सगळा रोष संकेतवर नको जायला म्हणून ठरल्याप्रमाणे त्यामुलीने लगेच संकेतच्या आईला प्रश्न केला,
" काय ओ.? मी आई होणार आहे की नाही हे तपासून घेऊन नंतर तुमच्या मुलाचं माझ्याशी लग्न लावणार आहात का..? आणि मी आई होऊ शकत नसेल तर काय करणार तुम्ही...?"
संकेतची आई लालबुंद होऊन तिच्याकडे आणि संकेतकडे बघत राहिली.
" असं कोण बोललं..?" संकेतची आई सगळं समजून ही बोलली.
" कोण म्हणजे..? तुमच्या मुलाला मी विचारलं..! तुमच्या आधीच्या पत्नीपासून तुम्ही वेगळे का झालात..! त्यांनी सांगितलं की ते दूर नाही झाले, तर त्यांच्या पत्नीला मुलं होत न्हवतं म्हणून ती स्वतःहून निघून गेली."
" मग..! बरोबर बोलला की तो..!" संकेतची आई तोऱ्यात बोलली. तिला ही समजलं की संकेतने बाजू सावरली होती.
" हो ना..! मग ती निघून गेली. पण तुम्ही तिला थांबवलं नाही.!"
" त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला. पण त्या मुलीला तिचीच चूक वाटतं होती. म्हणून ती स्वतःहून बोलून त्यांच्या घरातून निघून गेली." त्यामुलीची आई आपल्या मुलीला समजावत बोलली.
संकेत ही त्या मुलीच्या तोंडचं ऐकून सगळं समजून गेला, की आपल्याबरोबर ह्या मुलीचं लग्न लावायला तिचे आईवडिल कसे तयार झाले. संकेतच्या आईने त्यांना बरोबर समजावून ठेवलं होतं.
" असं काही नसतं आई..! एक मुलगी मुलं होत नाही म्हणून स्वतःच्या नवऱ्याला स्वतःहून सोडेल का..? " आणि ती मुलगी तिच्या आईकडे जाऊन बोलली, " आई..! जर उद्या माझ्यासोबत असं झालं तर..?"
" असं काय अभद्र बोलतेयस...!"
" अगं..! फक्त विचार कर..! मग मी ही तुमच्याकडे परत आली तर..? समज ह्यांची आधीची पत्नी माझी मोठी बहीण म्हणजे तुझी मोठी मुलगी असती तर..?"
" ए मुली.! काय काय बोलत सुटली आहेस ग..? नको ते विचार काय करतेयस..!"
" बस..! तुला काय बोलायचं आहे ते मी समजलो..!" त्या मुलीचे बाबा मध्येच बोलले. तशी ती मुलगी शांत झाली. मग ते संकेतच्या आईला बोलले.
" माफ करा..! माझ्या मुलीला जे बोलायचं होत ते ती बोलली. ती ह्या लग्नाला तयार होती. पण आता तिने जे मत मांडलं आहे, त्याला मी सहमत आहे."
" म्हणजे..?" संकेतची आई बोलली.
" म्हणजे आमच्या मुलीला हे लग्न मान्य नाही.!"
संकेत मनातून खूष झाला,पण चेहरा पडल्यासारखा उभा होता. त्याच्या आईला त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटलं.
" तुम्हाला जर तुमच्या मुलीच्या मनाप्रमाणे स्थळ बघायचं होत तर आमच्याबरोबर बोलणी का झाली..? " संकेतची आई रागावून बोलली.
" तेंव्हा आमची चुकी झाली की आम्ही योग्य चौकशी नाही केली. तुम्ही निघा आता..!" त्यामुलीचे वडील असे बोलल्यावर संकेतची आई आणि त्यांच्यात खूप वाद झाले. वाद अजून वाढू नये म्हणून संकेत मध्ये पडला. त्याने आईला समजावत त्यांच्या घराबाहेर आणलं आणि ते तिथून निघाले.
संकेतच्या मनासारखं झालं होतं, पण त्याची आई खूप चिडली होती. घरी जाईपर्यंत तिच्या तोंडातून एकही वाक्य बाहेर पडलं नाही. घरी आल्यावर ती सोफ्यावर बसली. संकेत आतून पाणी घेऊन आला. आईला पाणी देत बोलला,
" आई..! ठीक आहेस ना..?"
" हं..! कशी बोलली ती पोरगी..? आईबापाने काहीच शिकवलं नाही का तिला.?"
" आई..! आता झालं गेलं विसर..!"
" असं कसं विसरू..! त्यांनीही संमती दिली होती म्हणून आपण तिथे गेलो होतो ना..?"
" हो आई..! पण लग्नाला आलेल्या मुलामुलींना त्यांच्या लग्नाचा विचार करताना त्यांची मतं विचारायला हवीत ना..!"
" हं..! आता हे सगळं निघालं..! पाहिले आईवडिल सांगतील तिथे मुलांची लग्न लावत.!"
" हो..! पण आता जग बदललं आहे.. पाहिले नात्या नात्यात लग्न होतं. आता जग जवळ आलं आहे. मुलं इतर समाजाच्या , इतर राज्यातून आलेल्या मुलांशी संपर्क साधता. त्यामुळे त्याच्या आवडी निवडी बदलतात. "
" पण हा विषय वेगळा आहे."
" वेगळा नाही आहे आई..! तीने मला असं विचारलं की उद्या मला मुलं नाही झालं तर तुम्ही मला घरातून निघून जाताना रोखणार नाहीत.? मी घरातून गेले नाही तर तुम्ही मला स्वतःहून हाकलून लावणार..? आता सांग आई..! मी तिला काय उत्तर द्यायला हवं होतं.?"
संकेतची आई निरुत्तर होऊन शांत राहिली. दोन घोट पाणी पियाली आणि बोलली,
" पण ती असा का विचार करतेय की तिला मुलं नाही झालं तर..? सगळ्यांच्या नशिबात असं थोडी असतं..?"
" तेच तर आई..! सगळ्यांच्या नशिबात असं थोडी असतं..! आता माझ्या आणि सुरुचीच्या नशिबी असं आलं तर त्याला आम्ही काय करू शकतो..? सुरुचीला काही आधीच माहीत होतं का..? "
संकेतची आई संकेतने बोलल्या ह्या वाक्यांचा शब्दशः अर्थ घेत होती. तिला ही जाणीव होऊ लागली की आपण आपल्या सुनेबरोबर किती चुकीचं वागलोय. तरी ती बोलली,
" पण मी तर तुझ्या भविष्याचा विचार करत होते. मुलं नसणं हे किती त्रासदायक असतं हे तुला आता नाही कळणार..! कसं ही असलं तरी आपलं स्वतःच मुलं ते स्वतःच मुलं. "
" हो आई..! मला समजतंय ग तुझं म्हणणं. पण सुरुचीच्या नशिबात नाही म्हणून तिला असं दूर करणं चुकीच नाही वाटत का.? आम्हाला ही मुलं हवंच आहे ना ग..! आम्ही ही प्रयत्न केले ना..! पण आता आम्हाला कोणता तरी अवघड वाटणारा निर्णय घ्यावा लागेल. पण तुझा विचार करून आम्ही ते निर्णय नाही घेतले..! तुझ्या बरोबर बोलूनच मी निर्णय घेतला असता. पण त्या आधीच सुरुची अशी निघून गेली."
" माझंच चुकलंच रे..! मी तिला वेडंवाकडं बोलली. तिने राग मनात ठेवला असणार..! तुझी काही चूक न्हवती. पण मुलं हवं म्हणून तुम्ही ते हल्लीचे डॉक्टर सांगतील तसं करणार किंवा मुलं दत्तक घेणार.. हे आमच्या सारख्या माणसांना पटणार नाही.!"
" मला समजतंय तुला काय बोलायचं आहे ते..! पण तुला तुझं नातवंड हवं आहे तस आम्हाला ही आमचं मुलं असायला हवं, असं वाटतंय ना..! मग आमच्यासाठी जे पर्याय उपलब्ध होतील ते सर्व उपाय करायला आम्ही तयार होऊ..! तू बोललीस तशी आताचे डॉक्टर सांगतील तसं करायला ही आम्ही तयार होऊ..! पण... पण तुला विचारूनच..! पण खरं सांगतो आई..!" संकेतने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलला, " मी सुरुचीला सोडून नाही राहू शकत आणि सुरीची ही माझ्याशिवाय नाही राहू शकत."
संकेतच्या आईने संकेतला जवळ घेतलं आणि बोलली,
" माझ्याकडून चूक झाली आहे ना..!मी तिची माफी मागेन.! मी तिला आपल्या घरी घेऊन येईन..! "
" नाही आई..! तू माफी मागू नकोस..! फक्त आम्ही जे निर्णय घेऊ त्याला तुझा होकार दे..! तिला मी समजावेन.! "
" तरीही ही मी तुझ्या सोबत तिच्या दादाकडे येईन..! तिला घेऊन यायला..!"
" थँक्यू आई..!"
" सुरुचीवर एवढ प्रेम करतोस तरी त्या मुलीबरोबर लग्न करायला कसा तयार झालास..?"
संकेत ह्या प्रश्नाने मनातच हसला. पण चेहऱ्यावर काही न दाखवता तो मान खाली घालून शांत राहिला. पण मनात हाच विचार करत होता की हा सगळा उपद्व्याप केला तो तुला सगळं कळावं ह्यासाठी..! पण तो सगळा उपद्व्याप सार्थकी निघाला हे बरं झालं.!
दुसऱ्या दिवशी संकेतने ऑफिसमध्ये जाऊन काल घडलेला सगळा प्रकार मनोज आणि पल्लीवीला सांगितला. दोघेही संकेत आणि सुरुचीसाठी खूष झाले. पुढे काही दिवसांनी संकेत आणि त्याची आई सुरुचीला घरी घेऊन यायला तिच्या दादाकडे गेले. सुरुचीचे दादा आणि वहिनी ही खूष झाले. सुरूचीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. आता सुरुची आणि संकेत पुढचा संसार सुखाचा जगायला लागले.
◆◆◆◆◆ समाप्त ◆◆◆◆◆
( लेखकाकडून.: क्षमस्व:..! मी ही कथा फक्त एका स्पर्धेपूर्ती एका भागात लिहिली होती. पण त्या भागाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ( २० हजार अधिक व्ह्यूज ) आणि वाचकांच्या मागणीमुळे मी ती कथा इथवर लिहिली. आशा करतो तुम्हाला आवडली असेल..! पण काही वाचकांच्या प्रेमळ विनंतीला मान देऊन ही कथा इथवर थांबवत आहे. सर्वच वाचकांचे आभार..! लवकरच भेट होईल नवीन कथे सह...! धन्यवाद..!!!!! - निरंजन सावंत. )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा