एकटी 'ती', अनं सावरली ( भाग विसाव्वा )

This is a created story by writer. Do not compare with anyone's real life.


संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर संकेत घरी जायला निघाला. मागून मनोज आणि पल्लवी ही निघाले. संकेतशी आता काय बोलावं हे त्यांनाही सुचत न्हवतं. धीर द्यावा तर कसा..? काय बोलावं त्याला..? की झालं गेलं विसरून जा म्हणावं..? 

" बाय संकेत.!", शेवटी जाता जाता मनोज संकेतला बोलला.

संकेतने त्याच्याकडे पाहिलं. उजवा हात छातीपर्यंत वर करून थोड्या हसऱ्या चेहऱ्याने त्याने मनोजला बाय केलं.

मनोज आणि पल्लवी दोघे एकत्र थोडे पुढे चालत होते. मग काही अंतरावर दोघांचेही मार्ग वेगळे होणार होते. पल्लवी काही विचारात होती. तिला असं पाहून मनोज बोलला,

" ओ मॅडम..! तुम्ही संकेतच्या विचारात अडकलात की काय..?"

" हं..? " पल्लवी भानावर येऊन बोलली.

" कोणत्या विचारात आहात..?"

" काही नाही रे..!"

" बरं..! सांगायचं नसेल तर राहूदे..!"

" असा काय बोलतोयस..?"

" मग कसा बोलू..?"

" अरे..! मी पल्लवीचा विचार करत होते..!" 

" ओहहह..!"

" हं..! बिचारीवर काय वेळ आली आहे.."

" पण ती ठीक आहे ना तिच्या दादाकडे..!"

" हो..! पण तिचा संसार तुटतोय..!"

" हो..! ते तर आहेच..! पण तिला अशा नात्याचा त्रास होत असेल तर ते पुढे ओढत ताणत टिकवण्यात काय अर्थ आहे..!", संकेत बोलत होता.

पल्लवी मनोजकडे पाहत होती.

" संकेतने कोणता तरी ठाम निर्णय घ्यायला हवा..! सुरुची त्याची बायको आहे. तिच्यासाठी त्याच्या आईच्या विचारात काहीतरी तडजोड करावी लागली पाहिजे..! आईला त्याने समजावलं पाहिजे..! "

" पण त्याची आई समजून घेईल का..?" पल्लवी मध्येच बोलली.

" त्यांना नातवंड हवं आहे. आता सुरूचीचा असा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी दुसरे ऑप्शनस् आहेत ना..! फक्त त्यासाठी संकेतने त्याच्या आईला विश्वासात घेऊन, समजावून सांगितलं पाहिजे..!"

" असं बोलताना आपण एवढ बोलू शकतो. पण प्रॅक्टिकली करताना अवघड जातं..!" पल्लवी मनोजला हे सहजच बोलली. पण पल्लवीचा बोलण्यात जरा रुक्षपणा आला होता. मनोजने त्याचा वेगळा अर्थ घेतला. 

" अच्छा..?" मनोज थोडा रागात बोलला, " तुला असं वाटतं का की अशी परिस्थिती माझ्यावर आल्यावर मी आता बोलतोय तसं वागू शकत नाही..?"

"  तसं नाही रे.! पण अशी वेळ आली की जो तो मुलगा आपल्या आई वडिलांचा विचार करतो..! "

" हो का..? असेल ही..! पण मी त्यातला नाही..! लग्न झालं की आपल्या आई वडिलांबरोबर आपली बायकोही तितकीच महत्वाची असते हे कळतं नसेल तर लग्न का करतात असे लोक..!"

" तू शांत हो..!" पल्लवी मनोजचा आवाज वाढलेला पाहून बोलली.

" मी शांतचं आहे ..!" मनोजला ही भान होतं की ते रस्त्याने चालत आहेत.

दोघे ही खाली मान घालून तीन-चार पावलं पुढे गेले. अजून दोघांचे जाण्याचे मार्ग वेगळे होण्यासाठी बरंच अंतर बाकी होतं. तरीही मनोज पल्लवीला बोलला,

" चल.! बाय..!" 

" इतक्यात..? दुसरीकडे कुठे जायचं आहे का..?"

" नाही..! पण जरा लवकर घरी जायचं आहे.! "

" ठीक आहे..! जा..!" 

" बाय..!", पल्लवीकडे न पाहताच मनोज बोलला आणि झपाझप पावलं टाकत पुढे निघून गेला. 

