Feb 24, 2024
नारीवादी

तू तर घरीच असते!

Read Later
तू तर घरीच असते!
तू तर घरीच असते !( लघुकथा)

         \"तू घरीच तर असते.\" किती साधं वाक्य आहे हे. पण त्या वाक्यामागचं एका गृहिणीचे दुःख कोणीच समजू शकत नाही. बोलणारा बोलून जातो, \"तू घरीच तर असते.\"पण त्यामुळे एकाच वेळी तो त्या स्त्रीचा अपमान तर करतच असतो आणि दुसऱ्यावेळी तिला गृहीत पण धरत असतो. तिचं घरात असणं हे घरातल्या बाकीच्या लोकांसाठी चेष्टेचा विषय असतो. ती घरात असते म्हणजे बाहेर जगात काय सुरू आहे हे तिला माहीत नसतं का? तिचं घरात असणं इतकं क्षुल्लक असतं का? कि ती स्त्री स्वतःसाठी , घरासाठी बाहेर जाऊन अर्थार्जन करत नाही म्हणून हा टोमणा असतो?*********************************************
             बबन मामाच्या धाकट्याचं लग्न असल्यामुळे आज सगळेजण बबन मामाच्या घरी जमले होते. खरंतर दोन-तीन दिवसांपूर्वीच कार्तिकचं म्हणजे बबन मामाच्या मुलाचं लग्न  पार पडलं होतं, कालच रिसेप्शनही झालं होतं. पण ख्रिसमसची सुट्टी असल्याने आणि गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे माहेरी जायला न मिळाल्याने सगळ्या आते बहिणी, मामे बहिणी ,मावस बहिणी - भाऊ बबन मामाकडे लग्नानिमित्त एकत्र आले होते.

          विलासराव देशमुख यांना चार मुलं आणि तीन मुली, मुलं - रमेश, छगन, मोहन आणि बबन, मुली- नीता, गीता, बबीता. या सगळ्यांना दोन -दोन, तीन- तीन मुलं मुली. विलासराव हे गावचें एक मोठं प्रस्थ . वडिलोपार्जित पुष्कळ जमीन असल्याने मोठा रमेश बी.एस.सी. ऍग्री करून शेतीच बघत होता. तर छगन माध्यमिक शाळेवर शिक्षक होता. मोहनचे तर खत बी-बियाण्याचे तालुक्याला दुकान होतं. तर बबन मामा नगर परिषदेत आरोग्य विभागात लिपिक होता.

        नीता, गीता आणि बबिता यांचे योग्य वयात लग्न होऊन त्या आपापल्या घरी सुखी होत्या. सगळ्या भावंडांच्या मुला- मुलींची ही लग्न झाली होती, फक्त बबन मामाचा धाकटा कार्तिक हाच लग्नाचा राहिला होता. त्यामुळे मामांकडचं हे शेवटचं लग्न म्हणून सगळ्या आते, मामे ,मावस -बहिणी लग्नाकरता एकत्र आल्या होत्या.

          कालच लग्नाचे सगळे सोहळे आटोपले होते म्हणून, सगळेजण दुपारच्या वेळी निवांत गप्पा मारत बसले होते. तेव्हा बोलता बोलता सहजच विषय निघाला की, \"मी तर घरीच असते.\" आणि प्रत्येक जण आपापली व्यथा सांगत होती.

पूजा - "आपण घरीच असतो म्हणून प्रत्येकवेळी गृहीत धरल्या जातो ग."

नेहा -"हो ना! घरी असल्याने सगळ्यांना वाटते ही दिवसभर काय काम करते? पण त्यांना काय माहिती घर सांभाळणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही."

प्रिया - "अगं घरी किती लक्ष द्यावं लागतं. मुलांना सांभाळणं , त्यांचा अभ्यास, स्वयंपाकाचं, कामवाल्या बाईचं पण बघावं लागतं."

सीमा - "याशिवाय दुध , किराणा , भाजीपाला हे सगळं वेळच्यावेळी आणलं नाही आणि आधीच प्लॅनिंग करून ठेवलं नाही तर पूर्ण दिवस डिस्टर्ब होतो."

