शेवटचं पत्र"
गेल्या दोन तासांपासून तो जुना ट्रंक उघडून बसला होता. त्यात काही जुने फोटो, काही गिफ्ट दिलेल्या वस्तू, एक मोडकी घड्याळं, आणि एक जपून ठेवलेलं पत्र होतं—तिचं शेवटचं पत्र. ईशाने अर्जुनसाठी लिहीलेल. आजपर्यंत मी दिलेल्या प्रत्येक आठवणी ती जपत होती. हे त्याला नव्यानेच कळलं होतं. त्यांनी एकमेकांना दिलेल्या प्रेमाच्या आणाभाकांच्या आठवणीत तो दंग झाला.
अर्जुनच्या आयुष्यात ईशा एक वादळासारखी आली होती. शांत, पण खोलवर परिणाम करणारी. तिचं हसणंही वेड लावणारं होतं आणि तिचं रुसणंही. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून त्यांची मैत्री झाली. पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागताच ईशाच्या घरच्यांनी ईशाचे शिक्षण बंद केले. त्यामुळे ते दोघेही अस्वस्थ होते. पण प्रेम म्हणजे फक्त सोबत राहणं नसतं, हे दोघांनी शिकून घेतलं होतं. सुख आणि दुःखाचे चटके सहन करावेच लागणार हे माहिती होते. जसा ईशाच्या घरी तिला अर्जुन सोबत लग्न न करण्याचा दबाव होता. तसाच अर्जुनच्या घरी सुद्धा. पण अर्जुनने खूप प्रयत्न केले, सगळ्यांना खूप समजावून सांगितले. पण सगळे त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. परिस्थितीवर त्याचा ताबा नव्हता. शेवटी, एके दिवशी दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आणि वेगळा संसार थाटला. कारण तिच्या पोटात त्याचा अंश वाढत होता. सुखाची चाहूल लागली होती. सगळ काही सुरळीत होत होते. बघता बघता दिवस सरत होते. येणाऱ्या बाळामुळे दोन्ही कुटुंबांनी त्या दोघांनाही स्वीकारले होते. हळुहळु संसाराची वेल बहरली होती. दोन वर्षांतच दोन गोंडस मुले त्यांच्या पदरात होती. मुलांच्या भविष्याची स्वप्ने ते दोघेही बघत होते. आता फक्त त्यांच्या आयुष्यात आनंदच होता.
पण ईशाच्या अचानक जाण्याने ती सगळ्यांचे आयुष्य रिकामे करून निघून गेली होती. त्याला अजूनही तो दिवस आठवतो. रेल्वे स्टेशनवर तो तिला सोडायला गेला. गाडीत चढली आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं. यावेळी का कोण जाणे, तिच्या डोळ्यांत पाणी होतं आणि ओठांवर केविलवाणं हसू. गाडी हलली आणि ती त्याच्या दृष्टीआड झाली. हाताने बाय केलं आणि ते शेवटचं होत असं कधी त्यालाच काय तिला सुध्दा स्वप्नातही वाटलं नव्हतं.
"अहो, आठ दहा दिवसांत मी परत येते. तुम्ही स्वतः ची आणि मुलांची, आईची काळजी घ्या. " निघतांनाचे तिचे हे शब्द त्याच्या कानात घुमत होते.
ईशाच्या बहीणीची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ती बहीणी कडे निघाली होती. तसा अर्जुन नेहमीच आईला आणि मुलांना सांभाळून घेत होता. सगळेजण उत्तम प्रकारे घर सांभाळत होते. पण सुखाला गालबोट लागले आणि नियतीने वेगळाच खेळ खेळला. ती कायमची दूर गेली होती. तिच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. अठ्ठावीस वर्षांचा संसार अर्ध्यावर सोडून ती दूर निघून गेली. तेही कायमची... कधीही परत ना येण्यासाठी....
