शेवटचा विसावा

सुधाताईंच्या मना वर झालेला घाव निलिमाच्या व घरच्यांच्या प्रेमळ वागणुकीने हळूहळू भरत गेला. त्या थोडे हसू बोलू लागल्या. तरीही त्या झालेला प्रकार पूर्णपणे विसरू शकत नव्हत्या. ---------------------------------------
शेवटचा विसावा*

दोन वाजले,-- लंच साठी म्हणून नीलिमा खुर्चीतून उठली, तोच मोबाईल वाजला.
नंबर पाहून आश्चर्य करत रिसीव केला हॅलो ---कोण?
मी शोभा साने बोलते,
ओहो -- साने काकू,
मी ऑफिसमध्ये आहे ,काही विशेष?
विशेष तसं नाही ग पण जरा गंभीर बातमी...
"काय काय झाले? आई, अनिल वहिनी सर्व ठीक आहेत ना."..
अगं तुझी आई सुधा येथे माझ्या घरी आहे ती शॉक मध्ये असल्यासारखी झाली आहे. काहीच बोलायच्या मनस्थितीत नाहीये, बहुतेक अनिल चे व सुधा चे काहीतरी वाजले असावे...
निलीमाला घाम फुटला," आईला देता का फोन"...
अग, ती काहीचबोलत नाहीये, तू येऊ शकते कां, म्हणजे येतेस का ?
मी--पाहते प्रयत्न करते म्हणत तिने फोन बंद केला.
आज अचानक डोंबिवली ला जायचे, घरी कळवायला हवे.
अजय टूर वर गेलेले, सासूबाई घरी असतील त्यांना काय सांगावे.

विचार करत करत नीलिमाने आपल्या मुलीला सीमाला फोन लावला व थोडक्यात सर्व सांगितले.
मी उद्या रात्रीपर्यंत परत येते घरी. आजीला नीट सांभाळ. मी पोहोचल्यावर परत फोन करेन.

दुसऱ्या दिवशी ची सुट्टी घेत नीलिमा बाहेर निघाली तेव्हा निघता निघता घड्याळ पाहिले तीन वाजतात आहे म्हणजे साडेतीन चीएक्सप्रेस मिळेल, असा विचार करत ती स्टॅंडवर आ ली.
साडेतीनच्या नाशिक- मुंबई बस मधे बसल्यावर तिने साने काकूंना येत असल्याचा फोन केला.
बस डोंबिवली स्टेशनला पोचली तेव्हा, आठ वाजले होते. निलिमाने बस मधूनच अनिल व वहिनीला क्रमाक्रमाने फोन लावला पण, फोन स्विच ऑफ येत होता त्यावरून त्यांना बोलायचे नाहीये असे लक्षात आले, म्हणून मग ती तडक साने काकूंच्या घरीच पोहोचली.
काकूंनी तिचे हसून स्वागत केले.
"दमली असशील प्रवासाने, व जेवलीही नसशिल ठाउक आहे मला, तेव्हा हातपाय धुऊन जेव मग सावकाश बोलू."
हो" पण आधी आईला पाहू दे..."
दुपारी डॉक्टर ना बोलवलं होतं गोळी देऊन झोपवले आहे.
\" नेमके काय झाले काकू\".
"अगं काल रात्री आम्ही दोघं जेवणा नंतरजरा पाय मोकळे करायला बाहेर निघालो तेव्हा ही बॅग हातात घेऊन जाताना दिसली. मी आश्चर्याने विचारले इतक्या रात्री कुठे? तर म्हणाली पाय नेतील तिकडे."
तिचा चेहरा पाहून मग मी काहीच विचारले नाही व तिला घरी घेऊन आले ,तेव्हापासून अशी काही न बोलता, धक्का बसल्यासारखी झाली आहे.

आईजवळ बिछान्यात पडल्या पडल्या निलीमा च्या डोक्यांत विचार चक्र चालू होते.अनिल आणि वहिनी व आई चे इतके विकोपाचे भांडण व् त्याचे रूपांतरण अशाप्रकारे व्हावे?

