Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग सहावा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग सहावा )

आज सोमवार होता. सुरूचीची सकाळ पासूनची कामासाठीची धावपळ चालू झाली होती. तसं ही तिची दररोजची काम ठरलेली होती. ती तिला दररोज करावीच लागत होती,पण आज सोमवार होता. संकेत कामाला जाणार होता. लवकर उठून त्याच्या नाष्ट्याची आणि जेवणाच्या डब्ब्याची तयारी करायची होती. संकेत उठून आंघोळीला गेला. सासूबाई ही उठून देवाचं नाम स्मरण करत बसल्या होत्या. संकेत आंघोळ करून ऑफिसला जायची तयारी करून हॉल मध्ये आला. लागलीच सुरुची त्याच्या साठी चहा नाष्टा घेऊन हॉल मध्ये आली. सासुबाईनाही तिने चहा आणून दिला.

संकेतचा नाष्टा झाल्यावर संकेत ऑफीससाठी निघाला. आता घरात नेहमीसारखं सुरुची आणि तिच्या सासूबाईचं. संकेत ऑफिसमध्ये गेल्यानंतर सासूबाईंचे तेच टोमणे आणि तेच तेच बोलणं आठवढ्याच्या सहा दिवस तरी सुरुचीला ऐकून घ्यावं लागतं असे. आज ही त्याची सुरुवात होणार होतीचं. सुरुचीची एक चूक आणि सासूबाईंच तोंड चालू.

सुरुची नाष्टा आणि चहाची भांडी आवरून घासायला घेऊन गेली. तेवढ्यात सासूबाई बोलल्या,

" आंघोळीच पाणी काढ..!"

" हो आई..!"

सुरुची बाथरूममध्ये गेली. गिझरच गरम पाणी कडून बाहेर आली. सासूबाई आंघोळीला गेल्या. सुरुचीने घरचं सगळं काम आवरलं होतं. संकेत ऑफिसमध्ये जाणार असल्यामुळे त्याच्या डब्ब्याला सगळं जेवणच सुरुची सकाळी बनवायची. म्हणजे दुपारचं जेवणचं सकाळी बनवून व्हायचं.

सासूबाईं आंघोळ करून बाहेर आल्या, तशी सुरुची बेडरूममध्ये जाऊन बसली. सासूबाईं हॉलमध्ये आल्या आणि त्यांनी सुरुचीला आवाज दिला,

" सुरू..! इकडे ये जरा..!"

आज चक्क 'सुरू'..! सासूबाईंनी असा आवाज दिल्यामुळे सुरुची क्षणभर चकीतचं झाली. पण तिने लगेच प्रतिसाद दिला. 

" आले आई..!"

असं बोलून सुरुची हॉलमध्ये आली. सासूबाई सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांनी सुरुचीला सोफ्यावर बसायला सांगितलं.

" बस..!"

सुरुची त्यांच्यापासून जरा लांबच सोफ्यावर बसली.

" काल काय होत होतं तुला...?" सासूबाईंनी पहिला प्रश्न केला. 

हा प्रश्न आणि पुढील प्रश्न ही सुरुचीला अपेक्षित होते. म्हणून तिने जमेल तेवढी स्पष्ट उत्तरे द्यायचं ठरवलं होतं.

" काल दुपारपासून जरा पोटात दुःखत होतं. मी ह्यांना सहज बोलले, म्हणून हे लवकर ऑफिसमधून आले."

" मग मला का नाही सांगितलंस...?" हा प्रश्न सुसूबाईनी काळजीच्या अधिकाराने विचारला होता की धाकात विचारला होता हे सुरुचीला समजलं नाही.

" एवढं काळजी सारखं न्हवतं म्हणून तुम्हाला नाही बोलले."

सासूबाईनी थोडावेळ घेतला आणि म्हणाल्या,

" बरं..! मग डॉक्टर काय म्हणाले.? कशामुळे पोटात दुखलं..?"

ह्या प्रश्नाला जरा स्पष्ट उत्तर देणं बरोबर असं समजून सुरुची बोलली,

" डॉक्टर बोलले, थोडं इन्फेक्शन आहे. त्यांनी तसं इंजेक्शन दिलं.."

" बरं ..." एवढ बोलून सासूबाईंनी मान टीव्ही कडे वळवली आणि टीव्ही चालू केला.

सुरुची सोफ्यावरून उठून बेडरूममध्ये गेली. सुरुची सासूबाईंच्या मनात काय होत हे ओळखून होती. पण त्यांनी एवढ्यावरच कसं बोलणं थांबवलं ह्याच तिला आश्चर्य वाटत होतं. नाहीतर एरव्ही लहान-लहान कारणांवरून आपल्याला  खडेबोल सुनवणाऱ्या आपल्या सासूबाई आज लगेच कशा शांत झाल्या. 

दोघींची दुपारची जेवणं झाली. संध्याकाळपर्यंतचा वेळ सासूबाईंनी झोपून तर सुरुचीने बेडरूमची आवराआवर करण्यात घालवला. संकेत ऑफिसमधून घरी आला. सुरुचीने लगेच चहा बनवायला घेतला. संकेत फ्रेश होऊन आला. सुरुची सासूबाई आणि संकेतसाठी चहा घेऊन हॉलमध्ये आली आणि चहा ठेऊन किचनमध्ये गेली.सासूबाईंनी चहा पीत पीत संकेतला प्रश्न केला,

" संकेत..? आता पुढे काय ठरवलं आहेस..?"

" कशाचं आई..?" संकेतने आश्चर्य व्यक्त करत प्रतिप्रश्न केला.

" अरे..! एकच तर प्रश्न आहे..! आणि तो मला महत्वाचा वाटतो..."

