ती वाईट नाही, तिला बनवलं गेलं -3 अंतिम

ती वाईट नाही
"ठीक आहे, आज तुम्ही बनवा...असंही आज मला एका ठिकाणी कार्यक्रमात जायचे आहे, मी पाहुणे यायच्या आत येऊन जाईल.."

कामिनीने पाहुण्यांसाठी एक कार्यक्रम रद्द केला पण सासूबाई असं म्हटल्याने तिने जाण्याचं ठरवलं.

तिने जायच्या आधी सगळं घर साफ केलं, झाडाझुड, फरशी वैगरे सगळं केलं आणि ती निघाली.

पाहुणे यायच्या अर्धा तास ती आधी आली, पाहतो तर काय, सासूबाई अजून मेथीच निवडत होत्या..आता निवडणार केव्हा, फोडणी देणार केव्हा आणि भाकरी केव्हा करणार?? तिने जास्त प्रश्न न करता एकच विचारलं, "काही मदत करू का??"

"नको, अगं आधी घरी 10-10 पाहुणे यायची, सर्वांचं एकटीने करायची मी.."

तिने दुर्लक्ष केलं आणि खोलीत तयार व्हायला गेली. पाहुणे आले तशी ती खोलीतून बाहेर आली आणि पाहुण्यांसाठी दार उघडलं, हसतमुखाने त्यांचं स्वागत केलं.
किचनमध्ये पाहिलं तर सासूबाई लसूण सोलत होत्या. तिला टेन्शनच आलं..पण तिने दुर्लक्ष केलं.

पाहुण्यांमध्ये दोन गावाकडच्या बायका होत्या, त्या किचनमध्ये आल्या. किचनचा अवस्था बघून एकमेकांकडे बघू लागल्या. कामिनीच्या ते लक्षात आलं पण तिने दुर्लक्ष केलं.

सासूबाई लसूण सोलत उठायला लागल्या तशी त्यांना चक्कर आली, त्यांना कामिनीने पकडलं आणि खुर्चीवर बसवलं..

"काय झालं? डॉकटरकडे जाऊयात का??"

सर्वांनी विचारलं,

"काही नाही, माझ्या डायबेटीस च्या गोळ्या सुरू आहेत ना त्याने चक्कर येते बाकी काही नाही.."

आता स्वयंपाकाचं काय? त्यांनी कामिनी कडे बघितलं,

"कामिनी कर तू म्हणत होतीस ते काहीतरी.."

कामिनीचा संताप संताप झाला, एक तर पाहुण्यांपुढे काही बोलताही येईना. वेळ कमी, त्यात सगळं अर्धवट काहीतरी करून ठेवलेलं. तिने सासूबाई आणि दोन्ही पाहुण्यांना बेडमध्ये बसण्यास सांगितलं,

पाऊण तासात सगळा स्वयंपाक तयार झाला, छोले, भात, कढी सगळं तयार होतं. जेवायला बोलवायला म्हणून ती खोलीत गेली अन बघते तर काय, सासूबाई त्या पाहुण्यांशी बोलत होत्या,

"सुनबाईने लक्ष द्यायला हवं ना, किचन पाहिला ना कसा रचलाय? सगळं इकडचे तिकडे..मी एकटी होते तेव्हा सगळं अगदी वेळेवर व्हायचं.."

कामिनीने मोठ्या मुश्किलीने स्वतःला आवरलं आणि सर्वांना जेवायला बसवलं.

एक घास तोंडात टाकताच सासूबाईंचं सुरू,

"मीठ कमी झालंय का? कढी फारच आंबट वाटतेय..."

एव्हाना पाहुण्यांनी सगळं पाहिलं होतं, त्या कामिनीची बाजू घेत म्हणाल्या,

"सगळं अगदी चविष्ट आणि प्रमाणात झालंय, कशाला सुनबाईला उगाच बोलताय?"

हे ऐकून सासूबाईंना चांगलाच धडा बसला, गपगुमान सगळं खाऊन घेतलं.

ते गेल्यावर कामिनी सासूबाईंना बोललीच,

"आई मी सांगत होते की सगळं मी बनवते, ऐकत का नाही तुम्ही? शेवटी मलाच सगळं करावं लागलं ना?"

"केलं तर काय इतकं?"

"करण्याबद्दल माझं काही नाही, पण किती धावपळ झाली माझी? असं ऐनवेळी का सगळं ठरवता?"

"मीच करणार होते बाई पण आता शरीर नाही साथ देत"

"म्हणून मी करते म्हटलं तर तेही नको तुम्हाला"

सासूबाईंनी काही उत्तर दिलं नाही, चूक तर मान्य नाहीच नाही..

पाहुणे गेले पण सासूबाईंचं पुन्हा आधीसारखं सगळं सुरू झालं.

कामिनीसारख्या उत्साही, गृहकृत्यदक्ष मुलीची ऊर्जा कमी कमी होत गेली, तिचा संसारबद्दलचा, घराबद्दलचा कळवळा पार मारून टाकण्यात आला..

कामिनीला मोकळा, स्वच्छ दिवाणखाना आवडे. पण सासूबाईंना तसं सहन होत नसे, सगळं मोकळं केलं की त्या काही न काही वस्तू हॉल मध्ये आणून ठेवत. धान्याची गोणी, भाजीपाल्याची जुडी, वापरात नसलेल्या खुर्च्या...तिने आवरून आवरून शेवटी सोडून दिलं.

एके दिवशी हळदी कुंकवाला बायका घरी आल्या तेव्हा घराची अवस्था बघून सगळे नाक मुरडू लागले, एक आगाऊ बाई म्हणालीच,

"घरात जरा जास्तच पसारा दिसतोय"

सासूबाई ताडकन उत्तरल्या,

"आता घरातल्या बाईने आवरला तर आवरला जाईल ना?"

सासूबाईंचं हे दुतोंडी वागणं तिला खटकू लागलं. एकीकडे काही करू द्यायचं नाही, केलं तर सगळं पुन्हा अस्ताव्यस्त करून ठेवायचं आणि सर्वांसमोर सुनबाई काहीच करत नाही असा गाजावाजा करायचा..

तिने निर्णय घेतला, तिने एक नोकरी सुरू केली. घर पुन्हा सासूबाईंच्या ताब्यात परत दिलं. घरात जीव न अडकवता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं.

आपलं घर आपल्या ताब्यात परत आला म्हणून सासूबाई खुश होत्या, पण आपल्याकडून आधीसारखं काही होत नाही हे समजायला त्यांना वेळ लागला, सुनबाईच्या हातात सगळं दिलं असतं तर तिने उत्तमरीत्या सगळं सांभाळलं असतं हे समजेपर्यंत वेळ निघून गेली होती.

आजवर कित्येक अश्या कामिनी आपला उत्साह मावळून बसल्या आहेत, आपल्या संसाराच्या स्वप्नांना एकेक करून तडा गेलेला त्या पाहताय, आणि काहीही करायची इच्छा त्यांना उरत नाही तेव्हा "निष्क्रिय" असा ठप्पा ऐकून घेताय..

"ती वाईट नसते, तिला वाईट बनायचंही नसतं.... तिला वाईट बनवलं जातं... वाईट बनण्यासाठी पोषक वातावरण तयार केलं जातं, आणि एकदा का ती वाईट बनली की मग वाईटपणाचा शिक्काही तिच्यावरच ठेवला जातो. यात तिची चूक नसते, चूक असते वाईट बनण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या त्या पोषक वातावरणाची"

समाप्त

🎭 Series Post

View all