Login

शेवट ... न होऊन दिलेला ..! ......नैराश्य आणि त्यावर मी केलेली मात ...

Blog on Depression

        नैराश्य … ( depression ).. हा शब्दचं  इतका भयानक वाटतो , ऐकायलाही आणि बोलायलाही ..

      आणि त्यापेक्षा जास्त जर ही अवस्था कोणाच्या आयुष्यात आली असेल . कारण जर मनोधैर्य खंबीर असेल तरचं यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडतो , नाहीतर दुर्दैवी शेवट नक्कीच …

           खरंतर आजच्या काळात प्रत्येकजण नैराश्याने ग्रासलेला आहे . जीवन जगण्यासाठी करावी लागणारी अतोनात धडपड , कौटुंबिक कोलाहल , सांसारिक अस्थिरता , नोकरी , शिक्षण , राहणीमान , स्टेटस , आजारपण ...अशा कितीतरी गोष्टी आहेत …  ज्यात प्रत्येकाला यश येईल असेच नाही … प्रत्येकाचा संसार सुखाचा होईल असेच नाही ...प्रत्येक वेळी सुखी असू असेच नाही …  सुखाबरोबर पदरी आलेलं दुःख पचवण्याची क्षमता ज्यात आहे तोच खरा या नैराश्य सारख्या जीवघेण्या आजारातून बाहेर पडू शकतो … नाहीतर मग स्वतः च  स्वतःला मानसिक  त्रास देणं , स्वतःला कमी लेखन , जगण्याची उमेद संपवन ...असं काहीतरी मनात विचारचक्र सुरू होतं ...नि हे सर्व एका परिघाच्या बाहेर गेलं की मग स्वतःला स्वतःच आत्महत्येद्वारे संपवण असे प्रकार घडून येतात …      

        यासाठी मुळात स्वतःवर , स्वतःच्या मनावर खुप ताबा असायला हवा ..

      "नाही , हे मी नाहीच करणार " काही फरक पडत नाही या गोष्टीचा मला "

      मी बरोबर आहे ना ..! मग तुम्ही काहिही बोला . मी जशी / जसा आहे तशीच / तसाच राहणार ...तुमच्या बोलण्याने मी स्वतःला नाही बदलू शकत . 

      खरंतर अशी जर आपली वागण्याची वृत्ती ठाम असेल तर नैराश्यचं काय, इतर दुसरा कोणताही आजार .. किंवा कोणताही बिकट प्रसंग जरी आपल्यावर कोसळला तरी कोणीही आपलं काही बिघडू शकत नाही …

      मी हे सगळं लिहितेय म्हणजे … मी स्वतः ही खूपदा यातून गेलेली आहे ...मीचं काय प्रत्येक एक जण केव्हा केव्हा परिस्थिती पुढे एवढा हतबल होतो ...की शेवटी जगण्याचा शेवट करणे हाच पर्याय उरतो ...पण शांत डोक्याने विचार केला तर यातूनही मार्ग निघतो …

         संसार , परिवार , कुटुंब , म्हणलं की त्यात पारिवारिक समस्या आल्याच , त्या कोणालाही चुकल्या नाहीत . नसतील ...आणि लग्न झालेल्या मुलीसाठी , स्त्रीसाठी म्हणजे ही जन्मा जन्माची होरपळ म्हणला तरी चालेल … एखादी असेलच अशी जिला सासरी , माहेरचं सुख मिळालं असेल .. किंवा आयुष्यात केव्हाच त्रासदायक गोष्टींना समोरं जावं लागलं नसेल ...पण प्रत्येकीचं नशीब एवढं सुखी असतंच असं नाही ..

     माझ्याही कौटुंबिक आयुष्यात खुप साऱ्या समस्या आल्या … कौटुंबिक वाद ,  विचारांची तफावत ...पण यातून मी खुपदा स्वतःला सावरलं … खुपदा रडून समजावलं ..रात्र रात्र जागून काढल्या ...पण मनात केव्हा हे येऊ दिलं नाही ..की बस हे मला आता सहन नाही होतं …  मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले .. ' ठीक आहे ' , आता मी त्रासात आहे ना , काही होत नाही … परिस्थिती हिचं राहणार नाही , वेळ बदलते … देवालाही परिस्तिथी नुसार बदलावं लागलं होतं ..मग आपण तर अगदी सामान्य ..  

    तो आहे ना , बघतोय तो ...तोच करेल सर्व ठीक … प्रत्येकवेळी आशादायी ठेवलं स्वतःला …

     कारण माहित होतं , जर मी माझ्या मनात नैराश्याला येऊन दिलं , किंवा त्याचा विचार केला .. तर मी त्याच्या आहारी जाणार , आणि त्याचा परिणाम मला माहित आहे … काय होतो , काय असतो .. कारण मला खुप जगायचं आहे , इतक्यात आयुष्याचा शेवट नाही करायचा ..