ईशाचा तेरावा पार पडला. आले तसे पाहुणे निघून गेल्यावर तो स्वतः ला सावरत होता. त्याचा दुसरा मुलगा मनावर दगड ठेवून नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईला निघून गेला. दुःखाच्या गर्तेतून ते सगळे बाहेर पडत होते. कल्पनेच्या पलीकडे जाऊनही ईशाच सत्य कोणीच स्वीकारू शकत नव्हते. येणाऱ्या ऊन सावल्यांचा खेळ सुरूच होता. यंत्रवत आयुष्य जगत एक एक दिवस ढकलत होते.
ईशाला जाऊन आता जवळपास दीड महिना झाला होता. लहाना मुलगा काही दिवसांसाठी आला होता. तेवढंच मोठा भाऊ आणि वडीलांच्या प्रेमासाठी आसुसलेला. पण त्याच्या कणाकणात आणि मनामनात ती होती. अर्जुनने आयुष्यात खूप काही कमावलं, पण आता ईशाशिवाय सगळं अपूर्ण वाटत होतं आणि आज अचानक हा जुना ट्रंक उघडल्यावर तिचं शेवटचं पत्र सापडलं.
"प्रिय अर्जुन,
"कदाचित तुला आश्चर्य वाटेल. की अचानक हे पत्र वगैरे.... पण मला वाटतं काही भावना शब्दांत उतरायला हव्यात. आपलं प्रेम, आपल्या भावना आणि आता तुला गमावणं माझ्या जगण्याइतकंच अपरिहार्य आहे. पण हे प्रेम कधीच संपणार नाही. जर पुन्हा जन्म मिळाला, तर फक्त तुझीच होईन. आईंची काळजी घे आणि माझ्या दोन्ही चिमण्या पाखरांना जप. जरी ती मोठी झाली असली. तरीही त्यांना माझी आठवण येणारच. पण तू सांभाळून घे. मी कधी पर्यंत तुझ्यासोबत असणार. हे मला माहीत नाही. आत्ता पर्यंत आपला प्रवास सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झाला. पण मला व्यक्त होता आले नाही. आज उगाचच हे नि: श्ब्द प्रेम व्यक्त करत आहे. माझ्या भावना या पत्राद्वारे तुला कळतीलच. का? कुणास ठाऊक ! मला असं वाटतं आहे की यापुढे मी कदाचित तुझ्यासोबत नसणार. तुझा प्रवास तुला एकट्यानेच करावा लागणार. तू मात्र दुःखी होऊ नकोस.
तुझीच
"ईशा"
तुझीच
"ईशा"
त्या पत्रावर तिच्या डोळ्यांचे अश्रू सुकून गेले होते... आणि अर्जुनच्या डोळ्यात आज पुन्हा नव्याने अश्रू ओघळू लागले. हे पत्र का लिहीलं असेल! तिला माहित होतं का आपण दोघं कायमचे दूर होणार म्हणून? का लिहीले आणि कधी लिहीले असेल? तिला काही त्रास होता का? कधीच का बोलली नाही? मी तिला सतत दुखावत होतो का ? माझं प्रेम कुठे कमी पडल का? मुलांचाही विचार तिला आला नसेल का? "
भुतकाळाच्या सावल्या त्याच्या सोबत होत्या. तो त्यात गुंतत होता. आपलं प्रेम ! कधी कधी प्रेम फुलतं, पण एकत्र नसतं येत... आणि विरह हे त्याचं शेवटचं सत्य बनून जातं. तिचं नसणं तो स्वीकारू शकत नव्हता. तिचं नसणं मनाला घटका लावून घेणार होतं. ते अजुनही पुर्णपणे स्वीकारले नव्हते.