पल्लवीने ओळखलं की मनोज आपल्यावर रागावला आहे. त्याला बाय बोलयच्या आतच तो खूप पावलं पुढे गेला. आता  उद्याच त्याला समोरासमोर समजावून सांगू की त्याला दुखावण्याचा आपला कोणताही हेतू न्हवता. पण एकंदरीत पाहिलं तर सगळे मुलगे असंच वागतात किंवा वागू शकतात हा न्यूनगंड समाजात असतो. त्यामुळे त्यात एखादा मुलगा अपवाद निघालाच तरी तो मुलगा म्हणजे बायकोचा बैल, बायकोचं ऐकणारा, जन्मदात्या आई-वडिलांच्या विरोधात गेला म्हणून त्याचं समाजाकडून हिणवला जातो. म्हणजे 'इकडे आड तर तिकडे विहिर' अशीच काहीशी स्थिती त्याची होते. त्यामध्ये सुवर्णमध्य काढणं म्हणजे खूप मोठं काम. पण तो ही सुवर्णमध्य निघणं फक्त त्या मुलावर अवलंबून नसतं, तर त्यात त्याचे आई वडील ही पुढारलेल्या विचारांचे, पुरोगामी असायला हवेत.

पल्लवी थोडावेळ तिथेच उभी होती. मनोजच्या पाठमोऱ्या देह तिच्या दृष्टीआड होईपर्यंत ती त्याला पाहत होती. मनोजने एकदाही मागे वळून नाही पाहिलं. मनोजचा तसा स्वभाव न्हवता. पण कदाचित आज तो नक्कीच दुखावला होता. पल्लवी आता तिच्या मार्गाला लागली.

संकेत घरी पोहोचला. त्याची आई त्याची वाट बघतचं होती. मात्र सुरुची घरी नाही ह्यामुळे संकेतला घरी गेल्यावर कोणताच उत्साह न्हवता. बरेच दिवस असेच निघून गेले. ह्या दिवसात संकेतची आई संकेतबद्दल इतर नातेवाईकांना सांगत होती. संकेतच्या पुन्हा लग्नासाठी मुली शोधायची सुरुवात झाली होती. संकेतला ह्याचा तिळमात्रही गंध न्हवता. काही दिवसांनी संकेतसाठी एका मुलीचं स्थळ त्याच्या आईने निश्चित केलं. 

मुलगी सुंदर होती, सुशिक्षित होती. ती संकेतसोबत लग्नाला तयार होताना संकेतच्या आईने तिच्या आई-वडिलांना संकेतच्या पूर्व लग्नाबद्दल सगळं सांगितलं होतं. पण त्या मुलीच्या आईवडिलांना सुरुची कशी स्वतःहून संकेतला सोडून गेली आणि आता परत येणार नाही आहे, हे एकदम बनवून सांगितलं. त्या मुलीच वय एकोणतीस झालं होतं. संकतच वय तसं तिशी पार न्हवतं, पण आधीच लग्न मोडणार होत. त्यामुळे दोन्ही बाजू सांभाळून घेत हे लग्न ठरलं होतं. पण संकेतला ह्याबद्दल काहीच माहीत न्हवतं.

संकेतच्या आईने मुलीचा फोटो मिळवला आणि तो संकेतला दाखवायला घेऊन आल्या. संकेत नेहमी सारखा बेडरूममध्ये बेडवर पडून होता. त्याची आई बेडरूममध्ये आली. संकेतच्या शेजारी बसून संकेतला बोलली,

" तुझ्याबद्दल मी पुढचा विचार केला आहे..!"

संकेतने फक्त आईकडे पाहिलं.

" हा फोटो बघ..!" असं बोलत त्या मुलीचा फोटो त्यांनी संकेतकडे दिला. संकेत तो फोटो हातातून झिडकारून लावत बोलला,

" हे काय आई..?"

" काय म्हणजे..?". असं बोलत त्यांनी खाली पडलेला फोटो उचलला आणि संकेतच्या समोर धरून बोलल्या, "बघ किती सालस मुलगी आहे. तुझ्या आणि सुरुचीबद्दल मी तिला खरं खरं सांगितलं. ही सगळं समजून घेत तुझ्याबरोबर लग्नाला तयार झाली."

