शेतकरी मराठी निबंध (Shetkari Marathi Essay)

Essay About Farmer In Marathi
शेतकरी हा ग्राम विकास तसेच एकंदरीत संपूर्ण विकासाचा कणा आहे. शेती करणारा म्हणजे शेतकरी होय. प्रत्यक्ष जो जमीन कसून त्यातून पीक घेतो तो शेतकरी. शेतकरी शेतात पिके घेऊन स्वतःची उपजीविका करतो. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. शेतकरी जेव्हा पीक घेतो तेव्हाच संपूर्ण जगाला खायला अन्न मिळते.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात पूर्वीपासूनच शेती मुबलक प्रमाणात केली जाते. भारतातील अर्थव्यवस्था जास्तीतजास्त शेतीवर अवलंबून आहे. २०२० - २०२१ नुसार GDP मध्ये शेतीचे योगदान जवळजवळ १७% इतके आहे. शेती हे विकासाचे महत्त्वाचे चाक आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ हे सर्व फक्त शेतीतून मिळते आणि शेतकरी हाच हे सगळं संपूर्ण जगाला उपलब्ध करून देतो. शेतकरी आहे म्हणूनच संपूर्ण जगाला दोन वेळचे पोटभर अन्न मिळते. ऊन, वारा, थंडी, पाऊस या कशाचीच पर्वा न करता दिवसरात्र, बारा महिने तो शेतात काम करत असतो. प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढतो पण आपल्या कर्तव्याला कधीच मुकत नाही म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात.

विश्व कितीही पुढे गेले तरीही अन्नाची जागा पैसा किंवा समाजातील प्रतिष्ठा घेऊ शकत नाही. माणूस कितीही श्रीमंत असला तरीही त्याला अगदी सोन्याच्या ताटात सुद्धा अन्नच लागणार. यावरून आपल्याला अंदाज येऊच शकतो कोणत्याही क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरीही शेती आणि शेती घडवणारा शेतकरी हाच तारणहार आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आणि महाराष्ट्र राज्य हे कृषिप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यापूर्वी भारताला जास्तीत जास्त अन्न धान्यांची आयात करावी लागायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला आणि भारतात शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ मिळून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. याच महाराष्ट्रातून देशाला पहिले शेतकरी मुख्यमंत्री वसंतराव नाईक मिळाले. वसंतराव नाईक हे एक प्रगतिशील आणि हाडाचे शेतकरी होते. भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान हा त्यांनाच मिळाला. त्यांच्या शेतीविषयक धोरणामुळे त्यावेळी महाराष्ट्राला पावन पर्व पाहायला मिळाले. वसंतराव नाईक हे शेतकरी कल्याणकारी धोरणांचे महामेरू म्हणून ओळखले जात असले तरीही गोरगरीब शेतकरी त्यांना शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून ओळखतात. वसंतराव नाईक यांची जयंती सर्वत्र "कृषी दिन" म्हणून साजरी केली जाते.

शेतीचा उगम हा पुरातन काळापासून झाला आहे. आदिमानवाच्या विचार प्रक्रियेतून आणि स्त्रियांच्या लागवड तंत्रातून शेती विकसित झाली. मान्सूनवर आधारित शेती ही नैसर्गिक जीवनपद्धती आहे. भारतातील शेती ही मान्सूनवरच अवलंबून आहे. वेगवेगळ्या ऋतुमानानुसार भारतात खरीप, रब्बी असे प्रकार पडतात.

शेती करताना शेतकऱ्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी पडणारा अवकाळी पाऊस, वादळ, कोरडा किंवा ओला दुष्काळ, अचानक आलेली पूर स्थिती यामुळे शेतकऱ्याने कष्टाने जी लागवड केलेली असते ती तर जातेच त्याचबरोबर त्याचे आर्थिक तसेच वेळेचे नुकसान देखील होते. शेतकरी आणि त्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून असते आणि अश्या संकटामुळे त्यांच्यावर उपासमारीची तसेच कर्जाच्या विळख्यात अजूनच आवळले जाण्याची वेळ येते. बाजारात होणाऱ्या शेतमालाच्या किमतींमध्ये होणारी घसरण देखील शेतकऱ्याचे मोठे नुकसान करते. त्याचबरोबर तयार अन्नधान्य साठवण्यासाठी योग्य सोय नसणे, निर्यातीच्या नियमांमध्ये होणारे बदल, हमीभाव, सरकारी योजनांची माहिती नसणे किंवा त्या योग्य व्यक्तींपर्यंत न पोहोचणे, भ्रष्टाचार यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

शेती करण्यासाठी शेतकऱ्याकडे सुपीक जमीन, पाणी पुरवठा आणि काही प्राथमिक गरजेच्या गोष्टींची गरज असते पण यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे धैर्य आणि कष्ट करण्याची वृत्ती. जर निसर्गाची कृपा असेल आणि या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर शेतकऱ्याचा मोठा फायदा होतो त्याच बरोबर समजाचा देखील फायदा होतो. शेतीत मुबलक पीक तयार झाले तर महागाईची झळ कोणालाही बसत नाही. शेतकऱ्याकडे मनुष्यबळ उपलब्ध असेल तर शेतीची निगा आणि इतर गोष्टी करण्यात त्याला खूप मोठी मदत मिळते. सगळं जुळून आलं तर योग्य बाजारपेठ मिळाल्यावर शेतकऱ्याचे भांडवल सुटून त्याला नफा होतो. जगातील सगळेच उद्योगधंदे आणि क्षेत्रे कळत नकळत शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे आपण शेतीचा आणि शेतकऱ्याचा मान हा ठेवलाच पाहिजे.