मीना - "पण घरातल्यांना तर त्याची काही जाणीवच नसते. माझा नवरा म्हणतो , "त्यात काय एवढं? पैसे कमावण्या एवढं कठीण थोडंच आहे स्वयंपाक करणं आणि मुलं सांभाळणं?"

पूजा - "माझ्याकडे तर मुलांंचं ही सगळं मलाच बघावं लागतं. अहोंचा बिजनेस आहे. त्यांना घराकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ नसतो. मुलांच्या पालक सभेला मीच जाते. मुलांच्या आजारपणात डॉक्टरच्या चकराही मीच मारते. एखाद वेळी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलांना कुठे बाहेर घेऊन जाऊ या म्हटलं , तर म्हणतात, "मला एकच सुट्टीचा दिवस मिळतो आराम करू दे. तू घेऊन जा मुलांना बगिच्यात, नाहीतर बाहेर. तू तर घरीच असते!"


आशा - "आमचे राव तर मार्केटिंग मध्येच असल्याने ते म्हणतात, \"रोज बाहेर फिरून मी थकलो आहे. हे वाणसामान, भाजीपाला, घरातली मुलांची- तुझी लहान मोठी खरेदी तूच करत जा घरीच तर असते ना तू!"

नेहा - "अग मागल्या आठवड्यातलच उदाहरण सांगते, यांच्या मावस भावाकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. मी म्हटलं \"जाऊ या का? तर सकाळी घरून निघताना म्हणाले, \"हो मी रात्री लवकर येतो मग सोबत जाऊ\". माझ्या सासुबाई म्हणाल्या,\"अगदी वेळेवर जाणं बरं दिसतं का? मी आणि तुझे बाबा-सासरे, आम्ही सकाळीच जाऊ नीमाकडे.
(निमा-सासुबाईं ची बहिण). तू, मुलं आणि श्री या मागून संध्याकाळी." 
संध्याकाळी \"अहो\" ना फोन लावला तर म्हणाले,"माझी महत्त्वाची मीटिंग आहे, तू मुलांना घेऊन जा. तू तर घरीच आहे ना!"

जया - "अगं घरचं कितीही आवरा संपत नाहीच. मुलांची पालक सभा असली की , मी तिकडच्या तिकडेच पाण्याचे बिल, इलेक्ट्रिक बिल भरून येते. सासूबाईंना डॉक्टरकडे चेकअपसाठी नेणं माझ्याचकडे आहे. शिवाय घरातल्या पै-पाहुण्याला काय करायचं, काय द्यायचं हे मलाच बघावं लागतं. तरी प्रत्येक वेळी टोमणा, \"तू तर घरीच असते.\"

पूजा - "आजकाल तर \"तू तर घरीच असते\" या वाक्याने मला तर खूपच चीड येते."

नेहा - "मला पण , आणि कधीकधी स्वतःचा खूप राग पण येतो."

          बाकीच्या इतर बहिणींनी, नेहा आणि पूजाच्या वाक्याला दुजोरा दिला. या सगळ्या भगिनी मंडळाच्या गप्पा त्यांची दूरच्या नात्यातली एक आजी ऐकत होती. ही आजी तशी खूप धार्मिक , पण प्रत्येक गोष्टीच्या  मागचे विज्ञान तिला पूर्णपणे माहीत होतं. प्रत्येक गोष्टीची ती वैज्ञानिक दृष्टीने कारणमीमांसा पण करत होती.

आजी - "मी काही बोलू का ग तुमच्यामध्ये?"

सगळ्याजणी एकदम - "हो आजी बोल ना!"

