शेलारमॅडम
हागवणे सामाजिक शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम चालू होता. एका मोठ्या आलिशान लॉन असलेल्या हॉलमध्ये संस्थेच्या अंतर्गत असलेल्या शाळांचे शिक्षक शिक्षिका स्नॅक्स आणि सॉफ्ट ड्रिंकचा आनंद घेण्यात मग्न होते. गप्पागोष्टी, चेष्टा मस्करी चालू होत्या. शेलारमॅडम आणि त्यांचे कलिग चव्हाणसर कोणे एकेकाळी म्हणजे सुमारे १० वर्षांपूर्वी एकाच शाळेवर शिकवायला होते. खूप वर्षांनी त्यांची भेट होत होती. शेलार मॅडम म्हणजे अगदी मनमोकळं आणि गडगडाटी व्यक्तिमत्व. शरीराचा तर फुगाच झाला होता. कुणाला सहज थाप मारली, तरी समोरचा एक दोन पावलं भेलकांडलाच म्हणून समजा. आणि चुकून जर धक्का लागला तर बोलायलाच नको. कुणाच्या बोलण्यातून कोणत्या शब्दावर कोटी करतील याचा काही नेम नाही. त्यामुळे त्यांच्याशी बोलायचं म्हणजे 'ये रे बैला आणि घे शिंगावर' अशीच गत व्हायची. चव्हाण सरांनी शेलार मॅडमला पाहिलं आणि त्यांच्या जवळ गेले.
"काय मॅडम कशा आहात?"
"अरे वाह. चव्हाण सर...! खूप वर्षांनी...!"
"हं... हं... हं... हं..."
गालावर स्मित हास्य झळकवत चव्हाण सर म्हणाले,
"तुम्ही काय बॉ... आता संस्थेत पदाधिकारी झालेत. आमचं आपलं चाललंय..."
"तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक आहे बघा.", म्हणत शेला बाईंनी त्यांच्या पाठीवर थाप मारली. हातातल्या ग्लासातलं स्प्राईट भूकंप झाल्यासारखं ग्लासातून उचंबळून बाहेर आलं. चव्हाण सरांनी कसं बस स्वतःला सावरलं. म्हणाले,
"बरं... तुमच्या घरचे कसे आहेत? मिस्टर कसे आहेत? आणि आपली मुलं वगैरे...?"
लडिवाळ स्वरात आणि सुर लावत शेलार बाई म्हणाल्या,
"आमच्या घरचे आणि मिस्टर सगळे एकदम छान आहेत. पण मुलं आपली नाहीत हं... ती आमची म्हणजे माझी आणि माझ्या मिस्टरांची आहेत बरं."
बोलता बोलता चुकून आपण तुमची म्हणायच्या ऐवजी आपली मुलं म्हणालो, हे नंतर चव्हाण सरांच्या लक्षात आलं. तोवर आजूबाजूला जमलेली मंडळी खदखदून हसत होती. शेलार बाईंच्या अशा विनोदी नी मिश्किल स्वभावामुळे नेहमीच हशा पिकायचा. पण समोरच्याची चांगलीच गोची व्हायची. चव्हाण सरांनी गुपचूप तिथून काढता पाय घेतला. न जाणे पुढचा बॉम्ब आणखी मोठा असायचा!
खूप वर्षांनी भेटल्यामुळे शिक्षक शिक्षिका यांच्या जुन्या गप्पाटप्पा चालू होत्या. देशपांडेमॅडमची मुलगी नुकतंच एमबीए पूर्ण करून एका बँकेत सहा महिन्यांपासून कामावर रुजू झाली होती. लाडाकोडात वाढलेली, हायफाय राहणीमान नि बोलायला चांगलीच फटकळ होती. देशपांडेमॅडम मोठेपणाचा आव आणण्यासाठी तिला मुद्दाम घेऊन आल्या होत्या. भेटेल त्याला मुलीचं भरभरून कौतुक बोलून दाखवत होत्या. एका गोलाकार टेबलाभोवती कुदळेमॅडम, देशपांडेमॅडम, त्यांची मुलगी, शेलारमॅडम आणखी एक दोन शिक्षक जेवत बसले होते. जेवता जेवता चेष्टा मस्करी चालली होती.
कुदळेमॅडम देशपांडेमॅडमच्या मुलीला म्हणाल्या,
"काय गं? कसं चाललंय बॅंकेतलं काम?"