     नैराश्य आणि आत्महत्या हे दोन शब्द असे आहेत जे मी माझ्या मनातल्या शब्दकोशातून केव्हांच बाहेर काढले आहेत , त्यांना कधीच मनात येऊ देत नाही , ना की , माझ्यावर त्यांना ताबा मिळवून देईन …

     पण ,एवढं सगळं बोलणारी मी मात्र एका गोष्टीपुढे हतबल झाले …  एवढी हतबल की शेवटी वाटलं बस झालं आता , सहन होण्यापलीकडंच आहे हे सगळं … मारावी गच्चीवरून उडी खाली नि संपवावं सगळं …     

     पण म्हणतात ना आपल्या अवतीभोवती काही सकारात्मक ऊर्जा अशा असतात , ज्या कळत नकळत आपल्याला काही अनिष्ठ घडण्यापासून , करण्यापासून परावृत्त करतात … मग ते आपलं नशीब असो , किंवा आपल्याशी आयुष्यभरासाठी जोडली गेलेली आपली माणसं असो…  

     उन्हाळ्याचे दिवस होते ,  सूर्य जरी मावळतीस गेला तरी वातावरणातील उष्णतेचा पारा कमी होण्याचं नाव घेत नव्हता ..  तसही इकडे हरयाणात सहा महिने उन्हाळा , सहा महिने हिवाळा .. पावसाळा नाहीचं .. त्याची मर्जी केव्हा मनाला वाटेल तेव्हा पडणार .. मग या गर्मी पासून सुटकेसाठी त्याची वाट बघणं ही निरर्थक ...आणि लाइटचं लोडशेडिंग हे खासकरून उन्हाळ्यातचं असते ते कोणाला वेगळं सांगायला नको .. इन्व्हर्टर ही चालून चालून दमलेलं … रात्रीच्या एक दोनच्या सुमारास ते ही बंद पडलं ...हवेची एक झुळूक देखील आमची जणू परीक्षा बघत होती …

     आमच्या ह्यांना आधीच हवेशिवाय झोप लागत नाही . जर यांना मी मुभा दिली ना तर अगदी पावसाळ्यातही फुल्ल स्पीड मध्ये फॅन नी कुलर लावून झोपतील … ( AC नाही बरं का अजून आमच्याकडे ???? ) 

       तर मग झालं असं लाइट गेली नि यांना जाग आली , दोन्ही मुलीही उठल्या .. छोटी लहान होती तेव्हा ...आठ एक महिन्याची असेल .. मला म्हणले दरवाजा उघड , लाइट येईपर्यंत ...तेवढंच वार येईल आत ..,तसं मला काही सोयरसुतक नाही बघा लाइट गेली , आली तरी ..

    आदिवासी जमात … कुलर , पंखा काही काही लागत नाही मला .. त्यामुळे लाइट गेली तरी मला फारसा फरक नव्हता पडला .. पण हे म्हणतायत म्हणल्यावर  मी नाही देखील म्हणू शकत नव्हते … उठले दरवाजा उघडला , झोपेत होते .. दरवाजा उघडला ..नी दरवाज्याजवळच बेडवर झोपले …   वार तर आत आलं नाही पण सावजाच्या शोधात असलेला एक मच्छर मात्र कडकडून चावून गेला ..

     रागाने उठले नि त्या मच्छरला शिव्यांची लाखोली वाहिली ...अर्धी यांना , दरवाजा उघडायला लावला म्हणून  नि अर्धी त्या मच्छरला , चावून गेला म्हणून , झोपमोड झाली ना त्यामुळे …असे एवढे मच्छर चावून जातील , काही वाटत नाही पण तो मच्छर चावलेला कळला मला ..असा कळला .. की दुसऱ्या दिवशी .. उलट्या , कणकणी , ताप … 

      बिल्कुल कसाचं चैन पडेना … घराशेजारी असलेल्या डॉक्टर ला दाखवलं … गुन काही आला नाही .. शेवटी स्पेशालिस्ट कडे गेले .. कारण ताप कमी होत नव्हता .. त्याने रक्त ,लघवी चेक करायला सांगितले .. रिपोर्ट संध्याकाळी येणार होते ...मच्छर चावल्यावर लगेच आलेला ताप ,त्यामुळे नक्कीच काहीतरी लागण असणार ,हे निदान माझ्या मनात तरी नक्की झालं …   

      रिपोर्ट आले , "मलेरिया " … वा वा .. ऐकल्यावर वाटलं त्या मच्छराची आरती करावी आता .. बाबा मीच दिसले का तुला चावायला.. पण एक बरं वाटलं पोरींना चावला नाही ते ..