बिचारी आई तिला स्वतःच्या इच्छेप्रमाणे कधीच संसार मांडता आला नाही.
निलीमाला आपले बालपण आठवले.
सरिता ताई, निलिमाच्या पाठीवर झालेला ,अनिल उर्फ शेंडेफळ आज्जि, आई सर्वांचाच लाडका.
त्यांचे चाळीतले चार खोल्यांचे घर आईची नगरपालिकेतील नोकरी त्यामुळे तिच्या पायाला सतत चक्री लागलेली. घरी आज्जी होती घरचे सर्व निर्णय आज्जी घेत असे.
सासुबाई सांगत तसे तेवढे सामान आणायचे व घर कामात मदत करायची त्यामुळे घराची सर्व सत्ता आज्जीच्या हातात होती.
त्यामुळे बहुतेक स्वतःचा संसार असूनही आईला स्वतःचे असे अस्तित्वच नव्हते त्यामुळेच घर सजवण्याची तिची
हौस त्या वयात मारली गेली असावी .

पुढे आज्जी गेल्यावरही तिघा मुलांचे शिक्षण ,मुलींची लग्न यापुढे हौस करण्यासाठी पैसाही कुठे होता.
विचार करता करता निलीमाचा डोळा लागला.

सकाळी आईच्या कण्हण्याच्या आवाजाने जाग आली.
"आई -आई "आवाज देत नीलिमाने आईला बसत केल.
साने काकूंकडून चहा नाश्ता करून, आईला घेत ती बस मध्ये बसली.
बस नाशिक कडे निघाली.निलीमा ला पूर्वीचे सारे आठवले
अनिल तिचा भाऊ ,आज्जी आईचा लाडका , अभ्यासात बेताचाच त्यामुळे नोकरीही साधारण व अनुषंगाने पगारही बेताचा.
अनिल चे लग्न ठरले, घर लहान वाटू लागणे त्यामुळे दोन बीएचके फ्लॅट साठी पैसे साठवणे सुरू झाले.
आई व बाबा दोघंही रिटायर्ड झाले तेव्हा एकदम मिळालेल्या पैशातून फ्लॅट घ्यायचेठरले.
वहिनी या नव्या घराचे माप ओलांडून घरी आली. आई खूपच उत्साहात होती.. नवे घर नव्या तऱ्हेने सजवायचे ,खूप पूर्वी मनात साठवलेले स्वयंपाक घराचे स्वरूप तिला आता मूर्त स्वरूपात आणायचे होते...
.पण तिचे ते स्वप्नातले चित्र आणि वहिनी च्या इच्छेचे मॉड्यूलर किचन यात कुठेच साम्य नव्हते आईच्या कल्पनाही तिच्याच प्रमाणे जुन्या पद्धतीच्या होत्या.
वहिनीला वाटे संसार माझा, मी माझ्या पद्धतीने करेन ,त्यामुळे होणारे छोटे छोटे वाद हळूहळू वाढू लागले.
तशातच भर, बाबा अचानक हार्टफेल ने गेले.….

बाबांच्या आठवणीने निलीमाचे डोळे भरून आले. आईची नजर चुकवत तिने डोळे पुसत घड्याळात पाहिले नाशिक आलेले, बस स्टॅन्ड ला अजय गाडी घेऊन आले होते.

घरी पोहोचताच सर्वांनी तिच्या आईचे स्वागत केले ते पाहून नीलिमा सुखावली.

हळूहळू आई नीलिमा च्या घरात रुळत होती तरी मधून मधून ती डिप्रेशनमध्ये जात असे, तिचे औषध पाणी तिचा मूड संभाळणे म्हणजे तारेवरची कसरत होती.
. हळूहळू आईने झालेला प्रकार सांगितला.
बाबा गेल्यावर अनिल ने सर्व पैसा व घर स्वतःच्या नांवे केले आईनेही मोठ्या विश्वासाने व प्रेमाने दिले, तिलाही जबाबदारी नको होती. स्वतः जवळचे दागिनेही तिने वहिनीला या न त्या कारणाने दिले.

