शेला

आणि ती हसली

कथेचे शिर्षक:- शेला

विषय:- आणि ती हसली

लेखक:- सचिन पाटील 

           गेली सहा महिने सुरू असलेल्या तयारीचा हा परमोच्च आनंदाचा क्षण... खरं तर शामरावांच्या संपूर्ण आयुष्यातला हा आनंदाचा क्षण...कुमुद.. त्याची एकुलती एक लेक.. तीचं लग्न...

कुमुद च्या डोक्यावर भरल्या डोळ्यांनी अक्षदा टाकून झाल्या होत्या... अगदी देखणा लग्नसोहळा सुरू होता.. अहाहा काय ती नवपरिणित जोडी जणू दृष्ट लागेल अशीच... आणि ह्याच वेळी शामरावांच्या मनात ती धाकधूक लागून राहिली होती...त्याला कारण देखील तसेच होते... मुलीच्या सुखासाठी त्यांनी तिच्या होणार्‍या सासरच्या मंडळींपासून एक गोष्ट लपवली होती...
त्या विचारात हरवलेल्या वेळेत म्हणजे अगदी काही मिनिटात स्वतःचं संपूर्ण आयुष्य शामराव बसल्या जागी आठवत होते...
एक बाप नावाचं आभाळ कित्येकदा भरून येत होतं आणि डोळ्यांच्या कडा ओलावत मनातल्या मनात साठत राहत होतं... लख्ख आठवला होता शामरावांना कुमुद च्या जन्माचा प्रसंग... त्यावेळी ते कोकणातल्या दुर्गम भागात सरकारी ठेकेदार म्हणून काम करत होते .. कुमुद ची आई... शामरावांची पत्नी... मंदा... बाळंतपणासाठी तिथल्याच सरकारी दवाखान्यात दाखल होती... अपुऱ्याच सोयी उपलब्ध होत्या आणि तशातच मंदा तापाने फणफणत होती.. मोठ्या कष्टाने बाळंतपण झाले.. \"कुमुदचा\" जन्म झाला आणि काही वेळातच मंदा कायमची शामरावांना आणि जन्मलेल्या बाळाला सोडून देवाघरी गेली... नुकतेच जन्मलेले ते बाळ... दवाखान्यातल्या दाईने पाळण्यात ठेवले होते... आईच्या कुशीला पारखी झालेली नक्षत्रासारखी मुलगी जन्मतः एक व्यंग घेऊन जन्माला आली होती.. तिच्या दोन्ही पायाला चारच बोटे होती... दोन्ही पायाच्या अंगठ्या शेजारची बोटे नसल्याने ते पाय अतिशय निमुळते दिसत होते... एका बाजूला पत्नी जाण्याचे अतीव दुःख.. आणि दुसर्‍या बाजूला फक्त शामरावांच्या लक्षात आलेली बाब.. त्या दवाखान्यात होतेच तरी कोण म्हणा.. साठी उलटून गेली तरी जनसेवा म्हणून काम करत राहणारे डॉ. बोंडे... त्यांची तितकीच वयस्क सहकारी हौसाबाई ती दवाखान्यात सगळ्या कामा सोबत हे दाईचं काम सुद्धा करायची.. कुणाचच लक्ष्य गेले नव्हती अशी ती वेळ होती...
मंदा च्या अंतिम संस्कारांचा टप्पा पार करून शामराव ते दहा बारा दिवसाचे लेकरू घेऊन कायमचे गावाला निघून आले... गावी थोरल्या विधवा बहिणीच्या साह्याने कुमुदचं संगोपन सुरू झालं... दिवसांनी वेग घेतला.. वर्षे उलटत जाऊ लागली.. पण शामराव मात्र आपल्या लेकीसाठी कायम झटत राहिले..कुमुद पाच सहा वर्षाची असताना शाळेतून रडतच घरी आली.... तिच्याच वयाच्या तिच्या मैत्रिणी तिला तिच्या पायावरून चिडवू लागल्या होत्या.. आणि त्याच वेळी शामरावांनी एक गोष्ट ठरवली आणि मुलीच्या मनाला अजिबात दुःख होणार नाही याची काळजी घेत ती कटाक्षाने जपली.. कुमुदचे पाय मात्र नेहमी पायमोज्यात ठेवण्याचा त्यांनी नियम केला आणि काटेकोर जपला देखील ..... कुमुद शाळेत असो.. शिकवणीत असो वा मैत्रिणींसोबत असो.. कुठेही पायातून मोजे कधीच काढायचे नाहीत हे तिला अगदी लहानपणापासून सांगत आले होते..अगदी घरात सुद्धा नाही काढायचे....
कुमुदच्या पहिल्या चालण्याच्या वेळी शामरावांनी तिच्या पावलाचे ठसे एका पांढर्‍या रेशमी कापडावर उमटवलेले आत्ता सुद्धा त्यांना लख्ख दिसत होते... आयुष्यभर त्यांनी त्या नंतर दुसर्‍या कुणाला ते पाय पाहू दिले नव्हते.. अनेकांच्या नजरा चुकवत कुमुद सुद्धा वडिलांच्या सांगण्याप्रमाणे समजूतदार वागत राहिली होती... आयुष्यभर कुमुद बाबांची ती शिकवण समजून उमजून प्रमाण मानून प्रेमाने आणि जबाबदारीनेच तर जगत आली होती..
कुमुदचं लग्न जमवण्याच्या वेळी सुद्धा त्यांनी अगदी तिचे पाय कुणाला नजरेस पडता कामा नये अशी बैठक व्यवस्था तयार केली...
पसंतापसंती झाली...
मुलाकडच्या मंडळी चा होकार आला.. आणि त्यांनी कुठलाही शब्द समोरून यायच्या आधी नियोजित मानपान बोलून दाखवला.. आणि ते ऐकून समोरची मंडळी सुद्धा थक्क झाली...कुमुदला तिच्या संसाराचे संपूर्ण सुख भरभरून जगता येईल अशीच तर व्यवस्था केली होती एका बापाने..