      आपण काय कसंही सहन करू वो ...पण त्या लहानग्या पोरांचं काय …

     मागे सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक मतभेद..  नवीन लग्न झालेलं .. समजून घेणारं कोणी नाही ...मग मी जेवण कमी केलं , राग कुठे काढायचा म्हणून उपवास सुरू केले … एकादशी निर्जली केल्या … त्याचा परिणाम असा झाला .. अशी आजारी पडले ,सहा महिने अंथरुणातून उठले नाही… आणि त्याचा पुढे परिणाम असा झाला … शरीर खुप अशक्त झाले …  आणि सारखी आजारी पडू लागले . अगदी गार वारं लागलं तरी... … आणि त्याचा परिणाम असा झाला … मलेरिया ने जीव काढला माझा… दोन्ही बाळंतपणात जीवघेण्या कळा सोसून पोरींना जन्म देणारी मी मलेरिया पुढे हतबल झाले … आजाराने खचलेली मी … या आजारात पुरती कोलमडून गेले …

     पोरगी लहान तिला चमच्याने भरवावं लागायचं … दोन दिवस आड डॉक्टर कडे जायचे मी ...कारण मलेरिया ची लक्षण जीवघेणी असतात … माझी सुधारणा किती होतेय हे बघून डॉक्टर औषध द्यायचे .. काही खाल्लेलं पचायचं नाही … पाणी पिलं तरी नाका तोंडातून बाहेर यायचं..  आठवडा गेला ...तरी मी ठीक होईना … पोरीला उठून चमच्याने दूध पाजयचाही त्राण नव्हता अंगात …

    अंदाजे संध्याकाळचे चार वाजले असतील ... पोरी बाहेत खेळत होत्या … सर्व शरीर जड झाल्यासारखं वाटत होत .. खोलीत सगळीकडे अंधार ...वरती फॅन चालू होता … जीव गेल्यासारखं वाटत होतं ...श्वास घ्यायला येत नव्हता …. गुदमरल्यासारखं होतं होत … काही समजत नव्हतं काय करू .. मागचा एक आठवडा हिचं अवस्था होती .. एवढी वैतागले त्या दिवशी, डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं ...दुखणं सोसत नव्हतं ...शेवटी सरळ खोलीतून बाहेर येऊन खाली उडी मारावी हा विचार मनात आला ...बाहेर जाणार तेवढ्यात यांचा फोन आला ...रिंग वाजत होती … डोळ्यातून पाण्याच्या गरम धारा चालूच होत्या . फोन उचलण्याची देखील ताकद नव्हती अंगात …

    एकदा वाजला , दोनदा वाजला , तीनदा वाजला ...चौथ्यांदा मी फोन उचलला ...तिकडून आवाज आला ...मी घरी येणारेय … ज्यूस घेऊन येऊ का येताना ? कोणता आणू ? 

    फोन चालूचं होता .. मी रडत होते … कोणताही आना म्हणलं नि फोन खाली ठेवला ...अगदी पाच मिनिटातच हे घरात आले , फोन ज्यूस च्या दुकानापासूनच केला होता त्यामुळे …

      खुप रडले , खुप रडले ...यांच्याजवळ … यांनी विचारलं नाही का रडतेयस ...पण मला माहित होतं ..त्यांना जाणवत असेल मी किती त्रासात आहे … जास्त विचारपूस करत नाहीत पण मनातून खुप हळवे आहेत..… 

     अशाप्रकारे ते आठ दिवस अक्षरशः माझं मरण घेऊन आले होते .. पण मागे लिहिल्या प्रमाणे काही सकारात्मक गोष्टी आपल्या जवळ असतात अशा , जे आपल्याला अनिष्ट करण्यापासून प्रवृत्त करतात … आणि ते " हे " माझे मिस्टर होते माझ्यासाठी … 

    तेव्हापासून केव्हाही आजारी पडले , बर वाटत नसेल तर यांना फोन लावते नि रडत रडत सांगते बर नाही वाटत म्हणून .. रागाने हे फोन ठेवतात … पण पुढच्या अर्ध्या तासात घरी असतात …

    कोणाचं दुखणं यांना पटत नाही , माणसाने कसं सदृढ रहावं असं मत यांचं … पण मी मुद्दामहून तर आजारी नाही ना पडतं .. घरी येतात , ओरडतात …डॉक्टर कडे जायला येतं नाही का म्हणतात नी नाही नाही म्हणत डॉक्टर कडे घेऊन जातात …

      काहीही होऊद्या , कितीही संकटं , अडचणी , आजार येऊद्या … रडा , खुप रडा ...त्रागा करून घ्या …  पण मन मोकळं करा जवळच्या व्यक्तीला सांगा … रडत रडत का होईना … पण मनात ठेवू नका … हाच एकमेव पर्याय  आहे .. उरलेलं आयुष्य जगायचं असेल तर … 

   कारण , " आयुष्य सुंदर आहे , एकदाचं मिळतं, जगूण घ्या  "… 


 

        © vaishu patil …