वहिनी नोकरी करत असल्याने घर व दीपा व दिनेश अनिल ची मुले आईच संभाळत असे.
त्यामुळे घर काम व जवाबदारी तर आईची पण हक्क मात्र सर्व वहिनी कडे होते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईला वहिनी ला विचारावे लागे. ह्या अशा दुहेरी त्रासाने आईचा तोल सुटत चालला होता...
निलीमा ला आठवले,,-- मागे फोनवर बोलताना अनिल, आईची तक्रार करत होता पण तेव्हा नीलिमा ने त्याला आईला सांभाळून घे असे प्रेमाने समजावले ,पण त्या गोष्टीचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी आई व बायको या दुहेरी भांडणातून संतापाच्या भरात त्याने आईला घराबाहेर काढले. सांगता सांगता सुधाताई रडू लागल्या .
नीलिमा विचार करत होती, तीही नोकरी करणारी, घर सासुबाई सांभाळत असल्याने निलीमाला नोकरी करणे फारसे जड जात नसे. तिच्यामध्ये व सासुबाई मध्ये खूपअण्डरस्टॅण्डिंग होते.
ऑफिस मध्ये मैत्रिणी बऱ्याच वेळा निलीमाची थट्टा करत-- "तुझी नि अजयची पत्रिका मॅच केली की तुझी नि सासुबाईंची" म्हणूनच तुझे नि त्यांचे एवढे पटते खरेतर नीलिमा त्यांच्या कामात फारशी ढवळाढवळ करत नसे. त्यांचे घर सांभाळणे तिच्या सोयीचे होते. मुळातच तिचा स्वभाव साधा सरळ असल्याने तिने सर्व आनंदाने स्वीकारले. सासुबाई मोकळ्या स्वभावाच्या असल्यामुळे सर्व बाबतीत तिचे मत विचारत त्यामुळे नीलिमा चा संसार सुखाचा होता. पण --तशाच परिस्थितीत असलेली तिची आई, भाऊ, वहिनी यांची ही अशी तऱ्हा.
नीलिमा पूर्ववत नोकरीवर जाऊ लागली खरी पण मधून मधून एखादा घरी फोन करत असे. सासूबाई घरी असायच्या, त्याही आईची समजूत काढत असत"लेकीचे व जावयाचे घर हीआपलेच, जावई देखील मुलगाच असतो हो"
एकदा सरिता ताईचा फोन येऊन गेला, ती दूर परदेशी मुलांकडे असल्याने आईला तिच्याकडे जाणे किंवा तिला स्वतः भेटायला येणे शक्य नव्हते .
अनिल ने तर एकदाही फोन करून विचारपूस केली नाही. नीलिमा ने ही मग त्याचा विचार सोडून दिला.
सुधाताईंच्या मना वर झालेला घाव निलिमाच्या व घरच्यांच्या प्रेमळ वागणुकीने हळूहळू भरत गेला. त्या थोडे हसू बोलू लागल्या. तरीही त्या झालेला प्रकार पूर्णपणे विसरू शकत नव्हत्या.
मुलगा असून ही मुलीकडे राहावे लागते व त्याहीपेक्षा पोटच्या पोराने घराबाहेर काढावे याचा धक्का त्यांच्या मनात खोल वर बसला. त्यातून त्या सावरू शकल्या नाही...
कोण चूक आणि कोण बरोबर?
आई गेल्याचे निलिमाने अनिल ला कळवले नाही, काय संबंध त्याचा? आई चे शेवटचे क्रियाकर्म ही तिनेच केले.
"मुलगी हे परक्याचे धन व मुलगा हा वंशाचा दिवा, असे म्हणणाऱ्या या समाजासमोर तिने मुलगी ही "शीतल छाया" व. "शेवटचा विसावा" हा नवा संदेश तिने समाजाला दिला

लेखन. सौ.प्रतिभा परांजपे

---------------------------------------