ती त्याच्या प्रत्येक क्षणांची सोबती होती. हळुहळु फुललेल्या क्षणांची .... लपून छपून भेटातांनाची ती.... पावसात भिजून ओल्या केसातून उडवणारे थेंब, मायेचा सागर असणारी ती.... फक्त प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघालेली ती.... आज तिचं अस्तित्व या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात , प्रत्येक वस्तूत त्याला जाणवत होतं. तिचे कपडे, तिचे दागिने, स्वतः चेच लावण्य न्याहाळत आरशासमोर बघत बसणारी ती.... ईशा.... स्वतः च्या संसारासाठी राबराब राबणारी.... अचानक त्याने एक हंबरडा फोडला.
तेवढ्यात त्याची आई आणि दोन्ही मुले बाहेर आले. मोठा मुलगा सव्वीस वर्षाचा आणि दुसरा चोवीस. आयुष्याच्या सुखा दुःखाचे चटके सहन करत आत्ता कुठे ते स्थिर झाले होते.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अर्जुनच्या आयुष्याचा नाजूक धागा नियतीने अचानक तोडला होता. ईशाच्या जाण्याने अर्जुनचा आत्मविश्वास आणि आयुष्याचा उत्साह हरवल्यासारखा वाटत होता. त्या शेवटच्या पत्राने त्याला खूप काही सांगितलं होतं, पण काही प्रश्न अनुत्तरितच राहिले होते.
ईशा गेल्यावर अर्जुन स्वतःला पुन्हा सावरत होता. मुलांच्या भविष्याचा विचार करत त्याने आपला सगळा दु:खाचा भार मनातच ठेवला. पण मनाच्या एका कोपऱ्यात ती कायम होती, तिच्या आठवणींनी तो जगत होता. तिचं शेवटचं पत्र त्याच्यासाठी तो फक्त एक कागदाचा तुकडा नव्हता. तर ते त्याच्या आयुष्याचा आधार बनलं होतं. आज त्या ट्रंकमध्ये मिळालेलं पत्र त्याला पुन्हा तिच्या जवळ घेऊन गेलं. तिच्या हस्ताक्षरातील प्रत्येक शब्द, तिच्या भावनांनी भरलेली प्रत्येक ओळ... ती जिवंत असण्याच प्रतिक वाटत होतं. तो पत्रावरून अलगद हात फिरवत तिचा स्पर्श आठवत होता.
" माझी आई असती तर किती बरं झालं असतं," मोठ्या मुलाने हळूच म्हटलं, आणि अर्जुन त्याच्या जवळ गेला. तिघेही एकमेकांच्या गळ्यात पडून रडायला लागले.
"तुमच्या आईचा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी होता. तिचं प्रेम तुम्हाला विसरण्याची परवानगी कधीच नाही. तिला आनंद होईल, जर आयुष्यात तुम्ही तिला अभिमान वाटेल असं काही केलं तर" तो म्हणाला.
"तुमच्या आईचा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी होता. तिचं प्रेम तुम्हाला विसरण्याची परवानगी कधीच नाही. तिला आनंद होईल, जर आयुष्यात तुम्ही तिला अभिमान वाटेल असं काही केलं तर" तो म्हणाला.
संपूर्ण घरभर ईशाचं अस्तित्व होतं. तिच्या आठवणींनी अर्जुनला आज पुन्हा एकदा आठवलं की, ती फक्त दूर गेली होती, पण तिचं प्रेम आणि तिच्या आठवणींनी त्याचं आयुष्य कायमच भरलेलं होतं. "शेवटचं पत्र" पण हे तिचं जाण शेवटचं होत. तर ती तिच्या आठवणींची एक अमूल्य ठेव होती, जी अर्जुनसाठी आयुष्यभर पुरणार होती. खरंतर तिच हे पत्र शेवटचं होत. पण कणाकणात मनामनात ती समोर उभी दिसायची. विरहाच्या पावसात तो चिंब भिजला होता. पण मुलांसमोर दुःख न दाखवता तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी तो मनाने तयार झाला.
©® अश्विनी मिश्रीकोटकर