ती जरा तोऱ्यातच म्हणाली, "हं... काही नाही. खूप स्ट्रेसचं काम असतं."
"हम... मग लग्नाचं वगैरे काही?"
"तुम्हाला काय करायचंय माझ्या लग्नाचं?", फटकन ती बोलून गेली.
तिच्या अशा बोलण्याने कुदळेमॅडम चांगल्याच वरमल्या. उगाच आपण बोललो म्हणून त्यांना जरा वाईटच वाटलं. देशपांडेमॅडमनी ऐकून न ऐकल्यासारखं करत कुणाला काहीतरी आणायला सांगितलं. पण शेलारमॅडमचं चांगलंच लक्ष होतं. वातावरण निवळण्यासाठी मध्येच त्या म्हणाला,
"बरं... ते जाऊदे... मला सांग. पुढे काय करायचं ठरवलं आहेस? म्हणजे जॉब, करियर वगैरे?"
"विशेष काही नाही. पण आईसारखं बनायचंय मला. याच फिल्ड मध्ये करियर करायचं कि नाही? अजून ठरवलं नाही, पण आणखी शिकायचं आहे. लग्नाचा आताच काही विचार नाही."
"वाह खूप छान... फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर म्हणजे झालं."
आजूबाजूला उभ्या असलेल्या शिक्षिका शेलारमॅडमचा टोमणा ऐकून तोंड दाबून हसत होत्या. तर हसू आवरेना म्हणून कुदळेमॅडमनी शेलारमॅडमच्या पाठीवर हळूच थाप मारली. आणि प्लेट उचलून काहीतरी आणायचं नाटक करत तिथून सटकल्या. देशपांडेमॅडम आणि त्यांच्या मुलीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.
कार्यक्रम संपवून शेलारमॅडम नुकत्याच घरात येऊन टेकल्या. मोलकरणीने चहा पाणी आणून दिलं. गॅलरी मध्ये मिस्टर शेलार चहा घेत पेपर चाळत बसले होते. शाळेतून आल्यापासून शेलारमॅडमच्या मुलाची धुसफूस चालू होती.
"मम्मे... शाळेतल्या पॅरेंट मीटिंग साठी तुला आणि पप्पांना उद्या शाळेत बोलावलंय."
"हं... ठीक आहे. मी येईन उद्या."
"तू एकटी नकोय. पप्पा पण हवेत. टीचरने स्ट्रीक्टली सांगितलंय तसं."
"हमम... तरीही मीच येणार पप्पा नाही येणार."
"का गं...? सारखं सारखं तूच येत असते? टीचर म्हणाल्या या वेळी पप्पांना घेऊन यावं लागेल."
"का म्हणजे? दहा वर्षांपूर्वी तुझ्या अजित काकाच्या शाळेत जेव्हा जेव्हा परेंट मीटिंग असायची, तेव्हा तेव्हा तुझे पप्पा हजर असायचे. आणि मग तेव्हा पासून मी तुझी आई झाले."
"हां... मग त्याचं काय?", मुलाच्या डोक्यात काहीच शिरलं नाही.
"ते विचार तुझ्या पप्पांना."
"ओ. पप्पा. मम्मा काय म्हणतेय ओ..."
गॅलरीत मिस्टर शेलारांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. पेपरात डोकं घालून त्यांनी त्याच्याकडं साफ दुर्लक्ष केलं.
संस्थेच्या कार्यालयात दुपारचं जेवण करून सगळेच जरा सुस्तावले होते. मुलाच्या शाळेतली पॅरेंट मीटिंग संपवून शेलारमॅडम नुकत्याच ऑफिसमध्ये खुर्चीवर येऊन आरामात बसल्या होत्या. क्लार्क माने यांच्याशी एकजण हुज्जत घालत होता. त्यामुळे बाकीचे शांत बसून त्यांचं संभाषण ऐकत होते.
"काय चाललंय? आठवडा झालं तुम्ही काम करताय. आज या. उद्या या. परवा या."
"अहो साहेब.. ऐकून तर घ्या...", दीनवाण्या स्वरात माने त्यांना समजावण्याचा प्रयत करत होते.