संकेत अजूनही न समजल्यासारखा शांत होता. म्हणून सुरुचीच्या सासूबाईचं परत बोलल्या,

" आजपर्यंत तुमच्याकडून गोड बातमी नाही. मला तर माझ्या नातवंडाच तोंड कधी पाहतेय असं झालंय..!"

ह्या वाक्याने संकेत पूर्णपणे शांत झाला. त्याने हातातील चहाचा कप सरळ खाली ठेवला. सुरुचीच्या कानावर ही त्यांचं हे संभाषण जात होतं.

" तुम्ही इतक्या डॉक्टरच्या फेऱ्या मारलात. पण काहीच उपाय मिळाला नाही. म्हणून मी विचारतेय, पुढे काय ठरवलंस तू..?"

" आई..! आता आम्ही काय विचार करणार अजून..?" संकेत जरा धिरकरून बोलला.

" आम्ही म्हणजे..? मी तिला नाही विचारत आहे. मी तुला विचारतेय..! तू काय विचार केलायस...?"

" आम्ही दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे जाऊन चौकशी करायचं म्हणतोय..!",संकेत तात्पुरत सावरायचा प्रयन्त करत बोलला खरा, पण त्याचं उलटंच झालं.

" तू त्या डॉक्टर बरोबर बोलला आहेस का..?"

" नाही..! म्हणजे अजून नाही बोललो,पण मित्राने त्यांच्या बद्दल सांगितलं आहे. खूप मोठे डॉक्टर आहेत ते."

" उगाच कशाला नको ते प्रयत्न करतोयस तू..! तुला माहीत आहे की तुझ्या ह्या बायकोला मूल होणार नाही. आता अजून डॉक्टर केले म्हणजे वेगळं काय होणार आहे?"

" पण आम्ही प्रयत्न करून बघतोयना आई..!" 

" ते मला काही माहीत नाही. तू असे प्रयत्न करून काही होणार नाही. आता मलाच काही बघावं लागेल."

" म्हणजे...?" संकेतने जरा मोठ्या आवाजात प्रश्न केला.

" तुझ्या दुसऱ्या लग्नाचं बघितलं पाहिजे. "

" काय...?" संकेत ओरडला.

" काय म्हणजे..? तुला अजून काही कळत नाही. वय निघून गेलं ना की तुला मुली भेटणार नाहीत. आताच काही बघावं लागेल. तू सुरुचीला सोडचिठ्ठी द्यायचं बघ..!"

संकेतला त्याच्या आईची ही वाक्य ऐकून धक्काच बसला. त्याला सुरुचीच्या रडण्याचा बारीक आवाज येऊ लागला. तसा तो सोफ्यावरून उठून त्याच्या आईला बोलला,

" आई..! तू असे टोकाचे विचार नको करुस..! अजूनही वेळ गेलेली नाही."

 एवढं बोलून तो किचनमध्ये गेला. सुरुची खाली बसली होती. तिच्या दोन पायांमध्ये तोंड घालून ती रडत होती. संकेत तिच्याजवळ पायांवर भार देत बसला. सुरुचीच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला. सुरुची मात्र मान वर करायला तयार न्हवती. ती खाली मान घालून हुंदके देत होती. मग संकतेने जरा जोर लावताच तिचे खांदे मागे ढकलले. तसा सुरूचीचा चेहरा तिच्या पायातून दूर झाला. संकेतने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. तिच्या डोळ्यातून येणारी आसवं पुसत तिला बोलला,

" ओ रडू बाई..! नका रडू आता..! मी आहे ना..!"

सुरुची अजूनही हुंदके देत होती.

" ए..! असं काय करतेयस..? आई बोलली ह्याच तुला वाईट वाटणं बरोबर आहे,पण मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे..!"

सुरुची मात्र त्याच्या बोलण्याला कोणताच प्रतिसाद देत न्हवती. मग संकेतने तिच्या हनुवटीखाली त्याच्या उजव्या हाताची बोटं ठेवत जरा जोर देत सुरूचीचा चेहरा वर केला. तरीही सुरुची डोळे बंद ठेऊन रडत होती. मग संकेतच बोलला,

" ठीक आहे .! बस रडत..! मी चाललो घर सोडून..!"

असं बोलतच सुरुचीने डोळे उघडले आणि रडतच म्हणाली,

" तुम्हि कुठे जातंय..? मलाच ह्या घरातून बाहेर गेलं पाहिजे...!" आणि ती अजून रडायला लागली.

" ठीक आहे..! ह्या घरातून तू निघून गेलीस तर मी पण निघून जाणार..!"

" तुम्ही कुठे जाणार..?"

" जाईन कुठे ही..! तुला काय..?"

" दोष माझ्यात आहे. तुम्ही का तुमच्या आईंना सोडून जाणार..?"

" असं कसं..! दोष माझा ही आहे. मी तुझ्याबरोबर लग्न केलं ना..! मग आईच्या समोर मी ही दोषी आहे."

" तुम्ही का दोषी..? तुम्हाला थोडी माहिती होत की मी आई होऊ शकत नाही. तुम्हाला होईल मूल दुसऱ्या बाई कडून..! " असं बोलून सुरुची जोरात रडू लागली.

" मग तुला तरी कुठे माहीत होतं की तुला मुलं होऊ शकतं नाही. मग दोष तुझा कसा..?" संकेत असं बोलला आणि सुरुचीला काय बोलावं हे सुचलचं नाही. संकेत जे बोलला त्याला कोणाकडेही प्रतिउत्तर न्हवतं. कारण तेच सत्य होत. संकेतने सुरुचीचे डोळे फुसले आणि तिला कवेत घेतलं.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now