसे कोणी दिले .

मी तिला म्हणाले मी दुपारी तुला त्या दुकानात नेईन माझ्याकडे अजून चार आणे आहेत . डबा खाऊन झाल्यावर आम्ही दोघी पुन्हा त्या दुकानात गेलो चार आण्याच्या  ५ बॉब्या घेतल्या आणि खाल्ल्या . मला ती म्हणाली उद्या मी पैसे आणेन मग आपण उद्या पण खाऊ . ठरल्या प्रमाणे तिने दुसऱ्या दिवशी चार आणे आणले आणि आम्ही  दोघीनी मिळून बॉब्या फस्त केल्या . नंतर दोन चार दिवसांच्या गॅप ने ती  चार आणे आणायची आणि बॉब्या खायची .

 एक दिवस दुपारी तिची आई शाळेत आली .आणि आमच्या वर्ग शिक्षिका यांच्या शी काहीतरी बोलत होती. तेव्हा त्या दोघी जणी  वर्गाच्या बाहेर काहीतरी बोलत होत्या . आणि आम्ही मुली वर्गात बसलेलो होतो. तिची आई आलीय हे पाहत होतो .काय बोलत होत्या याचा काहीच अन्दाज येत नव्हता . बाई मध्ये मध्ये आत यायच्या आणि ओरडायच्या गप्पा बसा ... पुस्तकं काढा ... आणि पुन्हा बाहेर जाऊन तिच्या आईजवळ बोलत होत्या .

थोड्या वेळाने तिची आई आणि बाई दोघी वर्गात आल्या . बाईंनी तिला पुढे बोलावलं . काय ग तू घरी चोरी करतेस ? काय करतेस त्या पैशांचं ? कशासाठी चोरी करतेस?पैसे लागले तर घरी मागून घ्यायचे असे बोले पर्यंत तिच्या आईने तिला पाठीत चार पाच धपाटे घातले . आपण म्हणतो ना फटकावून काढेन तो तसाच काहीसा  प्रकार होता . बोलता बोलता बाईंनी एक कानाखाली लावून दिले . माझी हि गोरी गोरी मैत्रीण लालेलाल झालेली .ती घाबरली आणि रडत पण होती . मी अगदी समोरच होते .काय प्रकार आहे ?तिला का शिक्षा होतेय हे नीट कळत पण नव्हतं . मग तिने बाईंना सांगितलं मी पैसे आणून बॉब्या खायचे .

मी आणि शीतल दुकानात जाऊन घेऊन यायचो आणि खायचो .कधी पैसे ती आणते कधी मी आणते . असे सगळं कथन तिने बाईंना केलं . माझं नाव तिने घेताच माझ्या छातीचा ठोका चुकला  आत्ता मला पण फटका मिळणार याची मला कल्पना आली होती .बाईंचे डोळे लाल झाले होते चांगल्याच तापल्या होत्या

दुसर्यां क्षणाला बाईंनी मला पुढे बोलावले . इकडे ये शीतल तू पण घरातून पैसे चोरून आणतेस काय?

सर्व ताकद एकवटून मी बाईंना म्हणाले नाही बाई मला माझे पप्पा पैसे देतात .आज पण सकाळी खाऊ साठी त्यांनी एक रुपया दिलाय आणि खिशातून रुपया काढून मी त्यान्ना दाखवला . बाईंनी मला जागेवर जाऊन बसायला सांगितले . आणि मी हुश्श ... नशीब मला मार  नाही मिळला असं मनात म्हटले आणि जागेवर बसले .

तिला तिच्या आईने बाईंच्या पाया पडायला लावले . म्हण पुन्हा असे करणार नाही असे वदवून घेतले .बाईंनी आईच्या पाया पडायला लावले . आणि बोलल्या परत असे केलेस तर पोलिसांच्या ताब्यात देऊ तुला . रडून रडून मार खाऊन खाऊन लाल झालेली माझी मैत्रीण तिचा चेहरा मला आजही आठवतोय . खूप वाईट वाटत होतं तेव्हा तिच्यासाठी . आणि हा सर्व प्रकार वर्गात सर्व मुलींसमोर घडत होता .

 ती घरातून चोरून पैसे आणते असे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं .माझे वडील मला पैसे देतात तसे हि पण वडिलांकडून आणत असेल असेच वाटत होतं .

त्या सर्व प्रकारचा आमच्या मैत्री वर कधी फरक पडला नाही आम्ही पुढे हि खूप छान मैत्रिणी होतो . आई म्हणून मुलीने केलेल्या घरातल्या चोरी साठी तिला शिक्षा मिळालीच पाहिजे होती .बाई म्हणून वर्गातल्या मुलीला चोरीची सवय लागून तिचे भविष्य खराब न होण्यासाठी तिला शिक्षा मिळायलाच हवी होती . हे जरी  खरं असलं तरी हि शिक्षा फारच कठोर होती .

पुढे नंतर बाईंनी माझ्या वडिलांना पण विचारलं होतं तुम्ही हिला पैसे देता का ? एक रुपया देत नका जाऊ ?पाहिजे तर खाऊ घेऊन देत जा आणि अश्या पद्धतीने माझ्या खाऊवर पण गदा आणली होती . पण आमच्या घर समोरचं दुकान होतं त्यामुळे पुढे मी शाळेतून येताना खाऊ घेऊ लागले .

असो सांगायचं मुद्दा असा  कि मुलीला असे फटके देताना त्या माउलीला किती त्रास होत असेल हे मला आज मी एका मुलीची आई झाल्यावर मला कळते . सगळ्या वर्गा समोर हा प्रकार घडल्याने वर्गातील बाकीच्या ३० मुलींना पण कळले कि चोरी करणे चुकीचे आहे . मुलांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी आई आणि बाई म्हणजेच आपले गुरु यांचा किती हातभार आहे ते यातून कळते .