शेतात शेतकऱ्या सोबत बैल देखील राबत असतात. शेतकऱ्याचे ते मित्र आहेत. बैल नांगराला जुंपून जमीन नांगरली जाते. आत्ताच्या काळात ट्रॅक्टर वापरले जात असले तरीही बैल आणि नांगर घेऊन शेती करणारे शेतकरी देखील आहेत. त्यानंतर शेतकऱ्याचा खास मित्र म्हणजे गांडूळ. गांडूळ शेतातील जमीन भुसभुशीत करायला मदत करतो. त्याच प्रमाणे गांडूळ खत निर्मितीमुळे पिकांची वाढ देखील छान होते. यानंतर नंबर येतो कोंबड्या, गाय, साप, मधमाश्या, फुलपाखरे, म्हशी, शेळ्या यांचा. यामुळे शेतकऱ्याला शेतीसोबतच एक जोडधंदा करता येतो.

शेतातील अन्नधान्य फस्त करून टाकण्यात सगळ्या पक्ष्यांचा हात असतो अशी एक समजूत आहे पण हा एक निव्वळ गैरसमज आहे. काही पक्षी पिकांची काढणी झाल्यावर शेतात सांडलेले दाणे टिपतात. निसर्ग साखळी मध्ये पक्ष्यांना कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे नियंत्रण म्हणून विशेष स्थान आहे. याचे एक उदाहरण म्हणजे चीनमध्ये काही वर्षांपूर्वी चिमण्यांची कत्तल करण्यात आली होती आणि त्यामुळे तिथे चिमण्या शिल्लकच राहिल्या नाहीत. याचा परिणाम तिथल्या शेतीवर होऊ लागला परिणामी चीनला रशियातून चिमण्यांची आयात करावी लागली.

आजचा शेतकरी हा परंपरा आणि आधुनिकीकरण यांचा समतोल राखून शेती करत आहे. आजच्या युगात बदलेले तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या फायद्याचे ठरत आहे. आधुनिक काळात शेतकऱ्याला सगळ्या जगाची बाजारपेठ खुली झाली आहे आणि म्हणूनच तो आपला माल देश विदेशात विकू शकतो. शेती विषयक शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण घटू शकते. शेतीकडे करिअरच्या दृष्टीने न बघणारे लोक आता विकसित तंत्रज्ञानामुळे शेतीला महत्त्व देत आहेत. कोरोना महामारी नंतर बऱ्याच जणांना शेतीचे महत्त्व समजल्याने आता शेतीकडे देखील करिअरच्या दृष्टीने लोक बघत आहेत. शेतातून करता येणाऱ्या जोड धंद्यातून शेतकऱ्यांना नफा मिळून त्यांना थोडाफार हातभार मिळू शकतो. आजचा शेतकरी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून थेट शेतातून त्यांचा माल योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्या असणारा मध्यस्त नाहीसा झाल्याने ग्राहक व शेतकरी या दोघांनाही त्याचा फायदा मिळत आहे.

थेट शेतातून माल मिळत असल्याने ग्राहकही भेसळ मुक्त अन्न धान्य आणि भाज्यांचा आस्वाद घेत आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना हाच त्यांचा माल कोणत्याही परिस्थितीत मध्यस्ताला विकावा लागत आणि योग्य भावही त्याला येत नसे परंतु आता ही परिस्थिती बदलली आहे. एवढेच नव्हे तर मृदा परीक्षण, योग्य बियाणांची निवड, पिकांना योग्य असे कृत्रिम वातावरण निर्मिती तंत्र यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे. आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढवण्यावर शेतकरी भर देत आहेत त्याचा फायदा इतर लहान शेतकऱ्यांना देखील मिळत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या कल्पकतेतून शेतात चांगले पीक तयार झाले तर त्याचे अनुकरण करून इतर शेतकरी देखील त्याचा फायदा करून घेत आहेत.

शेतकऱ्याला योग्य सोयीसुविधा आणि योग्य मार्गदर्शन लाभले तर शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटना नक्कीच कमी होतील. लहान शेतकऱ्याला योग्य सिंचन पद्धती, चांगल्या दर्जाचे बियाणे, सेंद्रिय खते आणि कीटकनाशके या सर्वांची गरज आपले उत्पादन अधिक वाढवण्यासाठी लागते. यासाठी ते बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेतात.

एवढे सगळे करून त्यांना उत्पादन कसे मिळेल याची हमी नसते. जर नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्यांची ही सगळी मेहनत वाया जाते आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. उत्पन्न झालेले नसतानाही कर्जाचे हप्ते आणि इतर खर्च हे आ वासून उभे असतातच. अश्या वेळी सरकारी मदतच शेतकऱ्यांच्या कामी येते पण त्यालाही कित्येकदा उशीर झालेला असतो. सरकारच्या कर्जमाफी योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरीही अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती मदत पोहोचलेली नाही.