" ती काय कुणीही माझ्या सोबत लग्नाला तयार झाली तरी मी दुसरं लग्न करायला तयार नाही. बस..!" संकेत वैतागून बोलला.

" मग काय आयुष्यभर असा एकटा राहणार आहेस का..?" संकेतची आई पण रागावून बोलली.

संकेत तोंड फिरवून शांत राहिला. त्याला माहित होतं, आईच्या शब्दाला शब्द दिला तर विषय वाढत जाईल. 

" तु काय आता तिच्या आठवणीत असा एकटा जगणार आहेस का..? तुला दुसरं लग्न करावंच लागेल.", संकेतची आई त्याला सूनवत होती. " तुला आत्ता काही वाटणार नाही. पण वय झालं की तुला ही शहाणपण येईल. पण उशिरा आलेलं शहाणपण काय कामच...", असं बोलत त्यांनी फोटो संकेतच्या समोर ठेवला आणि त्या बेडरूममधून बाहेर गेल्या. 

संकेतने तो फोटो उचलला आणि बेडच्या बाजूच्या टेबलच्या खणात टाकून दिला. परत ह्या प्रकरणावरून दोघा माय-लेकांमध्ये अबोला निर्माण झाला. परत परत संकेतची आई अधून मधून संकेतला त्या मुली बद्दल विचारत होती. संकेतही त्या प्रकरणावर मौन बाळगून होता.

संकेतच शांतपणे, कोणाशीही कोणत्या गप्पा टप्पा न करता, खास करून मनोज आणि पल्लवीशी ही ऑफिसला येणं जाणं चालू होतं. त्या रस्त्यावरच्या प्रकरणावरून मनोजही पल्लवीबरोबर नेहमी सारख बोलत न्हवता. पल्लवी त्याला कित्येकदा समजावून झाली की तिच्या बोलण्याचा तसा अर्थ न्हवता. मनोज तिच्या हो ला हो देत पण त्याचं वागणं बदललेलंच राहील. अशा परिस्थितीत संकेत, मनोज आणि पल्लवी एकमेकांशी जास्त काही न बोलता आपल्या कामात व्यस्त राहायचे. 

शेवटी एके दिवशी जेवणाच्या वेळेस तिघे ही एकत्र बसले असताना संकेत स्वतःहून बोलला,

" आई माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करतेय..?"

" काय..? " पल्लवी बोलली.

" हो..! काही दिवसांपूर्वी तिने मला त्या मुलीचा फोटो दाखवला होता. आता नेहमी ती तोच विषय घेऊन बसते."

" मग..?  काय करायचं ठरवलं आहेस तू.?" पल्लवीने उत्सुकतेने विचारलं.

" काय म्हणजे..? मी तिला स्पष्ट नाही म्हणून सांगितलं..!"

" तरी ही आई विचारत राहते..?"

" तिचं म्हणणं अस आहे की, सुरुची यायला तयार नाही. तू किती दिवस असा एकटा राहणार आहे..? कधी तरी तुला ही वाटेल..! वय निघून गेलं की कुणी भेटणार नाही.. वगैरे वगैरे.."

" ओह..! मला तर वाटतं तू आईला स्पष्ट सांगावसं की आता तरी तू माझ्या आयुष्याचा विचार नको करुस..! "

" हं..!" एवढं बोलून संकेत आणि पल्लवीचं संभाषण संपलं.

मनोज ही तिथेच होता. तो हे सगळं ऐकतच होता. पण त्याने दोघांच्या मध्ये न बोलणं पसंद केलं. पण नंतर तो एकाएकी बोलला,

" मला वाटतं तू त्या मुलीला भेटावंस..!"

मनोजच्या ह्या वाक्याने संकेत आणि पल्लवी दोघांनीही झटकन मान वळवून मनोजकडे पाहिलं. संकेत काही बोलायच्या आत पल्लवी बोलली,

" काय..? म्हणजे तुला काय बोलायचं आहे..?" 

" तू एकदा त्या मुलीला भेट..!" मनोज पल्लवीकडे न पाहताच बोलला.

पल्लवीला ह्या गोष्टीचा इतका राग आला की ती तिथून उठून तडक बाहेर पडली आणि तिच्या चेअरवर जाऊन बसली. संकेत पल्लवीचा असा रागावलेल्या चेहरा पहिल्यांदा पाहत होता. मनोजला मात्र ह्याच काही वाटलं नाही.

🎭 Series Post

View all