आजी - "प्रत्येक शरीरात \"स्त्री ऊर्जा\" किंवा \"फेमिनाईन एनर्जी\" असते आणि आपण स्त्रियांच्या शरीरात ती जास्त प्रमाणात असते.ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेने जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे. ही ऊर्जा घरात असल्याने, घरात स्नेह, ओलावा, चैतन्य आहे, घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. स्त्रीने
 काही करणं हे एक्स्ट्रा आहे. या एनर्जी चा उपयोग करून घरातली गृहिणी स्वयंपाक करते, घर सजवते पण कधी तिनं ही एनर्जी वापरून काही केलं नाही तरी,  तिची किंमत कमी होत नाही. ती एनर्जी घरात आहे आणि ते असणचं एक देणं आहे. घरासाठी वरदान आहे. घरातली आई किंवा पत्नी बाहेर गावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर, घरात कसं वाटतं ते बघा. एखाद्याला दोन दिवस कदाचित बदल बरा ही वाटेल पण, नंतर मात्र सगळी कामे करणारे, सेवा देणारे असूनही काहीतरी रिकामं वाटेल, रुक्ष वाटेल. ती उणीव आहे स्त्री एनर्जीची! लग्न झाल्यावर लेक घर सोडून जाते तेव्हा घर रीतं, रिकाम  होतं. कारण ही ऊर्जा जाते. घरातली फक्त मुलगी नाही, तर ही ऊर्जा पण तीच्या सोबत जाते. ही एनर्जी निसर्गाची निर्मितीची, क्रिएशनची, उर्जा आहे. घरातल्या सगळ्या प्रगतीसाठी ,सगळ्यांच्या विकासासाठी ,सगळ्यांच्या पुढे जाण्यासाठी, यशासाठी ती एनर्जी वापरली जाते.

            जेव्हा तुम्ही मुलांचा अभ्यास घेता तेव्हा त्यांच्या यशासाठी हीच एनर्जी सरस्वती असते. नवऱ्याच्या आर्थिक यशाच्या मागे हीच लक्ष्मी उभी असते. घरातली प्रत्येक स्त्री काय देते ?काय करते ?तर ती असते! तुमचं असणचं देणं आहे. तुम्हाला आणखी काही करायची गरजच नाही. पण तरीही तुम्ही इतकं करता!

          तुमच्या असण्याचीच किंमत खूप मोठी आहे. ती पैशात मोजता येत नाही. जिथं स्त्रीचा अनादर आणि अपमान होतो, स्त्रीच्या एनर्जीचं शोषण होतं, तिथं ती नकारात्मक होते आणि सगळ्या घराला त्याचे परिणाम भोगावे लागतात, म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी म्हणून पूजा करायला सांगितलंय, पूजा प्रतिकात्मक आहे. पूजा म्हणजे आदर आणि कदर करणे. आपल्या यशात, आपल्या सुखात ,स्त्रीचा न दिसणारा वाटा मान्य करणे!

            म्हणूनच मुलींनो मला असं वाटतं की , प्रत्येक स्त्रीला आपल्या आतल्या या एनर्जीची खात्री पटली तर , तिच्या मनातला अपराधी भाव आणि न्यूनगंड निघून जाईल. ज्याप्रमाणे विजेसारखी ऊर्जा दिसत नाही पण असते, तसंच स्त्रीच्या ऊर्जेवर घराचं घरपण टिकून असतं. तिच्या कामांमधून ऊर्जा अभिव्यक्त होते आणि त्यामुळे इतरांना पुढे जाता येतं.

         "कोणत्याही स्त्रीने स्वतःची किंमत आपण नोकरी करतो की नाही, पैसा कमवतो की नाही हे या निकषावर करायची गरज नाही. अनुकूल परिस्थिती नसेल आणि स्त्रीला आयुष्यातल्या ऋतूप्रमाणे कधी थांबावं लागलं तर स्वतःला आळशी, निरुपयोगी समजू नका. कारण निसर्गाची प्रचंड ऊर्जा, इतरांना सहज देत तुम्ही स्थिर उभ्या आहात त्यासाठी तुम्ही ताकत लावलेली आहे."

            आजी हे सगळं इतक्या छान पद्धतीने सांगत होती की, सगळ्या बहिणी आजीचं म्हणणं अगदी तन्मयतेने ऐकत होत्या. आणि मग त्यांना स्वतःमध्येच एक आत्मविश्वास वाटायला लागला ,स्वतःवर भरवसा निर्माण झाला.
*********************************************
           अनेक गृहिणी घरातच असतात, त्यामुळे मला आता असं वाटतं की , आता त्यांना त्यांच्या असण्याचं महत्व कळलं असेल.
       

 संदर्भ - कांचन दीक्षित यांच्या \"स्त्री एनर्जी\" या ब्लॉगवरून साभार.

दिनांक - १८/२/२०२२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//