ती कुठे काय करते भाग दोन

तिची कथा


ती कुठे काय करते भाग दोन


"अग राधा असं काय करतेस? जरा समजून घे ना मला!" माधवराव दिनवाण्या स्वरात राधाची समजूत काढण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. राधा मात्र काहीच ऐकत नव्हती. ऐकत नव्हती म्हणण्यापेक्षा तिला काही ऐकूच जात नव्हतं. ती नुसतीच तिच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर दूरवर कुठेतरी शून्यात बघत होती, पण तिला दिसत मात्र काहीच नव्हतं. तिच्या भावनांचा बांध फुटला होता. डोळ्यातून अश्रूंची संतत धार वाहत होती, राधा त्या अश्रूंना अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, निग्रहाने शांत राहण्याची तिची धडपड मात्र तिच्या डोळ्यातलं सतत वाहणारे पाणी, ती केविलवाणी धडपड मोडीत काढत होतं. राधाला मनातून खूपच तुटल्यासारखं वाटत होतं. तिच्या मनात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. तिचं अंत:करण एकसारखं तेच तेच तिला आठवण करून देत होतं, जे माधवनं तिला सांगितलं होतं. भावनांच्या त्या धुमश्चक्रीत राधाचा निर्धार वाळलेलं पान जसं हवेवर कुठेही तरंगत जातं त्याप्रमाणे कुठेतरी दूर उडून गेला होता. क्षणाक्षणाला तिचं हृदय पिळवटत होतं, आक्रंदत होतं पण ते हतबल मात्र झालं नव्हतं.

राधाची ही अवस्था माधवला बघवत नव्हती. आयुष्यात आज पहिल्यांदाच राधा समोर त्याला फारच अगतिक आणि लाचार वाटत होतं. राधाचं मुकं रूदन माधवच्या हृदयालाही घरे पाडत होतं, पण तिची समजूत कशी काढावी, तिची मन भरणी कशी करावी? हे मात्र माधवला काही केल्या सुचत नव्हतं.

खरं तर वयाच्या या टप्प्यावर, राधासह सुखी संसाराच्या इतक्या वर्षाच्या सोबतीनंतर, माधवला खरं बोलून आपण खूप मोठा गुन्हाच केला की काय असं वाटत होतं. पण गेली वीस वर्ष त्याने जी गोष्ट जीवापाड जपली होती, ती अशी राधासमोर उघड झाल्यावर, राधा आपल्याला समजून घेईल, आपण कुठल्या परिस्थितीत इतके नियती शरण झालो, हे तिला नक्की कळेल असं माधवला वाटलं होतं. राधा चिडेल, रागावेल, ओरडेल पण नंतर काही दिवसांनंतर सगळं पूर्ववत होईल, या विचारांनं जणू माधवने राधाला गृहीत धरूनच, त्याचा राधासह सुखाचा संसार सुरू असतानाच, दुसरा एक इतिहास मोठ्या विश्वासाने राधाला सांगून टाकला.

या सांगून टाकण्यालाही अनेक बाजू होत्या. एकतर राधाचा मवाळ प्रेमळ स्वभाव, राधाचा माधववरचा आंधळा विश्वास, दुसरं आता पर्यंतच्या त्यांच्या वैवाहिक जीवनात जितक्या काही तडजोडी, कमीपणा, एखाद्या बाबतीत पड खाणे, स्वतःला दुय्यम मानुन समोरच्या व्यक्तीसह असलेलं नातं महत्त्वाचं समजून, वेळप्रसंगी अपमान सहन करून राधानं माधवचा संसार सुखी केला होता. नाती जपली होती. त्यामुळेच माधवनं त्याचा इतिहास सांगण्याचं धाडस केलं होतं. पण त्याच्या त्या एका सत्यानं राधा पुर्णपणे उन्मळून पडली होती. राधाचा जीव तीळ तीळ तुटत होता. तिला स्वतःचा, माधवचा आणि त्यांच्या नात्याचा तिटकारा वाटत होता.

आपल्या सुखी संसाराचं सुंदर, देखणं चित्र आपल्या जोडीदारांन असं बेरंग करावं, ज्या जीवनसाथी साठी राधाने प्रत्येक नात्यासमोर चूक असो वा नसो, मान झुकवली होती, त्या तिच्या सहचरांनं एवढा मोठा दगा द्यावा! नवरा म्हणून आयुष्यभर ज्याच्यावर तिने स्वतःचं जीवन ओवाळून टाकलं, त्यानेच तिच्या विश्वासाचा खून करावा, तिच्या प्रेमाचा अपमान करून, तिच्या भरवशाचे लचके तोडावे हे राधाला सहन होत नव्हतं.

बाहेर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता आणि राधाच्या आयुष्यात तिच्याच साथीदारांनं प्रतारणेचं विष कालवलं होतं. जोडीदाराची ही अशी भूमिका? आपल्या समर्पणाचं हेच फलित? या विचारांनी राधा आतल्या आत धुमसत होती. पाण्याविना मासोळी जशी तडफडते, तशी ती तळमळत होती. जीवाची काहीली व्हावी आणि ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशा नवऱ्यांनं डोळ्यांन देखत भर उन्हात, वाळवंटात एकटच, अनवाणी, भरकटकायला सोडून द्यावं अशी अवस्था राधाची झाली होती.



©® राखी भावसार भांडेकर


🎭 Series Post

View all