होता होता हा लग्नाचा दिवस धामधुमीत पार पडत होता.. आणि भटजींनी पुकारले...
"कन्यादानासाठी वधूच्या पित्याने यावे.. वराच्या मातापित्यांनी सुनेच्या सूनमुख पाहण्याचा विधी करण्यासाठी मंचावर यावे "
लगबगीने नव्याने झालेली व्याही मंडळी त्या चार पायर्‍या चढून समोरच्या पाटावर स्थानापन्न झाली... नवरा नवरी विधीच्या ठिकाणी आपापल्या पाटावर बसुन होती... शामराव कुमुद च्या बाजूला बसले... भटजींनी सांगितल्या प्रमाणे तो विधी छान पार पडत होता... वर पक्षाने नव्या सुनेचे सूनमुख पाहत असताना.. त्याचे असे पुरातन कुळाचार म्हणून काही दागिने नव्या सुनेला आणले होते...सोन्याच्या पाटल्या.. बांगड्या.. ठुशी.. हे तर होतेच पण त्याच तबकात होते... पेढे माठाचे जडसर तोडे... पैंजण पट्ट्या.. सुंदर नाजूक जोडवी.. मासोळ्या...
पायी परिधान करायचे ते अलंकार पाहून आता मात्र शामराव भर मांडवात घामाघूम झाले...
ही बाब मात्र नुकताच झालेला जावई.. \"चेतन\" याने मात्र बरोब्बर हेरली.. आणि हलकेच शामरावांना म्हणाला...
"काय झालं... नका काळजी करू मामा"
शामराव पुसटसे हसले खरे पण आतून हादरले होते... भर मांडवात त्यांनी लपवलेले बिंग फुटेल याची त्यांना धास्ती वाटत होती...
\"सूनमुख\" पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला... कुमुद चौरंगावर बसती झाली तिने सवयीने शालू पायावर झाकून घेतला...
सासुबाई चांदीचे ताम्हण घेऊन नव्या सुनेचे औक्षण करत होत्या.... त्यांनी स्वतःच्या हाताने एकेक दागिना कुमुदच्या अंगावर घातला... आणि पायाशी बसून आता त्या सुवासिनीचा अलंकार असलेली जोडवी तिला घालणार होत्या...
" सूनबाई... पाय पुढे कर पाहू..."
त्यांच्या तोंडून निघालेल्या शब्दांनी कुमुद जितकी धास्तावली होती.. त्याहून अधिक शामराव धास्तावले...
"कर ना पाय पुढे..." चेतन हळूच कुमुद च्या कानात म्हणाला...
कुमुद अगदी केविलवाणी झाली होती..तिने पाय पुढे केले...
पायातले मोजे हळुवार हातांनी तिच्या सासुबाईने दूर केले.. इतके नाजूक सुंदर पाय आणि कमी असलेले जोडव्याचे बोट....
चेतन ने खांद्यावरचा \"शेला\" त्या गोर्‍या निमुळत्या पायावर झाकून टाकला...कुमुद च्या हळव्या आयुष्याला आता ह्या शेल्याची भक्कम साथ आयुष्य भर आपली करून गेली... तिच्या जगाच्या दृष्टीने असलेल्या व्यंगाला कायमचे बाजूला सारून...
शामराव हंबरडा फोडून रडू लागले... हात जोडून भिजले शब्द गोळा करण्याचा प्रयत्न करू लागले...
नवे व्याही विठ्ठलराव पुढे झाले त्यांनी शामरावांना आपल्या हाताने घट्ट धरून ठेवले खांद्यावर हात टाकत आधार दिला... शांत केले...
सासुबाई झालेल्या राधिकाबाई त्वरेने पुढे झाल्या.. त्यांनी हळुवार हाताने तिच्या मोकळ्या झालेल्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढले... आणि पायी तोडे... मासोळ्या घालून मनापासून छानसे हसू चेहर्‍यावर आणून त्या कुमुदला म्हणाल्या..
" आपल्या घरची लक्ष्मी झालीस तू आज... तुझी जोडवी आपल्या कुलदेवी आई अंबाबाईच्या पायाशी शोभून दिसतील... तू आता अजिबात मोजे घालायचे नाहीत.. इतक्या गोड मुलीला माझी सून म्हणून स्विकारलेय मी... तर कधीच तुझ्या डोळ्यात अश्या किरकोळ कारणाचे व्यंग नको मानू... मी आहे तुझ्या सोबत...तुझी सासू म्हणून म्हण हवं तर तुझी मैत्रीण म्हणून म्हण... पण भरभरून आनंदी आणि मनमोकळी जगून घे बाळ.. आता यापुढे आपल्या घरभर तुझे हे सौभाग्याचे पाउल हक्काने उमटू दे.. काही काळजी करू नकोस..एक छानसा उखाणा मात्र नक्की घे हो आत्ता"
चेतन.. विठ्ठलराव... राधिकाबाई.. सर्व पाहुणे मंडळी... जगायेवढे सुख भरून पावलेले शामराव... सर्वजन कुमुद च्या तोंडी आलेला उखाणा समाधानाने ऐकत होते...
" माझ्या बाबांचे ते अश्रू असे सासरच्यांनी पुसले
...\"चेतनराव\" आले या आयुष्यात आणि मी हसले" ?


समाप्त.. ?️ सचिन पाटील...

टीम:- सातारा आणि सांगली (जिल्हा)