तेवढ्यात शेलारबाईंच्या डेस्कवर फोनची रिंग वाजली. त्यांनी पटकन फोन कानाला लावला तर तिकडून नवऱ्याचा मोठा आवाज कानावर पडला. आधीच शाळेतल्या मीटिंगमुळे बाईंचं डोकं भणभणलं होतं. त्यात आल्याआल्या मानेंची एका माणसाबरोबर चाललेली हुज्जत. बाईंचं डोकं आता चांगलंच तापलं.
"ऐकून काय घ्यायचं? मूर्ख वाटलो का मी इथं सारखं सारखं चकरा मारायला?"
तो इसम मानेंवर वसकला आणि त्याच वेळी शेलार बाई फोनवर नवऱ्याला ओरडल्या,
"मला काय माहित? मी आत्ताच आलेय. तुमचं तुम्ही बघून घ्या."
एकापाठोपाठ एक वाक्य आल्यामुळे ऑफिसमध्ये एकच हशा पिकला. तो अनोळखी इसम अचानक कोण बोललं म्हणून रागात इकडं तिकडं पाहू लागला. त्याचं लक्ष जिकडे जाईल, तो खाली मान घालून हसू दाबायचा प्रयत्न करायचा.
"एकदा सांगितलेलं कळत नाही का?", पुन्हा शेलार मॅडमचा आवाज घुमला. आणि पुन्हा एकदा सगळं ऑफिस खळखळून हसायला लागलं. आता तर तो इसम चांगलाच वैतागला. आपल्या आकांडतांडवाचा इथं काहीच उपयोग होत नाहीये. असं लक्षात आल्यावर तो गपगुमान ऑफिसमधून बाहेर पडला.
संध्याकाळची वेळ. पुण्यातल्या कर्वे रस्त्यावर वाहनांची वर्दळ चांगलीच वाढली होती. नळस्टॉपला दोन मिनिटांचा सिग्नल. सिग्नल लागला कि, मागे वाहनांची रांगच रांग लागायची. फुल्ल ट्राफिक. शेलार मॅडमच्या कारच्या समोरची बाईक बाजूला झाली. थोडीशी जागा झाली होती, पण अजूनही दिड मिनिटांचा सिग्नल बाकी होता. एव्हाना शेलारमॅडमने कार बंद केली होती. तोच कारच्या मागचा टुव्हीलरवाला जोर जोरात हॉर्न वाजवू लागला. एकदा... दोनदा... तीनदा... हॉर्न काही थांबायचं नाव घेईना. शेलार बाई चांगल्याच वैतागल्या. तसं आजुबाजुचेही वैतागले होते, पण हे रोजचंच म्हणून लोकं दुर्लक्ष करत होती. तावातावाने कारचा दरवाजा उघडून शेलारमॅडम बाहेर आल्या. त्यांना असं बाहेर आलेलं पाहताच त्या इसमाने हॉर्न वाजवणं बंद केलं. कमरेवर हात टाकून त्या म्हणाल्या,
"काय रे? काय झालं सारखं सारखं हॉर्न वाजवायला? सिग्नल पडलाय दिसत नाही का?"
आजूबाजूची लोकं फिदीफिदी हसायला लागली.
"गाडी पुढे घ्या म्हटलं... जागा झालीये,", जरा आवाज चढवून तो इसम म्हणाला.
"एवढ्याशा जागेत काय घर बांधतो का आता?"
लोकं आता आणखीनच मोठ्याने हसू लागली. त्यामुळं झालं असं कि, तो इसम पुरता गोंधळून गेला. काय बोलावं त्याला कळेना. तरीही तो म्हणालाच,
"ओ... काही काय बोलताय?",
"तू कर्वेच ना रे?", जरा बारीक नजर करत शेलारमॅडमनी त्याला विचारलं.
"कोण कर्वे? मी नाहीये कर्वे."
"मग रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय? सारखं हॉर्न वाजवतो. एवढी घाई झालीये तर स्वतःच्या विमान घ्यायचं ना मग."
शेलारमॅडम खणखणीत आवाजात म्हणाल्या तसा तो गपगार झाला. पण लोकांची चांगलीच करमणूक झाली होती. सिग्नलची वेळही संपायच्या बेतात होती. शेलारबाईं कारमध्ये बसल्या. सिग्नल सुटला तसं तो बाईकवाला ब्रूम ब्रूम करत सुसाट गायब झाला.
~ मित्रांनो कशा वाटल्या शेलारमॅडम आणि त्यांचे किस्से? आवर्जून कळवा. धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा