एकटी 'ती', अनं सावरली ( भाग २४ )

This is a created story by writer.


मनोज त्याच काम करत त्याच्या टेबलसमोरील चेअरवर बसला होता. पल्लवी संकेतला बाय बोलून तिच्या जागेवर येऊन बसली. मात्र तीच लक्ष मनोजवर होत. त्याच लक्ष आपल्यावर पडावं आणि आपण त्याला ' सॉरी' बोलावं, असं तिने ठरवलं होतं. स्वतःहून त्याच्याजवळ जाऊन सॉरी बोलण्याइतपत तिला तिची चूक वाटतं नसावी..!

बराच वेळ असाच गेला. दोघेही आपाआपल्या कामात व्यस्त होते. पण पल्लवी मात्र अधून मधून त्याच्याकडे पहात होती. ऑफिस मधून निघायच्या अर्धा तास आधी मनोजने त्याच काम हुरकल होतं. आता मनोज रिलॅक्स होऊन त्याच्या चेअरवर आरामात बसला होता. डोळे बंद करून मानेचा व्यायाम करत होता. काही वेळाने त्याने डोळे उघडले आणि इकडे तिकडे मान फिरवली. पल्लवी बसलेल्या दिशेला मान करताच त्याने पाहिलं की पल्लवी त्याच्याकडेच पाहत होती. चेहऱ्यावर तिचं नेहमीच गोड आणि पुढच्याला फ्रेश करून टाकणार स्मित हास्य होत. पण आज त्यात थोडे वेगळा, ' सॉरी'चा भाव दिसत होता. तिने फक्त होट हलवले, तोंडातून शब्द बाहेर काढले नाहीत. मनोज सगळं समजून गेला. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तो परत त्याच्या कॉम्प्युटरमध्ये पाहू लागला. तसं त्याला काम काहीच न्हवतं, पण उगाच कॉम्प्युटर मध्ये पाहत बसला होता. 

ऑफिसमधून निघायची वेळ झाली. संकेतने मनोजला आवाज दिला, तसा मनोज त्याच्या चेअरवरून उठला आणि त्याची बॅग घेऊन निघाला. पल्लवी मनात बोलली, 'हा संकेत काय आता मनोजला कायमचा बरोबर घेऊन फिरणार वाटतं. मला ही मनोजशी बोलायचं आहे. काय करावं..!' ती असा विचार करत असताना संकेतने तिला आवाज दिला,

" ओ पल्लवी मॅडम..! आज ओव्हर टाईम करायचा आहे का..?"

" हं..! नाही..! "पल्लवी भानावर आल्यासारखी बोलली.

" मग चला..!"

" हो..! निघतेच आहे.!" असं बोलून तिने घाई करत तिची पर्स उचलली आणि चेअरवरून उठून त्यांच्या मागे निघाली.

तिघे ही ऑफिसमधून बाहेर पडले. ते तिघे एकत्र होते खरे पण संकेत मनोजचे कान खात होता. मनोज त्याची मदत करत होता. पण दुसऱ्याच्या आयुष्यात आपण इतकं बोलणं त्यालाही पटतं नव्हतं. काय माहीत, उद्या संकेतची आई रागावली आणि संकेतला काही उलट सुलट बोलली तर. आणि ह्याचा राग येऊन संकेत आपल्यावर चिडला तर. पण आता आपण आपल्या मनातील सांगून मोकळं झालो आहोत. आता त्याला जे करायचं आहे ते त्याने करावं.

इथे पल्लवी संकेतकडे फुगून पहात होती. शेवटी संकेतने मनोजला बाय केलं आणि पल्लवीला ही बाय केलं. पल्लवीने त्याला बाय बोलताना तिच्या मनात असं होतं की, ' लवकर निघ आता.'. संकेत त्याच्या वाटेला निघून गेला. तसा मनोज दुसरीकडे वळून त्याच्या वाटेकडे निघाला. पल्लवी लगेच त्याच्या बरोबर चालू लागली. काही पावलं मनोजकडे पाहून टाकत ती बोलली,

" मनोज.."

मनोज तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे बघत चालत होता.

" मनोज..!" पल्लवीने पुन्हा आवाज दिला.

मनोजने परत न पाहिल्यासारखं केलं.

" मनोज..! सॉरी ना..! एवढा रागावला आहेस माझ्यावर..?" पल्लवी पटापट बोलत गेली.

मनोजने ऐकलं, पण काही बोलला नाही. पल्लवीने आता मात्र त्याची बॅगच मागे खेचली. मनोजला ते जाणवलं. त्याने थांबून मागे वळून बॅगकडे पाहिलं.पल्लवी बॅग पकडून उभी होती. 

" सॉरी..! आता कितीवेळ सॉरी बोलू..?" पल्लवी बोलली.

" मी कुठे बोललो सॉरी बोल म्हणून.!" मनोज इटक्यावेळाने पहिल्यांदा बोलला.

" हो..! पण तू काहीच बोलत नाही आहेस. मला माहित आहे तू माझ्यावर रागावला आहेस.!"

" असं काही नाही. बॅग सोड आता..!"

" नाही सोडणार.! पहले तू मला माफ कर..!"

" कशा बद्दल..?"

" जस की तुला माहीत नाहीच..!"

" नाहीच माहीत आहे.!"

" मग बोलत का नाहीस माझ्याशी..?"

" बोलतो तर आहे..!"

" असं..? नेहमी सारख बोलत नाही आहेस."

मनोज शांत झाला. त्याने त्याची बॅग पल्लवीकडून खेचली आणि परत चालायला लागला.

" सॉरी मनोज. मी तुला समजून नाही घेतलं." पल्लवी मनोजच्या मागे चालत चालत बोलली.

" काय समजून नाही घेतलंस..?"

" संकेतने मला सगळं सांगितलं. तू त्याची कशी मदत करत आहेस."

" अच्छा..! म्हणजे संकेतने तुला सांगितल तेंव्हा तुला समजलं.? तु स्वतःहून मला नाही ओळखू शकलीस."

" म्हणून सॉरी बोलली ना."

" पण तू सॉरी का बोलतेयस हे मला समजलं नाही.?" मनोज वैतागून बोलला, " जी व्यक्ती आपली नाही, त्या व्यक्तीला आपण का समजून घेऊ..! तू मला गृहीत धरलं होतंस ना..? आता तुला वाटतंय की मी तसा नाही. उद्या परत तुला अजून काही वाटेल." मनोज बोलत गेला.

" म्हणून तर सॉरी बोलले ना!"

" हं..! सॉरी..!" 

" तू माझ्यावर खूपच चिडला आहेस. मला माझी चूक कळली. आता मला माफ नाही करणार..?"

" मी काय माफ करू तुला.? मला वाटायचं तू मला समजून घेतेस. पण ... " असं बोलून मनोज थांबला.

" पण काय.?? मी नाही तुला समजून घेतल ना..? म्हणजे मी वाईट आहे..?"

" वाईट नाही. पण आपण एखाद्या व्यक्तीला आपलं मानतो आणि तीच व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही, आपले म्हणणं तिला समजत नाही तर अशा व्यक्तीला आपलं मानून आपण चूक करतो, असं मला वाटत."

" म्हणजे..? तू मला ती तुझी व्यक्ती मानतोस..?"

" मानलं होत..! आता नाही." एवढ बोलून मनोज तिथून लांब पावलं टाकत निघून गेला.

" मनोज.! मनोज..! थांब..!" पल्लवी त्याला हाक मारत होती. पण मनोज कुठे थांबतोय. तो निघून गेला. पल्लवीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मनोज आपल्याला एवढ जवळची व्यक्ती मानत होता आणि आपण त्याच अर्ध बोलणं ऐकून त्याला चुकीचं समजलो. पण तो काय म्हणाला..? आपली व्यक्ती..? म्हणजे..? ओहह..! खरचं..! मनोज आपल्याला लाईक करत होता.? पण तो कधी बोलला नाही..! बोलणार होता का..? पण आता काय..? आता तर तो आपला विचार ही नाही करणार..? असं असेल तर तो खूपच दुखावला गेला असेल. असा विचार करत पल्लवीने मनोजला कॉल लावला. पण मनोज कॉल उचलत न्हवता. शेवटी पल्लवी घरी निघून गेली.


इकडे संकेत घरी पोहोचला. त्याची आई त्याची वाट बघत होती. संकेत फ्रेश होऊन आल्यावर तिने त्याच्यासाठी चहा बनवला. दोघेही हॉलमध्ये बसून चहा पिऊ लागले. संकेतच्या आईने संकेतला प्रश्न केला,

" उद्या सुट्टी आहे ना..?"

" हो..! रविवार ना..!" संकेत बोलला.

" बरं..! मग मुलीकडच्यांना कळवू का..? आपण त्यांच्याकडे मुलगीला बघायला येतोय म्हणून.?"

" उद्या..? लगेच..?"

" मग काय झालं..? ते ही घाईत आहेत..!"

" बरं..! तू ठरव काय ते..!"

" हं..! मग मी त्यांना तस कळवते..! आपण संध्याकाळी तिच्या घरी जाऊ..!"

" म्हणजे.? ती इथे जवळपास राहते..?"

" जवळपासच म्हण तसं. आणि जवळचीच होती म्हणून लगेच कळलं मला..! "

" ठीक आहे..! मी आत बसतो."

" बस. बस. मी त्यांना कॉल करते." असं बोलून संकेतच्या आईने मुलीच्या आईला कॉल करायला मोबाईल हातात घेतला आणि त्यांना कॉल लावला.

संकेत बेडरूममध्ये येऊन बसला. तो मुद्दाम तिथे आला होता. कारण त्याला मनोजला कॉल करायचा होता. आपण प्लॅन केलेल उद्याच घडवायचं होतं. हेच संकेत मनोजला सांगणार होता. संकेतने मनोजचा नंबर डायल केला. मनोजच्या मोबाईलवर रिंग होत होती,पण मनोज कॉल उचलत न्हवता. संकेतने दोनदा प्रयत्न केला. शेवटी मनोज बिझी असेल असं समजून त्याने परत त्याला कॉल केला नाही. संकेतच्या आईने त्या मुलीच्या आईला कॉल करून ते मुलगी पाहायला येत असल्याच कळवलं. त्यांचा बघण्याचा छोटेखानी कार्यक्रम निश्चित झाला. पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यात काय घडणार आहे..! पण खरंच, संकेत हिम्मत दाखवून मनोज बोलला तसं त्या मुलीला बोलेल.?? आणि बोललाच तरी ती मुलगी त्याला नकार देईल..? की आईवडीलांच म्हणणं ऐकून संकेतशी लग्नाला तयार होईल..?

🎭 Series Post

View all